Saturday, November 23, 2013

व्यायाम

किती वेळ झाला असावा कळेना ..कोणीतरी मला दुरून हाक मारत असल्यासारखा आवाज आला ..मी पटकन डोळे उघडून पहिले ..माझ्या बाजूला शेरकर काका उभे राहून मला हाक मारत होते ...उठून बसलो ..काय झाली का झोप ? त्यांनी मिस्कीलपणे विचारले ..मी खजील झालो ..सर शवासनाच्या सूचना देत असताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही ..' होते असे ..अहो बाहेर खूप दिवस आपण दारू पिवूनच झोप काढली होती ..ती काही खरी झोप नव्हती .फक्त गुंगी असायची ..इथे दारू नसताना शरीर आपोआप राहिलेली झोप अशी मधूनच पूर्ण करून घेते . ..चला चहा घ्यायला लाईनीत ' असे म्हणत काकांनी माझ्या हातात एक ग्लास दिला ..चहा घेत गप्पा मारत बसलो ..दोन दिवसातच जरा हुशारी आल्या सारखे वाटत होते...सगळे जण चहा पीत गप्पा मारत होते ..दोन जण आमच्या बाजूलाच बसून बिस्किटाचा पुडा फोडून चहा बरोबर बिस्किटे खात होते .. माँनीटर तेथे जाऊन उभा राहिला आणि त्यातील एकाला रागावू लागला ..' सुनील काय रे उपोषण करणार होतास ना तू ? आता का खातो आहेस बिस्किटे ? संपली का ताकद तुझी ? ' ..सुनील नावाचा तो सधारण विशीचा मुलगा एकदम वरमला ..त्यांनीच मला बोलावले असे सांगू लागला ..मला कळेना इतक्या सध्या गोष्टीवरून माँनीटर सुनीलला का रागावला ..मला सुनीलची दया आली .. माँनीटर माझ्याकडे वळून म्हणाला ..अरे हो ..तुम्हाला सांगायचे राहिले ..या सुनीलला तुमच्याकडील काही खाण्याच्या वस्तू मागितल्या तर देवू नका अजिबात ' मग पुढे म्हणाला ' परवा याच्या घरची मंडळी भेटायला आली होती तेव्हा ..हा घरी घेवून चला म्हणून त्यांच्या कडे हट्ट करत होता ..त्यांनी ऐकले नाही ..म्हणून रागावून याने त्यांनी आणलेल्या खायच्या वस्तू फेकल्या ..त्यांना धमकी दिली की मला आज घरी नेले नाही तर मी आजपासून अन्न पाणी ग्रहण करणार नाही अशी ..बिचाऱ्याची आई काळजीने रडतच घरी गेली ..कसले उपोषण न कसले काय ..इथे मिळणारे जेवण जेवत नाहीय ..मात्र कालपासून सगळ्यांकडे बिस्किटे ..फळे वगैरे त्यांच्या घरून आलेल्या वस्तू फस्त करत बसलाय नाटकी आहे खूप ....मागच्या वेळी असाच धमक्या देवून उपचार पूर्ण न करताच घरी गेला ..लगेच दुसर-याच दिवशी दारू प्यायला कारण काय तर म्हणे ..मित्राने आग्रह केला ..' ..मलाही सुरवातीला इथे आणले म्हणून अलकाचा राग आला होता ..मात्र नंतर जे होतेय ते माझ्याच भल्यासाठी हे मला समजले तेव्हा माझा राग निवळला होता ..सुनीलला अजूनही इतकी साधी गोष्ट समजल नाही याचे मला नवल वाटले .सुनीलकडे मी पहिले तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि निघून गेला ..' निर्लज्ज आहे भलता ' असे म्हणत माँनीटर देखील निघून गेला .
घडयाळाकडे पहिले साडेपाच वाजत आले होते ..खिडकीशी जावून उभा राहिलो ..बाहेर आकाशात ढगांनी गर्दी केली होती ..बहुतेक पाउस पडणार अशी चिन्हे वाटली ...ढगाळलेले वातावरण पाहून मनात आले अशा वेळी मस्त हातात ग्लास घेवून खिडकी बाहेर निसर्ग बघत दोन पेग घ्यायला मस्त वाटेल ..मी गमतीने बाजूला उभ्या असलेल्या शेरकर काकांना तसे म्हंटले ..त्यांनीही हसून टाळी दिली मला ..गम्मत अशी की आम्ही दोघेही व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासठी दाखल होतो ..मात्र दारूचे विचार मनात होतेच ..मी भानावर येवून खिडकी जवळून दूर झालो ..चार जण हॉल मध्ये कँरम खेळत होते तेथे जाऊन बसलो ..छान रंगला होता खेळ ..एक बोर्ड झाल्यावर एकाने उठून मला खेळायला जागा दिली ..मी पण उत्साहाने बसलो ..पूर्वी कॉलेजमध्ये असताना मी छान खेळत असे ...गेल्या दहा बारा वर्षात अजिबात हात लावला नव्हता कँरमला ..बोर्ड घरातच कुठेतरी कोपर्यात धूळ खात पडला होता ..पहिला बोर्ड मला अवघड गेला ..अजिबात एकही सोंगटी घातली नाही मी ..जरा जोरात मारले जाई किवा एकदम हळू ..माझा पार्टनर मात्र समजूतदार वाटला ..मी एकही सोंगटी घेतली नाही तरी मला काही बोलला नाही ..उलट ' बहोत दिन के बाद खेलनेसे ऐसाही होता है ..म्हणत मला प्रोत्साहन देत गेला ...तीनचार बोर्ड खेळून बेल वाजल्यावर सगळे उठलो ..पुन्हा सतरंजी घातली गेली ..सगळे मांडी घालून बसले ..आता प्राणायाम आहे ..बाजूलाच येवून बसलेल्या शेरकर काकांनी माहिती पुरवली ..
प्रार्थना घेतली गेली ..मग शरीर संचालन नावाचा प्रकार सुरु झाला ..दोन्ही पाय पुढे पसरून पावले मांडीपासून चारपाच वेळा घोट्यातून डावीकडे आणि नंतर उजवी कडे फिरवायला सांगितले गेले ...दोन्ही हात मागे टेकून मी बाकीचे लोक कसे करतात ते पाहत ते करत गेलो ..मग दोन्ही पाय एकत्र जोडून पावले पुन्हा तशीच घोट्यातून चारपाच वेळा डावीकडे ..उजवीकडे फिरवून झाले ..छान वाटत होते ..पायाच्या सगळ्या शिरा ..सांधे मोकळे झाल्यासारखे वाटत होते ..मग हात समोर ताठ धरून दोन्ही हाताच्या मुठी तशाच डावीकडे ..उजवीकडे फिरवल्या ..मग हात कोपरातून वाकवून खांद्याजवळ आणण्याचा व्यायाम झाला ..शेवटी मान एका डाव्या खांद्याजवळ ..एकदा उजव्या खांद्याजवळ असे चार पाच वेळा झाले ..मग खाली मान वाकवून ती पुढून मागे फिरवून पुन्हा पुढे आणायला सांगितले ..सर्व सूचना दिल्या जात होत्या तसे करत गेलो ..
( बाकी पुढील भागात )