Saturday, May 31, 2014

बदनामीची भीती !

बदनामीची भीती ! ( बेवड्याची डायरी - भाग ५१ वा )


पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा वेळी त्याला आपल्या चुकांचा ..व्यसनांचा तसेच व्यसनासाठी केलेल्या भानगडींचा कबुली जवाब देणे अवघड वाटते ..' तो मी नव्हेच ' असा त्याचा अविर्भाव असतो ..खरे तर कुठून ना कुठून तरी आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या व्यसनी होण्याबद्दल माहिती कळलेली असते ..घरातील मोलकरीण ..सोसायटीचा वाॅचमन ...ऑफिसमधील सहकारी ..सोबत पिणारे मित्र ..अश्या लोकांकडून त्याच्या व्यसनी असण्याबद्दल व्यवस्थित माहिती पोचलेली असते सगळीकडे ..फक्त ' आपल्याला काय करायचेय ' या विचाराने लोक त्याच्या तोंडावर तशी चर्चा करत नाहीत ..किवा एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर व्यसनी त्याला अनेक समर्थने देवून उडवून लावतो ..अनेकदा कुटुंबीय देखील बदनामीच्या भीतीने तो व्यसनात अडकल्याची बाहेर कुठे वाच्यता करत नाहीत ..उलट कोणी तसा उल्लेख केला तर व्यसनीच्या चुकांवर पांघरून घालतात..असा हा आजार आहे ..त्यामुळे पाचव्या पायरीत सांगितलेले ' कन्फेशन ' करणे व्यसनी व्यक्तीला खूप जीवावर येते ' मुझको बरबादी का कोई गम नही..गम है बरबादी का क्यू चर्चा हुवा ' अश्या प्रवृत्तीने तो आपल्या चुका लपवून ठेवतो ..इतरांनी त्याच्याबद्दल चर्चा करू नये असे त्याला मनापासून वाटते ..कितीही झाकले तरी कोंबडे बांग देतेच हे विसरता कामा नये ..आपल्या चुकांवर पांघरूण घालून कुटुंबीय खरे तर आपल्या व्यसनीपणाला खतपाणी घालत असतात .
सर व्यसनी व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मनस्थिती बद्दल बारकाईने माहिती देत होते ..मला ते लागू पडते आहे हे जाणवले ..मी नेहमी बाहेरच्या लोकांमध्ये अगदी असेच वर्तन करत असे ..स्वतचा चांगुलपणा लोकांना जाणवावा असे वागत असे ..मी साधा भोळा..प्रामाणिक प्रवृत्तीचा ..जवाबदार ..सरळमार्गी व्यक्ती आहे असेच इतरांना भासवत असे ..खरेतर अनेकांना मी रोज दारू पितो ..दारूमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय ..माझ्या कुटुंबात भांडणे होत आहेत ..आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललो आहे ..कामावर दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलेय .वगैरे माहिती मिळाली असणारच ..कारण मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की चार माणसे एकत्र जमली की ते इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतातच ..तेथे हजर नसलेल्या व्यक्तीच्या दुर्गुणांची चर्चा करतात ..आपल्याला समजलेली गुप्त बातमी कोणाला सांगू नकोस असे म्हणत सगळीकडे वितरीत करतात .. फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याला कोणी काही बोलत नाहीत कारण त्यांना तो आपलं अपमान करेल अशी भीती असते किवा ' ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल ' या उक्तीनुसार गप्प राहतात ..अलका भांडणात आमचा आवाज वाढला की शेजारचे लोक ऐकतील या भीतीने चूप बसत असे ..सुरवातीला तर तिने माहेरी देखील माझ्या पिण्याबद्दल वाच्यता केली नव्हती ..सगळे काही छान आहे असेच भासवले होते ..माझ्या आईबाबांनी देखील कधी इतर नातलगांकडे माझ्या पिण्याचा विषय काढला नव्हता ...इतरांना समजले तर बदनामी होईल या भीतीने त्यांनी माझ्या चुकांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न केला होता ..पाचव्या पायरीत स्पष्टपणे म्हंटले होते की आपल्या चुका मोकळेपणी कबूल केल्या पाहिजेत तरच पुढे जाता येते ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये केले जाणारे शेअरिंग हा पाचव्या पायरीचाच एक भाग आहे ...प्रत्येकाने निर्भयपणे शेअरिंग करणे गरजेचे असते ..
सरांचे बोलणे सुरु असताना एकाने हात वर करून विचारले ' सर हे जे ईश्वर ..स्वतः ..व आदरणीय व्यक्तीजवळ चुकांची तंतोतंत कबुली दिली असे म्हंटले आहे.. ते तीन भाग का केले आहेत ..? " सरांनी त्याचे उत्तर दिले ..म्हणाले खरेतर जेव्हा आपण ईश्वरी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सर्वव्यापी ईश्वर ' यत्र ..तत्र ..सर्वत्र ' आहे असे म्हंटले होते ..म्हणजे प्रत्येक जीवात ते सर्वशक्तिमान चैतन्य वसलेले आहे ..तेव्हा चुकांची कबुली देताना नेमकी कोणाजवळ द्यावी हा प्रश्न पडतो ..किवा कोणाजवळही दिली तरी चालते का ? असा संभ्रम निर्माण होतो .. यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून हे तीन भाग आहेत ..पहिल्या भागातला ईश्वर म्हणजे आपले जवळचे कुटुंबीय ज्यात पत्नी ..आईवडील .भावंडे येतात ..आपण घरी अनेकप्रकारचे बेताल वर्तन केले आहे ..आपल्या वागण्याने कुटुंबियांना खूप त्रास झाला आहे ..आर्थिक ..मानसिक ..कौटुंबिक ..शारीरिक ..सामाजिक..आणि अध्यात्मिक या साऱ्या पातळ्यांवर जसे आपले नुकसान झालेय तसेच त्यांना देखील या सगळ्या पातळ्यांवर आपल्यामुळे त्रास झालेला आहे .. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध केला ..प्रतिकार केला तेव्हा तेव्हा आपण आक्रस्ताळे पणाने ..आक्रमकपणे ..त्यांना चूप बसवले आहे ..किवा त्यांनी आपल्याबद्दल चर्चा सुरु करतच तेथून काढता पाय घेतला आहे..त्यांना आपल्यामुळे त्रास होतोय हे कधीच त्यांच्या समोर मान्य केलेले नाहीय ..तर त्यांच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय असा कांगावा केला होता आपण ..पाचव्या पायरीचे आचरण करताना आपण जवळच्या नतलगांपुढे आपण त्यांना दिलेल्या त्रासाची कबुली देणे अपेक्षित आहे ..त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो ..तसेच आपण मनापासून सुधारू इच्छितो हे त्यांना समजते ..त्यांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळण्यास सुरवात होते ..आपल्या वागण्याबद्दल आपल्याला खरोखर पश्चाताप होतोय याची खात्री वाटते ..आता दुसऱ्या भागात " स्वतः जवळ कबुली दिली " असा उल्लेख आहे ..म्हणजे केवळ नातलगांकडे कबुली देणे पुरेसे नाहीय तर ..आपल्याला स्वतःला ते आतून ..अंतर्मनातून पटले पाहिजे ..अगदी मनाच्या खोल गाभार्यातून आपण चुकलो आहोत हे वाटले पाहिजे ..केवळ पाचव्या पायरीत सांगितले आहे म्हणून नव्हे ..किवा आपण व्यसनमुक्ती केंद्रात आलोत म्हणून नव्हे ..अथवा आता आपल्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरला नाही म्हणून ..इतरांनी लवकर आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून ..आपल्याला माफ करावे म्हणून ..पश्चाताप झालाय असे दाखवावे म्हणून नव्हे तर .मनापासून आपण चुकलो आहोत याची खोल जाणीव व्हावी अशी अपेक्षा आहे ..
( बाकी पुढील भागात )

Monday, May 26, 2014

स्वभावदोषांचे उच्चाटन ..नव्या व्यक्तिमत्वाला आकार !

स्वभावदोषांचे उच्चाटन ..नव्या व्यक्तिमत्वाला आकार ! ( बेवड्याची डायरी - भाग ५० वा )
" आपल्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती तसेच ..सुखी , समाधानी , संतुलित आणि उपयुक्त जिवन व्यतीत करणे खूप कठीण आहे " असे सांगत सरांनी आज समूह उपचारात पुन्हा ' आत्मपरीक्षण ' या संकल्पनेवर जोर दिला .." हट्टी .जिद्दी ...आत्मकेंद्रित ..बेपर्वा ..टोकाच्या नकारात्मक भावना ..आळशीपणा ..चालढकल करण्याची वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे तत्वज्ञान ..बेजवाबदारपणा ..इतरांच्या भावनांची किंमत नसणे ..स्वताचेच खरे करून दाखवण्याचा अट्टाहास ..अश्या प्रकारच्या व्यसनी व्यक्तिमत्वाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची चर्चा सरांनी केली ..खरे तर नेहमी स्वतःच्या बचावासाठीच एक व्यसनी धडपडत असतो ..प्रत्येक वेळी तो चुका करतो आणि आपल्याला इतरांनी माफ करावे असा त्याचा आग्रह असतो ..त्याच वेळी तो इतरांच्या झालेल्या चुका मात्र लक्षात ठेवून असतो ..त्या चुकांचा वारंवार उल्लेख करून तो ..स्वतःवर किती अन्याय झाला आहे याचा पाढा मनात वाचत रहातो ..त्यातून आत्मकरुणेचा भाव निर्माण होऊन ..आपण किती गरीब आहोत ..बिच्चारे आहोत ..हे जग खूप स्वार्थी आहे ..आपल्यावर किती अन्याय झालाय ..याचा हिशोब मनात ठेवत मानसिक संतुलनासाठी आधार म्हणून दारू किवा इतर मादक द्रव्यांचे सेवन करत रहातो .. स्वतःला आपण जोवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ..स्वतःचा शोध घेत नाही ..तटस्थपणे आपल्या चुकांचे परीक्षण करीत नाही ...तोवर आपल्या विनाशाला पूर्णपणे आपणच जवाबदार आहोत हे समजणार नाही ..शक्यता आहे की अनेक वेळा परिस्थिती ..आसपासची माणसे ..अघटीत घटना ..यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल ..परंतु अशा वेळी दारूचे सेवन करून परिस्थिती बदलत नाही ..अथवा समस्या सुटत नाही ..तर समस्या वाढते ...इतकी वाढत जाते ..की पुढे पुढे संघर्ष करण्याची क्षमता गमावून केवळ व्यसने करत राहणे हाच एक पर्याय आपल्यापुढे शिल्लक उरतो ..त्याऐवजी जर आपण जिवनावरील तसेच परमेश्वरावरील श्रद्धा जोपासली ..अखंड ठेवली तर नक्कीच आपल्या सकारात्मक क्षमता वापरून आपल्याला नव्याने उभे राहता येईल .."
" किती लोकांना आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले पाहिजेत हे मान्य आहे ? " सरांच्या या प्रश्नावर बहुतेकांनी हात वर केले आणि होकार दर्शवला ..एक जण तसाच मख्ख पणे बसून होता ..काय रे तुला सुधारावेसे वाटत नाही का ? असे सरांनी विचरताच तो म्हणाला ' सर माझ्या घरी माझे वडील देखील दारू पितात रोज संध्याकाळी ..त्यांना कोणी काही बोलत नाही मात्र मला येथे दाखल केलेय घरच्या मंडळीनी ..असे का ? " त्याच्या प्रश्नावर सर स्मित करत म्हणाले .. अगदी बरोबर प्रश्न पडलाय तुला..तुझ्या वडिलांनी देखील दारू सोडली पाहिजे असे तुला वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु इथे आपण स्वताच्या व्यसनमुक्तीसाठी दाखल झालो आहोत ..सध्या आपण फक्त स्वतःबाबत विचार करतो आहोत ..तू जर निश्चयाने प्रामाणिकपणे दारू सोडलीस तर नंतर तू वडिलांना देखील व्यसनमुक्तीसाठी मदत करू शकतो ..वडील पितात ..इतर नातलग पितात ..असे समर्थन करून आपण स्वतःचे व्यसन न्याय्य करू पाहतो आहोत ..एखादी चूक वडीलधारी माणसे करत असतील तर तीच चूक आपण केल्यास काही हरकत नाही हे तत्वज्ञान योग्य नाही ..तुझ्या वडिलांचे वय ..त्याच्या क्षमता ..त्याच्या जवाबदा-या ..यांची तुलना करता .कुटुंबीयांनी .. तू तरुण आहेस ..तुझे सगळे भविष्य घडायचे आहे ..तुला आधी उपचार दिले पाहिजेत असे ठरवले असले पाहिजे ..किवा वडिलांपेक्षा तुझ्या व्यसनमुक्तीला त्यांनी प्राधान्य दिले आहे.. हे खरेतर तुझ्या भल्या करिता आहे ..आता येथून सगळे चांगल्या प्रकारे आत्मसात करून तू बाहेर पडून व्यसनमुक्त राहिलास तर तुझ्या वडिलांना देखील उपरती होईल उपचार घेण्याची ..तू त्यांना मदत देखील करू शकशील व्यसनमुक्तीसाठी ..मात्र ते पितात म्हणून मी पितो हे समर्थन सर्वथा दुबळे आहे ..तू तुझ्या आईचा कधी विचार केला आहेस का ? नवरा आणि मुलगा दोघेही दारू पितात याचा आईला किती मानसिक त्रास होत असेल ? ती कशी सांभाळत असेल तुम्हा दोघांना ? तिची बिचारीची किती कोंडी होत असेल ? हा विचार कर आणि आधी स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी प्रामाणिक प्रयत्न कर " सरांनी सांगितलेले त्याला पटलेले दिसले ..त्याने होकारार्थी मान हलवली .
" आपल्या स्वभावातील दोष आपल्यासाठी हानिकारक आहेत हे मान्य केल्यानंतर ते आपल्या व्यक्तिमत्वाला पोखरून टाकून कुटुंबात ..समाजात आपल्याला बदनाम करत आहेत हे लक्षात घ्यायला हवे .हे स्वभावदोष काढून टाकून एका नव्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यास या पुढे आपण सज्ज झाले पाहिजे ..त्याची सुरवात पाचव्या पायरीपासून होईल असे म्हणत सरांनी पाचवी पायरी फळ्यावर लिहिली .." आम्ही ईश्वराजवळ ..स्वतःपाशी ..तसेच दुसऱ्या आदरणीय व्यक्तीपाशी आमच्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली दिली " सरांनी फळ्यावर लिहिलेली पायरी कोड्यात टाकणारी होती ..आपल्या चुकांची कबुली देण्याविषयी त्यात सुचवले होते ..मी जरा विचारात पडलो ..आजवर मी केलेल्या चुकांचे समर्थन केले होते ..आता त्याच सगळ्या चुका कोणाजवळ तरी कबूल करणे माझ्यासाठी कठीणच गोष्ट होती ..बहुतेक सरांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचले असावेत ते हसून म्हणाले " घाबरू नका ..ही चुकांची कबुली देणे कठीणच आहे हे मी जाणतो .. एक मराठी म्हण आहे ' मान सांगावा जनात ..अपमान सांगावा मनात " त्या नुसार आपण नेहमी आपल्या बाबतीत आपले यश ..सन्मान ..कर्तुत्व ..याबाबत आसपासच्या सर्वाना कळावे म्हणून धडपडत असतो ..आणि बहुधा आपल्या चुका ..अपमानाचे प्रसंग ..आपल्यामुळे झालेले नुकसान.. अशा गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो ..त्यामुळे आपल्या चुकांची जाहीर कबुली देणे अवघडच आहे आपल्यासाठी ..या पाचव्या पायरीला ' कन्फेशन ' अथवा बदलाच्या सुरवातीची नांदी म्हणता येईल ..ख्रिस्चन धर्मात अशा ' कन्फेशन ' ला खूप महत्व आहे ..आपण सिनेमात अनेकदा असे दृश्य पाहतो की जेथे ..चर्च मधील शांत गंभीर वातावरणात ' कन्फेशन ' बॉक्स मध्ये चेहऱ्यावर अतिशय प्रेमळ आणि आश्वासक भाव असणारा फादर ..समोर असलेल्या व्यक्तीचे ' कन्फेशन ' ऐकतो ..आणि नंतर त्याला दोष न देता धीर देतो ..मार्गदर्शन करतो ...अशी कबुली देणे ही बदलाची उपरती मानली जाते ..आत्मशुद्धीची ही एक महत्वाची सुरवात आहे..सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ अशी चुकांची कबुली देण्याबाबत सर्व धर्मानी मान्यता दिलेली आहे..असे केल्याने आपल्या मनातील अपराधीपणाची बोच निघून जाण्यास मदत मिळते .
( बाकी पुढील भागात )

बिंग फुटले

बिंग फुटले ( बेवड्याची डायरी - भाग ४९ वा )
रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही साधारण पंचाविशीचे ..मी बिछान्यावर आल्यानंतर देखील बराच वेळ ते तिकडेच होते ..त्यांची काहीतरी खलबते चालली होती असा संशय आला मला ..सकाळी मी चहा घेताना सहज शेरकर काकांजवळ त्याचा उल्लेख केला ..शेरकर काकांचे डोळे चमकलेले दिसले ..म्हणाले ...बहुतेक त्यांचे इथून पळून जाण्याचे प्लान चालले असतील ..हे तिघेही श्रीमंत घरचे आणि खूप लाडावलेले आहेत ..आपण हे माॅनीटरला सांगितले पाहिजे ..मला शेरकर काकांना आपण हे उगाच सांगितले असे झाले ..कारण प्रकरण आता माॅनिटर पर्यंत गेले असते ..मला उगाचच कशात अडकण्याची इच्छा नव्हती ..मी तसे शेरकर काकांना बोलून दाखवले ..' अहो तुम्ही कशाला घाबरता ..तुम्हाला काही होणार नाही ..उलट एक सावध नागरिक म्हणून तुमचे कर्तव्यच आहे वार्डात काही चुकीचे घडत असेल तर माॅनीटरला सांगणे ' ..शेरकर काका डोळे मिचकावत म्हणाले ..नाश्ता झाल्यानंतर माॅनीटरने मला ते तिघे कोण कोण होते हे विचारले ..मी नावे सांगितली ..मला ते नक्की काय बोलत होते ते माहित नाही ..त्यांना मी नाव सांगितले हे कळले तर ते उगाचच मला त्रास देतील असे माॅनीटरला म्हणालो ..त्याने तुमचे नाव कोणाला समजणार नाही अशी खात्री दिली मला ..तुम्ही घाबरू नका असा धीर देखील दिला ..
दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता ..पुढे काय होणार उत्सुकता देखील होतीच मनात ..तसे येथून पळून जाणे अजिबात सोपे नव्हते ..कारण बाहेर जाण्याचा एकच दरवाजा होता ..तो दरवाजा ऑफिसात उघडत असे ..ऑफिसमध्ये नेहमी एकदोन तगडे कार्यकर्ते बसलेले असत ..बाकी वार्डात सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..म्हणजे पळून जायचे तर आधी ऑफिसमध्ये जायला लागले असते .. जेव्हा केव्हा महिन्याभराचे किराणा समान येई किवा आठवड्याचा भाजीपाला आणला जाई तेव्हा काही लोकांना ते सामान टेम्पो मधून उचलून आणण्यासाठी म्हणून बाहेर नेले जाई ..मात्र त्यावेळी तेथे एकदोन कार्यकर्ते हजर असत..हे लोक कसे काय पळून जातील याचा विचार करून डोके शिणले माझे ..संद्याकाळी समूह उपचारांच्या वेळी सरांनी त्या तिघांना उभे केले ..म्हणाले .." घाबरू नका सगळे खरे खरे सांगा ..रात्री काय खलबते सुरु होती तुमची ..तुम्ही तिघे काय करत होतात बाथरूमच्या भागात ? ..तुम्हाला काहीही शिक्षा होणार नाही " यावर नागपूरचा असलेला गौरव म्हणाला " सर मेको हग्गी लगी थी..इसलिये मै वहा गया था " त्याच्या या बोलण्यावर सगळे हसले ..हा गौरव खूप लहान वयात बिघडल्याने तसा चेहऱ्याने खूप भोळाभाबडा वाटे ..तो नेमका काय म्हणत आहे ते सरांना बहुतेक समजले नाही ..' हग्गी लगी थी मधील ' हग्गी ' शब्द मलाही नवा होता ..सरांनी पुन्हा त्याला विचारले ...नीट सांग मराठीत काय झाले होते तुला ? तर म्हणाला मला ' हागरी ' लागली होती ..पुन्हा सगळे हसू लागले ..मग समजले की त्याला ' हगवण ' लागली होती असे तो सांगत होता ..पुढे काय झाले ते सांग मला ..तू ' हग्गी लागली म्हणून तिथे गेला होतास .तर आत संडासात न जाता बाहेर काय बोलत बसला होतास या दोघांसोबत ? काय रे तुम्हाला दोघांना पण ' हग्गी ' लागली होती का ? सरांनी थोडे दरडावून विचारले ..गौरव तसा लेचापेचा निघाला ..तो पोपटा सारखा बोलू लागला ..म्हणाला मी तेथे गेलो तेव्हा हे दोघे पळून कसे जायचे याचा प्लान करत होते .मलाही यांनी थांबवले ..म्हणाले जेव्हा केव्हा आता भाजी आणायला बाहेर नेले जाईल तेव्हा आपण तिघेही जाऊ ..आणि बाहेरच्या अंगणात गेलो की संधी साधून पळून जाऊ ..' सरांनी त्यांना खाली बसायला सांगितले अन म्हणाले ' हे बघा इथून पळून जाण्याचे विचार मनात येणे साहजिक आहे ..कारण आपल्याला इथे असणारी शिस्तबद्धता आवडत नाही ..सकाळी लवकर उठण्यापासून सुरु होणारा इथला दिनक्रम पार पाडणे जीवावर येते बहुतेकांच्या ..परंतु मित्रांनो हे सगळे आपल्याच भल्यासाठी आहे हे विसरता कामा नये ..पळून गेलात तरी तुम्ही शेवटी घरीच जाणार ..घरचे लोक आम्हाला कळवतील तसे ..पुन्हा आमची गाडी येईल तुम्हाला न्यायला ..पूर्वी अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत ..शिवाय तुमच्या सोबत बाहेर लक्ष द्यायला उभे असणारे कार्यकर्ते इतके लेचेपेचे समजू नका ..ते देखील पूर्वी तुमच्यासारखेच होते ..ते अतिशय सावध असतात ..ते लगेचच पाठलाग करून पकडतील तुम्हाला ..तुम्ही ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राच्या कैदेत नसून व्यसनाधीनतेच्या कैदेत आहात ..तेव्हा ' मैत्री ' मधून कसे बाहेर पडता येईल याचा विचार न करता व्यसनांच्या गुलामीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार कराल तर अधिक फायदा होईल ..
" व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने आपले काहीच चुकत नाहीय असे प्रत्येक व्यसनीला वाटणे स्वाभाविक आहे ..तो सहजासहजी उपचारांना तयार होत नाही म्हणून अनेकदा त्याला खोटे बोलून किवा जबरदस्तीने उपचारांना आणावे लागते ..पालकांचा तो नाईलाज असतो ..परंतु इथे दाखल झाल्यावर जर तुम्ही मनापासून उपचारात सहभाग घेतलात तर आपले काय चुकले ते नक्की ध्यानात येईल तुमच्या ..तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या पालकांनी तुम्हाला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला ते उगाच नाही ..त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे म्हणूनच काही पैसे खर्च करून ते तुम्हाला उपचारांना आणतात ..इथेही जर तुम्ही पूर्वीसारखाच नकारात्मक विचार केलात तर ..पुढे खूप नुकसानाला सामोरे जावे लागेल ..आम्ही सगळे या यातना भोगल्या आहेत ..तुम्हाला त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून आमची तळमळ असते ." .सर अगदी तळमळीने समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटले ..शेवटी त्या तिघांनी सरांची माफी मागितली ..आमचे चुकले अशी कबुली दिली ..प्रकरणावर एकदाचा पडदा पडला ..
( बाकी पुढील भागात )

चिरफाड करणारे पत्र !

चिरफाड करणारे पत्र ! ( बेवड्याची डायरी - भाग ४८ वा )
माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते ..परंतु इथे केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एका विस्कळीत झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा आकार देण्याचे काम सुरु झाले होते ..शरीरातून दारू लवकर निघून जाते मात्र मनातून निघून जायला खूप वेळ लागतो ..कारण मनातील दारूच्या सेवनाशी निगडीत असलेल्या भावना इतक्या सहज सहजी निघून जात नाहीत ..त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आकलन ..परीक्षण ..करणे गरजेचे आहे ..ते झाले की मनाच्या साफसफाईचे काम सुरु होते .. नंतर केलेली स्वच्छता नियमित टिकवून ठेवणे आलेच ..नाहीतर दारू अथवा व्यसन हा अतिशय खुनशी शत्रू आहे ..तो आपल्या बेसावध होण्याची वाट पाहत रहातो ..पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतो ..मला हे पूर्णपणे पटले ..पूर्वी घरी देखील अनेकदा मी दारू सोडली होती ..एकदोन महिन्यातच माझा निश्चय डळमळीत होऊन पिणे पुन्हा पुन्हा सुरु झाले होते ..कायमची व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी स्वतःवर कष्ट घेण्याची गरज होतो मला ...
नाश्ता करून झाल्यावर मी वार्डात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माॅनिटरने मला एक पाकीट आणून दिले... पाकीट उघडेच होते ..म्हणाला विजयभाऊ जरा वाचा हे सगळे ..मी पाकीट घेवून त्यातील कागदाची घडी काढली ..उघडून पहिले तर वर प्रिय असे लिहिलेले होते ...एका कोपर्यात जावून बसलो वाचत ..
प्रिय ,
परवा मी भेटीला आले असताना तुम्ही घरी घेवून जाण्यासाठी जो हट्ट केला त्यामूळे मी खूप व्यथित झाले आहे ..शेवटी तर तुम्ही घटस्फोटाची धमकी दिलीत मला ..इतकी का मी वाईट आहे ? आपल्या नव-याने व्यसनमुक्त असावे ही अपेक्षा ठेवणे हीच माझी चूक आहे ना ? जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्ही व्यसनमुमुक्त राहू शकाल..तर मी खरोखरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईन ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे ..
मला माहित आहे की तुम्ही रोज पिवून घरी आलात की मी कटकट करते ..आदळआपट करते ..म्हणून तुम्हाला माझा राग येतो ..पण त्यामागे तुमचा जीव सुरक्षित व्हावा हीच भावना असते माझी ..वर्तमान पत्रातील व्यसनाशी संबंधित वाईट बातम्या वाचल्या की खरोखर माझ्या काळजाचा थरकाप होतो ..दारूच्या नशेत खून ..दारूच्या नशेत बलात्कार ..दारूच्या नशेत अपघात ..दारुड्या बापाचा मुलाने खून केला ..विषारी दारूने मृत्यू ..दारूमुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ..अश्या प्रकारच्या बातमीचा मथळा मला अवस्थ करतो ..तुमची काळजी वाटते सतत ..तुम्हाला खरे वाटणार नाही कदाचित पण तुमच्या आणि आपल्या संसाराच्या काळजीने अनेक रात्री मी जागी असते ..बाजूला तुम्ही नशेत चूर झोपलेले असताना मी जागीच आहे ..डोळ्याला डोळा नाही हे तुम्हाला कधी जाणवले नसेल ..माझे वागणे चुकत असेल तर तुम्ही मला तसे स्पष्ट सांगा ..मी तुम्हाला हवा तसा बदल करेन माझ्या वर्तनात ..तुम्ही कितीही भांडले माझ्याशी ..माझ्या माहेरच्या उद्धार केलात ..मला शिव्या दिल्यात ..मूर्ख ..बेअक्कल ..बावळट म्हंटले तरी चालेल ..मी सहन करीन सगळे ..मात्र तुमचे दारू पिणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतेय ..
माझ्या मनात आजकाल आत्महत्येचे विचार येतात हे मी तुम्हाला प्रथमच सांगते आहे ..पराभवाची भावना मला सतत घेरून असते ..माझ्या संसाराची किती किती स्वप्ने सजवली होती मी . गरिबीत ..दारिद्र्यात देखील आनंदाने संसार करायला तयार होते ..तुम्ही अर्धपोटी ठेवले असतेत तरी चालले असते मला ..आम्हा मुलींना लहानपणापासून हे तडजोड करायला ..संसार आहे तसा स्वीकारायला शिकवले जाते ..पण तुमच्या दारूबाबत मात्र मला तडजोड करता येत नाहीय ..हा माझा पराभवच आहे ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी उपास केले ..नवस केले ..रोज देवाजवळ तुम्ही आणि आपला संसार सुरक्षित राहावा म्हणून मी प्रार्थना करत असते ..तुमचा देव धर्मावर विश्वास नाहीय म्हणून तुम्हाला न सांगता माझे हे उद्योग सुरु असतात ..दारूच्या नशेत तुम्ही मला अनेकदा घर सोडून कायमची निघून जा ..तोंड काळे कर ..असे म्हणत असता तुम्ही नशेत असे बोलता म्हणून मी दुर्लक्ष करते त्याकडे ..परंतु परवा पहिल्यांदाच दारू न पिता तुम्ही घटस्फोट घेईन अशी धमकी दिलीत मला ..हे माझ्या मनाला फार लागून राहिले आहे ..
तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे ...तुम्ही बरे व्हावे म्हणूनच हे चालले आहे हे तुम्हाला समजत नाहीय का ? योग्य वेळी मी येथील सरांच्या सल्ल्याने तुम्हाला घरी घेवून येईन ..मी अगदी थोडी पितो ..असे तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आला आहात ..मात्र आता तुमचे पिणे हाताबाहेर गेलेय हे तुम्हाला वाटत नाही का ? असो ..हे पत्र वाचून तुम्हाला माझा राग येईल कदाचित ..मला क्षमा करा.
सदैव तुमची
अलका
पत्र वाचताना माझा हात थरथरत होता ..डोळ्यातून अश्रू ओघळले ..!
( बाकी पुढील भागात )

Sunday, May 18, 2014

बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय !


बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय ! ( बेवड्याची डायरी - भाग ४७ वा )


काल रात्रभर जवळ जवळ जागाच होतो ...चौथ्या पायरीत सांगितल्या प्रमाणे ..स्वता:च्या चुकांचे समर्थन करणारा वकील बाजूला काढून आत्मपरीक्षण करताना माझी अवस्था खरोखर कठीण झाली होती ...आठवते तेव्हापासून स्वतच्या शोध घ्यायला सुरवात केल्यावर अनेक बारीक सारीक प्रसंग आठवू लागले ..जेथे मी माझी चूक मान्य करण्याऐवजी इतरांना दोष तिला होता ..कांगावा केला होता ...माझी चूक कबूल न करता इतरांशी भांडण करत गेलो होतो ...डायरीत प्रश्नाचे उत्तर काय लिहावे ते नेमके न समजल्याने मी माँनीटरला जेव्हा त्या बद्दल विचारले होते तेव्हा तो म्हणाला ..' आत्मपरीक्षण ' ही एका तासात होण्यासारखी प्रक्रिया नाहीय ..सध्या तुम्ही फक्त एक काम करा ..काम ..क्रोध ..लोभ ..मद..मोह आणि मत्सर या विकारांचा डायरीत एक एक भाग करा ..आणि आठवेल तेव्हा पासून या विकारांच्या बाबतीत तुमचे वर्तन कसे होते ते प्रत्येक विकाराच्या बाबतीत लिहून काढा ..तसेच त्या वर्तनामागील तुमचे नेमके विचार अथवा भावना यांचे परीक्षण करा ..त्या त्या वेळी ते विचार योग्य होते का ? त्या भावना नैतिक होत्या का ? हे तपासा ..अर्थात तुम्हाला हे सगळे करत असताना आत्मग्लानी येणे किवा अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणे ..हे परिणाम मिळतील तात्पुरते ..मात्र त्या मुळे खचून न जाता ..नेटाने प्रयत्न सुरु ठेवा ..पुढे ही अपराधीपणाची भावना काढून टाकण्यास देखील मदत मिळेलच नक्की ..

रात्री सगळे आठवत बसलो तसा अधिक अधिक खिन्नता येत गेली ..वाटले जर बारकाईने विचार केला तर आपण दिसतो तितके ..भासवतो तितके ..साधे सरळ नाही आहोत ..आपल्या मनात सतत एक स्वार्थ दडलेला असतो ..हा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपण वेळोवेळी खोटे बोलतो ..वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतो .. स्वार्थ कधी खाण्यापिण्याच्या वस्तूंचा ..कधी लैंगिक सुख मिळवण्याचा ..कधी आयता पैसा कसा मिळेल ..आपल्या मान सन्मान कसा प्राप्त होईल ..याबाबतचा असतोच ...शिवाय मत्सर देखील असतो आपल्या मनात अनेक लोकांबद्दल ..किवा सुप्त असूया असते ..त्यांचे रंगरूप ..वैभव ..संपत्ती त्यांचा मान सन्मान याबद्दल ..माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर अनेक दिवस मला उगाचच त्या कधीच न पाहिलेल्या श्रीराम नेने बद्दल असूया वाटत होती ...जेव्हा कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन करे तेव्हा मला त्याचा प्रचंड राग येवून अनेकदा ती व्यक्ती मरून जावी..उध्वस्त व्हावी ..असा मी विचार केला आहे ..माझ्या दृष्टीने नालायक असणाऱ्या अनेक लोकांना कसे संपवता येईल याचे मनसुबे रचले आहेत मनात ..अर्थात ते अमलात आणले नाहीत ही गोष्ट वेगळी .. कौटुंबिक ..सामाजिक ..अथवा देशांतर्गत कायदे पालन करण्याऐवजी ते कसे मोडता येतील याचा विचार अनेकदा मनात येतो ..लाल सिग्नल असताना मी अनेकदा आसपास कोणी पोलीस नाहीय हे पाहून सिग्नल तोडला आहे ..अशावेळी माझ्याकडे इतर वाहन चालक जेव्हा आश्चर्याने पहात तेव्हा मला खूप अभिमान वाटे ..माझे गाडी चालवण्याचे लायसन जवळ नसताना देखील मी अनेकदा गाडी चालवली आहे ..' दारू पिवून गाडी चालवणे हे तर नेहमीचेच असते .." पाहून घेवू काय होईल ते " या बेदरकर वृत्तीने ..एकदा मी जेमतेम १७ वर्षांचा असताना खोटे वय सांगून ' फक्त प्रौढांसाठी ' असलेल्या सिनेमाला मित्रांसोबत गेलो होतो ..त्या सिनेमात जंगलात ..गुहेत राहणाऱ्या आदिमानवा बद्दलचे चित्रण होते ..त्या सिनेमातील आदिमानवांना आजच्या सुधारलेल्या मानवा सारखी नैतिकतेची वगैरे बंधने अजिबात नव्हती ...ज्याच्याकडे जास्त शक्ती आहे युक्ती आहे तो सरळ सरळ इतरांवर अन्याय करून आपले सुख ओरबाडून मिळवीत होता ..विवाहबंधन पण नव्हते ..पसंत पडेल त्या वेगवेगळ्या स्त्रियांशी संग करण्यास मुभा होती ..लैंगिक संबंधातून निर्माण होणारी मुले ही आपोआप सगळ्या समूहात मोठी होत असत ..त्यांची जवाबदारी वडिलांवर नसे . नंतर आम्हा मित्रांना अनेक दिवस आपण त्या आदिमानवाच्या काळात जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते असे वाटत राहिले होते ..

रात्रभर सगळे असेच विचार मनात थैमान घालत होते ..मी आतून हादरलो होतो ..एरवी आपण मोठ्या समाजसेवेच्या ..न्यायाच्या ..प्रामाणिकपणाच्या ..कर्तव्यपालनाच्या ..गप्पा मारतो .मात्र स्वताच्या आत दडलेली नैतिकता तपासताना खरोखर आपण कोण आहोत ..कसे आहोत याची स्पष्ट जाणीव होते ...रात्रभर सारखी कुशी बदलत जागा होतो ..सकाळी मला पी .टी. करायचा देखील कंटाळा आला होता ..माॅनीटरला सकाळी माझी तब्येत बरी नाही असे सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले ..त्याने माझ्या कपाळाला हात लावून ताप आहे का ते पहिले ..मग म्हणाला ..ताप तर नाहीय तुम्हाला ..बहुतेक तुम्ही सिरीयसली आत्मपरीक्षण केल्याने असे कंटाळवाणे वाटत असेल ..रात्री झोप लागली नसेल ..असेच होते आत्मपरीक्षण करताना ..ते संत कबीराच्या दोह्या सारखे ' बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय '..खुद के अंदर झांक के देखा मुझसे बुरा ना कोय " ही भावना निर्माण होते ..कबीरा सारख्या संताला देखील असे वाटले तर आपली सर्वसामान्यांची काय कथा ..अर्थात तुम्ही प्रामाणिकपणे स्वताच्या आत शोधले म्हणून तुम्हाला तसे वाटतेय ..काही जण इतक्या प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत नाहीत त्यांना आपली चूक समजतच नाही ..अश्या लोकांना वारंवार उपचारांना यावे लागते ..

( बाकी पुढील भागात )

Wednesday, May 14, 2014

आत्मप्रौढी ..अहंकार ..आत्मक्लेश ..आत्मग्लानी वगैरे !

आत्मप्रौढी ..अहंकार ..आत्मक्लेश ..आत्मग्लानी वगैरे ! ( बेवड्याची डायरी - भाग ४६ वा )

सरांनी स्वतःमधील स्वभावदोष शोधून लिहिण्याबाद्दलच्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो तेव्हा ..सुरवातीला काय लिहावे तेच कळेना ..एक व्यसन करणे सोडले तर माझ्या स्वभावात फारसे काही दोष नव्हतेच ..उलट लहानपणापासून मी घरात आणि बाहेरही अतिशय गुणी मुलगा म्हणून वावरत होतो ..अभ्यासात ..खेळात ..बऱ्यापैकी प्राविण्य होते ...मित्र मंडळी व नातलगांमध्ये प्रसिद्ध होतो चांगलाच ...घरातही लाडका होतो सर्वांचा ..योग्य वेळी पदवीधर होऊन चांगली सरकारी नोकरी पण लागली होती मला ..स्वतःचा फ्लँट घेतल्यावर ..एक चांगले स्थळ म्हणून मला लग्नाच्या बाजारात मागणी होती ..मनासारखी पत्नी मिळेपर्यंत मी अनेक मुलीना नापसंत केले होते .. एकंदरीत सगळे छानच होते .. गडबड कुठून सुरु झाली असावी ते आठवेना ..आताशा गेल्या चारपाच वर्षात माझे दारू पिणे नियमित झाले होते ..तसेच कोटा देखील वाढला होता ..त्यामुळे अलकाची कटकट सुरु झाली की शब्दाने शब्द वाढून आमची भांडणे होत असत ..त्याला अलकाच जवाबदार होती असे माझे मत होते ..आपलं नवरा घरादारासाठी झटतो ..कष्ट करतो ..दिवसभर ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना ..तणावांना सामोरे जावे लागते त्याला ..तेव्हा रात्री थकून भागून घरी आल्यावर ..प्रेमाने विचारपूस करण्याऐवजी ..एकमेव विषय माझ्या दारू पिण्याचा ..हा विषय अजिबात काढायचा नाही असे अनेकदा बजावून सांगितले होते तिला ..तरीही ती माझ्या पिण्याचा विषय काढून भांडण ओढवून घेत असे ..मग मी चिडणे स्वाभाविक असे ..आणि रागाच्या भरात काही तोंडातून निघून गेले तर ..तिचा कांगावा ..रडणे .सुरु होई ..मुलेही घाबरून जात आमच्या भांडणाने ..मी तिला नेहमी सांगे ..तुला घरात काही कमी आहे का ? भौतिक सुखाच्या सगळ्या वस्तू आहेत ..त्यांचा छान उपभोग घेत आनंदाने राहायचे ..पण नाही ..एखाद्याचा स्वभावच कटकट्या असतो म्हणतात ना ..कोणताही विषय येवून जावून माझ्या दारूवर येई शेवटी ..अलीकडे तर..अलकाचे वागणे पाहून हिला एखद्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे कि काय असे मला वाटू लागले होते ..आझे आईवडील ..भावंडे यांचेही तसेच ..ते देखील जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा तेव्हा माझ्या तब्येतीबद्दल ..विशेषतः दारूबद्दल लेक्चर देत असत ..त्यांच्या अशा वागण्यामुळे मी त्यानाही हल्ली टाळत असे शक्यतो ..जगात बोलायला इतके विषय असताना यांना मात्र नेमके माझ्या दारूबर बोलायला का आवडते हा प्रश्नच होता मोठा ..मी दारू पिऊन कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..कधी कोणाकडे भिका मागितल्या नव्हत्या ..अथवा कधी दारूच्या नशेत रस्त्यावर ते झोपडपट्टीतले लोक करतात तसा तमाशा केला नव्हता ...तेव्हढे भान मला नेहमीच असे ..
लिहिता लिहिता मी एकदम थांबलो ..अरे ..आपल्या स्वताचे आत्मपरीक्षण करायचे होते ..इथे तर आपण अलकाचे परीक्षण लिहितोय ..शिवाय माझ्या वर्तनातील चुकीच्या बाजू न लिहिता ..माझ्याकडे चांगले काय काय आहे हे लिहित बसलो होतो ..ही तर आत्मप्रौढी झाली ..सरांनी सांगितले होतेच आपले दोष शोधणे अतिशय कठीण असते .." इतरांच्या डोळ्यातील कुसळ दिसते मात्र स्वताच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही " तसे..छे !..आपण समर्थनाचा वकील बाजूला न काढताच हे आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करून अलकाला दोष देत होतो ..आत्मपरीक्षण हे तटस्थपणे ..पारदर्शकतेने व्हायला हवे ..अगदी आठवते तेव्हापासून आपली नैतिकता शोधली पाहिजे ..मला काही सुचेनासे झाले ..नुसताच पेन हातात धरून बसलो ..मग आठवले ..लहानपणी एकदा मी रागाच्या भरात जेवणाचे ताट लाथाडले होते ..माझ्या आवडीची भाजी केली नव्हती म्हणून जेवण करणार नाही म्हणून हटून बसलो होतो ..बाबा रागावले मला त्यांनी अन्न हे पूर्णब्रम्ह असते त्याचा अपमान करू नये म्हंटले तेव्हा मी रागाने पानावरुन उठलो होतो ..उठताना चुकून झाले असे दर्शवत मुद्दाम पानाला लाथ मारली होती ..त्यावर बाबांनी एक झापड मारताच ..चुकून झाले तरी मला मारले म्हणून रडून खूप गोंधळ घातला होता ..कॉलेजला असताना ज्युनियर्सचे रँगिंग घेण्यात माझा पुढाकार असे ..एकदा एकाला आम्ही बळजबरी सिगरेट प्यायला पावली होती ..तो जेव्हा झुरका मारून ठसकत होता तेव्हा आम्ही खूप हसत होतो ..त्याची मजा घेत होतो ..तो मात्र डोळ्यात पाणी आणून विनवणी करत होता ..मित्रांमध्ये खर्चायला पैसे हवेत म्हणून मी अनेकदा बाबांच्या नकळत त्यांच्या पाकिटातले पैसे काढले होते ..चक्क चोरी केली होती ..लग्नानंतर देखील एकदोन वेळा अलकाच्या पर्स मधून मीच तिला घरखर्चासाठी दिलेले पैसे तिच्या नकळत काढले होते ..वर तिने विचारल्यावर हात वर केले होते ..तू वेंधळी आहेस ..हरवले असतील कुठेतरी म्हणून तिलाच दोष दिला होता ..अलीकडे माझ्या पगाराचा हिशोब तिला देणे बंद केले होते ..झालेली पगारवाढ तिच्यापासून लपवली होती ..अनेकदा आईची ..बाबांची ..अलकाची ..मुलांची खोटी शपथ घेतली होती उद्यापासून दारू नक्की सोडतो म्हणून ...अलकाला भांडणात अनेकदा तू घर सोडून जा आत्ताच्या आत्ता हे बजावले होते ..जणू ती माझी आश्रित असल्यासारखे वागवले होते तिला ..कामावरच्या पैश्यात अनेकदा थोडी गडबड करून चक्क पैसे खाल्ले होते ..म्हणजे खोटे हिशोब दाखवले होते ..हे सगळे नक्कीच नैतिकतेत बसणारे नव्हते ...
पुढे अनेक गोष्टी आठवू लागल्या मला ...एकदम भरून आल्यासारखे झाले ..बापरे .हे कधी शोधलेच नव्हते आपण ..अजून कितीतरी गोष्टी आहेत ..जेथे मी नैतिकतेची पर्वा न करता ..इतरांच्या भावना विचारात न घेता हवे तसे वर्तन केले होते ..वाट्टेल तशी दुरुत्तरे केली होती ..स्वताची चूक असूनही इतरांना दोष तिला होता ..माझे उच्च शिक्षण ...माझी नोकरी ..माझी कमाई ..माझा तडफदारपणा ..माझी हुशारी ..या बद्दल स्वतःवरच खुश राहून माझ्या वर्तनाचे समर्थन करत गेलो होतो ....मला खूप अपराधी वाटू लागले सगळे आठवल्यावर ..आपण खरोखरच खूप वाईट वागलो आहोत असे वाटले ..आईबाबांनी आपल्या जन्मानंतर किती स्वप्ने पहिली असतील आपल्यासाठी ..मात्र दारू प्यायल्यावर मी सरळ सरळ त्यांचा अपमान करत असे ..त्यांचे माझ्यावरील प्रेम ..माया याची पर्वा केली नाही ..,लग्नानंतर नवीन संसाराची स्वप्ने पाहिलेल्या अलकाला जेव्हा मी घरातून निघून जा ..असे मी म्हंटल्यावर किती क्लेश झाले असतील ? ..भावाने माझ्या दारू पिण्याबद्दल मला समजावले तेव्हा ..हा माझा पर्सनल मामला आहे ..त्यात तू दखल देवू नकोस असे सांगितल्यावर त्याला काय वाटले असेल ? एकदा सासरेबुवा घरी आले असताना मी अलकाशी भांडण करून तिचा अपमान केला असताना सासरेबुवा मध्ये बोलले तेव्हा त्यांना देखील ..नवराबायकोच्या भांडणात तुम्ही मध्ये बोलू नका ..तुमची मुलगी इतकी लाडकी असेल तर घेवून जा तिला असे बजावले होते ..मी एकदमच खिन्न झालो सगळे आठवून ..आता हे सगळे कसे लिहायचे ? असा प्रश्न पडला ..अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली ....शेवटी मी वही बंद केली ..उद्या लिहू असे म्हणत !
( बाकी पुढील भागात )

कर्णपिशाच्च !


कर्णपिशाच्च ! ( बेवड्याची डायरी - भाग ४५ वा )

आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..

इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लाघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लाघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..

मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा म्हणे वाहिनी भेटीला आल्या होत्या ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .

( बाकी पुढील भागात )

सुड्घेवू गवार ..वैरी लसूण...दावेदार मेथी !


सुड्घेवू गवार ..वैरी लसूण...दावेदार मेथी ! ( बेवड्याची डायरी - भाग - ४४ वा )

" चौथ्या पायरीत ' आत्मपरीक्षण ' करताना अनेकांना वाटेल की आम्हाला फक्त दारू सोडायची आहे त्यासाठी हे आत्मपरीक्षण वगैरेची अजिबात गरज नाही ..दारू पिणे सोडले तर माझ्यात काहीच दोष नाहीत ..आपले कुटुंबीय देखील अनेकदा आपल्याला म्हणाले असतील ' तू फक्त दारू सोड ..बाकी सगळे चांगलेच गुण आहेत तुझ्यात ' परंतु मित्रानो आपले कुटुंबीय हे आपण दारू सोडावी यासाठी म्हणत असतात ..त्यांना हे माहित नसते कि आपल्या स्वभावातील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा व्यसने करण्यास भाग पाडतात ..चौथी पायरी आपल्यास व्यसन करण्यासाठी कारण ठरणाऱ्या स्वभावदोषांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आहे ..ही विषारी मुळे जोवर आपल्या व्यक्तीमत्वात आहेत तोवर संपूर्ण व्यसनमुक्ती मिळवणे कठीण जाते ..काही दिवस व्यसन बंद ठेवता येते अनेकांना ..मात्र कायमच्या व्यसनमुक्तीसाठी ' आत्मपरीक्षण ' गरजेचे आहे ".सर देत असलेले चौथ्या पायरीचे विवेचन असलेले मला पटत होते ..मी अनेकदा घरी राहूनच एखादा महिना किवा दोन तीन महिने दारूचे व्यसन बंद करत होतो ...मात्र ऑफिसमध्ये ..घरी ..नातलगांशी ..काही वाद उदभवले ..अथवा मनात एखाद्या गोष्टीचा तणाव निर्माण झाला की ' फक्त आजच्या दिवस घेवूयात ' असा विचार करून मी दारू पीत असे ..पुन्हा पुन्हा त्याच गुलामीत अडकत असे ..निरर्थक चिंता ..अनाठायी निराशा ..आत्मप्रौढी ..अपयशामुळे आलेले वैफल्य..सतत अवस्थ ठेवणारा तणाव ..अश्या गोष्टी निर्माण होण्यास माझ्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये कारणीभूत होती ..ती शोधून व्यक्तीमत्वातून अशी वैशिष्ट्ये अथवा दोष काढून टाकण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करायला हवेत असे मला वाटले ..

' आत्मपरीक्षण ' हे समुद्र मंथन करण्यासारखे असते ..आपल्या अथांग अंतर्मनात दडलेले अनेक सुप्त स्वार्थ ..विकारांमुळे निर्माण झालेल्या अनैतिक कामना ..स्वकेंद्रित वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे बचावात्मक तत्वज्ञान ..जवाबदारी टाळण्याची मनोवृत्ती ..मनाची अखंड चंचलता ..सतत वाटणारा हव्यास ...आणि या सर्वातून निर्माण होत असलेले ..निरंतर असमाधान ..वगैरे गोष्टी या आत्मपरीक्षणातून आपल्याला आढळून येतील ..मित्रानो आपल्या व्यक्तीमत्वात केवळ दोषच आहेत असे नव्हे ..अनेक चांगले गुण देखील असतात प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वात ..प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतात ..परंतु आता एकदा व्यसनाचा गुलाम झाल्यावर आपल्यातले चांगले गुण लोप पावत चाललेले आहेत अथवा दोष इतके वाढलेले आहेत की त्यामुळे व्यक्तिमत्वातील गुण झाकले जावून केवळ दोषच समोर दिसतात ..म्हणून हे व्यक्तिमत्वातील गुण उजळून बाहेर काढण्यासाठी त्यावर असलेली दोषांची चादर हटवली पाहिजे " असे सांगत सरांनी समारोप केला ..आम्हाला डायरीत लिहिण्यासाठी प्रश्न दिला ' आपल्या स्वभावात कोणते कोणते दोष आहेत असे आपल्याला वाटते ..सविस्तर लिहा ? "

समूह उपचार संपून जेमतेम दहा मिनिटे झाली असतील ...वार्डातील बेल वाजली ..मला समजेना हे मध्येच कशी बेल वाजली ते ..शेरकर काका म्हणाले चला भाजी निवडावी लागेल आज सर्वाना ..आठवड्याची भाजी आलीय बाजारातून ..त्यात सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी असेलच ..शेरकर काकांनी भाजीला दिलेली ही नावे गमतीशीर होती ..त्यांना म्हणालो असे का म्हणता ? ते मिशीत हसून म्हणाले ' आता निवडायला बसशील तेव्हा समजेलच तुला " .आम्हाला सर्वाना चार पाच जणांचा गट बनवून बसवण्यात आले ..मग कार्यकर्त्यांनी दोन पोती भरून मेथीच्या जुड्या आणून त्यातील चारपाच जुड्या प्रत्येक गटाला दिल्या निवडायला ..काही गटांना लसूण सोलण्यासाठी दिले गेले ..काहींच्या पुढे गवार शेंगा ठेवल्या ..मी मेथी निवडण्याच्या गटात होतो ..जुडी सोडून आम्ही सर्वांनी मेथी निवडायला घेतली ..सुरवातीला चारपाच काड्यांची पाने मी व्यवस्थित तोडली ..मग कंटाळा येवू लागला ..बारकाईने प्रत्येक काडीची चांगली पाने खुडून ती आम्ही एका बाजूला टाकत होतो ..नंतर नंतर वाटले हे कंटाळवाणे आहे ..त्या ऐवजी गवार निवडायला जावू म्हणून मी गवार शेंगा तोडण्याच्या गटात जावून बसलो .पटापट साधारण एक इंचाचे तुकडे तोडू लागलो एका शेंगेचे ..मला गटातील एकाने थांबेवले ..म्हणाला ..अहो असे पटापट न बघता तोडू नका ..त्या शेंगेच्या शिरा देखील काढाव्या लागतात तोडताना ..नाहीतर जेवताना त्या शिरा दातात अडकतात ..वाटले तितके हे काम सोपे नव्हते ..मी सावकाश शिरा काढत शेंगा तोडू लागलो ..सुमारे पाच दहा मिनिटात माझा उत्साह संपला .. तेथून उठून लसूण सोलणाऱ्यांच्या गटात गेलो ..शेरकर काका त्या गटात होतो ." विजयभाऊ ..लसूण सोलून झाले की हात नीट साबणाने धुवा ..नाहीतर मग भलतीकडे हात लागून बोंबा माराल ..म्हणजे डोळ्याला वगैरे हात लावू नका धुतल्याशिवाय " ..असे म्हणत त्यांनी एक डोळा मिचकावला . लसूण सोलण्याचे कामही असे लुख्खेच वाटले मला ..सोलताना अलका घरी अशी सगळी कामे किती तत्परतेने आणि कंटाळा न येत करता ते जाणवले ..आपल्या पानात आयता बनवलेले पदार्थ पडतो म्हणून कधी तो पदार्थ करण्यामागे काय कष्ट आहेत ते समजले नव्हते . ..स्त्रियांमध्ये चिकाटी हा एक विशेष गुण असतो असे वाटले ..त्यामुळेच निवडणे ..टिपणे ..सोलणे ..विणणे ..अशी चिकाटी असणारी कामे त्या सहजतेने करतात ..पुरुष अशी कामे उत्साहाने काही वेळ करेल मात्र कायम अश्या प्रकारची कामे करण्यात स्त्रियांचा हातखंडा असतो हे नक्की ..एकंदरीत शेरकर काकांनी सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी ही नावे का ठेवलीत ते चांगलेच समजले .

( बाकी पुढील भागात )

उत्खनन ..मंथन !


उत्खनन ..मंथन ! ( बेवड्याची डायरी - भाग ४३ वा )


फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .

" फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे मला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..धर्माने शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..

सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व धर्मग्रंथांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते .

( बाकी पुढील भागात )

Friday, May 9, 2014

अहंकाराची लुडबुड !


अहंकाराची लुडबुड ! ( बेवड्याची डायरी - भाग ४२ वा )

अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..

अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण ! 

( बाकी पुढील भागात )

माझा अन्न सत्याग्रह !

माझा अन्न सत्याग्रह ! ( बेवड्याची डायरी - भाग ४१ वा )

काल रात्रभर नीट झोप लागलीच नाही ...पोटात जेवण नाही म्हणून असेल कदाचित ..शिवाय डोक्यात राग होताच मला काल घरी न सोडल्याचा ..सकाळी मी पीटी करता उठलोच नाही ..मुद्दाम तोंडावर चादर घेवून पडून राहिलो ..कार्यकर्ता उठवायला आला तेव्हा ..माझी तब्येत बरी नाही असे कारण सांगितले ..शेरकर काका मला दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करून गेले... मी त्यानाही दाद दिली नाही ..' ओ गांधी बाबा उठा की आता चहा तरी घ्या ' तिसऱ्यांदा शेरकर काका जवळ येवून मला उठवू लागले ..त्यांनी मला गांधी बाबा नावाने मारलेली हाक खटकलीच ..काल पासून मी अघोषित उपोषण सुरु केले होते म्हणून ते मला गांधीबाबा म्हणत आहेत हे जाणवले ..मी रागाने उठून बसलो व त्यांना म्हणालो ' काका तुमचे इतके वय झालेय ..मात्र शहाणपणा काडीचा नाहीय तुमच्यात ' यावर ते नेहमीप्रमाणे मिशीत हसले ..त्यांच्या हातात चहाचे तों ग्लास होते ..' जाऊ दे यार ..वयाचा आणी शहाणपणाचा काही संबंध नसतो ..चहा तर घे ..' माझ्या बाजूला बसकण मारत त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडला .. भूक लागली होती ..परंतु माझे अघोषित उपोषण मात्र सोडायचे नव्हते मला ..मी शेरकर काकांकडे न पाहता तोंड फिरवून बसलो ..' अरे जाऊ दे नको घेवून चहा ..पण बोल तरी जरा माझ्याशी ' काका चिवटपणे मला चिकटून राहिले ..' विजयभाऊ अहो ..असा राग चांगला नसतो आपल्या माणसांवर ..असे मनाविरुद्ध घडतच असते ..जेवणावर राग काढून काही साध्य होत नाही ..इथले कार्यकर्ते अजून एक दिवस वाट पाहतील तुम्ही जेवता की नाही याची ..मग सरळ डॉक्टरना बोलावून तुम्हाला सलाईन लावतील ..तुम्ही जास्त विरोध केलात तर बांधून ठेवून सलाईन लावतील ' हे ऐकून मी विचारात पडलो .. जरा अंतर्मुख झालो ..कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला माझ्या .

काल सरांनी सर्वाना नेहमीप्रमाणे सूचना दिली होती ..' आज पालकांच्या भेटीचा दिवस आहे ..ज्या लोकांना इथे येवून दहा दिवस पूर्ण होत झालेले आहेत ..तसेच वार्डातील ज्यांचे वर्तन नीट आहे अशा लोकांच्या पालकांना आम्ही भेटीस परवानगी दिली आहे ...मला माहित आहे की इथे व्यसनमुक्ती केंद्रात रहाणे म्हणजे बहुतेक लोकांना शिक्षा वाटत असेल ..कारण इथे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात ..पत्येक वेळी तुम्हाला अॅडजेस्टमेंट करावी लागतेय ..व्यसनी व्यक्तीच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावात बदल करण्यासाठी ते आवश्यकच असते...मात्र येथे मनासारखे वागता येत नाही म्हणून सर्वांनाच आपण लवकरात आपल्या घरी जावे असे वाटते ..इथे कोणालाही कायमचे राहायचे नाहीय ..उपचार पूर्ण झाल्यावर सर्वाना घरी जायचेच आहे .. व्यसनमुक्ती साठी आणि उज्वल भविष्यासाठी आपल्याला येथे आणले गेलेय ..यावे लागलेय ...किवां काही स्वतःहून आलेत म्हणा हवे तर ..पण पालक आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ..आपल्यात घडणारे बदल पाहण्यासाठी भेटायला येतात ..कोणीही आपल्या पालकांजवळ मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करू नका ..त्यातून हेच सिद्ध होईल कि अजूनही तुमच्यात सुधारणा झालेली नाही ..उलट हट्ट केला तर पालक नाराज होऊन तुमचे इथले वास्तव्य वाढवण्याचा विचार करतील हे ध्यानात ठेवा ..बाकी आपण सुज्ञ आहातच ' ....मी मनातून आज अलका भेटीला येईल म्हणून आनंदलो होतो ..तिच्याकडे घरी ने असा हट्ट करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता ..प्रत्यक्ष संध्याकाळी ती भेटीला आली तेव्हा तिचा प्रफुल्लीत चेहरा पाहून मला भरून आले होते ..मला पाहताक्षणी तिचे चमकलेले डोळे सांगून गेले कि ती अतिशय आतुरतेने माझ्या भेटीची वाट पाहत असावी .. जवळ बसताच तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली .. बोलताना ती इतकी निष्पाप दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम मी पाहतच राहिलो ' अहो लक्ष कुठेय तुमचे ..मी काय म्हणतेय ऐकताय ना ' असे म्हणत तिने मला भानावर आणले ..म्हणाली मुले पण मागे लागली होती आम्ही पण येतो बाबांना भेटायला म्हणून पण मीच नको म्हंटले ..पुढच्या वेळी नक्की आणीन मुलांना ..मग तिने माझी चौकशी सुरु केली ' कसे वाटतेय इथे ? जेवण कसे आहे ? सगळ्या उपचारात भाग घेता का ? वैगरे ..मी जमेल तशी उत्तरे देत होतो ..खरे तर तिच्याकडे मला घरी ने असा हट्ट करण्याचा माझा कुठलाच विचार नव्हता ..इथले सगळे नीट शिकूनच डिसचार्ज घ्यायचा हे मी ठरवले होते ..तरीही कसा कोण जाणे अलकाशी बोलता बोलता माझा विचार बदलत गेला ..पहिल्यांदाच मी पत्नी आणि मुलांपासून इतके दिवस दूर राहत होतो ..सुरवातीचे एक दोन दिवस वगळता मी इथे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यायला लागलो होतो .. इथे शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत हे देखील लक्षात आले होते ..पण अलकाशी बोलता बोलता वाटले ..दहा दिवस खूप झालेत आता ..यापुढे आपण दारू अजिबात पिणार नाही याची खात्री वाटू लागली होती मला..उगाच अजून जास्त दिवस राहून फारसे काही साध्य होणार नाहीय .. ..सहज एक चान्स घ्यावा म्हणून अलकाला म्हणालो ' आता मला पटलेय चांगलेच कि दारूमुळे आपले सर्वांचेच किती नुकसान केलेय ते ..यापुढे मी अजिबात प्यायची नाही असे ठरवलेय ..तू सरांना सांगितलेस तर ते मला डिसचार्ज सुद्धा देतील ' माझे हे बोलणे ऐकून अलका एकदम स्तब्ध झाली ...नुसतीच माझ्या तोंडाकडे पाहत राहिली ..कदाचित माझ्या मनाचा वेध घेत असावी ..म्हणाली ' अहो ..पूर्ण कोर्स केल्याशिवाय किवा सरांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला येथून नेता येणार नाहीय असे कालच सरांनी मला फोनवर सांगितलेय ..' ' म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीय तर अजून ? ..थोडे दुखावला जावून मी विचारले ..' इथे विश्वासाचा प्रश्नच नाहीय हो ..तुम्हाला डिसचार्ज देणे योग्य राहील कि नाही हे ठरवणारी मी एकटीच नाहीय ..सरांची परवानगी लागते त्यासाठी ..आपण आता बरे झालोत हे आजारी व्यक्तीने नाही तर त्याच्या उपचारकाने ठरवले पाहिजे ना ? ' 

" अग पण ..मी इथे स्वताच्या मर्जीने आलोय ..शिवाय आता मी सांगतोय ना की मला बरे वाटतेय .अजिबात दारूची आठवण येत नाहीय ..यापुढे मी अजिबात पिणार नाही ..तुझी शपथ " असे म्हणत मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ..यावर अलका गडबडली ..आपण तिची शपथ घेतली की ती भावनाविवश होते हे मला चांगलेच ठावूक होते ..मग म्हणाली ...बरे पाहू मी विचारते सरांना ..असे म्हणून पटकन उठून बाहेर ऑफिसात गेली ..मी वार्डातच बसून तिची वाट पाहू लागलो ..साधारण दहा मिनिटांनी परत आली ..' सरांनी नाही म्हंटले आहे ..' असे म्हणत खाली मान घालून बसली ..मी इथे आल्यापासून इतका चांगला सहभाग घेतोय सगळ्या उपचारात तरीही सरांनी माझ्या डिसचार्ज करिता नकार द्यावा याचे मला वैषम्य वाटले ..राग यायला सुरु झाला .. कुत्सितपणे म्हणालो ' तुला घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे तर ? ' अलका खाली पाहतच म्हणाली ' या पूर्वी इतके वेळा विश्वासघात केलंय तुम्ही की आता विश्वास ठेवणे कठीणच जातेय मला ..अनेक वेळा माझ्या शपथा झाल्यात ..मुलांच्याही शपथा घेवून झाल्यात ..मात्र तुमचे पिणे काही कायमचे बंद होत नव्हते ' तिच्या या बोलण्याने मी दुखावलो गेलो ..अपमानित झाल्यासारखे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात)

संगीतातून व्यसनमुक्ती !


संगीतातून व्यसनमुक्ती ! ( बेवड्याची डायरी -भाग ४० वा )

आज सायंकाळी ' म्युझिक थेरेपी ' आहे हे मला सकाळीच समजलेले ...शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे अनेक प्रकारची गाणी मी आवडीने ऐकत असे. .. दारू पितांना बार मध्ये बसल्यावर आम्हा मित्रांची खास गझल्स लावण्याची फर्माईश असे बारमालकाला ..मेहंदी हसन ..गुलामली ...पंकज उधास ..अशा गायकांच्या गझल्स ऐकून ' चियर्स ' करण्यात ..आम्ही वेळेचे भान विसरून जात असू ..मात्र मी कधी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शेरकर काकांनी तुला पण गाणे म्हणावे लागेल हे सांगून मला काळजीत टाकले होते ..काही उत्साही लोक सकाळपासूनच लायब्ररी मधून गाण्याची पुस्तके घेवून त्यातील गाणी पाठ करण्याचा मागे लागलेले..सायंकाळी ७ वाजता ...बाहेरच्या ऑफिस मधून तबला ..पेटी ..कोंगो ..अशी वाद्ये वार्डात आणून लावली गेली ..एका कार्यकर्त्याने माईक सिस्टीम लावली ..एकंदरीत वातावरण निर्मिती झाली होती ..सर वार्डात आल्यावर प्रार्थना घेवून त्यांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो मला माहित आहे आपण शनिवारच्या संगीत सभेची वाट आतुरतेने पाहता ..कारण संगीत अशी एक जादू आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो ..आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे संगीत असे म्हणता येईल ..आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करण्याची शक्ती संगीतात आहे ..नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्ती संगीत देवू शकते ..म्हणूनच आपण इथे आठवड्यातून एकदा संगीत उपचार घेतो ..इथे कोणी मोठा गायक अथवा कलाकार नाहीय आपल्यात .. तरीही सर्वांनी स्वताच्या आनंदासाठी या उपचारात भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्वाना विनंती आहे ..प्रास्ताविक झाल्यावर सरांनी एक हिंदी भक्ती गीत म्हंटले ..अनुप जलोटाने गायिलेले हे भक्तीगीत मी पूर्वी लहानपणी अनेकदा ऐकलेले होते ..सर गाणे म्हणतात हे पाहून मला नवल वाटले ..दुसरे सर हार्मोनियम वर बसले होते ..वा म्हणजे आज दोन्ही प्रमुख समुपदेशक या थेरेपीला हजर होते तर ..सरांचे गाणे झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..मग सरांनी आम्हाला एकेकाला आवाहन केले गाणी म्हणण्यासाठी ..जे उत्साही गायक वार्डात होते त्यापैकी एक जण उठून समोर गेला ..त्याने माईक हातात घेवून गाणे म्हणण्यास सुरवात केली ..' दोनो ने किया था प्यार मगर ..मुझे याद रहा ..तू भूल गई ' महुवा सिनेमातील हे दर्दभरे गाणे तो म्हणू लागला ..त्याचा आवाज यथातथाच होता ..मात्र तो अतिशय तल्लीन होऊन हे गाणे म्हणत होता ..तबल्यावर आमच्यातीलच एक जण बसला होता ..तो उत्तम तबलजी नव्हताच तरी तालाचे बरे भान होते त्याला ..मध्ये एक दोन ओळी विसरल्याने त्याने जेव्हा शब्दांऐवजी न ना ना न नाना ..नान न नाना सुरु केले तेव्हा सगळे हसू लागले ..दर्दभरे गीत सुरु असताना एकदम विनोदी वाटू लागले ..त्याचेही गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या आम्ही ...

एकाने मराठी लावणी म्हंटली ..त्याबरोबर शिट्ट्या वाजू लागल्या ..वातावरण चांगलेच रंगले ..शेरकर काका माझ्या मागे बसून मला बोटांनी ढोसत होते ..तू जा गाणे म्हणायला म्हणून ..वैतागून मी उठून दुसरीकडे गेलो ..मध्येच सर्वांनी ' वुई वांन्ट रमेश 'असा गलका सुरु केला ..एक रमेश नावाचा गांजाचा व्यसनी तयारच होता गाण्याचे पुस्तक घेवून ..हा खूप चांगला गायक असावा म्हणून सर्व त्याची मागणी करत आहेत असे मला वाटले.. रमेशने माईकचा ताबा घेतल्यावर खूप मोठा गायक असल्यासारखे जरा ' हॅलो माईक टेस्टिंग ...वन ..टू ' ...मग एकदम त्याने हिमेश रेशमाईया सारखा नाकात सूर लावला ..' झलक दिखलाजा ..एक बार आजा ...आजा ' सगळे हसू लागले ..रमेशला ताल सुराशी काही घेणे देणे नव्हते असे दिसले ..तो मस्त डोळे मिटून ...आजा ..आजा आळवीत होते ..त्याची तल्लीनता पाहून सर्वाना हसू येत होते ..सुदैवाने त्याचे डोळे बंद असल्याने त्याला समजत नव्हते की आपल्याला सगळे हसत आहेत ..एक गाणे संपल्यावर लगेच त्याने दुसरे गाणे सुरु केले ..' लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ' ..जेमतेम दोन ओळी म्हंटल्यावर मग पुन्हा दुसरे गाणे ' ओब्लाडा डा डा डा ..ओब्लाडू डू डू ' तो डोळे मिटून असे अंगविक्षेप करत होता ..की हसून हसून आमची मुरकुंडी वळली ..बरेच मनोरंजन झाल्यावर मग सर्वांनी एकदम टाळ्या वाजवायला सुरवात केली ..गाणे सुरु असताना सतत टाळ्या म्हणजे श्रोते तुम्हाला खाली बसायची सूचना करत आहेत हा अर्थ रमेशला माहित नसावा ..त्याचे ..डा डा डू डू सुरूच होते ..शेवटी सरांनी त्याला थांबवून आता नंतर म्हणा गाणे असे सांगितले तेव्हा त्याने माईक सोडला ..मला लक्षात आले रमेश चांगला गायक होता म्हणून नव्हे तर त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला गाण्याचा आग्रह होता होता ..बराच वेळ धमाल सुरु होती ... ' देखा ना हाये रे सोचा ना ..हाये रे ' या गाण्याला पब्लिक उठून नाचू लागले ...' खैके पान बनारसवाला ' पण झाले ..सुमारे दोन तास अतिशय मजेत गेले सर्वांचे..आम्ही सगळे आमच्या जीवनातील अडचणी ..संकटे ..दुखः ..विसरून जणू आनंदाच्या प्रदेशात शिरलो होतो ..सरांनी जेवणाची वेळ झाल्यावर सरांनी थांबण्याची सूचना केली आणि माईक हातात घेतला ..मित्रांनो सुमारे दोन तास आपण हा संगीताचा आनंदानुभव घेत होतो ..आता वास्तवात परतायची वेळ झालीय असे म्हणत ..समारोप करू लागले..

माणसाच्या जीवनात निराशा ..अडचणी ..संकटे असणारच ..तरीही जेव्हा जेव्हा आपण खूप अवस्थ असू ..कशातच मन लागत नसेल ..सगळ्या नकारात्मक भावना घेरतील तेव्हा संगीत नक्कीच तुम्हाला सगळ्या चिंता विसरायला लावते ..व्यसने करण्याच्या काळात देखील आपण संगीताचा आनंद घेतला आहे ..मात्र पोटात आणि डोक्यात दारू असताना आलेला आनंद हा कितीही झाले तरी कृत्रिमच ...भानावर राहूनच संगीताचा खरा आनंद लुटता येतो ..गीतकाराचा शब्द न शब्द बोलका होतो ..त्यात दडलेला गहन अर्थ मनात उतरतो ..सुरांची जादू हृदयात आनंदाचे कारंजे निर्माण करते ..तसेच वाद्यांचा ध्वनी आपल्या डोक्यात ताल निर्माण करून कोणतीही नशा न करता पाय थिरकायला लावतो ..मन भारून टाकतो हा अनुभव आता आपण सर्वांनी घेतलाय ..जगातले कोणतेही मादक द्रव्य देवू शकणार नाही अशी नशा संगीत आपल्याला देते ..इथून बाहेर पडल्यावर आपण हा आनंद विसरता कामा नये ..जेव्हा जेव्हा सगळे जग तुमच्यावर रागावले आहे असे वाटेल ..जगण्याचा कंटाळा येईल ..जीवन निरस वाटू लागेल ..एकटेपणाची भावना मनाला ग्रासेल ..व्यसन करण्याची अनावर ओढ मनात निर्माण होईल ..त्या त्या वेळी आपण जर संगीताचा वापर केला तर नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यास उर्जा मिळेल ..असे सांगत सरांनी उपचारांचा समारोप केला ..

( बाकी पुढील भागात )

बिडी -तंबाखूची लढाई !


बिडी -तंबाखूची लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ३९ वा ) 

सगळ्यांच्या सह्या घेवून झाल्यावर आम्ही सर थेरेपीच्या वेळी वार्डात येण्याची वाट पाहत बसलो ..साडेनऊला झाले वेगळेच ..माॅनीटर व कार्यकर्त्यांनी वार्डात मोठा स्क्रीन आणून लावला ..प्रोजेक्टर वगैरेचे व्यवस्था केली ..चौकशी केल्यावर समजले..कँन्सर बाबत जनजागृती करणाऱ्या एका संस्थेचे लोक येणार होते आमचे प्रबोधन करायला ..जरा वेळाने ते लोक आले ...भारतात सर्वाधिक लोक तंबाखूमुळे होणाऱ्या कँन्सर मुळे कसे मृत्युमुखी पडतात याची आकडेवारीसह माहिती सांगितली ..तंबाखू मध्ये असणाऱ्या विविध विषारी द्रव्यांबाबत माहिती दिली ..त्यांनी स्क्रीन वर आम्हाला भारतात तंबाखू व धुम्रपानामुळे झालेल्या कॅन्सर चे भयानक फोटो दाखवले ..सगळ्यात भयंकर असा तोंडाचा ..घश्याचा कर्करोग पाहून अंगावर काटाच आला सर्वांच्या ..गुटखा चघळण्यामुळे हा तोंडाचा कर्करोग हमखास होऊ शकतो असे सांगितले ..हे सर्व पाहत असताना सागळे पुरेसे गंभीर झाले होते ..शेवटी त्यांनी आम्हाला आम्ही येथे उपचारांना आल्याबद्दल आमचे अभिनंदन केले व आम्हाला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या ...ते लोक गेल्यावर शेरकर काका हळूच माझ्याजवळ आले ..म्हणाले ..दे तुझ्याकडची शिल्लक तंबाखू ..मी फेकून देतो ती बाथरूम मध्ये ..मी मनापासून हसलो यावर ..त्यांना म्हणालो मी फेकीन माझी पुडी ..तुमच्या हातात दिली तर तुम्हीच फस्त कराल ..त्यांनी नेहमीप्रमाणे मिशीत हसत टाळी दिली मला ..म्हणजे एकंदरीत परिणाम शून्य होता तर ..ते लोक जाताच सर वार्डात आले ..आम्ही सगळे घोळका करून त्याच्या भोवती जमलो ..शेवटी सर्वाना खाली बसवून सरांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो ..सकाळपासून उडालेला गोंधळ आलाय माझ्या कानावर..अशी पूर्वसूचना न देता बिडी तंबाखू वाटप बंद केल्याचे तुम्हाला रुचलेले नाहीय हे मी जाणून आहे ..परंतु नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागला आहे ..आपल्या सगळ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे हे तुम्ही देखील मान्य केले पाहिजे ..आताच आपण तंबाखूमुळे होणाऱ्या भीषण परिणामांबाबत माहिती घेतली आहे ..आपल्या पैकी कोणालाच असा भयंकर मृत्यू आलेला आवडणार नाही ..इथे दारू आणि इतर मादक द्रव्ये सोडतांना आपण जर तंबाखू देखील सोडली तर नक्कीच चांगले राहील ..ज्या लोकांना तंबाखू सोडताना ..पोट साफ न होणे..चीडचीड होणे ..अवस्थ वाटणे ..झोप न येणे .किवा इतर त्रास उद्भवतील त्यांना आम्ही औषध देवू हवे तर ..परंतु आता हा निर्णय अमलात आणायला सर्वांनी कृपया सहकार्य करावे ...असे म्हणून सरांनी आम्ही दिलेला अर्ज खिश्यात ठेवला ..कोणाला काही प्रश्न ? असे सरांनी विचारताच एकदम आठदहा हात वर झाले ..

" सर ..लेकीन मेरे घरमे मुझे तमांखू खाने के लिये मना नही है ..केवल मैने शराब छोडना चाहिये ऐसा बोला जाता है ..और मैने भी इसके आगे शराब नही पियुंगा ऐसी ठान ली है ..फिर मुझे तमांखू छोडने के लिये जबरदस्ती क्यों ? छत्तीसगढ मधल्या एकाने विचारले ..आम्ही नकळत माना हलवल्या ..त्याने सर्वांच्याच मनातला प्रश्न विचारला होता ..सर म्हणाले ..' हे बघा ..दारू आणि इतर मादक द्रव्यांचे परिणाम केवळ सेवन करणाऱ्या वर नव्हे तर त्याच्या कुटुंबियांवर देखील होत राहतात ..शारीरिक ..मानसिक ..कौटुंबिक ..आर्थिक ..सामाजिक ..आणि अध्यात्मिक अशा विविध पातळ्यांवर नुकसान होते ...दारू पिवून अपघात ..शिवीगाळ ..मारामारी ..किवा गुन्हेगारी .. ..वेड लागणे ..असे परिणाम होतात ..तंबाखूने तसे होत नाही ..तंबाखूमुळे कर्करोग ..दात खराब होणे ..कार्यक्षमता कमी होणे ..ब्राँकायटीस ..क्षयरोग ..क्वचित नपुंसकता ..असे आजार होऊ शकतात तरीही तंबाखूच्या नशेत शिवीगाळ ..तंबाखू सेवन करून मारामारी ..तंबाखूमुळे विविध मानसिक आजार उदभवणे..असे घडत नाही ..म्हणून आपले कुटुंबीय तंबाखू बाबत जास्त आग्रही नसतात ..' दगडा पेक्षा वीट मऊ ' या नात्याने ते आपल्याला तंबाखूचे सेवन करण्यास फारशी मनाई करत नाहीत ..याचा अर्थ असा नव्हे की तंबाखू चांगली आहे ..आपण जर व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालणार असू तर कोणत्याही प्रकारचे व्यसन अथवा मानसिक गुलामी आपण टाळली पाहिजे ..जर राहिलेले जिवन आरोग्यपूर्णतेने व्यतीत करायचे असेल तर आपण आता पासूनच प्रयत्न केले पाहिजेत ..' सरांचे बोलणे पूर्ण होताच .शेरकर काका म्हणाले ..सर पण आम्ही तंबाखू नंतर एकदोन वर्षात सोडणारच आहोत ..तसे मी ठरवले आहे ..सध्या फक्त दारू बंद करायची असे ठरवून आम्ही इथे उपचार घेतो आहोत ..शेरकर काकांच्या युक्तिवादाने सगळे हसू लागले ..

बराच काळ सर सर्वांना समजावत होते ..आम्हीही अनेक प्रकारचे युक्तिवाद मांडत होतो ..एकंदरीत तंबाखू सुरु केली पाहिजे ...आम्हाला सध्या फक्त दारू व इतर मादक पदार्थ सोडण्याची निकड आहे ..आम्ही नंतर तंबाखू देखील नक्की सोडू ..असाच सर्वांचा सूर होता ..शेवटी सरांनी काही अटी व शर्तींवरच तंबाखू बिडी सुरु करू असे जाहीर केले ..त्या अटी खालील प्रमाणे ठरल्या ..

१ ) थेरेपीजच्या वेळात कोणीही तंबाखू तोंडात ठेवता कामा नये ..कोणी असे करताना आढळ्यास ताबडतोब त्याची तंबाखू बंद करण्यात येईल .

२) बिडी ओढण्यासाठी किवा तंबाखू खाण्यासाठी बाथरूम जवळच्या जागेत सर्वांनी जावे ...वार्डात इतर ठिकाणी असे करू नये ..

३) बिडीचे विझलेले तुकडे ..तंबाखूच्या रिकाम्या पुड्या वगैरे नेमक्या कचरा टाकण्याच्या बादलीत टाकाव्यात ..तसेच तंबाखू खावून ..खिडकीतून बाहेर थुंकू नये .. बाथरूम मध्ये जावून थुंकावे 

४) आमचे पालक जेव्हा भेटीला येतील तेव्हा ..पत्येकाच्या पालकांना सर त्यांच्या पेशंटला तंबाखू अथवा बिडी द्यायची किवा नाही याची परवानगी घेतील ..ज्यांचे पालक तंबाखू बिडीस मनाई करतील त्यांची तंबाखू- बिडी बंद करण्यात येईल ...तसेच वरील नियम मोडणाऱ्या व्यक्तीची तंबाखू बिडी कायमची बंद करण्यात येईल .

आम्ही सर्वांनी या शर्ती मान्य केल्यावर ..मग नेहमीप्रमाणे तंबाखू-बिडी वाटप सुरु झाले... मी अंतर्मुख झालो होतो ..वाटले दारू बंद करून आपण एक वर्ष पूर्ण केल्यावर नक्कीच तंबाखू पण बंद केली पाहिजे ... 

( बाकी पुढील भागात )

Friday, May 2, 2014

बिडी ..तंबाखू ..!


बिडी ..तंबाखू ..! ( बेवड्याची डायरी - भाग ३८ वा )


आज सकाळी औषधे वाटून झाल्यावर सगळे ..बिडी तंबाखूचा रोजचा कोटा घेण्यासाठी रांगेत उभे असताना ..माॅनीटरने जाहीर केले की आजपासून बिडी -तंबाखू देणे बंद करण्यात येत आहे ..हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले ..एकदम आरडओरडा सुरु झाला ..मात्र माॅनीटरने कोणाचेही काहीही न ऐकता वाटप बंद करायला लावले ..सगळा गोंधळ उडाला ..आम्ही येथे दारू व इतर मादक पदार्थ सोडण्यासाठी आलेलो आहोत ..बिडी ..तंबाखू सोडण्यासाठी नाही असा सूर होता सगळ्यांचा ..मग वार्डात सगळे समूहात वाटले गेले आणि चर्चा सुरु झाली ..जेमतेम दोन तीन जण असे होते ..ज्यांचे म्हणणे होते की हे एकदम योग्य केले गेलेय ..व्यसनमुक्ती म्हंटले म्हणजे सगळीच व्यसने बंद केली पाहिजेत .. बहुतेक जण हा आमच्यावर अन्याय आहे असे म्हणू लागले ...आमच्या पालकांचे बिडी तंबाखू बद्दल काहीच म्हणणे नाहीय ..त्यांना दारू व इतर मादक पदार्थांचा त्रास होतोय ..त्यामुळे ते सोडण्यासाठी आम्ही इथे आहोत ..गोंधळाच्या वातावरणातच सुमारे तासभर गेला ..ज्यांच्याकडे काल वाटल्या गेलेल्या बिड्या किवा तंबाखू शिल्लक होती ते लोक एकदम श्रीमंत असल्याच्या अविर्भावात वावरू लागले ..ज्यांच्याकडील तंबाखू अथवा बिडी संपली होती ते लोक आपले कसे होईल या विवंचनेत ..मी बिडी ओढत नसे मात्र तंबाखूची सवय होती मला ..अगदी खूप नाही तरी सकाळी शौचाला जाताना चिमुटभर दाढेखाली धरली की बरे असे ..प्रत्येक वेळी जेवण झाल्यावर ..चहा झाल्यावर खूप तल्लफ येई तेव्हा चिमुटभर खात असे ..ही सवय मला अगदी कॉलेजला असल्यापासून लागलेली ..लग्नानंतर अलकाने काही दिवस तक्रार केली ..तोंडे वाकडी केली ..एकदोन वेळा माझी तंबाखूची पुडी लपवून ठेवली ..त्यावेळी मात्र मी चिडलो होतो तिच्यावर ..मी काही दिवसभर खात नाही तंबाखू ..थोडी चिमुटभर खातो ..त्याला तू अजिबात मना करू नकोस ..असा म्हणत वाद घातला खूप ..शेवटी तिने तक्रार करणे सोडून दिले होते ..पुढे दारूचे प्रमाण वाढल्यावर तिचे सगळे लक्ष दारू कशी बंद होईल माझी याकडे एकवटले होते ..तंबाखू नगण्य ठरली ..उलट हवे तर तंबाखू चालेल ..मात्र दारू अजिबात नको असा हट्ट होता तिचा ..अर्थात मी माझ्याच मनासारखे वागलो शेवटी ...

इथे उपचारांसाठी दाखल झाल्यावर देखील मला हीच चिंता होती की व्यसनमुक्ती केंद्र म्हंटल्यावर इथे तंबाखूचे वांधे होणार ..दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी मी सरांना त्याबद्दल विचारले होते..त्यावर ते हसून म्हणाले होते की बहुधा सर्वच व्यसनी व्यक्तींना दारू अथवा इतर मादक पदार्थांसोबत हे को-अॅडीक्शन असते तंबाखू ..सुपारी.. विडीचे ...हे आम्ही जाणून आहोत ..दारूच्या तुलनेत हे निकोटीनचे व्यसन तसे नगण्य वाटते आपल्याला ..इथे सगळी व्यसने एकदम बंद ठेवली तर खूप अवस्थता येते ..सगळ्याच व्यासनांशी एकाच वेळी झुंज देता येणे कठीण असते ..म्हणूनच आम्ही इथे अगदी माफक प्रमाणात इथे तंबाखू व विडी साठी परवानगी देत असतो ..रेशनिंग पद्धतीने येथे कोटा ठरवला आहे ..धुम्रपान करणाऱ्याला दिवसाला फक्त आठ विड्या मिळतील..सिगारेट अजिबात नाही ..कारण सिगारेट मध्ये काही ड्रग अँडीक्ट इथे मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या वगैरे भरून ओढण्याची शक्यता असते ..तसेच विडी मध्ये तंबाखूचे प्रमाण सिगरेटच्या तुलनेत खूप कमी असल्याने आणि कमी नुकसान व्हावे या हेतूने विडी दिली जाते ..तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना रोज फक्त एक पुडी तंबाखू मिळते ..जी सुमारे आठ दहा वेळा खाता येईल .. गुटखा ..खर्रा ..वगैरे प्रकार मात्र अजिबात मिळणार नाहीत ..हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला होता ..आता सगळेच बंद होणार म्हंटल्यावर मी देखील चिंतेत होतो ..मी कमी तंबाखू खात असल्याने माझ्या लॉकर मध्ये थोडी थोडी तंबाखू उरलेल्या एकदोन पुड्या ..तसेच भरलेली एक पुडी शिल्लक होती ..शेरकर काकांना ते माहित होते ..ते माझ्या मागे लागले ..एक चिमुटभर तरी तंबाखू दे म्हणून ..अगदी चार कण दे हवे तर ..यार सकाळी शौचाला साफ झालेली नाहीय ..एकदम गयावया करत ते माझ्या मागे फिरू लागले ..शेवटी मला त्यांची दया आली ..त्यांना मी तंबाखू देतोय हे कळले असते तर आणखी काही लोक माझ्या मागे लागले असते म्हणून मी त्यांना इशारा करून बाथरूमकडे जाण्यास खुणावले ..मग कोणाचे लक्ष नाही असे पाहून माझा लॉकर उघडून त्यातून पटकन ती भरलेली पुडी काढली आणि खिश्यात ठेवली ..एकाचे लक्ष गेलेच माझ्याकडे ..माझ्या संशयास्पद हालचाली पाहून त्याने काय ते ओळखले असावे ..तो पण माझ्या मागे मागे बाथरूम कडे आला ..शेवटी शेरकर काका आणि त्याला ही चिमुटभर तंबाखू द्यावी लागली मला ...

वार्डात जणू हलकल्लोळ मजला होता ..' अभी सर आने दो ..उनको बोलेंगे के हमको नही रहेना यहाँ.' .असा टोकाचा सूर काही काढू लागले ..बिडी ओढणारे महाभाग वार्डच्या काना-कोपऱ्यात फिरून कुठे एखादा बिडीचा तुकडा मिळतोय का ते तपासत होते ..त्यात अगदी उच्चशिक्षित लोक देखील सामील असलेले पाहून मला त्यांची गम्मत वाटली ..गुलामीची ही अवस्था मी प्रथमच अनुभवत होतो ..एकदोन दिवस माझ्याकडील शिल्लक तंबाखू मला पुरली असती ..मात्र नंतर आपले कसे होईल हीच विवंचना लागली मला देखील ..आता दोस्ती वगैरे बाजूला ठेवून फक्त स्वतःपूरते पाहायला हवे ..शेरकर काकांनी या पुढे कितींनी विनवणी केली तरी त्यांना तंबाखू द्यायची नाही हे मी ठरवले...नाष्टा झाल्यावर पुन्हा सगळे विडी तंबाखूच्या काळजीत समूहाने जमून चर्चा करत होते ..एकाने आयडिया काढली की आपण संस्थेच्या संचालकांच्या नावाने एक विनंती अर्ज लिहू ..त्यात सगळे नमूद करून ..विडी तंबाखू सुरु करण्याची विनंती करू ..अन्यथा आम्हाला येथून डिसचार्ज देण्यात यावा अशी मागणी करू ..लगेच कार्यवाही सुरु झाली ...जरा चांगले अक्षर असलेल्या एकाने अर्ज लिहायला सुरवात केली ..त्यापूर्वी त्याने अर्ज नीट लिहावा म्हणून त्याला एकाकडे असलेल्या चिमुटभर तंबाखूची लाच देण्यात आली ..ती दाढेखाली धरून मग त्याचा हात चालू लागला नीट ..अर्ज लिहून झाल्यावर त्यावर सगळ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या ..आम्ही वार्डातील ' त्रिदेव ' जे मानसिक रुग्ण होते व त्यांना कसलेही व्यसन नव्हते त्यांना देखील सह्या करण्यास सांगितले ..बिचार्यांनी निमूटपणे सह्या केल्या ..

( बाकी पुढील भागात )

सुंदरतेचा आस्वाद !


सुंदरतेचा आस्वाद ! ( बेवड्याची डायरी - भाग ३७ वा ) 

इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर झोप लागत नसे ..लागली तरी ती झोप नव्हती तर दारूच्या नशेत शरीर मन शिथिल होणे असे ..त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवे..मन देखील विषण्ण असे ..डोळ्यांची चुरचुर ..अंगदुखी ..पित्तप्रकोप अशी सगळी लक्षणे जाणवत ..अंथरुणातून उठूच नये असे वाटे ..अलकाने खूप तगादा लावल्यावर मी नाईलाजाने उठत असे ..आता ही लवकर उठण्याची सवय अशीच ठेवायची असे मी ठरवले होते मनाशी ..मी लवकर उठतो म्हणून माॅनिटरने मला बेल वाजल्यावर इतरांना उठवण्याची देखील जवाबदारी दिली होती ...हे दुसर्यांना उठवण्याचे काम गमतीशीर होते ..विशेषतः काही आळशी लोक उठायला खूप कंटाळा करत असत ..कितीही हाक मारला तरी नुसते ..हु..हम्म ..पाच मिनिट ..अशी सवलत मागत असत ..काही जण वैतागून ..मला म्हणत ...यार तू रातको सोता है या नही ? ..एकाने तर मला चक्क शाप दिला होता ..तू चैन से सोनेवालो कि निंद हराम करता है ..तूझे कभी चैन नही मिलेगा ..एकदोन महाभाग असे असत की अजिबात त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नसे ..शेवटी त्यांच्या तोंडवर थेंबभर पाणी शिंपडले की मग डोळे उघडत ते ..मला हे उठवण्याचे काम करतोय म्हणून काहींनी मला गमतीने ' मुर्गा ' म्हणजे ' कोंबडा ' म्हणण्यास सुरवात केली होती ..अर्थात मी हे काम उत्साहाने आणि हसतमुखाने न चिडता करत होतो ..सरांनी काल दिलेल्या प्रश्नानुसार मी येथे राहताना थेरेपीजच्या वेळा सोडून एक दिनक्रम लिहिला होता ..त्यात सकाळी पीटी झाल्यावर सूर्यनमस्कार ..दुपारी वाचन ..सायंकाळी मोकळ्या वेळात ..थोडा वेळ हास्यविनोदात सामील होणे ..थोडा वेळ कॅरम खेळणे ..टी.व्ही पाहणे ..आणि रात्री झोपण्यापूर्वी येथे जे जे शिकतो आहे त्याबाबत डायरीत नोंदी ठेवणे सगळे लिहिले होते .

आज समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' फक्त आजचा दिवस मधील शेवटची तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

१० ) फक्त आज मी स्वतःसाठी अर्धा तास देईन ..या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करेन .

११ ) जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही 

१२ ) मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल ..यावर मी विश्वास ठेवेन .

रोजच्या रोज स्वताच्या जिवनाबद्दलच्या चिंतना साठी दहावी सूचना आहे असे सांगत सर म्हणाले ..दिवसभरात केव्हाही मोकळा वेळ असेल तेव्हा आपण किमान अर्धा तास तरी चिंतन केले पाहजे ..म्हणजे आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे ..माझे दिवसभराचे वर्तन तपासणे ..मी कोणाशी कसा वागलो ..काय बोललो याचे परीक्षण करणे होय ..तसा प्रत्येक माणूस नकळत असे चिंतन करतच असतो ..मात्र बहुधा असे चिंतन करताना तो दिवसभरात स्वताच्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना आठवतो ..अपमान जनक प्रसंगांची उजळणी करतो ..इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वर्तनाचा विचार करून स्वताचे काय चुकले आहे हे न समजून घेता ...इतरांच्या चुका शोधून ..एकतर रागाची ..बदल्याची ..किवा निराशेची भावना मनात जोपासतो ..त्या ऐवजी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ..दिवसभरात घडलेल्या घटनांमधून मी काही सकारात्मक शिकतोय का ? मला भेटलेल्या व्यक्तींच्या वागणुकीतून मी काही धडा घेतोय का ?तसेच मी केलेल्या चुका उद्या कशा टाळता येतील ..आसपासच्या सर्वांशी आपुलकीचे संबंध कसे जोपासता येतील ..याचा विचार करणे म्हणजे सकारात्मक चिंतन होईल ..

' जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही ' हे वाक्य वाचल्यावर बहुतेक लोकांच्या मनात सुंदरता म्हणजे ' स्त्री ' चे सौंदर्य येवू शकते ..या सूचनेत सुंदरता या संकल्पनेत अनेक गोष्टी येतात ..तसेच या वाक्याचा असा ही अर्थ निघतो की ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरेन ' म्हणजेच ज्या ज्या गोष्टीना समाजाने ..धर्माने ..अथवा आपल्या संस्काराने वाईट म्हंटले आहे त्या सर्व गोष्टींपासून मी दूर राहीन .. समाज ज्याला चांगले म्हणतो ..सुंदर म्हणतो त्याचा आस्वाद घेईन ..यात विविध कलांचा आस्वाद ..निसर्गसौंदर्य ..भूतदया ..चांगल्या प्रकारच्या खाण्याच्या विविध गोष्टी ..संगीत ..वाचन ..समाजसेवा ..वगैरे गोष्टी येतात ..आपण व्यसन करत असताना नेमके ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे ' अश्या गोष्टी करत गेलो ..त्या ऐवजी आता चांगल्या आणि सुंदर गोष्टीत रस घेणे अपेक्षित आहे .

शेवटचे वाक्य होते ' मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवेन ' म्हणजे क्रिया -प्रतिक्रियेच्या सिद्धांतावर माझा विश्वास असला पाहिजे ..मी जर जगाला प्रेम ..आपुलकी ..माया ..द्या ..करुणा ...देत गेलो तर नक्कीच या गोष्टी मलाही मिळतील ..मात्र मी जर द्वेष ..तिरस्कार ..राग ..वंचना ..फसवणूक ..निर्भत्सना ..कटुता देत गेलो तर मलाही कधीतरी असेच मिळेल जगाकडून हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..आपल्या चांगल्या कर्मांनीच आपले भविष्य घडत जाते ..हे लक्षात ठेवून आपली भावना आणि कर्मे याप्रती जागरूक राहणे महत्वाचे आहे .

( बाकी पुढील भागात )