Sunday, May 26, 2013

योगा ...हमसे नही होगा !

दुपारचे जेवण आटोपून सगळे जरा विश्रांती घेत होते ..आता मला चांगली भूक लागू लागली होती .. पहिले दोन दिवस पोटात दारू नसल्याने काही खाण्याची इछाच नसे .. मळमळत होते ..मात्र आता बहुतेक शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा .. बहुतेक जण विश्रांतीच्या मूड मध्ये होते .. काही तरुण मुले कोपऱ्यात भिंतीशी बसून थट्टा मस्करी करीत होते ..शेरकर काका तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने त्यांच्यात सामील झाले होते ..दोन जण बुद्धिबळाचा पट उघडून डोके लावत बसलेले ..तर चार जण कँरम भोवती .. एकंदरीत चांगले खेळीमेळीचे वातावरण झालेले .. माझा जेमतेम डोळा लागत होता तोच पुन्हा एकदा ती कर्कश्श बेल वाजली .. माझ्यासारखे नवखे धडपडून उठून बसले ..आता योगाभ्यास होणार होता असे कळले ..माझा व योगाभ्यास यांचा छत्तीस चा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो .. इथे मात्र सर्वाना योगाभ्यास करणे सक्तीचे होते .. नाईलाजाने मी जरा मागेच बसलो .. योगाभ्यास घ्यायला आलेले सर ..अंगाने किडकिडीत होते ..चेहऱ्यावर मात्र प्रसन्नता होती .. त्यांनी सर्वाना अभिवादन केले .. तिकडे माँनीटर योगाभ्यास बुडविण्यासाठी नेमक्या वेळी लघवी..संडास वगैरे निमित्ताने बाथरूम मध्ये जावून बसलेल्या चुकार लोकांना शोधून बाहेर काढून ..हॉल मध्ये आणून बसवीत होता .. एकंदरीत आठदहा लोक योगाभ्यास चुकविण्याच्या मागे होते ...सरांना ते माहित असावे ..सरांनी त्यांना सर्वाना पुढच्या रांगेत बसविले .. मग ' योगेन चित्तस्य ..' अशी प्रार्थना म्हंटली ..' मित्रांनो आज आपण आधी योगाभ्यासाबद्दल नीट माहिती घेवूयात ..म्हणजे सर्वाना व्यसनमुक्ती केंद्रात योगाभ्यास का घेतला जातो याचे कारण कळेल ..तसेच मन लावून योगाभ्यास करण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल .. ' सरांनी पुढे एक प्रश्न विचारला ' योग ' म्हणजे काय ? ' आम्ही सर्व मख्खपणे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिलो .


' चला ..कोणीच उत्तर देत नाहीय असे दिसतेय .. ' योग ' म्हणजे दोन गोष्टींचे एकत्र येणे असे म्हणता येईल .. संस्कृत मधील ' युज ' या शब्दापासून योग हा शब्द आलाय ..इथे शरीर आणि मन यांचे एकत्र येणे या अर्थाने ' योग ' हा शब्द वापरला जातो ..एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शरीर आणि मनाची एकाग्रता ..संतुलन ..अतिशय महत्वाचे असते .. व्यसनमुक्ती केंद्रात यावे लागणाऱ्या व्यक्तीचे मन अतिशय चंचल असते हे गृहीत आहे .. अनेक वेळा मनाने या पुढे दारू प्यायची नाही ..असे ठरवूनही ..शारीरिक ओढीमुळे आपण दारू प्यायलो आहोत ..आणि काहीवेळा शारीरिक त्रास होत असताना ..दारू पिणे शरीरीला झेपणार नाही हे ठावूक असताना देखील मन दारूकडे ओढ घेते म्हणूनही आपण दारू प्यायलो ..थोडक्यात सांगायचे तर आपण ठरविलेल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी शरीर मनाचे एकत्र येणे आवश्यक होते ..मात्र ते आपल्याला जमले नाही .येथे योगाभ्यास करून सगळ्यात आधी आपण शरीर मन एकाग्र करण्याचे शिकणार आहोत ..यासाठीच योगाभ्यास बहुधा डोळे मिटून केला जातो ..म्हणजे डोळे मिटून शरीराच्या विशिष्ट हालचाली करणे ..विशिष्ट आसने करणे ....ज्यामुळे आपले स्न्यायु ..सांधे ..पचन संस्था ..मेंदूची ग्रहणशक्ती ..मज्जा संस्थेची कार्ये यांना बळकटी मिळेल ... व्यसनाधीनतेमुळे अनेक वर्षे आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे .. योगाभ्यास करून आपण शरीर आणि मन निरोगी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .. योगाभ्यास हा फक्त ज्यांना साधू संन्यासी व्हायचेय ..मोठे योगी बनायचेय त्यांनीच करायचा असतो हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे ..अष्टांग योग ..ध्यान साधना ..समाधी वगैरे अवस्था अगदी पुढील पायऱ्या आहेत .. इथे तसे काही नसणार आहे तर फक्त आपले शरीर आणि मन बळकट करण्यासाठी हलकी आसने आपण करणार आहोत ..अगदी प्रत्येकाला सहज शक्य होतील अशी आसने इथे घेतली जातील तेव्हा कंटाळा न करता एकाग्रतेने योगाभ्यास करणे आपल्या व्यसनमुक्ती साठी खूप फायदेशीर ठरेल 


सर सांगत असलेली माहिती मला नवीन होती ..माझे गैरसमज दूर व्हायला त्यामुळे मदत झाली .. पुढे सर म्हणाले इथे घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक आसनांचे फिशिष्ट फायदे आहेत ते मी वेळोवेळी सर्वाना सांगीनच .. सध्या इतकेच सांगतो की ' योगा मेक्स यु ..हेल्दी ..हँप्पी ..अँड क्रियेटीव्हली इफिशियंट ' सरांनी याचा मराठीत पुन्हा अर्थ सांगितले ..योगामुळे तुम्ही निरोगी ..आनंदी ..आणि सृजनात्मक शक्ती प्राप्त करू शकाल .. सरांचे बोलणे माझा उत्साह वाढवणारे होते .. चला काही फायदे होवोत की न होवोत .. आपण करून पाहायला काय हरकत आहे ...मग सरांनी सर्वाना डोळे मिटून उताणे झोपायला सांगितले .. हात शरीराच्या बाजूला ठेवा .. मान सरळ किवा सोयीस्कर वाटेल तशी एका बाजूला कलती ठेवा .. डोळे हलकेच मिटलेले .. सगळे शरीर सैल सोडा ..शरीरात कोठेही कसलाही ताण जाणवणार नाही अश्या अवस्थेत पडून रहा .. आपण आता शरीर मनाला उत्तम विश्रांती देणारे आसन करणार आहोत .जे दिसायला अगदी सोपे आहे मात्र योग्यप्रकारे करण्यास अवघड आहे ..ज्याला सर्व आसनांचा ' राजा ' संबोधले जाते असे ' शवासन ' करणार आहोत ..सर सांगत होते त्यापद्धतीने मी उताणा झोपलो ..डोळे मिटले .. सरांचा आवाज दुरून ..खोल जागेतून आल्यासारखा वाटत होता .. !


( बाकी पुढील भागात )

Friday, May 3, 2013

हँलुस्नेशन च्या गमती जमती ..!

मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे ..आजकाल साठीनंतर सारखे हे दुखते ..ते दुखते.आता आमचे काय राहिले आहे ..असे म्हणणारी माणसे मी खूप पहिली आहेत पण ..या वयातही तरुणांना लाजवेल असं उत्साह आणि मिस्कील पणा शेरकर काकांकडून नक्कीच शिकण्यासारखा होता .. त्यांच्या बाबत एकाने मला माहिती सांगितली होती की काकांची चांगली शेतीवाडी आहे घरी .. मात्र ते कश्याकडे लक्ष देत नाहीत ..मोठा मुलगा सगळे व्यवहार पाहतो .. घरी सतत अवस्थ राहतात व बाहेर मित्रांमध्ये जाऊन दारू पितात ..मग घरी आल्यावर आरडा ओरडा सुरु होतो ..असे जास्त वेळा झाले की मुलगा सरळ मैत्री च्या लोकांना फोन करून यांना घेऊन जायला सांगतो . साधारण तीन चार महिने झाले की पुन्हा घरी घेऊन जातो ..काका काही महिने चांगले राहतात व नंतर परत पिणे सुरु करतात ..परत मैत्रीत येतात .. त्यांच्या मते दारू हा त्यांचा प्रॉब्लेमचा नव्हता तर मुलाचे आणि कुटुंबियांच्या वागण्यामुळे त्यांना दारू प्यावी लागत होती ...मला वाटले जो पर्यंत काका इतरांच्या चुका शोधात बसतील आणि परिस्थिती बदलण्याची वत पाहतील तो पर्यंत त्यांचे व्यसनमुक्त राहणे कठीणच होते . 

काका मला सेंटर मध्ये उपचार घेताना अचानक भ्रमाच्या अवस्थेत गेलेल्या किवा भास झालेल्या लोकांच्या गमती सांगू लागले ..ऐक जण म्हणे दाखल होऊन चार दिवस झाले होते ..चार दिवस त्याला थोडा अशक्तपणा जाणवत होता ..भूक कमी होती ..व रात्री झोप नीट येत नव्हती ही तक्रार होती त्याची त्यावर औषध सुरु होते ..पाचव्या दिवशी ऐक दुसरा १५ दिवस झालेला जेव्हा बाथरूम मधून अंघोळ करून टॉवेल गुंडाळून वार्डात कपडे घालण्यासाठी आला . त्याच्या लॉकर मधून कपडे काढत असतांना हा नवीन गडी एकदम त्याच्या अंगावर धावून गेला ..त्याच्या पाठीवर ऐक जोरदार चापट मारून त्याला रागावू लागला ' तुला काही लाज लज्जा आहे की नाही ?.. इतक्या परक्या लोकांसमोर असे टॉवेल वर फिरतेस ?..वगैरे मोठमोठ्याने ओरडू लागला .. कोणाल काही कळेच ना की हा असं काय बोलतोय .. ज्याच्या पाठीवर मारले तो तर बावचळला होता .. हा मात्र त्याला रागवतच होता .. चल आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या घरातून .. असे म्हणू लागला मग मॉनीटर च्या लक्षात आले की हा ..भ्रमाच्या अवस्थेत गेलाय आणि त्या अवस्थेत तो त्या टॉवेल वर असणाऱ्या माणसाला आपली पत्नी समजतोय ..इतक्या माणसात आपली पत्नी पत्नी फक्त टॉवेल वर वावरते आहे हे पाहून त्याचे पित्त खवळले होते ..सगळा प्रकार लक्षात येताच मॉनीटर त्याला समजावू लागला .. बराच वेळ तो गोंधळल्या सारखा होता मग थोडा भानावर आला आणि माफी माफू लागला ..सर्वाना वाटले चला आता हा या अवस्थेतून भानावर आला असणार ..पुन्हा अर्ध्या तासाने हा एकाला विचारू लागला ..मुहूर्त टळून गेलाय तरी अजून लग्न का लागत नाहीय ? ..हे इतके पाहुणे कंटाळले असतील ..लवकर लग्न लावा .. म्हणजे काही वेळाने तो परत भ्रमाच्या अवस्थेत गेला होता ..या वेळी तो त्याला वाटत होते की वार्ड मधील सगळे लोक त्याचे नातलग ..पाहुणे आहेत आणि ते त्याच्या मुलाच्या लग्नाला आले आहेत ... हा भ्रमाचा प्रकार म्हणजे ऑन - ऑफ असा होता म्हणजे काही काळ ती व्यक्ती भ्रमाच्या अवस्थेत जाते तर काही काळाने पुन्हा भानावर येते ..पुन्हा भ्रमात जाते .वर वर जरी हे गमतीदार वाटले तरी ..मला जाणवले की ज्याला भ्रम होत आहेत अश्या व्यक्तीच्या बाबतीत त्याला जे भासते ते सगळे सत्य असते व अशी मेंदूची फसगत करणारी दार मेंदूचे कितीतरी नुकसान करत असते आज पर्यंत दारू मुले लिव्हर वर परिणाम होतो हे मी ऐकून होतो .मेंदू वर देखील असे गंभीर परिणाम होतात हे येथे समजले .. शिवाय त्या भ्रमाच्या अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्या व्यक्तीला आपण भ्रमात काय काय बडबड केली किवा काय कृत्ये केली ते आठवतच नाही ..हे तर अधिकच वाईट 

ऐक जण म्हणे ..एकदा अचानक जेवणाच्या वेळेला त्याचे सगळे सामान लॉकर मधून काढून पिशवीत भरून जेवण घ्यायला जे लोक उभे होते त्यांच्या रांगेत उभा राहिला .. समोरच्याला त्याने गाडी किती लेट आहे असे विचारले .. ज्याला विचारले तो देखील नवीनच होता त्याला काय उत्तर द्यावे ते कळेना .. हा मात्र अगदी गंभीर पणे रेल्वे स्टेशन वर उभा राहून गाडीची वाट पाहत असल्यासारखा उभा होता .. मॉनीटर च्या लक्ष्यात आल्यावर त्याला औषध देवून झोपवले गेले ..एकजण दाखल होऊन दोन दिवस झाले होते ..आणि भ्रमाच्या अवस्थेत गेला .. त्याने मॉनीटर ला ऐक लार्ज पेग ची आर्डर दिली ..गम्मत म्हणून मॉनीटर ने त्याला स्टील च्या ग्लासात ग्लुकोज घालून त्यात पाणी टाकून प्यायला दिले ..तर याने ऐटीत आधी त्या ग्लासातले दोन थेंब बोटाने बाहेर उडवले ..घटा घटा ग्लास रिकामा केला ..ते ग्लुकोज पिताना त्याने अगदी दारू पीत असल्या सारखा जरा कडवट चेहरा केला होता . परत त्याने रिपीट ची देखील ऑर्डर दिली होती नंतर . आपण येथे आलो ते बरे झाले असे मला वाटू लागले ..बाहेर दारू पिताना दारूमुळे होणारे सगळे दुष्परिणाम मला कधीच माहित झाले नसते व दारू किती भयंकर आहे ते देखील समजले नसते कधीच .. आता वाटत होते की अलकाने अगदी योग्य वेळी मला येथे दाखल केले होते .

( बाकी पुढील भागात )

भास ..भ्रम ..!


' प्रतिबिंब ' मधील विचार सरांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला होता व मला तो पटलाही .. माझ्या मागील अनुभवांवरून हे सिद्ध होत होते की मी मनाशी अनेकदा या पुढे प्यायचे नाही असे ठरवले होते तेरी काही दिवसांनी माझे पिणे परत सुरु झाले होते .. माझ्या पिण्याबद्दल माझे आई , बाबा , मोठी भावंडे ..आणि अलका देखील चिंतीत होती .. पूर्वी अगदी मी क्वचित घेई तेव्हा त्यांना कधी माझ्या बाबत काळजी बाटली नव्हती पण ..आताशा माझ्या पिण्याचा विषय नेहमी निघत असे .. मी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम किमान ऐक लाख रुपये इतकी होत होती .. म्हणजे गेल्या १० वर्षात मी ऐक लाख रुपयांची दारू प्यायलो होतो तर ..आणि तुलनेत जेव्हा दहा वर्षात माझा कपड्यांवर ..स्वतच्या जेवणावर ..वगैरे कमीच खर्च झाला होता .. मी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच ..' मेलो ..मेलो ..पकडा ..धरा त्याला ' अशी मोठी आरोळी ऐकू आली आणि ऐक जण जो मघाच पासून वार्ड मध्ये कोपऱ्यात बसून होता तो ओरडत धावू लागला ..काय भानगड आहे मला समजेना ..ताबडतोब चार कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि धरून ठेवली ..तो घामाघूम झाला होता ..सर्व शरीर थरथरत होते ..चेहरा काहीतरी भयंकर पहिल्या सारखा झाला होता ..त्याच्या डोळ्यात कोणतीही ओळख दिसत नाव्ह्ती.. दोन जणांनी ऐक नवार ची मोठी पट्टी आणली तिचे चार तुकडे केले आणि त्या व्यक्तीला धरून काळजीपूर्वक पलंगाला बांधून टाकले ..सर्व जण त्याच्या भोवती जमले होते ..माझ्या सारखे नवखे तर घाबरलेलेच होते .. काल रात्री हा माणूस सगळ्यांशी चांगला बोलत होता ..आणि अचानक आज याला काय झाले हा प्रश्न सगळ्यांना पडला होता ..तो माणूस बांधल्यामुळे जरा शांत झाला होता तरी पण बांधलेले हात पाय सोडवण्यासाठी त्याची चुळबुळ चालली होती ..तसेच तोंडाने देखील तो काहीतरी अस्पष्ट बोलत होता ..

मला अगदीच राहवले नाही म्हणून मी मॉनीटर ला त्या माणसाबद्दल विचारले .आणि त्यांनी दिलेली माहिती जरा आश्चर्यजनकच होती माझ्यासाठी ..हा प्रकार म्हणजे दारू मुले मेंदूवर झालेला तात्पुरता परिणाम होता म्हणे .. मेंदूला अनेक दिवस दारूची सवय झाल्याने ..अशी व्यक्ती व्यसनमुक्ती केंद्रात भरती होते ..किवा काही कारणाने दारू पिणे बंद होते तेव्हा काही जणांना असा त्रास होतो .. या प्रकारात दारू पिण्याचे खूप प्रमाण असेल असे काही नसते तर ..सदर व्यक्तीचा मेंदू दारू करिता किती संवेदनाक्षम असतो यावर हे अवलंबून असते .. म्हणजे जर मेंदूला विशिष्ट प्रमाणात दारूचा पुरवठा झाला नाही तर मेंदू एकप्रकारे असहकार पुकारतो ..आपल्या ज्ञानेंद्रिया मार्फत मेंदू कडे ज्या सूचना पाठवल्या जातात त्या संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर करप्ट होतात ...म्हणजे मेंदू कडे चुकीचे संदेश आणि संवेदना पाठविल्या जातात आणि मेंदू देखील या चुकीच्या संवेदना स्वीकारून त्यांचे विश्लेषण करून मज्जासंस्थेला पुढील कार्यवाही चे संदेश पाठवत असतो ..मुळात संदेश चुकीचा असल्याने ...मेंदू कडून आलेला कार्यवाही चा संदेश देखील चुकीच्या पद्धतीने कार्यवाहीत येतो ..शास्त्रीय परिभाषेत याला ' ' हँलुस्नेशन ' किवा ' डेलीरीयम ' असे ही म्हणतात ..अश्या व्यक्तीला ही अवस्था असे पर्यंत त्याच्या जिवाच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी बांधून ठेवणे आणि औषधोपचार करणे गरजेचे असते ,,जर बांधले नाही तर अशी व्यक्ती या अवस्थेत रस्त्यावर धावून गाडीखाली येऊ शकते ..कोठून उंचावरून पडू शकते ..उडी मारू शकते ..कोणाला काही इजा करू करू शकते ...काही दिवस ही व्यक्ती झोपू शकत नाही किवा जेवण ..लघवी ..संडास या नैसर्गिक क्रिया देखील त्याला समजत नाहीत . ऐक शांत झोप झाल्यावर हे भानावर येतात . 

डोळे ..नाक . कान ..जिव्हा ..त्वचा ही माणसाची ज्ञानेंद्रिये आसपास घडणाऱ्या घटनांचे आकलन करण्यासाठी मदत करून ..ते आकलन मेंदू कडे पोचवत असतात व नंतर त्याचे विश्लेषण करून मेंदू पुढील कार्यवाही चे आदेश देत असतो ..या आकलनातच गडबड होणे म्हणजे भयंकरच होते .अश्या अवस्थेत कशी कशी वेगवेगळ्या प्रकारचे वास येणे ..कोणीतरी हाक मारते आहे असं भास होणे किवा कानात कोणीतरी शिव्या देतेय असे आवाज ऐकू येणे ..समोर नसलेली दृश्ये डोळ्यासमोर साकार होणे..कोणीतरी आपल्याला मारायला आलेय असे दिसणे .. अंगावर अळ्या ..किडे फिरत आहेत असे वाटणे ..एकदम खूप थंडी वाजल्यासारखे होणे किवा एकदम उकडत असल्याचे वाटणे .. स्थळ काळाचे भान जाणे .मॉनीटर ने पुढे सांगितले की विजय भाऊ अहो ..यात अनेकांना वाटते की हे बहुतेक जास्त वर्षे आणि जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे होत असेल ..किवा देशी ..हलक्या दर्जाची दारू प्यायल्या मुळे होत असेल ..तर तसे अजिबात नाहीय ..कोणती ..किती दारू पितो माणूस हे यात महत्वाचे नसून त्याचा मेंदू दारू करिता किती संवेदनशील आहे ही गोष्ट महत्वाची आहे ..तसेच मानवी मेंदूची नेमकी किती क्षमता कमी होतेय दारूमुळे ..झालीय हे समजण्याचे तंत्रज्ञान अजूनतरी नीट विकसित झालेले नाही ..आणि या पूर्वी आपल्याला असे कधी झाले नाही म्हणून पुढे कधी होणार नाही असे समजणे देखील चुकीचे आहे कारण कोणाचा मेंदू केव्हा दगा देईल हे सांगता येत नाही .

या प्रकारच्या भासांचे उदाहरण ' वास्तव ' या सिनेमात दिले असल्याचे त्याने मला सांगितले ..चित्रपटाच्या शेवटी संजय दत्त च्या मागे जेव्हा पोलीस लागतात आणि तो त्याच्या घरात लपलेला असतो ..तेव्हा त्याला असलेले दारूचे व्यसन न मिळाल्याने .तो असाच खिडकी..बघून ओरडतो ... सर्वाना लपा म्हणतो .. प्रचंड घाबरलेला असतो तो .. मला तो सिनेमातला प्रसंग आठवला आणि मॉनीटर जे सांगतो आहे त्यावर माझा विश्वास बसला .. ही अवस्था किमान चार पाच दिवस तरी टिकते ..काही जणांना दारू बंद केल्यावर दुसऱ्याच दिवशी असे भास होतात तर काही जणांना दारू बंद केल्यावर काही दिवसांनी असे होते ..प्रत्येकालाच हे होईलच असेही नाही..तरी देखील कोणाला होईल आणि कोणाला होणार नाही असेही काही नक्की नसते ... काही लोकांच्या मेंदूतील सोडियम ..पोटँशियम या घटकांचे प्रमाण जर बिघडलेले असेल तर जास्त दिवस ही अवस्था टिकू शकते .. अश्या प्रकारचे भास होणे म्हणजे दारू सरळ मेंदूवर परिणाम करत असल्याचे हे प्रतिक आहे ..आणि इतके होऊनही जर दारू पिणे पुन्हा सुरु राहिले तर असा माणूस ठार वेडा होऊ शकतो ..मला असे पूर्वी काढ झाले नव्हते मात्र आठवले की मागच्या वेळी जेव्हा मी घरीच दारू बंद केली होती तेव्हा रात्री मला नीट झोप लागली नव्हती आणि ..ऐक दोन वेळा मला घरातील टेलिफोन ची घंटी वाजल्याचा भास झाला होता ..तर एकदा कोणीतरी दार वाजवते आहे असे वाटले होते ..बाहेर नाक्यावर सिगरेट आणायला जाताना देखील मागून गाडीचा होर्न वाजतो आहे असे वाटून मी बाजूला सरकलो होतो ..बापरे म्हणजे हे असेच भासाचे प्रकार होते तर .. मनातून मी जरा घाबरलोच..या पुढे परत दारू प्यायची नाही हे मनाशी पक्के ठरवत होतो .

( बाकी पुढील भागात )

निर्बलतेची कबुली ..मान्यता !


सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..आपण रोज या पुस्तकातील ऐक विचार वाचून त्यावर चिंतन करत असतो ..या चिंतनामुळे आपल्याला व्यसनापासून दूर राहण्याची मानसिक शक्ती मिळते असा हजारो व्यसनींचा अनुभव आहे . आजचा विचार हा व्यसनाधीन झाल्याची स्वतःला कबुली देण्यासंबंधी आहे .. आपण इथे उपचारांसाठी दाखल झाले आहेत खरे असले तरी ..बहुतेकजण आईवडिलांच्या ..पत्नीच्या ..किवा मुलांच्या आग्रहाखातर इथे दाखल झाले आहेत व त्यांना अजूनही मनात वाटत असेल की मी काही फारशी दारू पीत नव्हतो किवा फारसे व्यसन करत नव्हतो .. पण नातेवाईकांना उगाचच चिंता ..काळजी वगैरे वाटली आणि त्यांनी आग्रह केला तो मोडता आला नाही म्हणून उपचार घेण्यास तयार झालो . काही जणांना पत्नीने माहेरी निघून जाण्याची धमकी दिली असेल ..काही जणांना नोकरीवर गैरहजर राहण्याबद्दल नोटीस मिळाली असेल म्हणून जरा तब्येत बरी करण्यासाठी ता येथे आले असतील .. तर काही जण असेही असतील की व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय उपचार चालतात हे पाहण्यासाठी येथे दाखल झाले असतील ..मात्र मनातून प्रत्येकाला मी दारुडा नाही असेच वाटत असते कारण दारुडा म्हंटले म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे फाटके कपडे ..दाढी वाढलेली .. नोकरी गेलेली .. घरात सतत भांडणे .. लोकांकडे पैसे मागणे .. दारू पिऊन रस्त्यावर झिंगत चाललेला .. रस्त्याच्या कडेला नशेत पडून असलेला ..अश्या व्यक्तीशी तुलना करता आपल्या पैकी बहुतेक जणांना कधीच या अवस्थेला तोंड द्यावे लागले नसल्याने स्वाभाविक पणे आपण दारुडे आहोत हे मनापासून आपण कबुल करण्यास नकार देत असतो .

सरांचे म्हणणे अगदी पटले मला ..माझ्या मनात देखील दारुडा म्हणजे अशीच ऐक भणंग .. कर्जबाजारी ..झोपडपट्टीत राहणारा ..पत्नी .मुलांना मारझोड करणारा ही प्रतिमा होती ..आणि त्या तुलनेत मी जरी दारू पीत असलो तरी माझ्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती .. मी नेहमी अलकाला हेच सांगत होतो की मी दारू पितो म्हणजे एकदम आभाळ कोसळल्यासारखे घाबरण्याची काही गरज नाहीय ..मी काही दारुडा नाहीय अजिबात , मी स्वतः नोकरी करतो ..घरचा खर्च भागवतो .. कधीही तुला मारझोड केली नाहीय ..तू उगाच बाऊ करते आहेस माझ्या पिण्याचा ....आणि अलकाचे त्यावर असे म्हणणे होते की अहो पण तुम्ही रोजच दारू पीत आहात ..आता तुमचे प्रमाणही वाढत चालले आहे ..जेवण कमी झालेय ..सुटीच्या दिवशी तुम्ही दुपारी देखील पिता ही सगळी लक्षणे पाहून मला माझी आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटते ..रोज वर्तमानपत्रात दारूबद्दल काय काय बातम्या असतात ..कितीतरी अपघात होतात मग मला काळजी वाटणारच . अलकाचे म्हणणे तेव्हा मला पटत नसे पण आता सर् अगदी सविस्तर सांगत होते तेव्हा पटत होते .. सर् पुढे बोलू लागले ..मित्रानो जो पर्यंत आपण दारूच्या किवा जे काही मादक द्रव्य सेवन करत असू त्याच्या आहारी गेलो आहोत अशी कबुली देत नाही तो पर्यंत व्यसनमुक्त होण्याची ताकद मिळणे अवघड आहे . जो पर्यंत आपण व्यसनी झालो आहोत अशी आतून अंतर्मनातून कबुली देत नाही तो पर्यंत उपचारामधिल आपला सहभाग वाढणार नाही आणि मानसिक शक्ती देखील वाढणार नाही . आपण व्यसनी झालो आहोत की नाही हे तपासण्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारून आपण त्याची प्रामाणिक पणे उत्तरे दिली तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याची कबुली आपल्याला देता येईल . अल्कोहोलीक्स अँनॉनिमस ने या साठी वीस प्रश्नांची ऐक प्रश्नावली तयार केली असून त्या वरून मी तुम्हाला फक्त पाच प्रश्न विचारणार आहे व जर त्याची प्रामाणिक पणे तुम्ही होकारार्थी उत्तरे दिलीत तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याचे आपल्याला मान्य कारणे भाग आहे असे म्हणत सरांनी पाच प्रश्न फळ्यावर लिहिले

१) माझ्या व्यसनामुळे माझे कुटुंबीय चिंतीत आहेत काय ? ( कधी ..किती .कोणत्या दर्जाची पितो हे महत्वाचे नाहीय ) 

२) माझ्या व्यसनामुळे अनेकदा माझा वेळ आणि पैसा मी व्यर्थ वाया घालवत आहे असे मला कधी वाटले काय ? 

३) अनेकदा व्यसन बंद करण्याचा मी मनाशी निर्धार करूनही माझे व्यसन पुन्हा सुरु झाले आहे काय ? 

४) दुखः , निराशा , राग , अपमान , खुन्नस , वैफल्य , कंटाळा , वगैरे प्रकारच्या भावनांनी ग्रस्त झाल्यावर मला व्यसन करावेसे वाटते काय ? 

५) माझ्या व्यसनाबद्दल जेव्हा कुटुंबीय चिंता व्यक्त करतात व मला व्यसनमुक्तीचा सल्ला देतात तेव्हा मला त्यांचा राग येतो का ? 

फळ्यावर सरांनी हे प्रश्न लिहून सगळ्यांना ते प्रश्न वहीत उतरवून घेण्यास सांगितले आणि मग म्हणाले ..जर या पैकी तीन प्रश्नांची जरी होकारार्थी उत्तरे आली तर आपण स्वतःशी व्यसनी झाल्याची कबुली दिली पाहिजे . सर् फळ्यावर लिहीत असतानाच मी मनात या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक पणे देत होतो आणि तीनच काय पण पाचही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी येत होती . मला पटले की मी नक्कीच व्यसनी झालो होतो आणि मला उपचारांची गरज होती ..मनातल्या मनात मी अलकाचे आभार मानले कारण तिनेच मला इथे येण्याचा आग्रह केला होता . सर् पुढे सांगू लागले ' मित्रानो आपला अहंकार बहुधा अशी कबुली देण्याचा आड येत असतो ..आपली संपत्ती ..शारीरिक क्षमता ..आपले शिक्षण .. सामाजिक सन्मान ..अधिकाराचे पद .. वगैरे अहंकारामुळे आपण व्यसनी झाल्याचे मान्य करत नाही त्या मुळे आपल्याला जगात कोण पीत नाही ? .. थोडीशी घेतली तरी माझे काही नुकसान होणार नाही ..आणि नुकसान झाले तर .ते नुकसान भरून काढण्यास मी समर्थ आहे असे वाटत राहते व आपल्या पिण्याचे आपण समर्थन करत जातो . सगळ्यांनी तटस्थ पणे स्वतःकडे पाहण्याची गरज आहे म्हणजे आपली समर्थने गळून पडतात ' असे सांगत सरांनी समारोप केला . सगळे उठले तसे शेरकर काका माझ्या जवळ आले आणि मिस्कील पणे भुवया उडवत म्हणाले ' काय आहे का कबुल ? ' मी हसत त्यानी पुढे केलेल्या हातावर टाळी दिली .

( बाकी पुढील भागात )

कर्तव्य ..जवाबदारीचे भान !


सर्वाचे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर मॉनीटर ने आमच्या सगळ्यांच्या वह्या गोळ्या केल्या सरांना दाखवण्यासाठी ..मला उत्सुकता होती की माझे उत्तर पाहून सर् काय म्हणतात याची ...अर्ध्या तासात सरांनी वह्या तपासून परत पाठवल्या ..मी घाईने माझी वही उघडली तर त्यात फक्त बरोबर ची खूण केली होती आणि खाली सरांनी वही पहिल्याची सही केली होती ..माझा थोडासा विरस झाला त्यामूळे ..मला सर् वहीवर काहीतरी कौतुकाचे शब्द लिहितील असे वाटले होते ... पुन्हा टर्र्र्र्रर्र्र्र्र्र्रर्र अशी बेल वाजली आणि सर्व सतरंजीवर बसले ' मेडीटेशन ' ची वेळ आहे असे समजले ..मी देखील मांडी घालून सर्वांसोबत खाली बसलो .. जे लोक वृद्ध होते किवा ज्यांना खाली बसण्यास अडचण होती असे लोक मात्र मागे खुर्चीवर बसले होते ...सर् आल्यावर त्यांनी हलकेच डोळ्यावर हात फिरवून डोळे मिटले आणि मग सर्वाना तसेच हलकेच पापण्या बंद करायला सांगितल्या ..काही क्षण तसेच .शांततेत गेले ..मधूनच कोणाच्या तरी खोकल्याचा ..शिंकेचा आवाज ..खिडकीत चिमणीची चिवचिव ... बाहेरून बाहेरून जाणाऱ्या मोटारीचा मोठ्याने वाजलेला भोंगा असे काही काही आवाज अपवाद !...किती वेळ असे डोळे मिटून बसायचे ते समजेना ..मला सारखे डोळे उघडून आजूबाजूला पहावेसे वाटत होते ... 

सर् बोलू लागले ' हलकेसे आंखें बंद ..रीड की हड्डी में सीधे बैठनेका प्रयास ...प्रसन्न मुद्रा ... मी ताठ होऊन बसलो ...सरांचा आवाज त्या शांततेत गंभीर वाटत होता ... शरीर कें बाहरी दुनिया में भटकने चंचल मन को शरीर कें भीतर रखते हुवे ..अंतर्गत संवेदनाओ का अनुभव करते रहेंगे ...! सर् हिंदीत आणि मराठीतही तेच सांगत होते ...माझे मन सारखे आसपास होणाऱ्या आवाजाचा वेध घेत होते ..किवा मग बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे धाव घेत होते ..मध्येच घरची आठवण ..अलका आत्ता काय करत असेल ? ...मुले शाळेत गेली का ? ..ऑफिस मध्ये काय चालले असेल असे सारखे इकडे तिकडे पळत होते ... सर् पुढे बोलू लागले ' चंचल मनाला आज ...आत्ता .इथे शरीरात ठेवण्याचा सतत प्रयत्न करा ... आपल्या साऱ्या इच्छांच्या ... वासनांच्या... पूर्ततेचे साधन ..आपले अनमोल शरीर कसे जिवंत आहे ..ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवा ... आता मला शरीरात होणारा श्वास- उच्छवास जाणवत होता .... ' अनमोल शरीर को जीवित रखनेके कें लिये .अनेक कुदरती प्रक्रियाये लगातार शरीर में हमारे हस्तक्षेप कें बगैर काम कर रही है ... प्रमुख प्रक्रिया है नैसर्गिक स्वाभाविक सांस... प्रश्वास की ... इस प्रक्रिया का लगातार ..बारबार अनुभव करते रहेंगे ..शरीर में सांस कैसे अंदर ली जाती है ..फिर कैसे बाहर छोडी जा रही है ... माझे मन आता एकाग्र होत होते ..श्वासोच्छ्वास स्पष्ट अनुभवण्यासाठी खोल श्वास घ्या ...लंबी सांस लेंगे ...फिर आरामसे बाहर छोडेंगे .... सर् देत असलेल्या सूचनांचे मी पालन करू लागलो हळू हळू माझे श्वसन संथ होत असल्याचे जाणवले .. मग सरांनी सर्वाना एकाच सुरात तीन वेळा " ॐ ' कार चा दीर्घ उच्चार करायला लावला ..मला हे ' ॐ ' कार प्रकरण समजेना ..तरीही मी सर्वांसोबत सूर मिसळला .. जो भाई ' ॐ ' नही बोलना चाहते ...वो चाहे तो उसी स्वर में ' आमेन ' या ' आमीन ' भी बोल सकते है ..सरांनी पुढची सूचना दिली बहुधा जे उपचारी मित्र हिंदू नसतील त्यांना ' ॐ ' कार म्हणण्यास संकोच वाटू नये म्हणून सरांनी त्यांना त्यांच्या धर्मानुसार ' आमेन ' किवा ' आमीन ' चे दीर्घ उच्चारण करण्याची मुभा दिली होती ...तीन वेळा उच्चारण झाल्यावर सर् पुन्हा बोलू लागले .. मन की शांत अवस्था .निर्विचार अवस्था ..शून्य अवस्था पाने का प्रयास ...एकमात्र अनुभव शरीर के जीवित होने का ... प्रत्येक सांस कें साथ नाक में होनेवाली संवेदनाये पेट कें स्नायूओ का फुलना ..सिकूडना लगातार अनुभव करते रहेंगे ... कुछ पाने की लालच नही ..कुछ खोने का भय नही ...चिंता नही ..तनाव नही .. सगळे शांत होते मग सरांनी हळूहळू डोळे उघडायला ... चेहऱ्यावर तळवा फिरवायला सांगितले आणि सकाळी झालेलीच प्रार्थना पुन्हा झाली ...!

सर् काही बोलायला सुरवात करण्यापूर्वीच एकजण उठून उभा राहिला व म्हणाला ' सर् , माझे नाव आज पासून येथे बोर्डावर झाडू मारण्याच्या ड्युटीत लावले आहे ..मी कधी झाडू वगैरे हातात सुद्धा घेतला नाहीय आजपर्यंत ..तेव्हा असले काम मी करणार नाही .' .त्याच्या अश्या बोलण्यावर सगळे हसले .. ' ठीक आहे , खाली बसा .म्हणून सरांनी त्याला खाली बसायला सांगितले ..व सर्वाना विचारले ' अजून कोणा कोणाला अशीच अडचण आहे ? ' पाच सहा जणांनी हात वर केले ..माझे नाव अजून बोर्डावर लागले नव्हते .पण लागले नाही तर बरे या विचाराने मी देखील हात वर केला ..' बघा आपण सारे येथे ऐक कुटुंब म्हणून राहतो आहोत ..त्यामूळे येथील सारी कामे आपण वाटून घेऊन करतो आहोत ..आपल्या घरात जसे आई ..बहिण किवा पत्नी घरातील कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी झाडू मारते .. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करते .. घर आवरून ठेवते तसेच इथले काम आहे .. पूर्वी घरी दारू पिताना किवा व्यसने करताना आपण घर म्हणजे फक्त ' लॉजिंग ..बोर्डिंग ' असेच समजत होतो म्हणजे घरी काही पैसे दिले की खाण्याची व राहण्याची सोय होते घर आपल्यासाठी ..बाकी घरात कोणाच्या भावना काय आहेत ... कोणाला काय त्रास आहे ..याचा कधी विचार आणि पर्वा देखील केली नाही म्हणूनच आपण भावनिक दृष्ट्या कुटुंबियापासून दूर गेलो आणि व्यसनाच्या जवळ जात राहिलो ..तेव्हा इथे जर आपण ऐक कुटुंब म्हणून राहत असू तर नक्कीच येथील जमेल त्या जवाबदा-या आपणांस उचलल्या पाहिजेत ..तरच जिव्हाळ्याने आपल्याला इथे काही शिकता येईल आणि झाडू मारणे किवा स्वयंपाकाची भांडी घासणे हे काम जर कोणाला हलक्या दर्जाचे वाटत असेल तर आपला त्या कामांकडे पहाण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे जे काम आपल्या घरातील स्त्री करू शकते ते आपण का करू शकणार नाही ? ..कोणतेही काम हलके किवा भारी नसते मित्रानो तर आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला तसे वाटते ..परदेशात तर भरपूर पैसे देऊन देखील नोकर मिळत नाही तेथे अशी सर्व कामे घरातील लोकच करतात व हे स्वावलंबन आहे हे ध्यानात घ्या .. एकाग्रपणे झाडू मारणे हे देखील ऐक मेडीटेशन होऊ शकते ... आणि मग झाडू मारून झाल्यावर किवा भांडी घासून झाल्यावर जर तुम्ही वार्डमध्ये ..भांड्यावर ऐक नजर टाकली तर ती झालेली स्वच्छता पाहून निश्चितच तुम्हाला आनंद वाटेल ..त्या मुळे या अनुभवास कोणी मुकता कामा नये असे मला वाटते ... मुद्देसूद पणे समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटत होते .. आणि जर कोणाला काही शारीरिक अडचण वा त्रास असेल तर त्याला नक्कीच आपण या कामातून सुट देऊ शकतो . मात्र आपल्याला जर खरोखर जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा असेल तर आजपासून आपण या कुटुंबातील सदस्य म्हणून माझी जवाबदारी काय आहे हे समजून घ्यायला हवे व ती पार पडायला हवी ..हीच तर सुरवात आहे आपल्यातील बदलाची ..सरांनी बोलणे संपवून मग आता कोणाला काही अडचण आहे का विचारले तेव्हा सगळ्यांनी नकारार्थी माना हलविल्या एकजण म्हणाला ' लेकिन हमारे खानदान में कभी किसी ने झाडू नाही मारा आजतक ' त्यावर शेरकर पटकन म्हणाले ' तुम्हारे खानदान में कभी किसी ने दारू भी नही पी थी . वो तो तुमने करके दिखाया ना ? " सगळे जोरात हसले तो खजील होऊन खाली बसला . 

( बाकी पुढील भागात )

पालखी ...!


सरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ' ' तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?' या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते ..म्हणजे जगात आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात ज्याचा आपल्याला शारीरिक अथवा मानसिक त्रास होऊ शकतो ..व त्याचा त्रास करून घेऊन टेन्शन आहे ..कटकट आहे ..दुखः आहे ..म्हणून माझ्यासारखा व्यक्ती दारू पीत राहतो किवा जर काही जण दारू न पिता चीडचीड करणे ..निराश होणे ..वैफल्य ग्रस्त राहणे अश्या गोष्टी करत राहतात आणि स्वतःसोबतच इतरांचेही आयुष्य अवघड करतात त्या ऐवजी अश्या गोष्टी प्रसन्न पणे स्वीकारून जर त्यातून बाहेर पाडण्यासाठी मनाची ताकद वाढवली आणि योग्य तो विचार आणि कृती करत राहिले तर नक्कीच आपण या त्रासदायक अवस्थेतून स्वतची सुटका करू शकतो असं एकंदरीत अर्थ मला उमजला होता .. मी थोडक्यात मला जे समजले ते लिहिले ..

तितक्यात अचानक वार्डचा बाहेरचा दरवाजा उघडला गेला आणि तीनचार कार्यकर्ते एका माणसाला अक्षरशः उचलून वार्डात घेऊन आले ..सगळे जण त्यांच्या भोवती जमा झाले ..तो माणूस जाम पिलेल्या अवस्थेत होता ..मोठमोठ्याने शिव्या देत होता सगळ्यांना ..देख लुंगा .. छोडूंगा नही अश्या धमक्या देत होता ..मी देखील कुतूहलाने जवळ गेलो .साधारणपणे चाळीशीचा असावा तो माणूस ..अंगावर बनियान आणि ऐक लुंगी होती फक्त ..त्याला त्या कार्यकर्त्यांनी चुचकारत शांत बसवले आणि मग एकाने हातातील गोळ्या त्याला खायला दिल्या ...आणि त्याला पलंगावर बसवून ते मॉनीटरला त्याच्या कडे लक्ष द्यायला सांगून निघून गेले ..तो माणूस अजूनही असंबद्ध बडबड करत होता ..बीबी को अभी डायव्होर्स दे दुंगा .. सबको कोर्ट में खिचुंगा वगैरे चालले होते ..सगळे जण त्याची गम्मत पहात होते ..एकाने टोमणा मारला ' अरे तुम बाहर जाओगे तब ना ये होगा ? ..अब यहासे जल्दी निकलनेही वाले नही हो तुम " हे ऐकून तो उसळून पलंगावरून उठला उभा राहताना त्याचा तोल गेला तसा परत बसला ..म्हणाला ' कौन रोक सकता है मुझे ? है किसकी हिम्मत असे म्हणत छातीवर हात ठोकत आव्हान देऊ लागला ..सगळी गम्मतच होती .पाच मिनिटे आधी त्याला चार जणांनी अक्षरशः उचलबांगडी करून वार्ड मध्ये आणला होता ते तो बहुतेक विसरला असावा . .... त्याचा आवेश पाहून मॉनीटर ने सगळ्याने गर्दी कमी करायला सांगितले ..तो हळू हळू बडबड करत मग शांत झोपला ...!

हा काय प्रकार आहे ? मी माझा माहितगार मित्र शेरेकर काकांना विचारले ..त ते मिशीतल्या मिशीत हसत उद्गारले ' पालखी ' ...म्हणजे ? मी पुन्हा विचारले तसे ते सांगू लागले .. काही लोक दारू पितात.. खूप त्रास देतात घरच्या लोकांना भांडणे करतात ...तोडफोड करतात घरातील वस्तूंची ..मात्र त्यांना आपण दारूच्या आहारी गेलोय हे अजिबात मान्य नसते किवा आपल्यामुळे कुटुंबियांना त्रास होतोय हे त्यांच्या गावीही नसते व ते उपचार घेण्यास तयार नसतात अश्या लोकांना मग कुटुंबियांच्या विनंतीवरून ' मैत्रीचे ' लोक घरातून असतील त्या अवस्थेत अक्षशः उचलबांगडी करून गाडीत टाकून उपचारांसाठी घेऊन येतात या प्रकाराला येथे ' पालखी ' असे म्हणतात . ' मग तो माणूस बाहेर पडल्यावर , घरच्या लोकांना अजून त्रास देत असेल ..किवा बदला म्हणून अजून दारू पीत असेल असं विचार माझ्या मनात आला तसे मी काकांना बोलून दाखवले तर ते म्हणाले ' बेवडा माणूस दारू पिण्याशिवाय काही करू शकत नाही.. तो जरा ऐक दोन दिवस इथे चीडचीड करेल . एकदोन वेळा समूह उपचारात सामोल झाल्यावर ..मग निवळेल कारण त्यालाही आतून माहिती असते की आपले चुकते आहे पण अहंकारामुळे तो स्वतची चूक मान्य करत नाही .. इथे आल्यावर त्याला कळते की आपले या लोकांपुढे काही चालणार नाहीय .. ! शेरकर काकांचे म्हणणे बरोबरच होते ..घरच्या मंडळीना जर या एका व्यक्तीमुळे त्रास होत असेल तर याला सुधारण्यासाठी त्यांना असे धाडसी पाउल उचलणे भागच असणार ..कारण केवळ घरात भांडण करतो ..तमाशा करतो .तोडफोड करतो म्हणून लगेच पोलिसात धाव घेता येत नाही ..घरगुती मामला आहे म्हणून पोलीस ते मनावर घेणार नाहीत ..मनावर घेतले तरी अश्या माणसावर काय केस लावणार आणि कितीदिवस त्याला जेल मध्ये टाकणार हा देखील प्रश्नच असतो ..त्या ऐवजी जर त्याला सुधारणेसाठी थोड्या जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणे केव्हाही योग्यच ! अर्थात माझ्या बाबतीत असे शिव्यादेणे .भांडणे ..मारझोड वगैरे कधी घडले नव्हते तसे मी शेरकर काकांना म्हणालो तर हसून ..' अजून घडले नाही ..पण या पुढे प्याल तर तेही घडेल ' असे म्हणत त्यांनी माझ्या हातावर टाळी दिली ! 

( बाकी पुढील भागात )

प्रार्थनेचा सखोल अर्थ !


ओघवत्या भाषेत सर् बोलत होते ' तर मित्रानो ज्या निसर्गामुळे आपला जन्म झाला , आपण मोठे होतो आहेत . श्वास घेतो आहोत , त्या निसर्गाचे काही नियम हे कदाचित आपल्याला खूप जाचक वाटत असतात कारण माणूस हा नेहमीं प्रत्येक गोष्टीत ' आनंद ' शोधात असतो व निसर्ग नियम, त्याच्या नेहमी आनंदी राहण्याच्या आड येत असतात ..मात्र तरीही प्रत्येकाला जगावे तर लागतेच ..पण जर आनंद मिळत नसेल तर ?..तो आनंद शोधण्यासाठीच तर आपण ' व्यसन सुरु केले होते , म्हणजे ...आपल्या पैकी अनेकजणांना दारू का पिता किवा व्यसन का करता असे विचारले तर ते ..खूप टेन्शन आहे जिवनात ....खूप दुखः आहे ..मला नोकरी मिळत नाही ..घरात कटकटी होतात ..अशी वेगवेगळी कारणे सांगतात . म्हणजे या कारणांनी त्रस्त होऊन आपण ' आनंद ' शोधण्यासाठी म्हणून व्यसनाचा आधार घेतो ..याचाच दुसरा अर्थ असा की निसर्गाला ... त्याच्या नियमांना ...आपल्याला टाळताही येत नाही ..आणि सहनही करता येत नाही असा होतो .आपण प्रार्थनेच्या दुसऱ्या ओळीत म्हंटले आहे ' दे शक्ती ते सहाया " याचा अर्थ आपण मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी , नशा न करता , निराश न होता , दुखः न करता , सहन करण्यासाठी परमेश्वराजवळ शक्ती मागतो आहोत . सरांचे बोलणे मला पटत होते ..बरोबर होते त्यांचे म्हणणे ..मी अगदी सुरवातीला , मित्रांचा आग्रह ..पार्टी ..समारंभ या निमिताने आणि कुतूहलाने दारू प्यायलो होतो व तो अनुभव मला खूप आवडला होता ..नंतर मग जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध काही घडे .तेव्हा दारूने दिलेला तो आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी मी दारू पिण्यातील सातत्य आणि प्रमाण वाढवत गेलो .. जेव्हा जेव्हा मला इतरांनी दारू का पितोस असे विचारले तेव्हा तेव्हा मी त्यांना टेन्शन ..दुखः ..कटकटी अशीच कारणे सांगितली होती . 

सर् पुढे बोलू लागले ..पुढची ओळ आहे " जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया ' ..म्हणजे जरी आपण कोठे जन्म घ्यावा ..आपले आईवडील कसे असावेत ..आपले आईवडील गरीब असावेत की श्रीमंत .आपण कोणत्या जातीत किवा कोणत्या धर्मात जन्माला यावे ..आपण कधी मरावे ..आपलयाला एखादा नैसर्गिक आजार व्हावा किवा नाही ..आपल्याला मुलबाळ होईल की नाही ..भविष्यात आपल्याला अपेक्षित असे सगळे सुख मिळेल किवा नाही या व अनेक गोष्टी जरी आपल्याला टाळता किवा बदलता येणार नसल्या तरी काही गोष्टी करणे मात्र आपल्या हाती आहे ..म्हणजेच शक्य साध्य आहे . सरांनी पुढे आम्हाला प्रश्न विचारला की आता तुम्ही सांगा काय काय करणे शक्य आहे ते ? शेरकर काकांनी उतर दिले ' जेवण ' त्यांचे हे उत्तर एकूण सगळे हसू लागले ..सर काकांना म्हणाले ' काका , सगळे दात शिल्लक जेवण करायला ? ' . पुन्हा सगळे हसले .... ऐक जण म्हणाला 'शिक्षण ' ..प्रगती ..अगदी बरोबर सर् सांगू लागले '' मित्रानो जरी अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असल्या या निसर्गात , तरी त्या पैकी काही गोष्टी बदलणे आपल्या हाती आहे ..आपले आईवडील जरी गरीब असले व आपल्याला हवे तसे शिकवू शकले नाहीत तरी .. मोठे झाल्यावर आपण नक्कीच स्वतः कष्ट करून पार्ट टाईम नोकरी करून पुढील शिक्षण घेऊ शकतो ..तसेच आपली उंची , रंग , शरीराची ठेवण कशी असावी ही जरी आपल्या हाती नसले तरी आपण व्यायाम ..योगासने करून आणि निरोगी जिवनशैली अंगीकारून आपले शरीर सुदृढ ठेवू शकतो.. हे आपणास नक्कीच शक्य आहे ..तसेच प्रामाणिक पणे आणि जास्तीत जास्त कष्ट करून ..बचत करून ..आपण आपली आर्थिक स्थिती देखील बदलू शकतो आपण जरी कधीतरी म्हातारे होऊन मरणार असलो तरी तो पर्यंत आपले आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न कारणे आणि स्वतःसाठी आणि आपल्याशी संबंधित लोकांसाठी उपयुक्त आणि सुखी जिवन जगणे नक्कीच आपल्या हाती आहे .

सरांनी या वर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण दिले ' बाबासाहेब आंबेडकर यांना आपण कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नाही ते समजले मात्र आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेणे तरी आपल्याला शक्य आहे हे त्यांना उमजले आणि त्यांनी ते साध्य करून जगापुढे आपल्या वर्तनाने आदर्श ठेवला स्वतः सोबतच हजारो कुटुंबियांना आत्मविश्वास दिला ..प्रगतीची दिशा दिली ..! ' नेल्सन मंडेला याने देखील वर्णद्वेष संपविण्यासाठी दीर्घकालीन लढा दिला ..छत्रपती शिवाजी महाराजांनी ' मोगलांच्या जुलमी राजवटीतून जनतेला वाचविण्यासाठी मावळ्यांची सेना तयार करून ' स्वराज्य ' स्थापन केले ...इंग्रजांची गुलामी झुगारून देण्यासाठी ..भगतसिंग , राजगुरू , सुखदेव , चाफेकर बंधू , टिळक , सावरकर , सुभाषचंद्र बोस , लाला लजपतराय , सरदार पटेल , मंगल पांडे ..' महात्मा गांधी '.... खूप नावे सांगता येतील ज्यांनी स्वतच्या सुखाचा त्याग करून देशाला . ' स्वातंत्र्य ' मिळवून देण्यासाठी निर्धार केला व वेगवेगळ्या प्रकारे लढा दिला..ते सगळे जर दुखः आहे , टेन्शन आहे , अशी कारणे देत व्यसने करीत बसले असते तर आज हे दिवस आपल्याला दिसले नसते . म्हणजेच जरी परिस्थिती विपरीत असली ..मनाविरुद्ध घडत असेल तरी आहे त्या परिस्थितीत आपणास जे काही कारणे शक्य आहे ते साध्य करण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे .मग सर् शेरकर काकांना म्हणाले ' काका , तुम्हाला जेवण करण्यासाठी ' दातांची कवळी बसवणे ' नक्कीच शक्य आहे ..अर्थात इथून गेल्यावर व्यसनमुक्त राहिले तरच .! सगळे पुन्हा हसले ..शेरकर काका जरा लाजले . 

पुढची ओळ आहे ' मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय ? ,माझे मला कळाया दे बुद्धी देवराया ' याचा अर्थ सरळ आहे मित्रानो की , आपणास काय काय करणे शक्य आहे आणि काय काय अशक्य आहे ते नेमके न समजल्यामुळे आपण दिशाहीन झालो व व्यसनांच्या वाटेवर पुढे पुढे जात राहिलो आणि आपल्याला ' व्यसनाधीनता ' हा मनो शारीरिक आजार जडला ..जरी आता परत मागे फिरणे आणि भूतकाळात जाऊन आपण केलेल्या चुका टाळणे आपल्याला शक्य नसले तरी ..येणाऱ्या सोनेरी भविष्यकाळा साठी येथे नीट उपचार घेऊन ..सगळे आत्मसात करून ..व प्रामाणिक पणे ते आचरणात आणून ' व्यसनमुक्त ' जिवन जगणे आणि पुन्हा विकासाची वाट पकडणे आपल्याला नक्कीच शक्य आहे . मात्र आपला सगळ्यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे ..आत्मविश्वास नष्ट झाला आहे ... म्हणून वारंवार निर्धार करूनही आपण त्याच त्याच चुका करत गेलो ..आता या पुढे , आपण खूप शहाणे आहोत ..खूप हुशार आहोत ..शिकलेले आहोत ... श्रीमंत आहोत , वगैरे विचारांनी आपला अहंकार न वाढवता येथे ' व्यसनमुक्ती ' साठी जी काही पथ्ये सांगितली जातात त्याचा नम्रतेने अवलंब करण्याची बुद्धी आपल्याला त्या परमेश्वराने द्यावी म्हणून ही प्रार्थना आहे ..लहानपणी जसे आपण देवाला नमस्कार करून ' सर्वाना चांगली बुद्धी दे ' असे मागणे मागत होतो तसेच हे मागणे आहे खरे तर इथे कोणीच मंदबुद्धी किवा बिनडोक नाहीय तर उलट सगळे बुद्धिमान आहेत मात्र आपल्या बुद्धीचा नेमका आपल्या आणि सर्वांच्या फायद्यासाठी कसा उपयोग करावा याचा ' सद्सदविवेक ' आपण गमावला आहे व स्वतच्या बुद्धीचा चांगला उपयोग करण्यासाठी आपण या प्रार्थनेनत सहनशीलता ...धैर्य ..मानसिक शक्ती आणि विवेक ' मागतो आहोत . पाहता पाहता १ तास होत आला होता ..वेळ कसा पुढे सरकला ते समजलेच नाही . शेवटी सरांनी सर्वाना आज सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ तुम्हाला काय समजला ? असा प्रश्न दिला व सर्वाना आपल्या डायरीत त्याचे उत्तर लिहायला सांगितले ' .

( बाकी पुढील भागात )

मान्यता..प्रार्थना !



मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ' ड्रिंक ' असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ' कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो . नंतर एकाने समोरच्या भिंतीवर असेल्या बोर्डवर लिहिलेली प्रार्थना वाचली सगळ्यांनी त्याच्या मागे ती प्रार्थना म्हंटली आणि सुप्रभात चा नारा दिला गेला व चहा वाटप सुरु झाले स्टुल वर किटली ठेवून त्या मोठ्या किटलीतून प्रत्येकाच्या ग्लासात चहा ओतण्याचे काम ऐक जण करत होता ..सगळे शिस्तीत रांगेने येऊन चहा घेत होते .. चहा घेण्यासाठी सर्वाना रांगेत उभे राहिलेले पाहून जरा गम्मत वाटली ..मला असल्या रांगेची वगैरे सवयच नव्हती कधी ..अगदी गँस सिलिंडर आणण्यासाठी देखील गेलो असता रांग पाहून माझे डोके फिरत असे ..सकाळपासून चहा हवासा वाटत होता म्हणून नाईलाजाने रांगेत उभा राहिलो तर मॉनीटर जवळ येऊन म्हणाला तीन दिवस तुम्हाला रांगेत उभे न राहण्याची सवलत मिळू शकते कारण नवीन आलेल्या लोकांना व्यसन न केल्यामुळे शारीरिक त्रास होत असतात तसेच मानसिक अवस्थता असते ..मला अशक्तपणा वाटत होताच थोडासा पण अशी सवलत घेणेही आवडले नाही म्हणून त्याने दिलेल्या ग्लासात रांगेने चहा घेतला . चहा घेताना शेजारी बसलेल्या एकाला विचारले की मघा तुम्ही सगळे " मी ' ड्रिंक ' घेतो असे म्हंटल्यावर का हसलात ? " तर तो पुन्हा हसला ... म्हणाला ' अहो , बहुतेक सगळेच असे दारू म्हणण्या ऐवजी ' ड्रिंक ' म्हणतात ..कारण दारू म्हंटले की जरा लेव्हल खाली आल्यासारखे वाटते माणसाला व ' ड्रिंक ' म्हणणे मोठेपणा वाटतो शिवाय ड्रिंक असे म्हंटले की आपण दारूमुळे होणारे दुष्परिणाम नाकारून मनातल्या मनात दारूचे उदात्तीकरण केल्यासारखे होते.. खरे तर वर्ष सहा महिन्यातून आणि अगदी एखादा पेग घेतला जातो तेव्हा ड्रिंक असे म्हणण्याची प्रथा आहे भारतात ..आपण सगळे रोजच दारू पीत होतो ..स्वतःला आणि कुटुंबियांना त्रासही होत होता आपल्या पिण्याचा तरी आपण सरळ दारू न म्हणता ड्रिंक म्हणतो याची गम्मत वाटते इथे . त्याचे म्हणणे मला पटले आणि स्वतची गम्मत देखील वाटली . चहा घेऊन नंतर अंघोळीला गेलो ..घरी मी आंघोळीला जाताना अलका ला आवाज दिला की ती टॉवेळ .कपडे ,,गरम पाणी असा सगळा सरंजाम बाथरूम मध्ये तयार ठेवत असे इथे मात्र स्वतःलाच सगळे करावे लागणार हे लक्षात आल्यावर आपण पत्नीवर किती अवलंबून आहोत हे जाणवले मात्र तरीही तिच्या म्हणण्यानुसार दारू सोडू शकलो नाही याचा खेद वाटला .

बाथरूम समोर नंबर लावून अंघोळ उरकली अंघोळ करून छान फ्रेश वाटले ...तो पर्यंत नाश्त्याची वेळ झालेली होती ..मला लॉकर देताना मॉनीटर ने ऐक कप्पे असलेली स्टीलची थाळी आणि ऐक चमचा देखील दिला होता व ती थाळी प्रत्येकवेळी नीट धुवून ठेवायची असेही बजावले होते ..ती थाळी न चमचा घेऊन पुन्हा नाश्त्याच्या रांगेत उभा राहिलो ..पोहे होते नाश्त्यासाठी ..गरम गरम पोहे खाताना घरी कधी अलकाने नाश्ता करणार का असे विचारल्यावर तिच्यावर मी चिडत होतो हे आठवले . नाश्ता झाल्यावर परत एकदा चहा दिला गेला ..आणि मग ' समूह उपचार ' म्हणजे ' ग्रुप थेरेपी ' ' होणार असे समजले . मला तीन दिवस आराम करण्याची मुभा होती तरी मी सगळ्यांबरोबर समूहात बसलो . ऐक नवीन माणूस ' समूह उपचार घेण्यासाठी उभा होता इथे काही कार्यकर्ते निवासी आहेत तर काही बाहेरून येणारे आहेत असे समजले होते मला .सर्वाना सर् असे संबोधण्याची पद्धत होती व सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी होते.. आता तेच व्यसनमुक्ती च्या कार्यात सहभागी आहेत ही माहिती समजल्यावर त्यांचे कौतुकही वाटले.. मला ही सगळी माहिती ते शेरकर काका पुरवीत होते .
समूह उपचाराच्या सुरवातीला प्रार्थना म्हंटली गेली .

' जे टाळणे अशक्य , दे शक्ती त सहाया , 
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया , 
मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय ,
माझे मला कळाया , दे बुद्धी देवराया ! 

अशी होती सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले " मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत " सरांचे वकृत्व छान वाटले ... ते हिंदीत बोलत होते त्यामूळे उपचारांसाठी दाखल असलेल्या , मध्यप्रदेश , छत्तीसगढ , उत्तर प्रदेश येथील बांधवाना आणि इतरभाषीय लोकांना देखील समजणे सोपे होते . सरांनी सर्वाना ऐक प्रश्न विचारला सांगा पाहू जगात काय काय टाळणे आपणास अशक्य आहे ? सगळे जण विचारात पडले मग एकाने उत्तर दिले ' मौत ' , दुसरा उद्गारला ' जन्म ' पुन्हा सगळे शांत होते सर् आम्हाला विचार करायला प्रवृत्त करत होते मग एकाने उत्तर दिले ' दुखः ' ... अपघात , ' ..अगदी बरोबर सर् म्हणाले पुढे सर् बोलू लागले ' एका माणसाला नेहमी आपण आनंदी असावे असे वाटते व ही मानवी प्रवृत्तीच आहे पण ..जगात प्रत्येकाच्या मनासारखे सगळे घडत नाही कारण आपण ज्या निसर्गात राहतो त्याचे काही नियम आहेत ...निसर्गनियमानुसार आपल्या जिवनात कधी सुख येते तर कधी दुखः येते ..कधी एखाद्या जिवलग माणसाचा मृत्यू होतो ..तर कधी कोणाचा जन्म होतो ..दिवस उगवतो .मावळतो आणि रात्र होते ..भरती येते .पुन्हा ओहोटी असते , काळीकुट्ट अमावस्या येते तशीच अल्हाददायक पौर्णिमा देखील असते . ओघवत्या भाषेत सर् बोलत होते आणि सगळे मन लावून ऐकत होते . 

( बाकी पुढील भागात )

परिचय .

टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ..टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ्र्र्र्र्र..कर्कश्य आवाजात तिसर्यांदा बेल वाजली तेव्हा मी वैतागून तोंडावरचे पांघरून काढले अन डोळे उघडले ....आसपास बहुतेक लोक उठलेले होते .मी भिंतीवरच्या घड्याळात पहिले सकाळचे साडेपाच झाले होते ..बापरे इतक्या लवकर उठायचे ? आसपासचे लोक उठून आपापल्या चादरी घडी करण्यात आणि गाद्या गुंडाळून ठेवण्यात गुंग झाले होते ..मी काल रात्री सुमारे आठ वाजता जो गोळ्या घेऊन थोडेसे जेवून पलंगावर पडलो होतो ते थेट आता बेल वाजल्यावर मला जाग आली होती ..अजूनही बराच अशक्त पणा जाणवत होता ... इतका वेळ मला झोप कशी लागली याचे मला नवल वाटले ऐरवी मी घरी खूप उशिरा झोपत असे व सकाळी उशिरा उठत असे ..इथे बहुतेक उलटे होते लवकर झोपणे ..आणि लवकर उठणे ..वार्ड ला लागून असलेल्या एका छोट्या खोलीत दोन पलंग होते त्या पैकी ऐक पलंग मला झोपायला दिला होता ..तर बाकीचे ..लोक वार्ड मध्ये खाली गाद्या घालून झोपत असत . मी नवीन असल्यामुळे किमान तीन दिवस तरी मला पलंग मिळणार होता अशी माहिती काल मला एकाने दिली होती ..तसेच तीन दिवस येथील सर्व उपचार पद्धतींमधून मला सवलत मिळणार होती ..हे असे का ? तर म्हणे सुरवातीला दारू बंद केल्यावर काही शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतात म्हणून त्यातून निघेपर्यंत पलंग आणि आराम मिळणार ...बरे वाटले ..चला निदान दारू बंद केल्यावर काही त्रास होतो याची जाणीव तरी आहे या लोकांना ..काल रात्री मला खूप गाढ झोप लागली होती याचे कारण मला दिलेल्या गोळ्या होते या गोळ्या कोणत्या आहेत त्याचे नाव विचारले पाहिजे एकदा ..म्हणजे घरी कधी दारू सोडण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास घेता येतील असा विचार मनात आला ..लगेच स्वतःच्याच या विचारांची गम्मत वाटली मनात ..एकीकडे दारू सोडण्यासाठी उपचार घेण्यासाठी दाखल झालो होतो आणि त्याच वेळी बाहेर पुन्हा सुरु झाली तर बंद करताना झोप कशी येईल यासाठी गोळ्या माहित करून घेण्याचा विचार येत होता .काल मनात खूप उलटे सुलटे विचार येत होते आणि एकंदरीत मी येथे उगाच दाखल झालो अशी भावना दृढ झाली होती ..पण आज सकाळी मात्र जरा बरे वाटत होते.


मी पलंगावर उठून बसताच तो तरुण मुलगा जवळ आला प्रसन्न पणे मला त्याने गुडमॉर्निंग केले आणि बाजूला बसला ' विजयभाऊ काल छान झोप लागली होती ना ?' ..' हो तर ..अगदी काल रात्री ८ ला जो झोपलो तो आताच मला जाग आली ' मी देखील हसून उत्तर दिले ...आता सर्वांची थोडी शारीरिक कवायत होईल थोड्या वेळात तुम्ही तोंड वगैरे धुवून घ्या ..माझ्या कडे काहीच सामान नव्हते आणले मी सोबत ..त्याला तसे सांगितले तसे म्हणाला ..अरे हो विसरलोच होतो ..काल संध्याकाळी तुमच्या घरून तुमचे सामान आले आहे सगळे ..हा मला आश्चर्याचा धक्काच होता ..काल संध्याकाळी मी बायकोला फोन करायचा ..सरांना भेटायचे म्हणून मागे लागलो तर याने सर् उद्या भेटतील असे सांगितले होते ..सरांनी ही बायको उद्या येईल असे सांगून माझी बोळवण केली होती आणि मग हे समान केव्हा आले ? मनात समजलो आपल्याला काल उल्लू बनवले होते या लोकांनी ते . तो माझ्याच कडे पाहत होता जणू माझे विचार वाचत असल्या सारखे सावरून म्हणाला हे सामान तुमच्या पत्नीने नाही आणले तर कोणीतरी माणूस येऊन देवून गेला ..' त्याची माझी भेट तरी करून द्यायची होती तुम्ही " मी उद्गारलो .त्यावर तो नुसताच हसला ' अहो आता जास्त विचार करू नका तुम्ही ' असे म्हणत त्याने एकाला हाक मारून बाहेरून माझे सामान आणायला पिटाळले ..एका प्लास्टिक च्या पिशवीत दोन बर्मुडा ..ऐक ट्रँकसुट दोन टी शर्ट , अंडरवेअर ..बनियान..टॉवेल , अंघोळीचा साबू ..कपडे धुण्याचा साबू ,टूथब्रश .पेस्ट ..माझा दाढीचेसामान ठेवायचा प्लास्टिक चा डबा असे सगळे साग्रसंगीत सामान होते कोपऱ्यात मला आवडणारी लसणाची चटणी पण एका बाटलीत भरून दिलेली होती . 


त्याने मला त्याच्या मागे येण्यास सांगीतले..एका वार्ड मध्ये भिंतीला लागून कोपऱ्यात पाच सहा कपाटे होती त्याला कप्पे होते त्या पैकी एका कप्यात त्याने माझे सामान ठेवले आणि कप्पा बंद करून त्याला कुलूप घातले व त्या कुलपाची चावी एका काळ्या दोऱ्यात अडकवून तो दोरा माझ्या गळ्यात घातला ..' हा तुमचा लॉकर आहे , लक्षात ठेवा याचा नंबर ..आणि ही चावी पण सांभाळून ठेवावी म्हणून गळ्यात घातली आहे ..मी त्याच्याकडे पाहून हसलो ' म्हणजे तुम्ही काल माझी आणि पत्नीची भेट होऊ दिली नाहीत तर ? ' ' अहो , इतके दिवस तुम्ही घरीच तर होतात इथे येऊन जेमतेम तुम्हाला चोवीस तास होतील आणि इतक्या लवकर कंटाळला की काय ? त्याने प्रतिप्रश्न केला . ' पण ..पण ..' ' पण बिण काही नाही आता तुम्ही काही दिवस बाहेरच्या जगाचा विचार करणे सोडून दिले तर इथे तुम्हाला छान वाटेल आणि फायदाही होईल ' त्याने अनुभवी बोल सुनावले . मी नुसतीच मान डोलावून लॉकर मधून टूथ पेस्ट ब्रश काढला माझ्या साठी खास नवी पेस्ट आणलेली दिसत होती हिने आणि ब्रशही नवाच होता हे पासून जरा बरे वाटले..तेथे बरीच कपाटे होती एका कपाटाला १२ कप्पे होते ( लॉकर ) म्हणजे बरेच जण राहत होते तर इथे ..वार्ड मध्ये अजूनही अनेक जण माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ..बाथरूम , संडास कोपऱ्यात होते एकूण सहा संडास बाथरूम आणि त्याचा उपयोग करण्यासाठी जरा गर्दीच दिसली ..मला अश्या गर्दीची सवय नव्हती म्हणून तेथे घुटमळत होतो तितक्यात एकाने मला वाट करून दिली ' अरे नया दोस्त है , इनको पहेले जाने दो ' असे इतरांना सांगितल्यावर मला विनासायास बाथरूम ..संडास वापरता आले . बाहेर येऊन पुन्हा पलंगावर बसलो तर ..टूथ ब्रश हातातच राहिलेला ..पुन्हा उठून लॉकर कडे गेलो गळ्यातील चावी लावून कुलूप उघडले आणि आत ब्रश ठेवला ..हा ऐक तापच होता ..घरी वस्तू जागच्या जागी ठेवायची मला कधीच सवय नव्हती इथे प्रत्येक वेळी वस्तू काढली की उपयोग करून परत लॉकर मध्ये व्यवस्थित ठेवण्याचा नवीन उपद्व्याप मागे लागला . ...आता चहा हवा होता . 


कालचा तो म्हातारा जवळ आला मला त्याने नाव विचारले यावर मी ' विजय' असे त्रोटक उत्तर दिले ..त्याचे समाधान झालेले दिसले नाही आडनाव विचारले तर आडनाव सांगितले मग त्याने स्वतची ओळख करून दिली त्याचे नाव मुकुंद शेरकर होते मात्र त्याला सगळे जण काकाच म्हणत असावेत . मी त्याला चहा बद्दल विचारले तर त्याने माहिती पुरवली चहा पी .टी . व प्रार्थना झाल्यावर मिळेल . घरी उठल्याबरोबर तोंड धुतले की मला चहा लागत असे इथे घर नाही हे पुन्हा जाणवले ... वार्ड मध्ये सगळे जण रांगेत उभे राहून लहान पणी शाळेत करतात तशी कवायत करत होते ऐक ..दोन ..तीन ..चार च्या ठेक्यावर छान चालले होते कुतूहलाने ते पाहायला मी देखील वार्ड मध्ये जाऊन उभा राहिलो समोर तो मॉनीटर सगळ्यांकडे तोंड करून आकडे मोजत कवायत घेत होता सगळ्या दारुड्यांना असे येथे शिस्तीत कवायत करताना पाहून हसू आले मला ..ते म्हातारे काका देखील अगदी पुढे उभे होते रांगेत .कवायत करून झाली तशी सगळे रांग सोडून एकत्र गोळा झाले ' अरे विजय भाऊ , आप नये आये हो ना ? चलो यहां सामने आकर सबको अपनी पहेचान करवादो ' मॉनीटर ने मला समोर बोलावले आणि माझे नाव ..गाव आणि व्यसन सगळ्यांना मोठ्याने सांगायला सांगितले ..जरा बिचकतच मी पुढे झालो आणि नाव... गाव सांगितले मात्र व्यसन सांगताना जरा चाचरलो ' दारू ' असे म्हणण्या ऐवजी ' ड्रिंक्स घेतो ' असे म्हणालो तसे सगळे हसले व सगळ्यांनी मला अभिवादन केले .

प्राणायाम


ऑफिस मधून नाईलाजाने वार्डात परतलो , मात्र मान खूप बैचेन झाले होते , कुठून आपल्याला इथे येण्याची दुर्बुद्धी सुचली असे झाले होते ..अलकाचा रागही येऊ लागला होता मला ..जगात कितीतरी लोक दारू पितात ..मी प्यायलो तर काय बिघडले होते तिचे ? .. बर किमान सकाळपासून मला इथे सोडून गेलीय ..निदान एखादा फोन तरी करायला हवा होता तिने मला .. हळू हळू माझी बैचेनी वाढत होती सारखा बाहेरच्या दाराकडे लक्ष होते माझे ...टर्रर्र्र्र्र्र अश्या कर्कश्य आवाजात ऐक बेल वाजली तसे सगळे जण हॉल मध्ये सतरंजीवर जाऊन बसले , एकाला विचारले काय आहे हा प्रकार तर म्हणाला ' प्राणायाम ' ची वेळ झालीय आता , ऐक तास प्राणायाम करायचा आहे सगळ्यांना .बापरे ..प्राणायाम वगैरे प्रकार मी फक्त ऐकून होतो ..कधी कधी अलका रामदेव बाबांचे प्राणायाम टी.व्ही वर पाहत असे हे माहित होते ..पण आपल्याला हे करावे लागणार या विचाराने माझी अवस्थता अजून वाढली . पुन्हा तो मघाचा चुणचुणीत तरुण माझ्या जवळ येऊन म्हणाला ..' तुम्हाला तीन दिवस आराम करायचा आहे , मग बरे वाटले की प्राणायाम करावा लागेल ' . .मी मनात म्हणालो ' बेट्या राहणारच नाहीय मी तुमच्याकडे तीन दिवस ..आता उद्या अलका भेटायला आली की जातो मी घरी " . माझ्या शेजारी अजून ऐक जण गादीवर झोपला होता ..त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो प्राणायाम करत नव्हता ..त्याला विचारले की तो इथे किती दिवसापासून आहे तर म्हणाला ' उद्या ऐक महिना पूर्ण होईल मला ' . इतके दिवस हा इथे कसा राहू शकला याचे कुतूहल वाटले तर म्हणाला ' पहेले पहेले जरा बहोत गुस्सा आता है सबको , लेकिन बादमे सब ठीक हो जाता है ' मी मनातून जरा हादरलो होतो ..पण मला खात्री होती की अलका उद्या मला भेटायला येईल तेव्हा नक्की माझी सुटी होईल .आणि सरांनीही मला तसेच सांगितले होते ..हे मी त्याला सांगितले त्यावर तो मोठ्याने हसला ..माझ्या अज्ञानाची त्याला गम्मत वाटली असावी म्हणाला ' ऐसे सबको बोलते है सर् , लेकिन ऐक बार अंदर एन्ट्री होने कें बाद ऐक महिना रहेनाही पडता है सबको ' त्याचे हे उद्गार माझ्या जखमेवर मीठ चोळणारे होते ..मी नुसताच बावचळून त्याच्याकडे पाहत राहिलो . बाहेर हॉल मधून सर्वांचा ' श्वास जोरात बाहेर सोडल्याचा आवाज येत होता .. तो म्हणाला ' कपालभाती ' कर रहे है सब लोग ' . मी पुन्हा उठून बाहेर दाराकडे जायला निघालो तर तो तरुण मला अडवण्यासाठीच बाहेर थांबला होता जणू ..लगेच त्याने मला अडवले व म्हणाला ' सर् आता कामात आहेत , तुम्हाला बाहेर जाता येणार नाही .त्याने जरा ताकदिनेच माझा दंड पकडला होता ते जाणवले ,गुपचूप परत फिरलो न पलंगावर येऊन बसलो .

खिडकीतून बाहेर पहिले ..अंधार दाटून येत होता .. आता माझे सगळे मित्र जमले असतील बार मध्ये ..मस्त सगळे मजा करत असतील आणि मी ..इथे जेल मध्येच अडकलो होतो ..छे ! काहीतरी केले पाहिजे इथून बाहेर पाडण्यासाठी ..ऐक महिना मला राहणे शक्यच नव्हते ..एकतर माझी तेव्हढी रजा शिल्लक नव्हती ..कितीतरी कामे बाकी होती ..विम्याचा हप्ता ..विजेचे बिल .. .वर मी मित्रांकडून उधार पैसे घेतले होते ते देखील परत करायचे होते ..मी पुन्हा उठू लागलो तसे बाजूच्या माणूस म्हणाला ' यार ,बार बार बाहर मत जाओ आप , फालतू में कोई आपको डाटेंगा ' पुन्हा बसलो नुसती चीड चीड होत होती माझी ..थोड्या वेळाने तो तरुण बहुधा वार्ड चा प्रमुख असावा तो हातात चार गोळ्या आणि एका ग्लासात काहीतरी घेऊन आला ..' हे घ्या औषध ..हे घेतले की बरे वाटेल तुम्हाला ' मी त्याला म्हणालो 'आधी मला सरांना भेटू द्या ,मग घेईन औषध ' ' अहो सर् आताच बाहेर गेलेत , ते आले की नक्की भेट घ्या तुम्ही ' तो बोलण्यात हुशार होता खूप ...पुढे म्हणाला ' विजयभाऊ , अहो हे औषध घेतले तर तुमची बैचेनी कमी होईल न भूक ही लागेल , सकाळी तुम्ही जेवला देखील नव्हता ' त्याचा सहानुभूतीचा स्वर ऐकून जरा बरा वाटले त्याने दिलेल्या गोळ्या हातात घेऊन तोंडात टाकल्या आणि त्याच्या हातातील ग्लास घेतला तर हात पुन्हा थरथर कापू लागला तो थरथरत्या हात कडे पाहतोय हे लक्षात येताच मी जरा शरमलो . ग्लास तोंडाला लावला .. ते पाणी गोड लागले ' ग्लुकोज ' घातले आहे त्यात ' ..त्याने माहिती पुरवली .

औषध घेऊन पुन्हा पलंगावर आडवा झालो आणि डोळे मिटले ..असं कसा मी मुर्ख असे विचार मनात येऊ लागले ..कुठून हिच्या नादी लागलो ..अन इथे आलो . ..माझे दारू पिण्याचे प्रमाण आता वाढले होते हे मलाही जाणवत होते पूर्वी आठवड्यातून एकदा शनिवारी घेणारा मी आता रोजच घेत होतो ..अन सुटी असली तर मग दुपारी देखील हुक्की येई ... . पण म्हणून काही अगदी व्यसनमुक्ती केंद्रात येण्याइतका पीत नव्हतो मी ..आणि मी जर ठरवले असते तर येथे न येताच सोडू शकलो असतो की ...पूर्वी दोन तीन वेळा मी अनेक दिवस पिणे बंद केले होतेच ! पुन्हा एकाने हाक मारली म्हणून डोळे उघडले तर ऐक दुसराच माणूस मला हाक मारत होता ..त्याच्या हातात अन्नाचे ताट होते ' जेवून घ्या थोडेसे ' तो आपुलकीने म्हणाला तसा उठून असलो फारशी भूक नव्हतीच मला पण सकाळपासून काही खाल्ले नव्हते म्हणून जेवू लागलो थोडासा वरणभात खाल्ला ...पोळी भाजीला हात लावला नाही .. त्या माणसाने आग्रह केला म्हणून ऐक पोळी खाल्ली . प्रार्थनेचा आवाज ऐकू आला सामुहिक प्रार्थना सुरु होती ..बहुतेक प्राणायाम संपला होता .तो सकाळचा मिस्कील म्हातारा पुन्हा माझ्या जवळ आला ' काय कसे वाटतेय ' त्याचा स्वर कुत्सित होता हे जाणवले मला .त्याच्याशी न बोलणेच शहाणपणाचे आहे असे वाटले ..नुसता ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली . आणि पुन्हा पलंगावर डोळे मिटून पडलो . 

( बाकी पुढील भागात )

दिवस पहिला


मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते ..गेले काही दिवस माझे पिणे वाढलेय म्हणून अलका सारखी कटकट करत होती ..तिने कुठून तरी या व्यसनमुक्ती केंद्राची माहिती आणली आणि माझ्यामागे लकडा लावला होता की एकदा तरी आपण चौकशी ला जाऊ येथे म्हणून पण मी अनेक वेळा उडवून लावले होते तिला ..मी काही दारू पिऊन कधी भांडण करत नव्हतो .. कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..सगळे काही सुरळीत चालले होते तरीही अलका सारखी मागे लागली म्हणून तिला असेच एकदा म्हंटले होते की ' जाऊ केव्हातरी ' आणि तिने आज सुटी पाहून अचानक मला इथे आणले होते ..मी तिला प्रतिकार करू शकत होतो ..नाही केला .कारण मला थोडेफार कुतूहल होतेच व्यसनमुक्ती केंद्राबद्दल . 

उठून पलंगावर बसलो तसे एकदोन जण माझ्याजवळ आले आणि माझे निरीक्षण करू लागले ऐक जण जरा वयस्कर होता ..केस पांढरे मात्र त्याच्या चेहऱ्यावर मिस्कील भाव होते ..जणू काही तो मला ' काय ? कशी मजा आली " असे म्हणत असावा ... दुसरा खुपच तरुण होता साधारण पंचविशीचा असावा ..माझ्या जवळ येऊन म्हणाला ' विजय भाऊ , बरे झाले तुम्ही उठलात .चला चहा घ्या थोडा म्हणजे तरतरी येईल .. त्याच्या हातात ऐक स्टीलचा ग्लास होता ...माझे डोके जड झाले होते ..शिवाय मघा ऑफिस मधून मला सरळ आत पलंगावर आणून झोपवले होते ..माझे जेवण देखील राहिले होते ..पोटात नुसती आग पडली होती ..मी त्याला पाणी मागितले ..त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ..ऐक ..दोन तीन ..मी घटाघटा तीन ग्लास पाणी रिचवले ..तेव्हा कुठे जरा हुशारी आली ..खूप दारू पिऊन रात्रीचा जेव्हा मी घरी येऊन न जेवता झोपत असे तेव्हा देखील मला एकदम मध्यरात्री जाग येई व पोटात पडलेली आग शांत करण्यासाठी असे दोन तीन ग्लास पाणी प्यायले की बरे वाटे ..त्याने मला चहा दिला गरम गरम वाफाळलेला चहा घ्यावासा वाटत होता पण ..पण तो ग्लास हातात घेतला तेव्हा हात थरथरू लागला ..माझ्या थरथरत्या हात कडे पाहून तो म्हतारा परत गालात हसतोय असे वाटले ..त्याचे असे हे ..जवळ उभे राहणे आणि मुख्य म्हणजे माझे सतत निरीक्षण करणे मला आवडले नाही ..मी त्याच्याकडे त्रासिक मुद्रेने पहिले ..तसा तो निघून गेला . हळू हळू चहाचा ऐक ऐक घोट घेत होतो ..पण आता आपण व्यसनमुक्ती केंद्रात अडकलो आहे ही भावना मात्र मन पोखरत होती ..माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीचा हा ऐक अपमानच समजत होतो मी ..दारू काय जगात सगळेच पितात ..आणि जर एखादा प्रामाणिक पणे कष्ट करून नीट संसार करत जर स्वतच्या आनंदासाठी दारू प्यायला तर त्यात चूक ते काय ? ..अलकाला उगाच माझी चिंता वाटे ..मी काही लहान मुलगा नव्हतो की... मला स्वतचे भले बुरे समजत नव्हते अश्यातला ही भाग नव्हता ..उलट हल्ली तिच्याच कटकटीमुळे माझे पिणे वाढले होते ...ही बाई सारखी घरात माझ्या मागे काहीतरी भुणभुण लावत असे ..हे करा ..ते करा ..हे का नाही केले ? ते का नाही केले ? वगैरे ..ऑफिस मधील साहेबाची वेगळीच तऱ्हा ..त्याला कोणतेही काम कधी पसंत पडले असे होत नसे . प्रत्येक काही ना काही चुका काढून हाताखालच्या लोकांवर कसे डाफरावे याचे जणू त्याचे खास ट्रेनिंग झालेले होते ..ऑफिस चा ताण ..घरच्या कटकटी या सगळ्या गोष्टीतून विरुंगुळा म्हणून मी पीत असे !

चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते ..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव ..परत आलो आणि पलंगावर बसलो ..समोरच्या भिंतीवर मोठे घड्याळ होते त्यात साडेपाच वाजले होते ..बापरे म्हणजे मी जवळ जवळ पाच तास झोपलो होतो तर .. ! तो तरुण मुलगा आज्ञाधारक भाव चेहऱ्यावर घेऊन उभाच होता माझ्या समोर त्याला विचारले की येथील प्रमुख कोण आहेत ? मला त्यांना भेटायचे आहे .यावर तो नुसताच हसला ..मग म्हणाला ..सर् दुपारी लंचसाठी घरी जातात आता येतीलच संध्याकाळी ..तुमचे काय काम आहे ? .याला कशाला सांगू मी माझे काम ? ..ते मी सरांनाच सांगीन म्हणत चूप बसलो . जरा वेळाने कोणीतरी म्हणाले की सर् आलेत बहुतेक ..मी लगेच सावध झालो आणि उठून बाहेरच्या दाराकडे जाऊ लागलो तर मला एकाने अडवले म्हणाला ..कुठे जाताय ..तिकडे ऑफिस मध्ये जाता येणार नाही तुम्हाला ..माझी सटकलीच .साला मी काय चोर बीर आहे की काय ? ..मला सरांना भेटायचे आहे असे म्हणत त्याला बाजूला करून मी पुन्हा दाराकडे निघालो ..बाहेर ऑफिस ला जाण्याचे दार बंद होते मात्र त्या दाराला मध्यभागी ऐक चौकट होती व त्यातून बाहेरच्या लोकांशी बोलता येईल से वाटले मी जवळ जाऊन सर् ..अहो सर् ..जरा मला तुमच्याशी बोलायचे आहे असे ओरडलो .तसे वार्ड मधले एकदोन जण धावत आले आणि ते मला पुन्हा पलंगाकडे नेऊ लागले ..माझा आवाज एकून बाहेरून दार उघडले गेले आणि बाहेरच्या माणसाने मला धरलेल्या लोकांना सांगितले ..सोडा त्याला ..सर् त्याला बोलवत आहेत ..मी पटकन बाहेर आलो ..सकाळचाच तो माणूस बसला होता खुर्चीवर ..प्रसन्नपणे हसत म्हणाला ' बोला विजयभाऊ ? कसे वाटतेय आता ? .. मला अलकाला जरा फोन करायचा आहे मी त्याला म्हणालो तसे हसला ' अहो त्या जाऊन जेमतेम पाच तास झालेत आणि लगेच तुम्हाला त्यांची इतकी आठवण यायला लागली की काय ? ..त्या उद्या येणार आहेत तुम्हाला भेटायला " ..नाही पण मला जरा तिला महत्वाचा निरोप द्यायचा आहे ..मी माझी मागणी पुढे रेटली .म्हणाला ..ऐक काम करा तुम्ही तुमचा निरोप माझ्याजवळ द्या , मी त्यांना पोचवतो ..त्याने मला निरुत्तर केले ..मग म्हणाला तुम्ही फक्त ऐक दिवस धीर धरा उद्या नक्की तुमची भेट घालून देतो पत्नीशी . मी ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली व मागे वळलो.!

( बाकी पुढील भागात )

व्यसनमुक्ती केंद्र

सकाळी उठलो अन क्षणभर आपण स्वप्नात तर नाही ना अशी शंका आली , कारण काहीही कटकट न करता अलका चहा घेऊन आली होती , चक्क बेड टी ? . ऐरवी आधी तोंड धुवा असा म्हणणारी अलका हीच का ? चहाची कपबशी हाती घेताना होणाऱ्या हातांच्या थरथरी कडे दुर्लक्ष करीत एकही टोमणा न मारता टी शेजारी बसली , " मग आज चालायचे ना ?" अतिशय प्रेमळ स्वरात तिने विचारले . मला काही समजलेच नाही ' आज कुठे बर जाणार होतो मी हिच्यासोबत ? ' मी डोक्याला जरा ताण दिला पण छे ! डोके नुसते सुन्न झाले होते , मी बावळटा सारखा तिच्याकडे पाहत राहिलो , मी पुरेसा बेसावध आहे हे बघून म्हणाली ' अहो , असं काय करताय , आज आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात जायचे आहे ना माहिती घ्यायला ? ' मी काही उत्तर देईपर्यंत तिने हाताला धरून मला बेडवरून उठावलेच होते . 

तिने पटापट दोन्ही मुलांना उठवले त्यांचे आवरून मुलांना शेजारच्या काकूंकडे सोडून आम्ही निघालो , मी थोडा प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला पण तिने चक्क माझ्याकडे दुर्लक्ष केले होते , मी कालच स्टॉक मध्ये आणून ठेवलेली क्वार्टर काढून पटापट संपवून निघालो होतो , पण आज म्हणावी तशी मजा येईना , मला जरा जास्त टेन्शन आले होते म्हणून वाटेत पुन्हा ऑटो थांबवून मी समोरच्या बर मध्ये शिरलो , काउनटर वरच उभे राहून उभ्याउभ्याच ऐक क्वार्टर लावली , आता जरा तरतरी आली होती . ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्र अशी पाटी असलेल्या वास्तुसमोर ऑटो उभा राहिला . अलकाने मला हात धरून खाली उतरवले आणि मुख्य कार्यालयात आम्ही पोचलो . समोरच्या खुर्चीत ऐक प्रसन्न चेहऱ्याचा माणूस बसला होता , म्हणजे हे महाशय मला समजावणार तर ? ...मी मनातल्या मनात हसलो ..या पूर्वी मला समजवायला आलेल्या अनेक लोकांना मी माझ्या युक्तिवादाने उडवून लावले होते . अलकाची बडबड सुरु झाली होती , मी किती पितो , कसा त्रास देतो , वगैरे वगैरे ...परक्या माणसाजवळ असे भडभड आपल्या नवऱ्याबद्दल तिचे असे बोलणे मला आवडले नव्हते पण घरी गेल्यावर तिचा बेत पाहू असे ठरवले मी , कारण माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीला तिला परक्या माणसासमोर रागावणे शोभले नसते , मी नुसताच ऐकत बसलो , मजेत ऐक सिगरेट काढून पेटवली आणि तिचे झुरके मारत त्या ऑफीसचे निरीक्षण करू लागलो , " हं ! काय म्हणता मग विजयभाऊ ? " त्या माणसाने एकदम दोस्ती खात्यात बोलायला सुरवात केली माझ्याशी . ' मी काय म्हणणार ? माझ्या बद्दल सगळेच तर हिने आपल्याला सांगितलेच आहे आता , पण नाण्याला दुसरीही बाजू असते " मी जरा उपहासाने म्हणालो . ' वाहिनी , अहो विजयभाऊना समजतेय हो सगळे की जे चालले आहे ते काही योग्य नाहीय ते पण..." तो माणूस पुढे बोलू लागला , अश्या प्रकारच्या बोलण्यावर काय विरोध करावा हे मला उमजेना तो गृहस्थ माझीच बाजू घेत होता , मी होकारार्थी मान डोलावली ' मग ..राहताय ना तुम्ही आमच्या बरोबर ?' तो पुढे उद्गारला . " अहो ..पण ..पण मला सुटी मिळणे कठीण आहे " मी लटका विरोध केला " त्याची काही काळजी करू नका , सारे काही सुरळीत होईल" असे म्हणत त्याने माझ्यासमोर ऐक फॉर्म सरकवला नाईलाजाने मी सही केली तेव्हा तो माझ्याकडे पाहून प्रेमळ हसला आणि मला एकदम मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले .अलकाच्या डोळ्यात पाणी तरळले ..ते पाहून मला कसेसेच झाले ..तिला इतके अगतिक झालेले मी कधी पहिले नव्हते ..मी उपचारांसाठी दाखल होतोय ही खरे तर तिच्यासाठी आनंदाची बाब होती तरी तिच्या अश्रुंचे कारण मला समजेना . 

" इथे जेवणाची सोय काय ? , स्वयंपाक कोण करते , अंघोळीला गरम पाणी देता का ? ' वगैरे प्रश्न ती विचारात होती ...मला आता मस्त गुंगी येत होती ..शरीर सैलावले होते , डोळे जड झाले होते ' चला विजयभाऊ , आपण आता जाऊ तुम्ही जरा विश्रांती घ्या म्हणत कोणीतरी मला हात धरून उठवले हे आठवते आहे .

( बाकी पुढील भागात )

आरंभ


सप्रेम नमस्कार !

सध्या मी माझ्या दुसऱ्या खात्याच्या स्टेट्स वर आणि काही समूहात ' मला समजलेला , किवां न समजलेला देव , अल्लाह , गॉड वगैरे हे शीर्षक असलेली माझ्या प्रत्यक्ष जीवनावर आधारित लेखमाला लिहिण्यास सुरवात केली असून त्याचे ६१ भाग पूर्ण झालेले आहेत , अजून किमान २०० भाग होतीलच . माझ्या व्यसनाधीनतेच्या खेरीज , अनेक सामाजिक समस्या , जनमानसातील वेगवेगळे धर्मवाद , जातीवाद , अश्या अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या या मालिकेला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय या बद्दल आपले सर्वांचे आभार ! आपला हा प्रतिसाद माझी लेखनक्षमता वाढण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे . सदर लेखमाला लिहीत असतांना अनेकांना व्यसनमुक्तीचे नेमके उपचार काय असतात ? व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्तीची नेमकी प्रक्रिया कशी आहे ? सुधारणेचे प्रमाण किती असते ? वगैरे कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे कारण आज सगळीकडेच व्यसनाधीनतेची समस्या उग्र स्वरूप धारण करत असून पाहता पाहता एखाद्या कुटुंबाची वाताहत होताना अनेकांनी पहिले आहे व जर आपल्याला काही मदत करता आली तर आवडेल असेही बऱ्याच जणांनी मनोगत माझ्याकडे व्यक्त केले आहे . म्हणूनच आमच्या मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्यापासून ते उपचार घेऊन सुटी मिळेपर्यंत नेमके काय कामकाज चालते , व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष व्यसनी व्यक्तीचा आणि पालकांचा सहभाग कसा असावा , व्यसनमुक्ती केंद्रातील वातावरण , तेथील गमतीजमती , वगैरे सगळ्या बाबी सांगणारी ऐक नवीन लेखमाला सुरु करण्याचा विचार आहे . ' एका बेवड्याची डायरी ' या शीर्षकाची माझी ऐक लेखमाला २००३ साली लोकमत या मान्यवर दैनिकाच्या ' सखी ' य साप्तहिक पुरवणीत प्रकाशित झाली होती सुमारे ४० भाग प्रकाशित झाल्यावर ही मालिका काही तांत्रिक कारणांमुळे पुढे लिहू शकलो नव्हतो . 

सदर ' एका बेवड्याची डायरी ' ही लेखमाला फेसबुकवर सुरु करणार आहे तेव्हा कृपया जास्तीत वाचकांनी सदर लेखमाला वाचावी हो नम्र विनंती . या नवीन लेखमालेत ऐक व्यसनी व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी दाखल असून तेथील त्याच्या दैनंदिनी बद्दल त्याच्याच शब्दात तो लिखाण करतोय अशी मध्यवर्ती कल्पना आहे !