Sunday, August 31, 2014

निसर्गाची ऐशीतैशी


निसर्गाची ऐशीतैशी ( बेवड्याची डायरी - भाग ५९ वा ) 


सरांनी चर्चेला घेतलेला ' लैंगिक शिक्षण ' हा विषय सुरवातीला जरी अनावश्यक वाटला होता तरीही ..हा विषय महत्वाचा आहे ..यावर मोकळेपणी चर्चा झाली पाहिजे ..शंकानिरसन झाले पाहिजे ..गैरसमज दूर झाले पाहिजेत असे सर्वाना वाटू लागले ..संडासात उघड्या नटीची फोटो घेवून जावून हस्तमैथुन करतो म्हणून आम्ही त्या तरुणाला हसलो होतो ..मात्र अंतर्मुख झाल्यावर आमच्या ध्यानात आले की बहुधा प्रत्येकाने कधी न कधी ' हस्तमैथुन ' केले होते . एकाने सरांना प्रश्न विचारला ' सर हस्तमैथुन दिवसातून किती वेळा केले म्हणजे नुकसानदायक असणार नाही ? ' सर हसून म्हणाले " छान ..आता तुम्हाला प्रश्न विचारेवेसे वाटत आहेत ..हे पहा सर्वात आधी एक स्पष्ट करणे गरजेचे आहे की लैंगिकता किवा शरीर संबंध अथवा कामतृप्ती हे जरी आपल्या जीवनाचे महत्वाचे आणि अविभाज्य अंग असले तरी लैंगिक संबंध किवा कामतृप्ती म्हणजेच सगळे जिवन नव्हे हे लक्षात ठेवा ...निसर्गाने निर्माण केलेला एक प्रगत ..प्रगल्भ ..वेगवेगळ्या भावना मनात निर्माण होणारा ..सामाजिक भान असणारा ..प्रश्न पडणारा आणि प्रश्नांची उकल करू शकणारा प्राणी म्हणून मानवाची निर्मिती झाली आहे ..आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून सर्व जीवसृष्टीचे ..प्राणीमात्रांचे मानवाने संरक्षण करावे हा देखील निसर्गाचा हेतू असला पाहिजे माणूस जन्माला घालण्यामागे ..इतर प्राणी ' आहार , निद्रा , भय , मैथुन या चार गोष्टीनी बांधले गेले आहेत या खेरीज त्यांची बुद्धी काम करत नाही ..मानव एकमात्र प्राणी आहे जो विविध कलाप्रकार ..क्रीडाप्रकार ..मनोरंजनाच्या विविध गोष्टींचा वापर करू शकतो ..तसेच अध्यात्मिकता हे अंग देखील मानवाकडेच दिलेले आहे ..कदाचित या मुळेच मानवाच्या बाबतीत ' नराचा नारायण होणे ' हा वाक्प्रचार वापरला जातो . मात्र मानवाने आपल्या बुद्धीचा वापर केवळ स्वताच्या स्वार्थासाठी ..भोगांसाठी.. सुरु केलाय त्यामुळेच अनेक नैसर्गिक असमतोल निर्माण होत आहेत ..लैंगिक संबंधांची प्रेरणा मनात निर्माण होऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता निर्माण करण्यामागे निसर्गाचा प्रजनन किवा पुनर्निर्माण हा एकमात्र हेतू आहे ..जीव सृष्टीचे अस्तित्व कायम राहावे म्हणून सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक प्रेरणा निर्माण करण्यात आलेली आहे ..

मानव सोडून इतर सर्व प्राणी लैंगिकतेचा वापर पुनरुत्पादन या एकमात्र हेतूने करतात ..म्हणूनच इतर प्राण्यांचा लैंगिक संबंध विशिष्ट कालावधीतच आणि विशिष्ट प्रकारेच घडतो ..जेव्हा मादी प्रजनन योग्य असते तेव्हाच प्राणी शरीर संबंध करतात ..ते देखील मादीच्या संमतीने ..अल्पवयीन शरीर संबंध किवा बलात्कार हे प्रकार प्राण्यामध्ये नसतात ..वयात आलेल्या मादीचा अनुयय करून ..इतर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून ..मगच प्राण्यांना लैगिक संबंध ठेवता येतो ..तसेच एका विशिष्ट वयापर्यंतच म्हणजे प्रजनन योग्य असेपर्यंतच प्राणी लैंगिक संबंध ठेवतात ..मानव मात्र आपल्या इच्छेनुसार ..जबरदस्तीने ..मूड आला म्हणून शरीर संबंध ठेवतो ..प्रजनन क्षमता कमी झाल्यानंतर म्हातारपणी देखील शरीरसंबंधांची लालसा ठेवतो ..तसेच मानवाने आपल्या आनंदासाठी मैथुनाचे विविध प्रकार शोधून काढले आहेत जे काही वेळा निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध असतात ..गुदामैथुन हा प्रकार प्राण्यांमध्ये बहुधा नसतो ..शरीर संबंध जरी निसर्गनियमानुसार आवश्यक असले ..गरजेचे असले ..त्यातून मिळणारा आनंदाचा .कामतृप्तीचा भाव कितीही हवाहवासा वाटला तरी..काही नैसर्गिक आणि सामाजिक मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे ..



हस्तमैथुन हे लैंगिक संबंधा इतकेच आनंद देणारे माध्यम असले तरी त्याचा अतिरेक नक्कीच हानिकारक ठरू शकतो ..तरुणांनी आठवड्यातून फार तर एकदा हस्तमैथुन करण्यास हरकत नसते ..हस्तमैथुन करणे म्हणजे पाप ..शक्तीनाश ..लिंग वाकडे होणे ..नंपुसक होण्याही शक्यता वगैरे गोष्टी सांगण्यामागे ब्रम्ह्चर्याचा पुरस्कार करण्याऱ्या लोकांचा अतिरेक असू शकतो ..अथवा तरुणांनी हस्तमैथुनाच्या आहारी जावू नये म्हणून घेतलेली काळजी असू शकते " सरांच्या या उत्तराने त्या तरुणाचे समाधान झालेले दिसले . 


लैंगिकतेचा संबंध थेट आपल्या जन्माशी आहे हे आपण जाणतोच त्यामुळे लैंगिकता किवा शरीरसंबंध हे पाप असू शकत नाही ...प्रजननाच्या नैसर्गिक प्रक्रियेत नर - मादी या दोघांचा समान सहभाग असतो ..त्यामुळे निसर्गाने नर आणि मादी हा जन्म दर विशिष्ट ठेवलाय ..मानवाच्या बाबतीत अनेक गैरसमजांमुळे ..पुरुषाला जास्त मोठेपणा देवून स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे तसेच वंशाला दिवा वगैरे धार्मिक गैरसमजांमुळे ..हुंडाप्रथा..लग्नासाठी करावा लागणारा खर्च ..अशा सामाजिक कारणांमुळे सध्या प्रत्येकाला आपल्याला मुलगा व्हावा असे वाटते ..त्यामुळेच स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे ..मित्रानो एक लक्षात घ्या हे निसर्गाला धरून नाही ..येथे विवेक वापरण्याची गरज आहे ..मुलीने जन्म घेवून तिच्यामुळे आईबापाला त्रास होऊ नये म्हणून मुलगी जन्माला येवू द्यायची नाही हा अतिशय स्वार्थी विचार आहे ..त्या ऐवजी जन्माला आलेल्या मुलीला सुरक्षितता मिळावी ..तिला सन्मानाने जगता यावे ..तिच्यावर अन्याय होऊ नये या साठी आवश्यक ते सामाजिक आणि मानसिक बदल करणे जास्त महत्वाचे आहे .. कारण जसा जसा निसर्गातील स्त्री चा जन्मदर कमी होत जाईल तशी तशी पुरुषांना अधिक असुविधा निर्माण होऊ लागेल ..स्त्री व पुरुष हे परस्परांना पूरक असल्याने स्त्रियांची संख्या कमी झाली तर लग्नाला जोडीदार मिळणे कठीण होईल ..शरीर संबंधांची गरज भागवणे दुरापास्त होईल ...असलेल्या स्त्रियांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल ..बलात्काराचे प्रमाण वाढत जाईल ..आणि मुख्य म्हणजे काही काळानी प्रजनन बंद होईल ..मानवसृष्टी धोक्यात येईल ..तेव्हा निसर्गाच्या विरुद्ध जाणे मानवाने थांबवले पाहिजे !

लैंगिक शिक्षण ???


लैंगिक शिक्षण ???  ( बेवड्याची डायरी - भाग ५८ वा ) 

नेहमीप्रमाणे प्रार्थना घेवून सरांनी आजच्या समूह उपचारांचा विषय म्हणून फळ्यावर ' लैंगिक शिक्षण ' असे लिहीताच ..आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो ..इथे सुमारे साठ टक्के लोक लग्न झालेले ..मुलेबाळे असलेले होते ..काही पन्नाशी उलटलेले ..तर उरलेले अविवाहित देखील सज्ञान या व्याख्येत मोडणारे होते ..लैंगिक शिक्षण हा विषय आम्हाला कशाला ? असा विचार माझ्या मनात आलाच ...व्यसनमुक्तीचा आणि लैंगिक शिक्षणाचा काय संबंध ? हा प्रश्न देखील पडला ..सरांनी सगळ्यांच्याकडे पाहून स्मित केले .." तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल ना ..लैंगिक शिक्षणाचा आणि व्यसनमुक्तीचा काय संबंध ? " सर्वांनी होकारार्थी मना डोलावल्या .." मित्रानो लैंगिक शिक्षण केवळ व्यसनमुक्तीशीच नव्हे तर आपल्या संपूर्ण जिवनाशी निगडीत आहे ..लैंगिकतेतूनच आपला सर्वांचा जन्म झालाय ..तरीही आपल्या पैकी फार थोड्या लोकांना लैंगिकते बदल शास्त्रीय माहिती असते .. थोडी फार माहिती आणि भरपूर गैरसमज आपल्या मनात असू शकतात ..लैंगिकता म्हणजे केवळ स्त्री - पुरुष संबंध ..अथवा शारीरिक सुख इतकाच त्रोटक अर्थ लैंगिकतेचा काढला जातो " ..मी पहिल्यांदाच हा विषय कोणीतरी इतक्या उघडपणे चर्चा करतोय हे पहात होतो ..खाजगीत चर्चिला जाणारा हा विषय आहे असेच माझे मत होते ..बहुतेक सगळ्यांच्या मनात हेच चालले असावे कारण बहुतेक लोक सरांकडे न पाहता खाली मान घालून सरांचे बोलणे ऐकत होते ..सर्वांनी आधी माना वर करा ..असे सरांनी सांगितले ..शेरकर काका तुम्ही पण ..सरांनी असे म्हणताच सर्वांनी वर फळ्याकडे पहिले ..शेरकर काका साठीच्या पुढे पोचलेले ..सरांनी त्यांचे नाव घेताच खसखस पिकली ..' आज आपण लैंगिकता म्हणजे नक्की काय ? लैंगिकतेच्या शास्त्रीय बाजू ..या बाबतची स्त्री - पुरुष यांची शारीरिक व मानसिक जडणघडण .. प्रेमसंबंध आणि शरीरसुख ..स्त्री -पुरुष इंद्रीयाबाबतची शास्त्रीय माहिती ..अपत्यप्राप्ती ..लैंगिकतेतून मिळणारे शारीरक आणि मानसिक सुख ..हस्तमैथुन ..दारू आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे लैंगिकतेवर होणारे दुष्परिणाम ..तसेच लैंगिकते बाबत असलेले प्रचंड गैरसमज या बाबत चर्चा करणार आहोत ..हा विषय सर्वांच्या जिवनाशी निगडीत असला तरी देखील आपण याची उघडपणे चर्चा करणे टाळतो किवा या विषयाकडे गंभीरतेने न पाहता ..काहीतरी अश्लील....अंधारातले ..चावट ..या दृष्टीकोनातून पाहतो ...या बाबतचे अनेक जोक्स करतो ..खिल्ली उडवतो ..स्त्री पुरुष इंद्रियाशी संबंधित शिव्या देतो ..खाजगीत हमखास चर्चा केला जाणारा हा विषय असूनही याबाबत आपल्याला नेमकी शास्त्रीय माहिती नसते .."

' लैंगिकते बाबत शास्त्रीय माहिती असलेली पुस्तके किती लोकांनी वाचलेली आहेत ? " सरांनी हा प्रश्न विचारताच ..जेमतेम एक दोघांनी बोट वर केले ..बाकी सगळे अवघडल्या सारखे बसलेले होते .." बर आता सांगा ..बाजारात मिळणारी पिवळ्या कव्हरची ..प्रणयाचे रसभरीत आणि अवास्तव वर्णन असणारी..अनैतिक संबंधावर आधारित .मस्तराम ..मुसाफिर .अशा टोपणनावानी लिहिणाऱ्या लेखकांची ..तसेच हैदोस ..बिनधास्त कथा ..मदभरी कहाँनिया ..डेबोनेर ..चॅस्टीटी ..फॅन्टसी .. वगैर नावे असलेली ..उघडीनागडे फोटो असलेली मासिके किती लोकांनी वाचली आहेत ? " सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले ..घाबरू नका मोकळेपणी हात वर करा ..असे सरांनी म्हणताच सुमारे पन्नास साठ हात वर झाले ..सगळेच हसले ..शेरकर काकांचा देखील हात वर झाला होता ..आता वातावरण जरा मोकळे होत होते ..सरांनी पुढचा प्रश्न विचारला ." किती लोकांनी नेट वर ..वेबसाईटवर ..अथवा आडबाजूला असणाऱ्या थेटरमध्ये ..मित्रांच्या रूमवर .. अश्लील समजले जाणारे चित्रपट ..क्लिप्स ..व्हिडीओ गुपचूप पहिले आहेत ? "..पुन्हा सगळे हात वर झाले ..' अरे वा ..सगळे हात वर झालेत ..म्हणजे या विषयात सर्वाना इंटरेस्ट आहे ..मात्र उघड कबुल करायला शास्त्रीय चर्चा करायला लाज वाटते ..कदाचित म्हणूनच देशात बलात्कार ..स्त्रियांशी संबंधित गुन्हे ..बालकांचे लैंगिक शोषण ..एड्स ..लैंगिकतेशी संबंधित इतर आजार ..गुप्तरोग ..यांचे वाढते प्रमाण आहे ..अधिक लैंगिक सुख मिळवण्यासाठी निरनिराळ्या मादक पदार्थांचा वापर ..उत्तेजना निर्माण होण्यासाठी.. उन्मादासाठी दारूचा वापर असे प्रकार होत आहेत .." 

सर बोलत असताना मागच्या बाजूला बसलेल्या दोघांमध्ये काहीतरी कुजबुज सुरु होती ..हळू हळू त्यांचे आवाज वाढले ..' काय चालले आहे रे तिकडे ? काय गप्पा मारताय .." असे सरांनी विचारताच दोघेही गप्पा बसले ..त्यातील एक म्हणाला .." सर याच्या खिश्यात एका उघड्या नटीचे बिकिनी घातलेले चित्र आहे ..याने मासिकातून फाडून घेतले आहे .." सगळे मोठ्याने हसू लागले ..ज्याच्या खिश्यात ते मासिकातून फाडलेले चित्र होते ..तो खूप खजील झाला ..मानेनेचे नको नको म्हणून लागला .." सर हा ते चित्र घेवून जातो संडासात " अशी एकाने पुस्ती जोडली ..त्या बरोबर पुन्हा सगळे हसू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..' अरे ...यात काही वावगे नाहीय ..असे प्रकार व्यसनमुक्ती केंद्रातच नव्हे तर सगळीकडे घडत असतात ..लैंगिक उत्तेजना मिळवण्यासाठी अशा फोटोंचा वापर होत असतो ..त्यात गुन्हा नाहीय काही " ..तो मुलगा संडासात असा उघडा फोटो घेवून जावून हस्तमैथुन करत असावा हे सगळ्यांचा ध्यानात आले ..तो मुलगा मान खाली घालूनच बसला होता ..सर पुढे म्हणाले ' हस्तमैथुन हे पाप आहे ..हस्तमैथुनाने तेज कमी होते ..इंद्रिय वाकडे होते ..शरीर खंगते ..रक्त कमी होते ..वीर्यनाश होतो ..वगैरे गोष्टी सर्वांनी कोणाकडून तरी ऐकल्या आहेत म्हणून हस्तमैथुन हे मोठे पाप आहे हेच सगळ्यांच्या मनात बसलेले आहे ..खरे तर हस्तमैथुन हे लैंगिक भावनेचा निचरा करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात सुरक्षित असे माध्यम आहे ..सुमारे ९० टक्के पुरुष या माध्यमाचा कधी ना कधी वापर करत असतात ..फक्त कोणी तसे उघड काबुल करत नाहीत ..तेव्हा त्या मुलाची खिल्ली उडवणे बंद करा " सरांनी असे म्हणताच सगळे अंतर्मुख झाले . 

( बाकी पुढील भागात )

शस्त्र त्याग ???


शस्त्र त्याग ??? ( बेवड्याची डायरी - भाग - ५७ वा )

सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सहाव्या पायरीत ..आपल्या स्वभावात असलेल्या दोषांचा त्याग करण्यास सुचवले होते ..हे एक प्रकारे शस्त्रत्याग करण्यासारखेच होते ..राग ..इतरांना दोष देणे ..स्वत:च्या मनासारखे व्हावे म्हणून आरडाओरडा करणे ..खुन्नस ठेवणे . कुटुंबियांना घर सोडून जाण्याची ..आत्महत्येची धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल करणे ..मोठी मोठी स्वप्ने दाखवून त्यांना आपल्या मनासारखे वागायला भाग पाडणे ..किवां गरजेनुसार रडणे ..क्षमायाचना करणे ..पश्चाताप झालाय असे भासवणे ..ही शस्त्रे एक व्यसनी नेहमीच स्वतचे व्यसन करणे सुरळीत सुरु रहावे म्हणून वापरात असतो ..मात्र व्यसनमुक्तीच्या काळात देखील तो सगळे काही आपल्या मनासारखे सुरळीत घडावे म्हणून या शस्त्रांचा वापर करत जातो ..आपल्या स्वभावातील हे दोष वारंवार आपल्याला व्यसनाकडे घेवून जावू शकतात हे त्याच्या गावीही नसते ..केवळ काही दिवस व्यसन बंद असले की तो जग जिंकल्याच्या अविर्भावात वावरू लागतो .. आणि येथेच त्याची फसगत होते ..मग त्याला कोणी आपल्या पूर्वीच्या वागण्याचा उल्लेख केला की राग येतो ..कोणी आपल्या क्षमतेबाबत संशय व्यक्त केला की खुन्नस जागृत होते ..कोणी अविश्वास दर्शवला तर मनापासून वाईट वाटते ...आपण व्यसन आता बंद केलेय या अहंकारात तो जीवनाबद्दल मोठी मोठी स्वप्ने पाहतो ..व्यसन बंद आहे म्हणजे आता सगळे काही मनासारखे सुरळीत घडेल अशी आशा ठेवतो ..आणि तसे घडले नाही तर पुन्हा व्यसनाचा आधार घेतो ! 

सहाव्या पायरीच्या विवेचनात सरांनी हे सारे स्पष्ट केले होते ..माझ्याही बाबतीत नेहमी तसेच घडत आले होते ..खूप आर्थिक त्रास झाला ..किवा काही शारीरिक समस्या आली ..पत्नीने माहेरी जाण्याची धमकी दिली की काही काळ मी व्यसन बंद करत असे .. मनावर घेतल्यावर मी पाहिजे तेव्हा व्यसन सोडू शकतो हा अहंकार जागृत होऊन .. आता सारे काही ताबडतोब सुरळीत व्हावे अशी अपेक्षा मी ठेवत असे सगळ्या जगाकडून ..व्यसन बंद करून मोठे उपकार केल्याच्या भावनेत वावरत असे ..मी व्यसन बंद करू शकतो म्हणजे मी खूप निर्धारी आहे..कुटुंबियांच्या भल्यासाठी मी खूप मोठा त्याग केलाय अशी भावना मनात तयार होऊन ..आता सगळे माझ्या मनासारखे घडावे अशी मागणी करत असे ..मात्र मी व्यसन बंद केले तरी पूर्वी मी व्यसनामुळे दिलेले त्रास ..विश्वासघात ..मुजोऱ्या..माझे आणि कुटुंबियांचे केलेले अतोनात नुकसान इतर सर्वांनी विसरून जावे ही अपेक्षा ठेवत असे ..त्यांना मात्र हे सगळे ताबडतोब विसरणे केवळ अशक्य असते ..मी जणू त्या गावचाच नाही असा वावरत असताना कोणी मी पूर्वी दिलेल्या त्रासाची आठवण काढली की मला राग येई ..जुन्या गोष्टींचा उल्लेख करून हे लोक उगाच मला त्रास देत आहेत असे वाटे ..माझ्या भावनांची कोणालाही पर्वा नाही असे वाटे ..कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन केले की मला अपमान वाटे ..माझ्यावर अविश्वास व्यक्त केला की खुन्नस वाटे घरच्या लोकांची ..आणि मग माझी चिडचिड सुरु होई ..तसेच सगळे आपल्या मनासारखे सुरळीत कधी होईल या विचाराने मी अवस्थ राही ..अशी बैचेनीची ..रागाची ..अपमानाची भावना मला सतत अस्वस्थ ठेवत असे ..आणि एक दिवस माझी सहन शक्ती संपुष्टात येवून ' व्यसन बंद ठेवून काही फायदा नाही ' असे विचार मनात सुरु होता असत ..अरेरे मी किती गरीब बिच्चारा..सगळे जग किती स्वार्थी .. माझ्या त्यागाची कोणाला किंमत नाही ..वगैरे विचारांनी मी ' फक्त आज एकदाचा खूप मनस्ताप होतोय म्हणून थोडेसे व्यसन करायला काय हरकत आहे ' या विचारांनी एकदा म्हणून प्यायला जात असे ..या आजाराचा सगळ्यात घातक भाग असा की एकदा म्हणून घेतले की माझ्या शरीर मनाची व्यसनाबद्दल असलेली सुप्त भूक जागृत होऊन पुन्हा पुन्हा मी व्यसन करत राही ..परत जीवनाबद्दलचे सगळे नकारात्मक विचार मला घेरून रहात आणि पूर्वीचेच वर्तन सुरु होई .

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहून मी समाधानाने डायरी बंद केली ..माझ्या बाजूला बसलेल्या शेरकर काकांनी मला टोमणा मारलाच ..' काय स्कॉलर ? " असे म्हणत डोळे मिचकावले ..मी देखील हसून त्यांना टाळी दिली ..स्वताचे परखड आत्मपरीक्षण करताना खूप हलके वाटते हे मी काकांना समजावून सांगू शकत नव्हतो ..तितक्यात एक गांजाचा व्यसनी आमच्या जवळ आला ..हा गडी तसा खुशालचेंडू होता ..तो सगळ्या थेरपीज निव्वळ नाईलाजाने करत असे ..प्रत्येक वेळी माॅनीटर त्याला रागवत असे ..तरीही याच्यावर काही परिणाम होत नसे ..त्याला पाहून काकांनी हाताने चिलीम ओढण्याची अॅक्शन करत ' भोले ..भेज दे सोने चांदी के गोले ' असा पुकारा केला ..तो मनापासून हसला . बसलाच आमच्या जवळ येवून..केवळ गांजा पिण्याची अॅक्शन पाहूनच तो एकदम उत्तेजित झाल्यासारखा वाटला ..त्याचे डोळे चमकू लागले ..बापरे किती खोल आकर्षण दडले असते मनात हे मला जाणवले ..माझ्याही बाबतीत असेच होता असावे असे वाटले ..माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कोणी दारुडा मित्र भेटला ..अथवा दारूने मिळणाऱ्या आनंदाचा कोणी उल्लेख केला तर मी असाच उत्तेजित होऊन ' एकदा तरी घ्याला हवी ' हा किडा मनात रेंगाळू लागे ..कधीतरी कुठल्या तरी निमित्ताने मग हा डोक्यातला किडा शेवटी मला व्यसनाकडे घेवून जाई . 

( बाकी पुढील भागात )

Friday, August 15, 2014

तुलना !

तुलना ! ( बेवड्याची डायरी - भाग ५६ वा ) 

डायरीत सरांनी सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर मी अतिशय गंभीरपणे लिहित असताना ..अमित नावाचा एक तरुण माझ्याजवळ आला ..हा ४ दिवसांपूर्वीच उपचारांसाठी दाखल झाला होता ..डायरीत नेमके काय लिहायचे हे त्याला समजत नव्हते ..तो माझ्या डायरीत वाकून पाहू लागला ...माझे उत्तर पाहून तुला कसे उत्तर लिहिता येईल ? मी त्याला विचारल्यावर तो हसून म्हणाला ..अहो तुम्ही जरा व्यवस्थित लिहिता असे मला समजलेय..तुमचे पाहून मी लिहिले तर माझे उत्तर सरांना आवडेल आणि मला लवकर डिस्चार्ज मिळेल येथून ..त्याची हि समजूत वेडगळपणाची होती . केवळ चांगली डायरी लिहितोय हा काही लवकर डिस्चार्ज मिळण्यासाठीचा निकष नव्हताच ..जे लिहले जातेय ते किती प्रामाणिक पणे लिहिलेय हे त्या व्यक्तीच्या इतरवेळीच्या वर्तना वरून निरीक्षण करून समजतेच .व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवायला येथील निवासी कार्यकर्ते तत्पर असत आणि त्याच्या अनुभवातून त्यांना कोण किती प्रामाणिकपणे उपचार घेतोय हे समजत असे .आधी माझे लिहून होऊ दे ..मग तुला सांगतो कसे उत्तर लिहायचे ते असे मी त्याला सांगितले .

वार्डातील बहुतेक जण डायरी लिहिण्यात मग्न होते ..माॅनीटर नेहमीप्रमाणे सर्व डायरी लिहित आहेत ना यावर लक्ष ठेवून होता ..काही पुन्हा पुन्हा उपचारास येणारे लोक हे डायरी वैगरे लिहून काही फायदा नाहीय या अविर्भावात बसले होते ..त्यापैकी एकाला माॅनीटर ने हटकले ..' काय रे कितवी अॅडमिशन ? " या प्रश्नावर तो जरा वरमला ..खाली मान घालून हाताची बोटे मोजत म्हणाला ' सातवी ' ..त्याचे उत्तरे ऐकून आसपासचे हसू लागले ..तो आणखीनच खजील झाला .मग त्वेषाने म्हणाला ' मेरे बाप के पास जादा पैसे हो गये है ..इसलिये बार बार मुझे यहाॅ रखा जाता है ... देखते है कितने बार रखेगा " त्याचे हे उर्मट पणाचे बोलणे सर्वांनाच खटकले ..माॅनीटर त्याला म्हणाला '" अरे प्रत्येक वेळी तू बाहेर पडल्यावर दारू प्यायला म्हणून तुला वडिलांनी येथे परत आणलेय उपचारांना ..मी दारू पिणारच अथवा मला माझ्या मर्जीने जगता आले पाहिजे हा अट्टाहास तू सोडत नाहीस तोवर तुझे वडील तुला येथे दाखल करतील..इतक्या वर्षात तुला साधी इतकी गोष्ट समजली नाहीय की आईवडील जो निर्णय घेतात तो नेहमी आपल्या भल्याचा असतो ..तुला वाटते त्यांच्या कडे जास्त पैसे आहेत म्हणून दाखल करत आहेत उपचारांना ..किती मोठा मूर्ख आहेस तू ..दारूमुळे तुझे जिवन उध्वस्त होऊ नये म्हणून हे सगळे सुरु आहे हे समजले की तू सुधारशील ..तुला आईबापानी किती स्वप्ने पाहत मोठे केलेय ..त्यांनी तुला मोठे करण्यासाठी खूप कष्ट उपसलेत ..हे तुला समजत नाही यात तुझाच दोष आहे ..तू जोवर तुझा हट्टीपण सोडणार नाहीस तोवर हे असेच चालत राहील ..तू जर इतका शहाणा .. स्वाभिमानी आहेस ..स्वतच्या मर्जीने तुला जगायचेय तर मग सरळ घर सोडून निघून जा कुठे तरी ..स्वताच्या पायावर उभा राहा ..वाट्टेल तशी व्यसने कर ..तुला कोणी अडवणार नाही ..मात्र आईवडिलांच्या पैशावर ..त्यांच्याच घरात राहून ..तू व्यसने करशील तर त्यांचे कर्तव्याच आहे तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ' तो मुलगा माॅनीटरचे उत्तर ऐकून उसळून म्हणाला " मेरा बाप भी तो हप्ते मे एक बार पिता है एक दो पेग दारू " तो आता वाद घालण्याच्या मूड मध्ये होता ..' छान ! तुझे वडील आठवड्यातून एक वेळा दारू पितात हे बरोबर लक्षात ठेवलेस ..मात्र वडिलांनी त्यांचे करिअर कसे घडवले ..किती कष्ट केले ..तुम्हाला तुम्हाला कसे मोठे केले हे लक्षात नाहीय तुझ्या ..तू आधी व्यसनमुक्त राहून स्वतःचे करियर घडव ..आणि मग वडिलांशी तुलना कर ..इतकेच काय वडिलांचे पिणे वाढले तर त्यानाही उपचारांना घेवून ये हवे तर तू ..पण त्या आधी स्वतः व्यसनमुक्त होणे महत्वाचे " माॅनीटर ने समज दिल्यावर तो डायरी लिहू लागला ..

त्यांचा संवाद ऐकून वाटले आपणही लोक पितात म्हणून मी प्यायलो तर काय हरकत आहे या विचारानेच दारू पीत गेलो होतो ..जगात बहुसंख्य लोक व्यसने करीत नाहीत हे मात्र आपण समजून घेतले नाही ..म्हणजेच नकारात्मक गोष्टी मी लवकर शिकलो होतो ..मनोरंजन म्हणून खेळ ..कला ..निसर्गात फिरायला जाणे ..आपला फावला वेळ सकारात्मक कार्यात घालवणे वगैरे मी करू शकलो असतो तरी देखील मी मनोरंजन म्हणून दारू पिण्याचा मार्ग पत्करला ही माझीच चूक होती ..शिवाय माझी चूक मान्य न करता मला दारू पिण्यास कोणीही आडकाठी करू नये ..माझ्या दारू बद्दल कोणी बोलू नये ..मला माझ्या मर्जीने जगू द्यावे हा हट्ट कायम ठेवला होता ..माझ्या पिण्यामुळे पत्नी ..मुले ..इतर नातलग किती दुखी: होता आहेत याचा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता .हा माझा एक प्रकारचा अहंकारच होता .

( बाकी पुढील भागात )

Friday, August 8, 2014

स्वता:शी लढाई !

स्वता:शी लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ५५ वा )

" व्यसनांमुळे निर्माण झालेले अथवा आधीपासूनच आपल्या स्वभावात असलेले .. स्वभावदोष काढून टाकण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते ..तसेच ती एकट्याच्या बळावर कधीच पूर्ण होत नाही ..कारण आपले स्वभाव दोष हे आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनलेले असतात ..तसेच अनेकदा हे स्वभावदोष आपण ..स्वतःच्या समर्थनासाठी ..स्वतःच्या बचावासाठी ..इतरांना घाबरविण्यासाठी ...आपल्या मनासारखे होण्यासाठी ..एक शस्त्र म्हणून वापरले आहेत ..आता हे स्वभाव दोष कर्णाच्या कवचकुंडलांसारखे आपल्या व्यक्तिमत्वाला चिकटून बसलेले आहेत ..या स्वभावदोषांमुळे आपण अनेकदा संकटात सापडलो आहोत तरीही आपण आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले तरच कायमची व्यसनमुक्ती ..तसेच एक प्रसन्न आणि उपयुक्त असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभेल हे मान्य करणे कठीण जाते आपल्याला ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस च्या बारा पायऱ्या केवळ व्यसनमुक्तीच नाही तर एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारून आदर्श आणि अध्यात्मिक उंची गाठण्यासाठी मदत करतात म्हणून केवळ व्यसनमुक्त न राहता पुन्हा पुन्हा व्यसनात अडकू नये आणि आपले व्यक्तिमत्व स्वतःसाठी आणि इतरांसाठी उपयुक्त बनविण्याच्या उद्देशाने आपण सहाव्या पायरीत सांगितल्याप्रमाणे आपले स्वभावदोष काढून टाकण्याच्या प्रयत्नाला लागले पाहिजे .."

सर सहाव्या पायरीचे विवेचन विवेचन देताना पुढे म्हणाले " आपल्या व्यक्तिमत्वातील सारे स्वभाव दोष परमेश्वराच्या मदतीने काढून टाकण्यास सुचवले आहे ..म्हणजेच आपल्या जवळचे नातलग ..आपले शुभचिंतक ..आपल्याला वेळोवेळी योग्य वागणुकीसाठी प्रेरित करणारे आपले गुरुजन ..समुपदेशक .अथवा अल्कोलीक्स अॅनाॅनिमस मधील आपला स्पाॅन्सर ..तसेच वेळोवेळी आपल्यावर ओढवणारी परिस्थिती ..एखादी त्रासदायक घटना ..एखादी आपत्ती ..आपल्यावर टीका करणारे लोक ...हे सारेच परमेश्वर या व्याख्येत समाविष्ट आहे हे विसरता कामा नये ..आपले स्वभाव दोष काढून टाकण्यासाठी आपल्याला आवडेल अशी अनुकूल पद्धतच वापरली गेली पाहिजे हा अट्टाहास नको ..जसे शिल्पकार एखादे शिल्प कोरताना मोठी शिळा घेवून त्यावर छिन्नी ..हातोडी ..वगैरे हत्यारांचा वापर करून त्यातून एखादे सुंदर शिल्प साकार करतो तशीच ही प्रक्रिया असणार आहे ..सगळे मला अनुकूल असले तरच मी स्वतःमध्ये योग्य ते बदल करीन असे न म्हणता जमेल त्या प्रकारे ..आहे त्या परिस्थितीत ..त्रासदायक प्रसंगी ..अपमानजनक घटनेतूनही परमेश्वर मला काही शिकवण देवून माझे स्वभाव दोष काढून टाकण्यास मला मदत करू शकतो हा दृष्टीकोन असला पाहिजे ..प्रत्येक वेळी आपल्याशी गोड बोलून लोक आपल्याला बदलला प्रेरित करतील असे नव्हे तर काही वेळा रागावून ..टीका करून ..निर्भत्सना करून ..देखील लोक आपल्याला काही शिकवण देवू शकतात .. म्हणूनच तर संतानी म्हंटले आहे ' निंदकाचे घर असावे शेजारी '

आपल्याशी केवळ चांगले वर्तन करणारे लोक अथवा आपल्याला अनुकूल असलेली परिस्थितीच बदलास सहाय्य करेल असे नाही तर आपल्याशी दुरावा बाळगणारे ..सतत टीका करणारे ..आपल्या मनाविरुद्ध वागणारे लोक ..प्रतिकूल परिस्थिती देखील ..आपल्याला काही शिकवण देवू शकतात यावर विश्वास ठेवता आला पाहिजे ..त्यामुळे विपरीत प्रसंगात आपला विवेक सोडता कामा नये ..अर्थात हे सगळे ताबडतोब जमेल असे नाही ..मात्र बदलाचा ध्यास असला कि नक्की जमते " असे सांगत सरांनी फळ्यावर प्रश्न लिहिला.. " आपले स्वभावदोष दूर करण्यासाठी कोणी कोणी आजवर आपल्याला मदत केली आहे आणि कशा प्रकारे ? "...समूह उपचाराची संपला तसा मी लगेच डायरीत प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..डोळ्यासमोर अनेक प्रसंग होते जेथे मला वडिलांनी कठोर शब्दांचा वापर करून माझ्या वागण्यात बदल सुचवला होता ..ऑफिस मध्ये बाॅसने रागावून ..वाॅर्निग देवून मला फटकारले होते ..माझ्या लक्षात आले कि त्यावेळी मी अपमान न वाटून घेता हे लोक आपल्याला बदलासाठी मदत करत आहेत असे समजलो असतो तर नक्कीच मला फायदा झाला असता ..मात्र माझ्या अहंकारा मुळे मी त्यांनी माझा अपमान केला असे समजून बदल करण्याएवजी सूडभावना मनात ठेवली ..अथवा स्वतःला त्रास करून घेत दुप्पट व्यसने केली होती ..

( बाकी पुढील भागात )

स्वभावदोष हाकलणे !

स्वभावदोष हाकलणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ५४ वा )

काल समूह उपचार संपल्यावर आम्ही सगळे डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पत्नीचा फोन नंबर देणाऱ्या पाटील भोवती गोळा झालो होतो ..सगळे त्याला तू मूर्ख आहेस असे म्हणत होते ..तो खजील होऊन बसला होता ..शेरकर काका अशी मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत ...ते पाटील ला म्हणाले ..तुला पुढची बातमी तर सरांनी सांगितलीच नाहीय ..मला ऑफिस मधून असे समजलेय की तो दारू पिवून तुझ्या घरी पण गेला होता ..आणि तुझ्या पत्नीकडे उधार पैसे मागत होता ..तुझ्या पत्नीने त्याला पैसे न देता घरातून हाकलले ..नंतर तिला खूप राग आला तुझा आणि तिने सरांना फोन करून तुला किमान सहा महिने तरी इथे ठेवावे अशी विनंती केली आहे ..हे ऐकून पाटील चक्क रडू लागला ..आता अजून सहा महिने वाढले उपचारांचे हा मोठाच धक्का होता ..मग तो शेरकर काकांच्या मागे लागला ..तुम्ही खरे सांगा ..अजून काय म्हणाली माही पत्नी सरांना ? कधी फोन केला होता तिने ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्याची केविलवाणी अवस्था पाहून सर्वांनी त्याची खूप मजा केली ..मग एकेक जण असे डिस्चार्ज होणार्या व्यक्तीला घरचा फोन नंबर व पत्ता दिल्याने पूर्वी घडलेले ऐकीव किस्से सांगू लागले .. एकाने असा घरचा पत्ता घेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी जावून खोटीनाटी करणे सांगून पैसे घेतले होते ..एकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खरोखर डिस्चार्ज केले होते ..नंतर ते दोघेही नियमित एकमेकांना भेटू लागले ..दोघांचेही दारू पिणे सुरु झाले त्यामुळे ..हे किस्से ऐकून मी मनाशी ठरवले की इथे उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कितीही चांगला मित्र असला तरी आपल्या घरचा पत्ता व फोन नंबर द्यायचा नाही ..इथे राहताना मित्र निवडताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे ..जे लोक अजूनही नकारात्मक विचार करतात ...गंभीरतेने उपचार घेत नाहीत ..थेरेपीज बुडवतात अशा नाठाळ लोकांपासून चार हात दूर राहिलेले बरे ..

आजच्या समूह उपचारात सरांनी फळ्यावर अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसची सहावी पायरी लिहिली.. ज्यात म्हंटले होते की '"परमेश्वराच्या मदतीने आम्ही आमचे सगळे स्वभावदोष काढून टाकण्यास पूर्णपणे तयार झालो " फळ्यावर पायरी लिहून होताच सरांनी मोठा सुस्कारा सोडला ..म्हणाले खूप कठीण काम आहे हे ..व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या या बारा पायऱ्या कोणी पूर्ण प्रामाणिकपणे आचरणात आणल्या तर तो नक्कीच ' संत ' बनेल ..अर्थात आपल्याला जरी संत बनायचे नसले तरी एक सर्वसामान्य आयुष्य समाधानाने आणि प्रसन्नतेने व्यतीत करायचे आहे ..त्यामुळे जास्तीत जास्त प्रामाणिकपणे या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करायला हवा ..असे म्हणतात की एक व्यसनी व्यक्तीकडे जन्मतः नैसर्गिक इच्छा आणि आकांक्षा इतर व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात असतात .. तो स्वताच्या इच्छापूर्ती साठी अधिक आग्रही असतो ..कदाचित त्यामुळेच तो जास्त जिद्दी ..हट्टी बनलेला असतो ..त्याला प्राप्त झालेल्या अतिरिक्त बुदिमत्तेचा वापर करून तो नेहमी स्वता:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो ...शिवाय संवेदनशील व हळवा असल्याने छोट्या छोट्या गोष्टीत तो पटकन रागावतो ..निराश होतो ..दुखी: होतो ..वैफल्यग्रस्त होतो या सर्व नकारात्मक भावनांचा परिणाम म्हणून तो सहजगत्या व्यसनांकडे आकर्षित होतो ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करता यावे या अट्टाहासामुळे तो सहजगत्या खोटे बोलतो ..ढोंगीपणा करतो ..दुहेरी व्यक्तिमत्व बनते त्याचे ..त्यातूनच अनेक प्रकारचे स्वभावदोष निर्माण होतात त्याच्या स्वभावात ..पुढे व्यसनाच्या काळात तो पूर्णतः निर्ढावतो ..अनेक स्वभावदोष त्याच्या वागण्यात इतरांना जाणवतात ..आता जरी आपण इथे उपचार घेताना व्यसनमुक्त असलो तरी जोवर या स्वभावदोषांची आपण दखल घेत नाही आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही तोवर आपले व्यसन वारंवार सुरु होण्याचा धोका कायम आहे ..वैचारिक आणि भावनिक संतुलन साध्य करणे आपल्याला आवश्यक ठरते ..सांगा बरे आपल्यात कोणते कोणते स्वभाव दोष आहेत असे आपल्याला वाटते ? सरांच्या या प्रश्नावर एकेकाने उत्तर देण्यास सुरवात केली ..खोटे बोलणे ..बाता मारणे ..दिवास्वप्ने पाहणे ..अतिआत्मविश्वास ..स्वतःला शहाणा समजणे ...दोषारोप करणे ..इतरांच्या भावनांची पर्वा नसणे ..आत्मकेंद्रित वृत्ती ..कृतघ्नता ..आळशीपणा ..कामचुकारपणा ..बेजवाबदारपणा ..असमंजसपणा ..उतावळेपणा .आर्थिक गैरव्यवहार करणे ..पैश्यांची अफरातफर करण्याची वृत्ती ...चैनीवृत्ती ..अय्याशी वृत्ती ..चालढकल करण्याची वृत्ती ..कमी कष्टात जास्त पैसे मिळावेत अशी इच्छा असणे ..झटपट सुख मिळावे अशी लालसा ..इतरांवर दादागिरी करणे ..माझेच म्हणणे खरे असे वाटणे . ..सतत असुरक्षित वाटणे ..वार्डातील सगळे पटापट ऐकेक स्वभावदोष सांगत होते ..सर ते फळ्यावर लिहित होते ..पाहता पाहता मोठीच यादी तयार झाली ..

त्या यादीकडे पाहत हसून सर म्हणाले " बापरे ! .तुम्ही सर्व खूपच प्रामाणिकपणे सांगितले आहेत आपले स्वभावदोष .आता हाच प्रामाणिकपणा हे स्वभावदोष निघून जाण्यासाठी वापरला पाहिजे ..यापैकी काही ना काही दोष प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीत देखील असतात ..मात्र त्यांचे हे दोष त्यांना व्यसनाकडे नेण्यास प्रवृत्त करत नाहीत कारण त्यांना व्यसन करू नये हे भान असते ..व्यसनामुळे आपले शारीरिक.. आर्थिक ..मानसिक.. कौटुंबिक ..सामाजिक पातळीवर नुकसान होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना असते ..किवा व्यसन करणे योग्य नाही हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून पक्क कोरला गेला असतो ..त्यामुळे त्यांचे स्वभावदोष जरी इतरांसाठी घातक..त्रासदायक असले तरी त्यामुळे ते व्यसन करतील असा धोका नसतो ..आपल्या बाबतीत मात्र ' आधीच मर्कट ..त्यात मद्य प्यायला ' असे घडलेय ..त्यामुळे आता हे मर्कटपण काढून टाकले तरच आपली व्यसनमुक्ती सहजपणे टिकते ..तसेच समाधानी आणि स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयुक्त असे आयुष्य घडवण्यास आपल्याला मदत मिळते ..पुढे सर म्हणाले या पायरीत म्हंटले आहे की परमेश्वराच्या मदतीने हे स्वभावदोष काढून टाकायचे आहेत ..म्हणजे आपल्याला स्वताच्या बळावर हे करता येणे कठीण आहे ..कारण सध्या आपले स्वभाव दोष हे आपले शस्त्रे किवा अस्त्रे बनली आहेत..आनंदाने जीवन व्यतीत करता यावे यासाठी आपण या शस्त्रांचा वापर ..गैरवापर करत आलो आहोत ..अशी शस्त्रे स्वतःहून त्यागण्यास आपले अंतर्मन सहजासहजी तयार होणार नाही...व्यसनमुक्तीचा आणि स्वभावदोष काढून टाकण्याचा काहीही संबंध नाही असे आपल्याला वाटेल ..जगत माझ्यापेक्षा जास्त स्वभावदोष असलेली अनेक माणसे आहेत ..त्यात काय विशेष ? ..प्रत्येक व्यक्तीत असतातच स्वभावदोष अशी समर्थने मनात तयार होऊ शकतात ..या समर्थानांच्या आड लपून आपण स्वभावदोष काढून टाकण्याच्या बाबतीत चालढकल करू शकतो ...हे स्वभावदोष काढून टाकताना खूप मानसिक त्रास होईल आपल्याला ..तरी आपली ही शस्त्रे त्यागणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे ..

( बाकी पुढील भागात )

आदरणीय व्यक्ती !

आदरणीय व्यक्ती ! ( बेवड्याची डायरी - भाग ५३ वा )

कन्फेशन करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात... अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता ...समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..

सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ' स्पाँन्सर ' म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने... काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ' तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..' नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ " असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .' खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..' यावर पाटीलने मान खाली घातली ...आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..

सर पुढे सांगू लागले ' व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ' रीलॅप्स ' होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही ..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी ...त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले .

( बाकी पुढील भागात )