" भाग्यवान दारुडा " ( बेवड्याची डायरी - भाग १८ वा )
हॉल मध्ये सर्वाना एकत्रित बसवले गेले होते ..आता अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची मिटिंग होणार आहे हे समजले ..मी कुतूहलाने अगदी पुढच्या रांगेत जाऊन बसलो ..माँनीटर ने प्रार्थना घेतली ..बोलायला सुरवात केली ..नमस्कार मित्रानो माझे नाव संदीप .."मी एक भाग्यवान दारुडा आहे ..केवळ ईश्वराची असीम कृपा ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दर्शवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..आणि आपणा सर्वांचे मला लाभलेले प्रेम ..केवळ याच बळावर मी आज दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर आहे ..तसेच सुखी ..समाधानी ..संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय " संदीप ने असे म्हणताच ..सर्वांनी ' हाय संदीप ' ..असे म्हणता त्याला अभिवादन केले . पुढे तो म्हणाला " मी स्वतःला भाग्यवान दारुडा का म्हणतोय याचे सर्वाना आश्चर्य वाटत असेल .. सुरवातीची काही वर्षे सोडल्यास ..नंतर अनेक वर्षे मी दारूच्या गुलामीत जगत होतो ..दारूमुळे माझे शरीर .मन ..कुटुंब ..आर्थिक बाजू ..सामाजिक स्थान ..माझे आत्मिक स्वास्थ्य ढासळत जात होते.. हे समजत असूनही मी नाईलाजाने पुन्हा पुन्हा दारू पीत गेलो ..जीवन जगणे म्हणजे माझ्या साठी जणू सक्तमजुरीची शिक्षा झाले होते ..दारू शिवाय जीवन जगण्याची कल्पनाही करवत नव्हती इतकी प्रचंड गुलामी निर्माण झाली होती ..मनोमन मी यातून सुटका व्हावी अशी इच्छा करत होतो ..मात्र मला सुटकेचा मार्ग सापडत नव्हता ..कोणाच्या तरी ओळखीने माझ्या कुटुंबियांना या व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता मिळाला ..हो ..नाही ..करता करता शेवटी येथे दाखल झालो ..इथेच मला अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची माहिती मिळाली ..हे देखील समजले मी अतिशय घातक अशा आजारात अडकलो आहे ..त्यातून सुटका होण्यासाठी बारा पायऱ्यांचा मार्ग मिळाला ..मित्रानो मी भाग्यवान अशासाठी आहे की आज जगात लाखो लोक दारूच्या विळख्यात अडकले असूनही त्यांना सुटकेचा मार्ग मिळत नाहीय ..ते आपल्या नशिबाला ..परिस्थितीला ..कुटुंबियांना ..किवा आणखी कुणाला तरी दोष देत पुन्हा पुन्हा दारू पीत आहेत ..रोज कणाकणाने उध्वस्त होत आहेत ..तरीही त्यांना मला मिळाला तसा मार्ग अजून मिळाला नाहीय ...मला हा मार्ग मिळाला आणि माझा पुनर्जन्म झाला ..म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतोय "
तो हिंदीत स्वतची कथा न संकोचता सांगत होता ..आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन त्याचे बोलणे ऐकत होतो ..तो जणू आमचेच मनोगत सांगत आहे असे वाटत होते ..पुढे तो म्हणाला ' सर्वसाधारण मुलांप्रमाणेच मी मोठा होत गेलो ..माझ्यावर प्रेम करणारे आईवडील ..भाऊ बहिण ..सर्व इतरांसारखेच ..मी अआभ्यासात हुशार होतो ..पदवी प्राप्त केल्यानंतर ..पुढेही मी शिकलो ..चांगली नोकरी मिळाली ..त्याच आनंदात मित्रांच्या आग्रहाखातर माझ्या हातात दारूचा ग्लास आला ..सुरवातीचे काही दिवस दारू म्हणजे मला मिळालेली एक जादू आहे असे मला वाटले ..दारूचा घोट पोटात जाताच ..माझ्या चित्तवृत्ती बहरून जात असत ..माझ्या विनोदबुद्धीला धार चढत असे ..माझी रसिकता जागृत होई ..सगळ्या समस्या ..ताण तणाव चुटकीससरशी निघून गेल्याची ..एक प्रचंड हलकेपणाची भावना निर्माण होई ..सुंदर समृद्ध भविष्य मला खुणावत असे ..परंतु मित्रानो हळू हळू दारू पिण्याची ओढ माझ्या मनात घट्ट होत होती ..माझ्या मनावर त्या नशेच्या अवस्थेचा पगडा ..मगरमिठी अधिक दृढ होत होती हे मला समजले नाही ..पुढे पिण्याचे प्रमाण वाढत गेले ..पगारातील सगळा पैसा दारूत खर्च होऊ लागला ..मनाचे असमाधान ..अवस्थता वाढत गेली ..त्याच बरोबर नैराश्य ..वैफल्याचा मी धनी होत गेलो ..माझे दारू पिणे आता एक आनंदोत्सव न राहता सर्वांच्या काळजीचा विषय बनत चालला होता ..कुटुंबियांच्या आग्रहाखातर काही दिवस दारू बंद केली ..मात्र पुन्हा सुरु झाली ..असे वारंवार घडत गेले ..सर्वांचा विश्वास गमावला ..नोकरीत दांड्या मारण्याचे प्रमाण वाढल्यावर ..जेव्हा साहेबांनी मला नोटीस दिली तेव्हा मी रागाने बेदरकारपणे नोकरी सोडली ..दुसरी मिळवली ..अश्या किमान दहा नोकऱ्या करून झाल्या ..सगळा पैसा दारूत गेला ..वय वाढत गेले तसे नुकसानही वाढत गेले ..शेवटी भावाच्या एका परिचिताने भावाला या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती सांगितली ..भावाने मला त्याबद्दल विचारले ..मी साफ नकार दिला ..दारू मी स्वतच्या बळावर सोडू शकेन ..अशी माझी खात्री होती ..परंतु ते जमू शकले नाही ..शेवटी मला इथल्या लोकांनी प्यायलेल्या अवस्थेत जबरदस्ती उचलून येथे आणले .,,मला सुरवातीचे काही दिवस प्रचंड अपमानास्पद वाटत होते ..नंतर नंतर इथल्या थेरेपीज ..योगाभ्यास ..प्राणायाम या सर्व गोष्टींमुळे माझ्या बुद्धीवर असलेला दारूचा पगडा कमी होण्यास मदत झाली ..अल्कोहोलिक्स अँनानिमसचे साहित्य वाचल्यावर मी दारूच्या गुलामीत जगत होतो हे जाणवले ..मग सगळे काम सोपे होत गेले ..मी येथे रमलो ..
मित्रानो दारू सोडली म्हणजे माझ्या जीवनातील समस्या संपल्या असे नाही ..परंतु आता माझ्या जीवनातील समस्यांवर दारू हे औषध नाहीय हे मला पक्के समजले आहे ..माझे जीवन कितीही समस्यापूर्ण असले तरीही ..दारू ही त्यावरची तात्पुरती मलमपट्टी असते ..त्याऐवजी आत्मभान बाळगून ..नैतिकतेचा पाठपुरावा करून ..जीवनावर श्रद्धा ठेवून ..नक्कीच समस्यांचा सामना करता येतो हे मला येथे शिकायला मिळाले ..त्यामुळेच आज मी हातीपायी धडधाकट उभा आहे तुमच्या समोर ..रोज दारूच्या नशेत वाहने चालवून अपघातात मरणारे ..दारूमुळे घरदार सोडून भटकणारे ..एकाकी रहाणारे ..दारूमुळे लिव्हर फुटून ..कावीळ होऊन ..मरणारे अनेक लोक आहेत ..मात्र मला हा मार्ग मिळाला म्हणूनच मी वाचलो ..नव्याने जीवनाला समोरा गेलो ..माझ्या मनात नम्रता ..कृतज्ञता ..सहिष्णुता ..ही बीजे रोवली गेली आहेत ..आता रोजच्या रोज माझ्या समर्पणाचे खतपाणी घालून ती बीजे प्रचंड वृक्ष कसा होतील यासाठी प्रामाणिकपणे मला श्रम करावे लागतील ..याची मी नियमित खबरदारी घेत असतो .....
( बाकी पुढील भागात )