Saturday, April 26, 2014

परिस्थितीशी जुळवून घेणे !


परिस्थितीशी जुळवून घेणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ३४ वा )

मिलिंदच्या ' फक्त आजचा दिवस ' च्या केलेल्या विडंबनाचे कौतुक करत सर म्हणाले ..एक वैशिष्ट्य सांगितले जाते व्यसनी व्यक्तीचे ते हे की व्यसनी व्यक्तीची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र असते ..परंतु त्याला ही बुद्धिमत्ता योग्य पद्धतीने स्वतःच्या भल्यासाठी तसेच प्रगतीसाठी ..व्यसनमुक्तीसाठी ..वापरता येत नाही ..तर उलट तो ही अतिरिक्त बुद्धी नेमकी स्वता:च्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ..स्वता:च्या चुका लपवण्यासाठी वापरत असतो.. त्यामुळेच व्यसनमुक्त रहाणे त्याला अवघड जाते ..सरांनी मग पुढची सूचना चर्चेला घेतली ..' फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षानुसार बदलण्याऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थिती नुसार बदलण्याचा प्रयत्न करेन ' ...प्रत्येक व्यसनी हा नेहमी स्वताच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करता यावे या मनोवृत्तीचे समर्थन करणारा असतो ..तो त्या साठी खूप आग्रही देखील रहातो ..मात्र या जगात कोणाच्याही मनासारखे सतत घडत नसते ...आसपासची माणसे ..परिस्थिती ..अनेकदा आपल्यासाठी अनुकूल नसतात ..त्यावेळी व्यसनी व्यक्ती पटकन निराश होतो ..वैफल्यग्रस्त होतो ..अथवा खूप संतापून संघर्ष करणे सोडून देतो ...व त्याच्यावर अन्याय होतोय असे समर्थन देवून पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो ..खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे ..अन्यथा सतत भांडणे ..कटकटी ..भावनिक असंतुलन ..या गोष्टींचा सामना करावा लागून आपण केलेला व्यसनमुक्तीचा निश्चय वारंवार डळमळीत होऊन व्यसन सुरु होते .

पुढची सूचना होती ...' फक्त आज माझ्या चंचल मनाला मी आवर घालेन ..स्वतःला उपयुक्त एखादी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन ' ही सूचना खरेतर प्रत्येक व्यक्तीला लागू पडते कारण चंचलता हा मनाचा स्थायीभाव आहे ..मन सारखे एका विचारतून दुसऱ्या विचाराकडे जात असते ..बहिणाबाई चौधरी यांनी ' मन वढाय वढाय ' या कवितेत मनाच्या चंचलतेचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे ..मन नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भोगांच्या विचारात लिप्त असते ..अशा ओढाळ मनाला जर लगाम घालता आला नाही तर माणसाची ' एक ना धड ..भराभर चिंध्या ' अशी अवस्था होणारच ..जिवनात यशस्वी व्हावे ..अधिकाधिक प्रगती करावी ..स्वताच्या आणि इतरांच्या सुखासाठी सतत प्रयत्न करावेत ..सर्वाना आनंद होईल असे वर्तन असावे ..असे सर्वांनाच वाटत असते ..मात्र सर्वाना ते करता येत नाही याचे कारण मनाची चंचलता हे आहे ..आपण जरी व्यसनमुक्तीचे ..चांगल्या जीवनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून येथे उपचार घेत असलो तरीही अनेकदा ..मनाच्या चंचलतेमुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ शकतो ..मग कंटाळा येणे ..निराशा येणे ..कुटुंबियांची ..मित्रांची ..खूप आठवण होऊन येथून लवकरात लवकर बाहेर पडणे ..वगैरे प्रकारच्या विचारांनी मन अवस्थ होते ..तसे होऊ नये म्हणून मनाच्या चंचलतेला आवर घालणे अपरिहार्य आहे ..आपले व्यसनमुक्तीचे ..प्रगतीचे ..ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला मनाला कठोरपणे लगाम घालता आला पाहिजे ..चंचल मनाला ताळ्यावर आणण्यासाठी अथवा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण सर्व येथे योगाभ्यास व प्राणायाम करतोच आहोत ..मात्र हे आभ्यास प्रामाणिक पणे केले तरच ..शिवाय येथून बाहेर पडल्यावर देखील हे सुरु ठेवले तरच आपल्या मन ताब्यात ठेवणे शक्य होईल ...प्राणायाम करताना ' अनुलोम विलोम . अथवा ' दीर्घ श्वसन ' या प्रकारावर भर दिला तर नक्कीच हे साध्य होईल ...सर्वांनी घरी देखील हे केले पाहिजे ..काळ कोणासाठी कधीच थांबत नाही ..आपण आधीच आयुष्याची अनेक अनमोल वर्षे व्यसनाधीनतेत वाया घालवली आहेत ..तेव्हा आता वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे ..प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे लक्षात घेवून ..आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी ..आरोग्यासाठी ..ज्ञान संवर्धनासाठी ..आपण वेळ दिला पाहिजे ..स्वतःला उपयुक्त अशा गोष्टी शिकण्याचा ...अभ्यासण्याचा प्रयत्न असला पाहिजे आपला ..उगाचच टिवल्याबावल्या ..टाईमपास ..फालतू बडबड ..नसते विचार करत बसण्यापेक्षा ..वेळेचा सदुपयोग केला पाहिजे .

सर हे सर्व बोलत असतांना एकाने प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला ..सरांनी त्याला अनुमती दिली ..तो उठून उभा राहत म्हणाला ' सर ..मला घरची खूप आठवण येतेय ..मला घरी कधी सोडणार ? ' त्याच्या या प्रश्नाने सर्व हसू लागले ..हा फालतू प्रश्न आहे असे म्हणत त्याच्या आसपासचे लोक त्याला खाली बसवू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..मग म्हणाले ..बघा हा मनाच्या चंचलतेचा उत्तम नमुना ..आपण आता इथे काय शिकतो आहोत याकडे याचे लक्षच नव्हते ..हा सतत इथून बाहेर कसे आणि केव्हा पडता येईल याच विचारात होता इतका वेळ ..असेच असते मनाचे ..ते आपले शरीर जेथे आहे तेथे न राहता शरीराच्या बाहेर पडून सर्व ठिकाणी जावू पहाते ..प्रत्येकाने ' आत्ता ..इथे ' हा विचार केला तर हे टाळता येते ..आपण आत्ता ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीचे उपचार घेत आहोत हे ध्यान्यात ठेवले पाहिजे ..आपले उपचार पूर्ण होताच इथून बाहेर जाता येईल हे नक्की ..त्यासाठी आपले कुटुंबीय आणि समुपदेशक निर्णय घेत असतात ..तेव्हा त्याबाबत आपण विचार करणे व्यर्थ आहे ..त्याएवजी आपण इथे का आहोत ? का यावे लागले ? याचा विचार केला तर इथले वास्तव्य नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरेल ..बाहेर असताना देखील आपण असेच चंचल होतो ..घरी असताना ..मित्रांचा विचार ..व्यसनाचा विचार ..ऑफिसचा विचार ..तर ऑफिसला गेल्यावर ..घरचा ..नातलगांचा विचार ..भविष्य काळातील समस्यांचा विचार ..किवा भूतकाळातील विचार ..हे सगळे सोडून ' आत्ता ..इथे ' हा विचार समोर ठेवला तरच चंचलता आटोक्यात ठेवता येईल .

( बाकी पुढील भागात )

Friday, April 25, 2014

बुद्धीचा गैरवापर !


बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी - भाग ३३ वा )

आज पहाटे गम्मत झाली ..नेहमीप्रमाणे बेल वाजली तसे आम्ही सर्व उठून बसलो ..वार्डच्या भिंतीवरील घडाळ्यात सहा वाजलेले होते ..पटापट उठून सगळे ..गाद्या..चादरी आवरून ठेवायला लागले ..रोज पहाटे बेल वाजवून उठवण्याचे काम ..माँनीटरने वार्ड मधील एका उत्साही मुलाला दिलेले होते ..हा सुमारे पंचविशीचा मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून येथे उपचार घेत होता ..खूप बडबड्या आणि उत्साही ..सकाळी उठण्याचा जे लोक कंटाळा करत ..किवा उठून पुन्हा काहीतरी आजारीपणाचे कारण सांगून झोपून राहत .. पी .टी. , योगाभ्यास , प्राणायाम अशा थेरेपीज करणे टाळत असत ..त्यांची नावे वहीत लिहून माँनीटर कडे देण्याचे काम या अशोककडे दिलेले होते ..एकप्रकारे तो माँनीटरचा मदतनीस म्हणून काम करत असे ..स्वभावाने तसा चांगलाच होता ..मात्र त्याचे हे कंटाळा करणाऱ्या लोकांची नावे माँनीटरला देणे अनेकांना पसंत नव्हते ..म्हणून काही नाठाळ लोक त्याला ' खबरी ' किवा ' चमचा ' म्हणत असत ..सगळे आवरून पी .टी. करायला उभे राहिले ..तितक्यात माँनीटर बाहेरच्या ऑफिसात जावून आला ..ऑफिसमधून वार्डात आल्या आल्या तो ' काय मूर्खपणा चाललाय हा ' असे ओरडला .. पी .टी . करणे थांबवायला लावले ..आम्हाला समजेना काय भानगड झालीय ते ..मग माँनीटर अशोकला म्हणाला ' अरे तू सर्वाना पहाटे सहा ऐवजी चारलाच उठवले आहेस ..मी आता बाहेरच्या घड्याळात पहिले तर तेथे साडेचार झालेत ' आम्ही पटकन वार्डातील घडल्यात पहिले तेथे साडेसहा वाजलेले ..सर्व चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..आपल्याला मूर्ख बनवले गेले आहे हे अशोकच्या लक्षात येवून तो खजील झाला ..मग माँनीटर ने सर्वाना विचारले ' खरे खरे सांगा ..हा प्रकार कोणी केलाय ' सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..कोणीतरी रात्री सगळे झोपले असताना स्टूलवर चढून वार्डातील घड्याळा काटे फिरवून ते दोन तास पुढे करून ठेवलेले होते ..कोणीच काहीच सांगायला तयार होईना ...कोणीतरी अशोक वहीत आपले नाव लिहून माँनीटरला देतो याचा राग काढण्यासाठी हे केले असावे हे उघड होते ..सगळे पार वैतागले होते ..कारण दोन तास आधी उठून ..सगळे आवरून आम्ही पी .टी.ला उभे राहून सगळेच मूर्ख बनलो होतो ..आता पुन्हा दोन तासांसाठी झोप येणे शक्य नव्हते . 

मग माँनीटर ने आता दोन तास वेळ कसा घालवायचा म्हणून टी. व्ही . लावला ..त्यावरचे कार्यक्रम पाहत बसलो सर्व ..मी टी.व्ही पाहताना माझ्या शेजारी बसलेल्या शेरकर काकांना विचारलेच ..' काका तुम्ही इतके हुशार ..शोध लावा की या भानगडीचा ..कोणी घड्याळ पुढे केले असेल ? ' काकांनी मला चार पाच संशयित नावे सांगितली ..बहुतेक सगळे जण ब्राऊन शुगाचे व्यसनी होते ..परवा या चौघांनी सकाळी वेळेवर उठण्याचा कंटाळा केला होता ..यांची नावे अशोकने माँनीटरला सांगितली होती ..त्यांना समज देण्यात आली होती ..बहुतेक त्याचा बदला यांनी घेतला असावा ' असा काकांचा संशय होता ..नंतर समूह उपचाराच्या वेळी हा प्रकार समजल्यावर सरांनी .. हा प्रकार गम्मत म्हणून छान आहे ..मात्र ही गम्मत सर्वांसाठी कशी त्रासदायक आहे हे सांगत ..ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल ..असे उद्गार काढले ..तसेच मी कोणालाही रागावणार नाही याची खात्री बाळगून.. ज्याने हे केले असेल त्याने स्वतःहून पुढे यावे असे आवाहन केले ..कोणी रागावणार नाही याची खात्री झाल्यावर मग एका मिलिंद नावाच्या मुलाने हळूच हात वर करून ..हा प्रकार त्याने केला असल्याचे कबूल केले ..हे का केलेस असे त्याला विचारले असता ..त्याने सांगितले की अशोकने ...मिलिंदच्या डायरीत लिहिलेला एक कागद फाडून घेतला होता .. व तो कागद सरांना दाखवीन अशी त्याला धमकी दिली होती ..त्याच्या बदल्यात अशोकने त्याच्याकडून स्वतःचे कपडे धुवून घेतले होते ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..कोणता कागद ? काय लिहिलेय त्यावर ? .सरांनी मग अशोकला तो कागद आणण्यास सांगितले ..अशोकने खिश्यातून काढून कागद सरांच्या हाती दिला ..सरांनी तो घडी केलेला तो कागद उघडून त्यावर नजर टाकली आणि हसू लागले ..त्यावर काहीतरी भयंकर लिहिलेले असावे असे वाटले होते आम्हाला ..पण सर हसत होते ..सरांनी मिलिंदकडे हसत पहिले ..' मस्तच सुचलेय तुला हे ..तुझ्या कुशाग्र बुद्धीचे हे प्रतिक आहे ..फक्त दिशा थोडी चुकली आहे ' असे म्हणत त्याची तारीफ केली ..मग सरांनी तो कागद सर्वाना वाचून दाखवला . ..परवा पासून जे ' फक्त आजचा दिवस शिकवले जात होते त्याचे विडंबन मिलिंदने कागदावर लिहिले होते ..

१ ) फक्त आजचा दिवस ..आयुष्यभराचे सर्व चिंता ..प्रश्न ..समस्या मी आजच सोडविल्या गेल्या पाहिजेत याचा विचार करून स्वताचे डोके खराब करून घेईन ..आणि टेन्शन आलेय असे कारण देवून दारू पीईन .

२ ) फक्त आज मी कोणाचेही ऐकणार नाही ..जास्तीत जास्त गबाळे दिसण्याचा ..सर्वांवर टीका करण्याचा ..दुरुत्तरे करण्याचा ..उर्मटपणे वागण्याचा आणि स्वतः सोडून सर्वांनी सुधारावे असा प्रयत्न करेन .

३ ) फक्त आजचा दिवस कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने मी कोणाचे तरी वाटोळे करीन ..भांडणे लावीन ..चुगल्या करीन ..त्यामुळे माझा वेळ छान जाईल ..

४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या मनासारखी असावी यासाठी मी वाट्टेल ते करेन ..भांडेन ..परिस्थितीला दोष देईन ..नातलगांवर आरोप करेन ..सर्वाना अशांत करेन ..जेणे करून कोणी मला दारू पिण्याबद्दल दोष देणार नाहीत .

५ ) फक्त आजचा दिवस मी अतिशय चंचलपणे वागेन ..एकही गोष्ट धड करणार नाही ..नसत्या उचापती करेन ..

६ ) फक्त आजचा दिवस स्वतःला उपयुक्त असे एखादी गोष्ट शिकण्याऐवजी ..कंटाळा करत ..बोअर झालो असे म्हणत कटकट करीन ...दारू पिवून झोपून राहीन ..

सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो ...त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते ..ते अशोकला सापडले ..अशोकने ते सरांना दाखवेन अशी धमकी देवून स्वतःचे कपडे धुवून घेण्याचे काम करून घेतले होते मिलिंद कडून ..सरांनी मग अशोकला समज दिली ..तू हा तुझ्या अधिकारांचा गैरवापर करून .. सरांना नाव सांगेन ही भीती घालून स्वताची कामे करून घेणे यापुढे बंद केले पाहिजेस असे बजावले ..मिलिंदला सर म्हणाले..अरे तू एकप्रकारे स्वताचे परिक्षणच मांडलेले आहे यात ..पूर्वी असेच वर्तन असायचे आपले ..तेच तू अतिशय हुशारीने लिहिले आहेस ..आता असे वर्तन आपल्याला करायचे नाहीय.. हेच तर शिकण्यासाठी आपण येथे आलोत ..

( बाकी पुढील भागात )

मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे !


मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ३२ वा )

सरांनी फळ्यावर लिहिलेली दुसरी सूचना होती ' फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा ..आणि स्वतः खेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन ' ..त्याबाबत सांगताना सर म्हणाले ..एका व्यसनी व्यक्तीला इतरांचे आपल्या बाबत काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची अजिबात सवय नसते .. त्याला कोणी त्याच्या वर्तनाबद्दल काही सूचना दिल्यास तो लगेच समर्थने देतो ..कोणाला तरी दोष देतो ..किवा आपले वर्तन हे परिस्थितीनुसार कसा नाईलाज होता हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो ..त्याचे हे बचावात्मक धोरण किवा आक्रमक धोरण सोडून देवून त्याने इतरांचे म्हणणे नेमके काय आणि का ? आहे हे समजून घेण्यासाठी ...इतरांचे शांतपणे ऐकून घेण्याची गरज असते ..त्यातून बरेच शिकायला मिळू शकते हा झाला फक्त ऐकण्याचा भाग ..दुसरा भाग असतो वर्तनाचा ..व्यसनी व्यक्ती हेकेखोर ..हट्टी ..जिद्दी ..असतो ..आपल्या या स्वभावात बदल करण्यासाठी इतरांनी आपल्या वर्तनाबाबत दिलेल्या सूचनांचा वापर करून स्वतःच्या वृत्तीत व कृतीत बदल करण्यास यातून सुचवलेले आहे ..यातून आपल्याला बरेच शिकायला मिळू शकते याबाबत एक छान घोषवाक्य आहे ' Learn to Listen and Liisten to Learn ' म्हणजे ' ऐकायला शिका आणि शिकण्यासाठी ऐका ' ..हे जर आपण पाळण्याचा प्रयत्न केला आपली अवांतर अथवा निरर्थक बडबड कमी होऊन ' मितभाषी ' होण्यास मदत मिळते व अनेक गोष्टी शिकता येतात . ..फक्त आज मी नीटनेटके दिसण्याचा प्रयत्न करेन या वाक्यातून ...आपले व्यक्तिमत्व नेहमी प्रसन्न व ताजेतवाने ठेवण्यास सांगितले गेले आहे ..व्यसनी व्यक्ती व्यसनांच्या काळात आळशी प्रवृत्तीकडे झुकलेला असतो ...तसेच व्यक्तिगत निराशेमुळे अनेकदा तो आपल्या दिसण्याबाबत आपल्या पेहरावाबाबत निष्काळजी रहातो ..व्यसन बंद केल्यावरही काही लोक अशाच आळशी प्रवृत्तीचे राहतात ..वेळच्या वेळी अंघोळ ..दाढी ..कपडे स्वच्छ ठेवणे ...व्यवस्थित केस विंचरणे ..अशा बाबतीत तो निरुत्साही आढळतो ..यात बदल होणे आवश्यक आहे ..कारण आता व्यसन बंद ठेवून आपण एका नवीन आयुष्याला सामोरे जाणार आहोत तेथे यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तिमत्व उठावदार असणे गरजेचे ठरते ..आजचा दिवस किंचितही टीका न करता ..स्वतःखेरीज अन्य कुणालाही सुधारण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ व्यसनी व्यक्तीच्या दोषारोपण करण्याच्या ..छिद्रान्वेशी वृत्तीच्या ..वागणुकीत बदल सुचवला आहे ..आपल्या अश्या टीका करण्यामुळे किवा सतत इतरांच्या चुका शोधण्याच्या प्रवृत्ती मुळे तो आसपासच्या लोकांमध्ये अप्रिय होऊ शकतो ...आपल्या आसपास सगळे मूर्ख आहेत अशी त्याची समजूत होऊन तो स्वतःला अतिशाहणं समजू लागतो .. अनेकदा त्याची टीका खरी देखील असली तरी ती इतरांना नाराज करणारी असते ..आधीच व्यसनाच्या काळात व्यसनी व्यक्तीने अनेकांची मने विनाकारण दुखावली असतात ..आता आसपासच्या सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांवर टीका करणे किवा त्यांच्या चुका शोधणे बंद केले पाहिजे ..त्याऐवजी जास्तीत जास्त वेळ आपण स्वताच्या सुधारणेबाबत दिला पाहिजे ..व्यसनाधीनतेच्या काळात आपल्यात निर्माण झालेले स्वभावदोष ..विचारांचे ..भावनांचे व वर्तनाचे बिघडलेपण लवकर निघून जावे यासाठी जास्तीत जास्त वेळ स्वताच्या सुधारणेकरता व्यतीत करून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे ..इतरांना सुधारण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवता कामा नये ..हे समजावून सांगताना सर आमच्या नेमक्या त्रुटीवरच बोलत आहेत असे वाटत होते मला ..ते सांगत असलेल्या गोष्टी मला तंतोतंत लागू पडत होत्या ..

फक्त आजच्या दिवस कुणालाही समजणार नाही अश्या पद्धतीने मी कोणाचे तरी भले करेन .या वाक्यात व्यसनी व्यक्तीची आत्मकेंद्रित व आत्मप्रौढी मिरवण्याची वृत्ती ओळखून त्यात बदल करण्यासाठी प्रेरित केले जाते ..अनेक वर्षे आपण फक्त स्वतःच्या सुखाचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला आहे ..या स्वार्थी वृत्तीमुळे आपण अनेकांना दुखावले आहे ..यापुढे जर आपण आपल्या आसपासच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करण्याचे ठरवले तर नक्कीच आपण केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची संधी मिळत रहाते ..आत्मगौरव करण्यात किवा शेखी मिरवण्यात ..आत्मप्रौढी मिरवण्यात आपण कधीच मागे राहत नाही ..आपण केलेल्या चुका झाकण्यासाठी इतरांसाठी आपण काय काय केलेय किवा आपण किती दयाळू ..कृपाळू ..परोपकारी आहोत हे सतत सांगण्यात त्याला धन्यता वाटते ..' नेकी कर दर्या में डाल ' या उक्तीनुसार जर कोणाला आपण कशाही पद्धतीने मदत केली तर त्यात अगदी डंका वाजवून ..स्वताचे मोठेपण सिद्ध करणे म्हणजे आपल्या चांगल्या कर्मावरील आपली श्रद्धा डळमळीत असल्याचे लक्षण आहे ..निसर्ग आपल्या सर्व प्रकारच्या चांगल्या -वाईट कृत्यांची योग्य ती दखल घेत असतो ..व त्या कर्मानुसार आपले भविष्य घडत जाते यावर आपली श्रद्धा हवी ..म्हणजे कोणालाही नकळत कोणाचे तरी भले करता येणे शक्य आहे ..हे सांगत सरांनी पुढे आणखीन तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षा नुसार बदलण्या ऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थितीनुसार बदलण्याचा पयत्न करेन .

५ ) फक्त आज मी माझ्या चंचल मनाला आवर घालेन . 

६ ) स्वतःला उपयुक्त अशी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन .

' फक्त आजचा दिवस ' चे तत्वज्ञान खूपच मौलिक आहे असे मला वाटले .. बेबंद ..बंडखोर .बेलगाम..स्वैर अशा वर्तनाच्या व्यसनी व्यक्तीला मर्यादांच्या चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न नक्कीच व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचा होता ..उद्या सर काय सांगतात याची उत्सुकता लागून राहिली होती मला . 

( बाकी पुढील भागात )

फक्त आजचा दिवस !


फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी - भाग ३१ वा )

आजच्या समूह उपचारात सरांनी आधी चर्चा झालेल्या अल्कोहोलिक्स अॅनाँनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्यांचा एकत्रित आढावा घेत आम्हाला सर्वाना ' फक्त आजचा दिवस ' हे तत्व समजावून सांगितले ..पहिल्या तीन पायऱ्या या हतबलता , मान्यता , अस्ताव्यास्तता दर्शवून देतात ..तर दुसऱ्या पायरीने विश्वास ..श्रद्धा मिळवता येते , तिस-या पायरीत नवीन जीवनाचा मजबूत पाया तयार करण्यासाठी स्वेछेचा त्याग व आपल्याला समजलेल्या ईश्वराच्या कलाने जीवन व्यतीत करण्याबद्दल मागर्दर्शन दिलेले आहे हे सांगत ..सरांनी सर्व प्रथम.. इथे दाखल झाल्यावर आपण व्यसनांच्या आहारी गेलेलो आहोत हे स्वतःशी कबूल करणे आवश्यक आहे व त्यासाठी व्यसनामुळे आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे तपासण्यास आपल्याला प्रेरित केले गेलेय असे सांगितले ..आपली बुद्धी , आर्थिक व मानसिक शक्ती , तसेच शैक्षणिक आणि इतर क्षमता स्वतःच्या बळावर व्यसन कायमचे बंद ठेवण्यास कशा असमर्थ ठरल्या हे प्रत्येकाने नक्कीच तपासले पाहिजे ..तरच आपल्याला व्यसनमुक्ती साठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे आहे हे समजेल .. ही पहिली पायरी ..नंतर ही मदत घेण्यासाठी ईश्वरी शक्ती ओळखणे ज्यात विशिष्ट धर्माचा ..जातीचा ..पंथाचा देव तर येतोच पण त्या खेरीज निसर्ग ..आपले नातलग ..स्नेही ..हितचिंतक ...एखादी अध्यात्मिक विचारधारा ...एखादे तत्व इतकेच नव्हे तर अल्कोहोलिक्स अँनाॅनिमसचे तत्वज्ञान .. सगळे आपल्यासाठी कसे उच्चशक्ती किवां ईश्वर आहे हे समजून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे आले ..जे जे आपल्याला व्यसनापासून परावृत्त करण्यास मदत करते ते सगळे या ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होऊ शकते ..हे समजून घेवून त्यावरील विश्वास बळकट करणे ही झाली दुसरी पायरी ..आणि यापुढे व्यसनमुक्त रहात नवीन जीवनाची बांधणी ...जडण घडण ..किवा नव्या आणि सर्वांसाठी उपयुक्त अशा पद्धतीने जीवन व्यक्तीत करण्यासाठी आपल्याला समजलेल्या ईश्वरी तत्वानुसार जीवन व्यातित करण्याची मानसिक तयारी हे तिसऱ्या पायरीचे सार आहे असे सर म्हणाले ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ' फक्त आजचा दिवस ' हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले केवळ व्यसनी व्यक्तीसाठीच नाही तर ..अस्वस्थ ..अशांत ..असमाधानी ..असुंतूलीत..अयशस्वी अशा सर्व लोकांसाठी.. हे ' फक्त आजचा दिवस ' लागू पडते .ज्यात फक्त आजचा दिवस काहीही झाले ..कितीही संकटे आली ..कितीही निराशा... वैफल्य आले ..कितीही आनंदाचा यशाचा क्षण आला तरीही मी व्यसन करणार नाही हा निश्चय आहेच ..या खेरीज माझ्या सुखी ..समाधानी ..संतुलित आणि यशस्वी जीवनासाठी काय काय करणे भाग आहे हे स्पष्ट केले ...एक एक दिवसाच्या हिशेबाने आयुष्य अधिक सोपे ..सहज ..सुंदर कसे घडते हेच यात दिले आहे .

' फक्त आजचा दिवस '

१) फक्त आजचा दिवस आयुष्यभराचे सर्व प्रश्न ..चिंता ..समस्या एकदम सोडवण्याऐवजी ..फक्त आलेला आजचा दिवस मी व्यवस्थित पणे जगण्याचा प्रयत्न करेन .

२ ) फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा आणि स्वतःखेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन .

३ ) फक्त आजचा दिवस मी कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने कुणाचे तरी भले करेन ..

ही तीन वाक्ये सरांनी फळ्यावर लिहिली आणि एकेका वाक्याचे विश्लेषण करण्यास सुरवात केली ..प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रश्न ..समस्या..चिंता असतात..आणि त्या समस्या सोडविल्या जाव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते ..या चिंता आणि समस्याच आपल्या अस्वस्थतेस कारणीभूत असतात .. या समस्या चुटकीसरशी सुटाव्यात ..यांचे उत्तर आपल्याला ताबडतोब मिळावे ..किवा या चिंता कधी कमी होतील या बाबतचा सर्वांगीण विचार करण्यात आपण बराच वेळ वाया घालवत असतो ..खरे तर प्रत्येकाला आपण नक्की किती दिवस जगणार आहोत हे देखील माहित नसते ..भविष्याच्या पोटात नेमके काय दडलेले आहे हे कोणीच सांगू शकत नाही ..अशा वेळी संपूर्ण जिवनभराच्या चिंता .समस्या यांचा आपण विचार करत बसतो ..त्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो ..सतत चिंताग्रस्त असतो ..काळजी करत बसतो ..प्रश्न सुटावेत म्हणून बैचैन रहातो.. हे अविवेकी आहे ..क्षणभंगुर किवा अशाश्वत जीवनाची अनिश्चितता ध्यानात घेतली तर हे व्यर्थ असते ..त्या ऐवजी जर ' फक्त आजचा दिवस ' या प्रश्न चिंता सोडवण्यासाठी मी व्यवस्थित पद्धतीने व्यतीत केला तर नक्कीच मी समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू शकेन ..आता व्यवस्थित म्हणजे काय हा प्रश्न उरतो ..तर व्यवस्थित म्हणजे ...सर्वात आधी आज मी या अनमोल शरीराची योग्य स्वच्छता ठेवेन ..शरीर बळकटी करता आवश्यक व्यायाम करेन ज्यात योगाभ्यास , प्राणायाम येते ...नंतर माझ्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली नोकरी अथवा काम नीट जवाबदारीने करेन ..माझ्या सभोवालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवेन ..माझ्या कुटुंबियांच्या भावनांची योग्य काळजी घेईन ..भविष्याची तरदूत म्हणून योग्य ती काटकसर ..बचत करेन ..माझी मनस्थिती आनंदी राहण्यासाठी मनोरंजन ..कला ..माझे छंद यांच्यासाठी योग्य वेळ देईन ..एकंदरीत जवाबदारीने वागेन हे सगळे व्यवस्थितपणाच्या व्याख्येत येते .

( बाकी पुढील भागात )

झाडू ड्युटी !


झाडू ड्युटी ! ( बेवड्याची डायरी -भाग ३० वा )

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ..अगदी लहानपणा पासूनच्या घटना आठवत होतो ..अनेक घटनांमध्ये मला जाणवले की माझ्या आवडी निवडी ..माझ्या इच्छा ..वगैरेंबाबत मी खूप जागरूक असे ..एकदा लहानपणी मेथीची भाजी खाणार नाही म्हणून मी हटून बसलो होतो ..तर एकदा विशिष्ट रंगाचाच शर्ट विकत घ्यायचा म्हणून कपड्यांच्या दुकानात रडून गोंधळ घातला होता ..आईचा नेहमी मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात म्हणून आग्रह असे ..पालेभाज्या ..तसेच कारली ..दुधी ..मुळा ..भोपळा ..वगैरे भाज्या अजिबात आवडत नसत ...एकदा घरी जेवणात मेथीची भाजी केलेली होती ..मी ती भाजी खाणार नाही म्हणून हटून बसलो ..मला वेगळी बटाट्याची भाजी करून दे म्हणून आईकडे हट्ट धरला ..आईने खूप समजावले ..सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ..आवडीनिवडी पेक्षा त्या भाज्यांमध्ये पोषक तत्वे कोणती आहेत ते पाहून भाजी खाल्ली पाहिजेत वगैरे समजावले ..मात्र मी तिचे अजिबात ऐकायला तयार नव्हतो ..शेवटी मी जेवत नाहीय ते पाहून तिने रात्री ११ वाजता मला वेगळी बटाट्याची भाजी करून दिली तेव्हा माझे समाधान झाले होते ..पुढे मी एन.सी .सी च्या कँम्प मध्ये गेलो असताना ..माझ्या या भाज्यांच्या आवडीनिवडी मुले मला जवळ जवळ उपाशी राहावे लागले होते ...कारण तेथे सर्व भाज्या माझ्या नावडीच्या होत्या ..मी फक्त वरण पोळी खाल्ली होती तीन दिवस ..तेव्हा जाणवले होते की सर्व भाज्या खायची सवय आपल लावून घ्यायला हवी होती ..माझ्या मित्राकडे एक लाल रंगाचा शर्ट होता तो त्याला खूप .. शोभून दिसे ..मलाही वाटे असला शर्ट आपल्याला हवा ..जेव्हा दिवाळीत कपडे खरेदी साठी आम्ही सर्व कपड्यांच्या दुकानात गेलो तेव्हा मी मला तो विशिष्ट लाल रंगाचा शर्ट हवा अशी मागणी केली ..नेमका माझ्या मापाचा शर्ट तेथे उपलब्ध नव्हता ..थोडा आखूड होता ..तरीही मी तो आखूड लाल शर्टच घेणार असा हट्ट धरला ..मला सर्वांनी खूप समजावले ..मात्र मी रडारड सुरु केली ..शेवटी तो आखूड मापाचा शर्ट घेवून आलो ..जेमतेम दिवाळीत तो दोन दिवस वापरला ..धुतल्यानंतर तो अजूनच आखूड झाला नंतर तो शर्ट मी पुन्हा घातला नाही ...शाळेत विशिष्ट प्रकारचे दप्तर हवे ..वह्या विशिष्ट कंपनीच्याच हव्यात ..वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी मी हटून बसत असे ..माझे सर्व मित्र दहावीनंतर कॉमर्सला गेले म्हणून मी पण घरचे सायन्स घे असा आग्रह करत असताना कॉमर्सलाच गेलो ..नंतर अनेकदा आपण सायन्स घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटत राहिले ..अनेक घटना मला आठवत गेल्या ज्यात माझ्या इच्छा तसेच माझ्या आवडीनिवडी नुसार मी घरच्यांना वेठीला धरले होते ..त्यांच्या मानसिकतेचा विचार न करता ..ते आपले हितच बघत आहेत याचा विचार न करता केवळ स्वतच्या इछेचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला होता ..नोकरी लागल्यावर जेव्हा पहिल्या पगारात मित्रांनी पार्टी दिली तेव्हा ..मित्रांनी बियर घेण्याचा आग्रह केला ..आमच्या घरी कोणीही कधीच दारू किवा बियर वगैरे घेत नसे ..उलट माणसाला कोणतेही व्यसन नसावे हाच आग्रह असे वडिलांचा ..तेव्हा देखील मी वडिलांची शिकवण बाजूला ठेवून बियर घेतली ..घरी आल्यावर जेव्हा वास आला तेव्हा वडील रागावले ..मी वडिलांना माझ्या पिण्याचे समर्थन दिले ..आजकाल सर्वच पितात ..एखादे दिवशी घेतली तर इतके बोलायचे काही कारण नाही ..असा वाद घातला ..पुढे माझे पिणे वाढतच गेले ..तेव्हा देखील मी समर्थने देत गेलो ..वाद घालत गेलो ..कदाचित त्यामुळेच आज मला व्यसनमुक्ती केंद्रात यावे लगले होते ..पहिल्यांदाच मी स्वताच्या इच्छा बाजूला ठेवून घरच्यांच्या इच्छेला मान दिला असता तर मला व्यसन लागले नसते ..उत्तर लिहून झाल्यावर मी मोठा सुस्कारा सोडला ..

उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे ..येथे उपचार घेणाऱ्या सर्वांनाच झाडू मारणे ..वार्ड सफाई ..जेवण बनवण्याची मोठी भांडी घसणे वगैरे प्रकारची कामे करावी लागत असत ..फक्त जे आजारी आहेत ..वृद्ध आहेत किवा इतर काही समस्या आहेत अश्यानच यातून सूट मिळे..तत्वतः हे मला मान्य होते ..मात्र प्रत्यक्ष माझी झाडू ड्युटी लागली आहे हे ऐकून मला कसेसेच झाले ..घरी कधीच मी असल्या कामांना हात लावला नव्हता ..झाडू मारणे ..भांडी घासणे ..स्वैपाक करणे ..कपडे धुणे ..घराची साफसफाई करणे वगैरे कामे स्त्रियांनी करायची असतात ही एक चुकीची मानसिकता बनून गेली होती ..अलका माहेरी गेली की या मानसिकते मुळे मला खूप त्रास होई ..चारचार दिवस मी घरात झाडू मारत नसे ..ती येई तेव्हा घराचा अक्षरश: उकिरडा झालेला असे ..सगळीकडे कचरा ..अस्ताव्यस्त पडलेले माझे कपडे ..फ्रीज मध्ये उघडे ठेवलेले पदार्थ ...चहा केलेली खरकटी भांडी ..नासलेल्या दुधाचे बाजूला ठेवलेले भांडे ..वगैरे पसारा पाहून ती खूप कटकट करत असे ..तिला सगळा पसारा आवरायला चारपाच तास लागत ..यावर मी तिला म्हणे तुला आपल्या घराची इतकी काळजी आहे तर मग माहेरी जावू नकोस .. मात्र ती माहेरी गेल्यावर मी सर्व साफसफाई नीट करत जावी असे मला वाटले नव्हते ..

माझा पडलेला चेहरा पाहून माँनीटर म्हणाला ..विजयभाऊ ही ड्युटी तुमच्याकडून काम करून घ्यावे म्हणून लावलेली नाहीय तर या जागेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी म्हणून ..तसेच आपला अहंकार कमी व्हावा म्हणून लावली जाते ..तसेच आपले घर स्वच्छ ठेवण्यात आपल्या कुटुंबातील स्त्रियांचा कसा वाटा असतो हे समजून त्यांची किंमत कळावी हा हेतू आहे ..कोणतेही काम हे हलक्या अथवा दुय्यम दर्जाचे नसते ..उलट अशी कामे केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो ..वेगवेगळ्या प्रकारची कामे केल्याने शरीराला व्यायाम मिळतो ..आपले मन स्वस्थ आणि शांत राहण्यास ही कामे मदत करतात ..त्याचं बोलण्याला मी मान डोलावून दुजोरा दिला .

मेरी मर्जी !


मेरी मर्जी ! ( बेवड्याची डायरी- भाग २९ वा )


मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब...दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही ..बहुतेकांनी स्वताच्या स्वार्थाच्या इच्छा बोलून दाखवल्या ..नियम मोडणे ..चोरी करणे ..वगैरे विचार मनात आले ..म्हणजेच जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वता:च्या इच्छेने जगण्याची संधी उपलब्ध होते ..त्याच्यावर कोणतेही बंधन नाही ..कोणताही दबाव नाही ..अशी परिस्थिती असते ..तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात स्वैराचाराच्या गोष्टी येतात ..आपल्या मनात असलेल्या इच्छा या फक्त स्वतःच्याच नव्हे तर आपल्याशी संबंधित इतर लोकांच्या भल्याच्या आहेत कि नाहीत हे नीट समजेपर्यंत आपण स्वतच्या इच्छेने जीवन जगायला मिळावे हा अट्टाहास सोडून देणेच आपल्या आणि इतरांच्याही हिताचे असते ..हेच तिसऱ्या पायरीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ..कदाचित आपल्या व्यसनी होण्याचे कारण देखील हेच आहे ..आपण दारू किवा इतर व्यसने आपल्या मर्जीने करत गेलो ..मला माझ्या पद्धतीने जीवन जगण्याचा हक्क आहे असे समर्थन करत गेलो स्वतच्या पिण्याचे ..आपले कुटुंबीय ..स्नेही ..शुभचिंतक ..आपल्याला वारंवार व्यसने करण्यापासून परावृत्त करत राहिले ..मात्र आपण कोणाचेही ऐकले नाही ..उलट त्यांच्याशी वाद घातला ..दुरुतारे केली ..प्रसंगी भांडलो ..त्यांना शत्रू मानून जिद्दीने ..हट्टाने ..स्वताच्या मनासारखे वागत गेलो ..खरे तर तंबाखू ..दारू ..व इतर व्यसने वाईट असतात ..त्यामुळे प्रचंड नुकसान होत हे आपण लहानपणापासून ऐकलेले असते ..प्रत्येकाच्या गल्लीत ..गावात ..व्यसनामुळे बरबाद झालेला व्यसनी आपण पाहिलेला असतो ..तरीही व्यसन केल्याने माझे काही वाकडे होणार नाही .मी लिमिट मध्ये पिवू शकेन ..प्यायलो तरी मी नुकसान होऊ देणार नाही ..मी पाहिजे तेव्हा बंद करीन ..मी माझ्या पैश्याने पितो ..मला माझे समजते ..वगैरे समर्थने देत ..किवा आपल्या पिण्याला इतर लोक ..परिस्थिती ..मित्र ..इतरांचे माझ्याशी असलेले वर्तन कसे जवाबदार आहे हे स्वतःला आणि इतरांना पटवून देत गेलो ..हा आपला अहंकार होता..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत नेमक्या या अहंकारावरच बोट ठेवले आहे ..

दुसऱ्या पायरीत ..आपण स्वतःच्या शरीराचे मालक आहोत ..आपले जीवन आपल्या पद्धतीने आपण जगले पाहिजे .. हा आपला अहंकार कमी करण्यासाठी ..आपलं जन्म कसा निसर्गनियमानुसार झालाय ..आपल्या मोठे होण्यात अनेकांचा कसा हातभार आहे ..हे सांगून जीवनावरील मालकी हक्काची भावना सोडून देवून ..माझ्या जीवनावर निसर्ग ..नातलग ..समाज यांचा कसा अधिकार आहे हे सांगून ..आपल्यापेक्षा उच्चशक्ती जीवनात कार्यरत आहेत ..त्या शक्तीला समजून घेवून ..त्या शक्तीच्या नियमानुसार वागले तर सगळे ठीक होते हा विश्वास ठेवण्यास सांगितले आहे ..त्या नुसार जीवन व्यतीत करण्याबद्दल तिसऱ्या पायरीत सांगितले आहे ..म्हणजेच यापुढे मनात आलेली कोणतीही गोष्ट करताना केवळ स्वतःच्या मनात आले आणि केले असे न करता ..दुसऱ्या पायरीत उल्लेख केलेल्या ईश्वराच्या सल्ल्याने जर आपण वागत गेलो तर नक्कीच आपल्या विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होत जातील ..असे सांगत सरांनी समूह उपचार संपवला ..आम्हाला डायरीत लिहायला प्रश्न दिला ..' स्वताच्या इच्छेने जिवन व्यतीत करण्याने आपले काय काय नुकसान झालेय ते लिहा ? " 

मी डायरीत उत्तर लिहित बसलो .. काही लोक काय लिहायचे ते न सुचल्याने नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..सर त्यांना म्हणाले ..यात जास्त विचार करण्यासारखे काही नाहीय ..फक्त जसे वागलो ते लिहायचे आहे ..इतका विचार व्यसन करण्या आधी केला असतात तर किती बरे झाले असते ..सगळे हे ऐकून हसू लागले ..सरांचे बरोबरच होते ..आम्ही व्यसन करत असताना ..व्यसनाच्या आहारी जात असताना ..कसलाही सारासार विचार केला नव्हता ...म्हणून तर व्यसनी झालो होतो ...एक जण माझ्या जवळ येवून माझ्या डायरीत डोकावू लागला ..हा प्राणी इथे उपचारांकरिता तीन वेळा आलेला होता ..म्हणजे ' सिनियर ' होता ..इतक्या वेळा उपचार घेवूनही ..याला नेमके काय लिहावे हे समजत नव्हते याचे मला नवल वाटले ..त्याला म्हणालोच मी ..'अहो ..आता सरांनी सांगितलेय कि सगळे उलगडून ..आपण स्वताच्या इच्छेने कसे जगलो ...त्यामुळे काय नुकसान झालेय हे लिहा ' तो खजील झाला ..म्हणाला ' हे सगळे ठीक आहे हो ..पण मी इथून बाहेर पडल्यावर फक्त एकद्च प्यायलो ..तरी मला यांनी धरून आणले आहे इथे ' लगेच माँनीटर तेथे आला ..' अरे तुला तीन वेळा उपचार दिले तेव्हा ..आपण या पुढे एकदाही दारू प्यायची नाही हेच शिकवले होते ना ? ..तरीही तू म्हणतोस कि फक्त एकदा प्यायलो ..तू इथून बाहेर पडल्यावर पुन्हा स्वताच्या इच्छेने एकदा का होईना दारू प्यायलास ..म्हणून तुला पुन्हा आणले उपचारांसाठी ..अजून तुला स्वताची इच्छा सोडून देता येत नाहीय म्हणून वारंवार यावे लागतेय ..या पुढे पिण्याच्या पहिले ' मी आज दारू पिवू का ?' अशी आई वडिलांची ..पत्नीची परवानगी घे ..ते हो म्हणाले तरच दारू पी ..हे जेव्हा तू शिकशील तेव्हाच व्यसनमुक्त राहशील ...!

( बाकी पुढील भागात )

Thursday, April 17, 2014

स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे !


स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे ! ( बेवड्याची डायरी - भाग २८ वा )

अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या दुसऱ्या पायरीत सरांनी ईश्वर किवा उच्च शक्तीचे स्वरूप ...तसेच प्रत्येकाच्या जिवनात ती उच्चाशक्ती निसर्ग ..नातलग ..समाज यांच्या रूपाने कशी अस्तित्वात आहे हे मागच्या वेळी उलगडून सांगितले होते ..मला ते पटलेही होते ..एखादा विशिष्ट देव ..धर्म ..बाजूला ठेवून आपल्यावर प्रेम करणारे नातलग ..आपल्याला जीवन आनंदीपणे व्यतीत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करणारा समाज ..नैसर्गिक ..कौटुंबिक अथवा सामाजिक नियम ..इतकेच काय पण आपण देशात रहातो त्या देशाचे कायदे हे सर्वच ईश्वर या व्याख्येत मोडत असतात ..या सर्व गोष्टी आपल्याला मर्यादेने जगण्यास शिकवतात ..निसर्गाने प्रत्येक जीवाला काही क्षमता दिलेल्या आहेत तशाच काही मर्यादा देखील घातल्या आहेत ..या मर्यादा जे लोक मान्य करत नाहीत ते बंडखोरी करतात ..स्वतच्या मर्जीने जीवन व्यतीत करू इच्छितात ..त्यामुळेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो ..हे नियम जाचक वाटून ते क्रोधीत होतात ..निराश ..वैफल्यग्रस्त होतात ..त्यांचे जीवन जगणे अधिक अधिक कठीण होते ...आपले सगळे अहंकार बाजूला ठेवून ..आपल्या मर्यादा समजून घेवून ..या ईश्वरी शक्तीला समजून घेतले तर ..या शक्तीला सहकार्य करत नक्कीच आनंदीपणे जगणे अधिक सोपे होते ..

आजच्या समूह उपचारात सरांनी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या तिसऱ्या पायरीवर चर्चा करण्यास सुरवात केली ..तिसऱ्या पायरीत म्हंटले आहे की.. ' आम्ही आमच्या इच्छा व जिवन आम्हास समजलेल्या ..उमगलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला ' ..ही पायरी वाचून सरांनी एक प्रश्न विचारला ..' आपल्या पैकी कोणा कोणाला स्वताचे जिवन हे आपण स्वतः निर्माण केले आहे असे वाटते ? त्या लोकांनी हात वर करावा ' ..कालच दुसऱ्या पायरीबद्दल समर्पक चर्चा झालेली असल्याने कोणीच हात वर केला नाही ..सगळ्यांना किमान आपले जिवन आपण स्वतःनिर्माण केलेले नाहीय हे समजले असावे बहुतेक ..सर हसले ..छान ..म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे ..की आपलं जन्म होण्यास ..आपले पालनपोषण होण्यास ..आपले योग्य पद्धतीने शिक्षण होण्यास .. कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत जे आपल्याला मदत करीत गेले ..तरीही जेव्हा पासून आपल्याला समज आली अथवा आपला ' स्व ' म्हणजेच ' मी ' जागृत झाला तेव्हापासून आपण विविध प्रकारच्या इच्छा जोपासण्यास सुरवात केली ..त्या इच्छापूर्तीचा आग्रह धरला ..त्या इच्छापुर्तीतच आपले सुख दडले आहे असा आपला समज होता ..आपले खाणेपिणे ..कपडे घालणे ..मित्र निवडणे ..आवडी निवडी ..अथवा आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवणे ...असे सगळे अधिकार आपण सर्वांनी अगदी नीटच गाजवण्याचा प्रयत्न केला ..जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर कुटुंबीयांनी मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला अथवा त्यांची मर्जी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखे वाटले आपलं ' स्व ' दुखावला गेला ..मग आपण बेदरकारपणे दुरुत्तरे करू लागलो ..घरातील मोठ्या माणसांच्या ..नातलगांच्या सूचनांचा अव्हेर करू लागलो ..आपल्याला अपेक्षित असलेले सुख ..आनंद ..शोधण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग करत गेलो ..एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जगावे असे वाटणे स्वाभाविक आहे.. मात्र आपल्या इच्छा आपल्या भल्याच्या आहेत की नाहीत हे समजण्याची आपली क्षमता नसल्याने .. आपल्या आयुष्यात दुर्दैवाने व्यसनांचा शिरकाव झाला ..तंबाखू ..दारू ..तसेच इतर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये ' अॅडीक्टीव्ह पाॅवर ' म्हणजेच ' सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करून घेण्याची क्षमता ' असल्याने ..नकळत त्या पदार्थांच्या आहारी गेलो ..पाहता पाहता आपण व्यसनाधीनता या गंभीर आजारात अडकलो ..आपल्या अहंकारामुळे आपण यात अडकू शकतो हे आपल्याला समजले नाही ...तसेच अडकल्यावर देखील आपण अडकत चाललो आहोत ..अडकलो आहोत हे आपण हे आपण स्वतःशी मान्य करू शकलो नाही..कोणाची मदत घेण्यास तयार झालो नाही त्यामुळे अधिक अधिक अडकत गेलो ..विविध प्रकारचे नुकसान होत राहिले .. या आजारातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण आता सर्व प्रथम स्वतच्या मर्जीने जिवन जगण्यास मिळावे हा अट्टाहास काही काळ बाजूला ठेवला पाहिजे . 

सर हे सर्व सांगत असताना आम्ही सगळे कान देवून ऐकत होतो ..सरांची व्यवस्थित उलगडून सांगण्याची शैली छानच होती ..पुढे त्यांनी सर्वाना एक प्रश्न विचारला ' जर समजा की तुम्हाला ' मिस्टर इंडिया ' या सिनेमा मध्ये अनिल कपूर सारखे अदृश्य होण्याचे ब्रेसलेट प्राप्त झाले ..तर सर्व प्रथम कोणकोणत्या गोष्टी आपण कराल ? ' प्रश्न जरा गमतीशीरच होता ..आठ दहा जणांनी उत्तरे देण्यासाठी हात वर केले ..शेरकर काकांचा हात देखील वर झाला ..एकेक जण उत्तरे देवू लागला ..सर मी कोणालाही नकळत राष्ट्रपती भवनात जावून फिरून येईल ..मी हॉटेलमध्ये जावून गुपचूप महागडे पदार्थ खावून येईल ..मी ' रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ' मध्ये जावून भरपूर नोटा घेवून येईन ..मी माझ्या शत्रूचा खून करीन ..मी सगळे जग विनातिकीट फिरून येईन ..मी ज्वेलरीच्या दुकानात जावून खूप दागिने आणीन माझ्या पत्नीसाठी ..अश्या प्रकारची उत्तरे सगळे देवू लागले ..शेरकर काका म्हणाले ' मी दारूच्या कारखान्यात जावून विदेशी मद्याच्या खूप बाटल्या आणीन ' सर्व मनापासून हसले ..जणू सर्वांच्या मानतील सामायिक इच्छाच शेरकर काकांनी बोलून दाखवली होती ..

( बाकी पुढील भागात )

ब्लँकआउट !


ब्लँकआउट ! ( बेवड्याची डायरी ..भाग २७ वा )

रात्री नीट झोप झाली नाही ..रात्रीचे जेवून गादीवर पडल्यापडल्या बाजूलाच बसून स्वत:च्या गुडघेदुखीबदल तक्रार सांगत ..स्वत:च्या हाताने गुढघे दाबत बसलेल्या शेरकर काकांची बडबड ऐकत होतो ..सगळे जण झोपेला आलेले ..अकरा वाजता लाईट्स बंद होणार .. तोवर सर्वांची जरा टंगळमंगळ सुरु होती...तितक्यात वार्डचा बाहेरचा दरवाजा उघडून कार्यकर्ते एका धडधाकट व्यक्तीला धरून आत घेवून आले ..तो माणूस मोठमोठ्याने अर्वाच्च शिव्या देत होता ..सगळे धडपडून उठले जागेवरून .. साधारण चाळीशीचा असावा ..अंगावर एक बर्म्युडा होता फक्त ..बाकी वर शर्ट वगैरे काहीच घातलेले नव्हते त .. तब्येत चांगलीच वाटली .. त्याने वार्डमध्ये प्रवेश करताक्षणी दारूचा प्रचंड भपकारा आला ..त्या वासाने कसेतरीच झाले मला ..मळमळल्या सारखे .. त्याला वार्डमध्ये सोडून कार्यकर्ते निघून गेले बाहेर ..तो इकडे तिकडे पिंजऱ्यातील अस्वस्थ वाघासारखा फिरत होता ..मध्येच कोणाला तरी मोठ्याने शिव्या घालत होता ..आम्ही सगळे कुतूहलाने त्याच्या भोवती जमलो ..आमच्या कोणाशीही त्याची ओळख नसतानाही तो सगळे अगदी त्याचे मित्र असल्यासारखा आम्हाला सांगू लागला ' आज सोडलाच नसता त्याला ..वाचला पहा थोडक्यात ..कोथळाच बाहेर काढणार होतो हरामखोराचा ' ..त्याच्या बोलण्यातून आज मरता मरता वाचलेल्या त्या व्यक्तीचे नाव अनिल आहे असे समजले ..हे देखील समजले की अनिल म्हणजे त्याच्या पत्नीचा भावू ..हे महाशय आपल्या साले साहेबांवर खूप संतापलेले होते तर ..त्याच्या मोठमोठ्याने बोलण्यामुळे सर्वांच्या झोपा उडाल्या होत्या ..असा कोणी नवीन वार्डात आला की एकदोन जुने ..पुराने पापी असलेले ..अश्या व्यक्तीची थोडी फिरकी घेतात हे मला माहित होते ..त्या नुसार मस्करी करण्यात हातखंडा असलेल्या शेरकर काकांनी सुरवात केली ..' अरे यार ..चाकूने भोसकणार होते की काय त्या अनिलला तुम्ही ? ..मग मजा नाही ..नुसत्या हाताने एकदोन फाईटी मारून जीव घेतला तर जास्त चांगले असते..चाकूने काय ..कोणीही मरते ..नुसत्या बुक्कीत ठार झाला पाहिजे माणूस .." हे ऐकून तो माणूस जरा भडकला .." तुम्ही समजता काय मला ..नुसत्या बुक्कीत देखील ठार करू शकतो मी ..लाल मातीत खेळलेला आहे ..एकावेळी चार चार जणांना फिरवू शकतो .".असे म्हणत त्याने एकदम पहिलवानी पवित्रा घेतला ..सगळे त्याच्या भोवती गोल करून उभे होते ..त्याने हाताच्या दंडावर ..मांडीवर शड्डू ठोकल्यासारखे केले ..आणि तयार झाला कुस्तीला ..त्याच्या वर्तनावरून समजत होते की त्याला तो नेमका कुठे आहे ..त्याला कुठे आणले आहे हे काहीच भान नव्हते ..तो शड्डू ठोकत शेरकर काकांना आव्हान देवू लागला ..' मला कुस्ती नाही येत ..कराटे येत असेल तुम्हाला तर लढू ' असे म्हणून शेरकर काकांनी त्याला अजून डिवचले ..तो पण लगेच ..तुम क्या समझे मेरेको ...कराटे का ब्लँक बेल्ट हु मै ..असे म्हणाला ..लगेच त्याने हवेत आडवे तिडवे हातवारे करत कराटे खेळण्याचा पवित्र घेतला ..हे त्याचे माकडचाळे पाहून आमची हसून हसून मुरकुंडी वळली ..एव्हाना एका कार्यकर्त्याने त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या ..तो त्या गोळ्या घ्यायला तयार होईना ..मग शेरकर काकांनी त्याला सांगितले " ये गोली लेनेके बादही मै लडूंगा तुमसे " ही मात्र लागू पडली ..' गोलीसे कौन डरता है..जो डर गया समझो मर गया " असे म्हणत मोठ्या शुराच्या अविर्भावात त्याने गोळी घेतली ..मग सुमारे तासभर शेरकर काका आणि त्याचा कल्ला सुरु होत्या ..हळू हळू गोळीचा परिणाम जाणवू लागला ..त्याच्या हालचाली शिथिल झाल्या . ..बोलता बोलता तो गादीवर आडवा झाला ..चक्क घोरू लागला दहा मिनिटात .. ! 

नंतर कितीतरी वेळ मी त्याच्या या असंबद्ध वर्ताना बद्दल विचार करत होतो ..दारू प्यायल्यावर माझे कधी असे माकड झाले नव्हते ..मला स्थळ ..काळ ..वेळ याचे नेहमीच भान राही ..याचे तर भलतेच होते ..त्याला आपण कुठे आहोत ..आजूबाजूला कोण आहे याचे देखील भान नव्हते ..सकाळी तो माणूस उठल्यावर त्याच्याकडे पहिले तर ..रात्रीची घटना एखादे स्वप्न असावे असे त्याचे वर्तन होते ...सकाळी अनोळखी चेहऱ्याने तो ..मी कुठे आहे ? मला कोणी आणले इथे ? ही कोणती जागा आहे वगैरे विचारात होता आसपासच्या लोकांना ..मी माँनीटरला विचारलेच त्याबद्दल ..तेव्हा त्याने जे सांगितले ते भयावहच होते ..दारू मुळे किवा मादक द्रव्यांमुळे बरेचदा अशी " ब्लँकआउट "ची अवस्था येवू शकते ..या अवस्थेत माणसाच्या मेंदूचे काम सुरु असते ..मात्र ते काम असंबद्ध पद्धतीने सुरु राहते ..आसपासची परिस्थिती ..लोक ..स्थळ ..काळ.. वेळ याचे भान हरपते ..बाकी सर्व अवयव कार्यरत असतात ..परंतु तो त्या अवस्थेत जे जे काही करतो ते त्याच्या स्मरणात अजिबात राहत नाही ..काही जण तर या ब्लँकआउटच्या अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..काही जणांना वस्त्रांचे भान राहत नाही ..किवा लघवी संडास यांचे भान सुटते ..काही जण नुसती रडारड करतात ..सारखे दुखःचे कढ येतात त्यांना ..काही जणांच्या बाबतीत ही अवस्था कमी तीव्रतेची असते ..म्हणजे रात्री आपण घरी कसे आलो हे सकाळी आठवत नाही ..मात्र तो घरी बरोबर आलेला असतो ..किवा रात्री कोणाशी काय बोललो ..शेवटचा पेग कोणत्या ठिकाणी प्यायलो ..आपली गाडी किवा स्कूटर कुठे ठेवली आहे हे सगळे त्याला सकाळी अजिबात आठवत आठवत नाही .. अश्या अवस्थेत तो जे जे वर्तन करतो ते त्याला सकाळी सांगितले तर तो कानावर हत ठेवतो ..मी असे काही केलेच नाही म्हणतो ..त्याला वाटते हे लोक आपण दारू सोडावी म्हणून उगाच भलते सलते आरोप करत आहेत आपल्यावर ..माँनीटर सांगत असलेली माहिती मला तंतोतंत पटली..मला देखील अनेकदा सकाळी रात्री काय काय घडले याचा तपशील काही केल्या आठवत नसे ..अनेकदा तर मी उठल्या उठल्या आपण स्कूटर बरोबर घरी आणली नाही नाही हे आठवत नसे ..मग आधी बाल्कनीत जावून मी स्कूटर जागेवर आहे किवा नाही हे तपासत असे..काही वेळा रात्री मी अलकाशी खूप भांडण केलेले असे ...रागाच्या भरात जेवणाचे ताट भिरकावलेले असे ..मात्र सकाळी अलका जेव्हा मला हे सांगे तेव्हा मला ते अजिबात आठवत नसे ..अलका उगाच काहीतरी तिखटमीठ लावून सांगतेय किवा मला घाबरवण्यासाठी बोलतेय असे वाटे .

परंतु ही अवस्था खूप प्यायल्याने येत असेल ना ? असे मी माँँनीटरला विचारले .. तेव्हा त्याने दिलेले उत्तर मला चिंतेत टाकणारे होते ..खूप प्यायले तरच किवा हलक्या दर्जाची दारू घेतली तरच असे होते असे अजिबात नाही ..हे प्रत्येकाच्या बाबतीत केव्हाही घडू शकते ..आपलं मेंदू काही वेळा दारूबाबत खूप संवेदनशील असतो ..प्रत्येक वेळी असे होतेच असे नाही ..मात्र केव्हाही हे होऊ शकते हेच खरे आहे ..काही वेळा एकदोन पेग नंतर देखील मेंदू जास्त उत्तेजित होऊन ही अवस्था येते ..तर काहीवेळा एकदोन क्वार्टर पिवून देखिल असले काहीच होत नाही ..शेवटी त्या वेळी त्याचा मेंदू दारूबाबत किती संवेदनशील आहे त्यावर ही अवस्था अवलंबून असते ..आणि मेंदूची संवेदनशीलता अनेकदा आपल्या भावनिक स्थितीवर अवलंबून असते ..त्यामुळे आपल्या बाबतीत असे कधीच होऊ शकणार नाही हे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे ..!

( बाकी पुढील भागात )

मानसोपचार तज्ञांची भेट !


मानसोपचार तज्ञांची भेट !  ( बेवड्याची डायरी -भाग २६ वा )

मला आता येथील वास्तव्यात आठवडा होत आला होता ..बहुतेक येथील सर्वांशी ओळखी झालेल्या होत्या ..केवळ दारूचेच व्यसनी नव्हे तर इथे निरनिराळी इतर व्यसने करणारे देखील लोक दिसले ..त्यापैकी काही व्यसनांची तर नावे देखील मी प्रथमतः ऐकली होती ..' व्हाईटनर ' .सुंघणारे...तसेच ' फोर्टविन ' व वेदनाशामक इंजेक्शने घेणारे ..एकाच्या तर दोन्ही हातावर खूप जखमा आढळल्या ..मी त्याला त्या जखमांचे कारण विचारले तर त्याने सांगितले की मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात हे लागले आहे ..जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत ..माझा यावर विश्वास बसत होता ..त्याच वेळी तेथे आलेल्या माँनिटरने मला माहिती पुरवली की हा खोटे बोलतोय ..या जखमा अपघाताने नव्हे तर इंजेक्शन घेताना त्याची सुई वारंवार ' आउट ' गेल्याने झालेल्या आहेत ..हा जे वेदनाशामक इंजेक्शन नशा म्हणून वापरतो ..त्याचे मिश्रण सिरींजमधून हाताच्या शिरेत घेताना ..घाईघाईत किवां शिरेचा योग्य अंदाज न आल्याने अनेकदा सुई प्रत्यक्ष शिरेत न जाता शिरेच्या बाजूला त्वचेच्या खाली खुपसली जाऊन ..तेथे याने सिरींज द्वारे सोडलेल्या मादक द्रव्याचा साठा होऊन गाठ तयार होते ..नंतर ती गाठ फुटून जखमा तयार होतात ...ज्या लवकर भरत नाहीत ..कारण याचे सतत अशी इंजेक्शने घेणे सुरु असते ..तसेच त्या जखमा बऱ्या होण्यासाठी योग्य पथ्ये देखील पाळली जात नाहीत ..काही वेळा शीर लवकर सापडत नाही ..तोवर हे लोक शीर सापडेपर्यंत सारखी सुई त्वचेत खुपसत राहतात ..त्यामुळे देखील अशा जखमा होतात ..हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला ..भयानकच होते हे ..मला तर साधे आजारी असताना देखील इंजेक्शन घेण्याची भीती वाटते ..इथे तर स्वतच्या नशेसाठी वारंवार सुई टोचून घेतली जात होती ..माँनीटरने पुढे सांगितले की ..जेव्हा वारंवार इंजेक्शन घेवून हातांच्या शिरा निकामी होतात तेव्हा मग पायांच्या शिरांचा देखोल वापर केला जातो ..पुढे त्या देखील निकामी होत जातात ..मग पोटातल्या शिरेत ..डोळ्याखालच्या शिरेत ..अगदी शेवटी शेवटी तर लिंगावरील शिरेत देखील हे मादक द्रव्य टोचून घेतले जाते ..माँनीटर हे सगळे सांगत असताना तो निर्लज्जपणे सगळे ऐकत मान डोलवत होता ..अजून माहिती म्हणून मी माँनीटरला ' व्हाईटनर ' बद्दल विचारले ..आपण ' इरेजर ' म्हणून जे कोरेस कंपनीचे ' व्हाईटनर ' वापरतो ..त्यात दोन बाटल्या असतात ...एका बाटलीत पांढऱ्या रंगाचा घट्ट द्राव असतो ..तर दुसऱ्या बाटलीत तो घट्ट द्राव प्रवाही करण्यासाठी ' थिनर ' असते ..ते थिनर विशिष्ट प्रकारच्या केमिकल पासून बनवले जाते ..तर ते थिनर एका रुमालात ओतून घेवून ..वारंवार तो रुमाल नाकाशी धरून त्याचा वास घेतले जातो ..त्यामुळे डोके बधीर होऊन ..नाश येते ..याची पुढची पायरी म्हणजे ते थिनर रुमालात न ओतता एका छोट्याच्या प्लास्टिकच्या पिशिवीत ओतून त्या पिशवीत नाक खुपसून दीर्घ श्वास घेत तो दर्प घेतला जातो ..त्या केमिकल मधील विषारी द्रव्ये मेंदूवर परिणाम करून नशा येते ..मला आठवले की वर्तमान पत्रात या बद्दल मी वाचले होते ..त्या ' व्हाईटनर ' वर आता बंदी येवून त्याऐवजी ' पेन इरेजर ' आलेत म्हणून ..मात्र बंदी येवूनही अनेक ठिकाणी हे ' व्हाईटनर ' जास्त किमतीत उपलब्ध होते असे समजले..बहुधा कमी वयाची मुले या व्यसनात अडकतात ...या नशेने वेड लागल्याचे किवा ओव्हरडोस होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे ..असे माँनीटरने सांगितले ..आजकाल शिक्षणासाठी बाहेर गावी होस्टेलवर राहणारे विद्यार्थी ..अगदी मुलीही ..तसेच दारूचा तोंडाला वास येतो म्हणून ..वास न येणारी नशा शोधणारे अनेक तरुण अशा प्रकारच्या मादक द्रव्यांच्या आहारी जात असतात ..ज्यात गांजा ..चरस ..अफू ..ब्राऊन शुगर ..व इतर अनेक मादक द्रव्ये येतात ..माँनीटरने व्यवस्थितच माहिती दिली मला .

आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने ...सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले ..माझेही नाव त्यात होते ..मलाही नकार द्यावासा वाटले ..परंतु विचार केला की जर मला मनापासून दारूच्या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर उपलब्ध असलेली सारी मदत घेतलीच पाहिजे ..माझा नंबर आल्यावर मी केबिन मध्ये गेलो ..तरुण हसतमुख मानसोपचार तज्ञांनी मला बसायची खुण करून माझ्या फाईल वर भरलेली माझी माहिती वाचली ..माझा रक्तदाब पहिला ..डोळ्यात टाँर्चचा प्रकाश टाकून डोळ्याच्या बाहुल्या तपासल्या ..मग मला .. किती वर्षांपासून दारू पिता ? ..किती पिता ? ..दारू प्यायल्यावर घरी भांडणे ...शिवीगाळ ..मारपीट होते का ? दारू खेरीज अन्य मादक पदार्थ घेता का ?असे प्रश्न विचारले ..मी उत्तरे देत गेलो ..मग सध्या झोप शांत येते का ? ..स्वप्ने पडतात का ? ..कानात काही आवाज येतात का ? भविष्यकाळाची खूप चिंता वाटते का ? ..पत्नीच्या वागण्याचा काही संशय येतो का ? कोणी तुमच्याशी अदृश्य पणे बोलते आहे असे वाटते का कधी ? ..खूप राग येतो का ? निराश वाटते का ? असे वेगवेगळे प्रश्न विचारले ..मी जमेल तशी उत्तरे दिली ...त्यांनी फाईल वर काहीतरी लिहले ..म्हणाले बरे झाले तुम्ही लवकर उपचारांना आलात ..तुम्ही दिलेल्या उत्तरावरून अजून तरी तुमचे गंभीर प्रकारची मानसिक नुकसान झालेय असे वाटत नाही ..अर्थात तुम्ही खरी उत्तरे दिली असतील तर ..डॉक्टरशी खरे बोलावे नेहमी ..कारण त्यामुळेच तो आपल्याला योग्य ती मदत करू शकेल ..तुम्हाला मी तुमची अवस्थता तसेच भाविनिक चंचलता किवा भावनिक तीव्रता कमी करण्यासाठी एक गोळी लिहून देतोय ..ती सध्या घ्या नियमित ..मग तुमच्या डिसचार्ज नंतर ठरवू गोळी बंद करायची की नाही ते ..

मी मानसोपचार तज्ञांना भेटून बाहेर पडताच ..बाहेर नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या काहींनी मला घेरले ..काय म्हणाले ? काय विचारतात ? असे प्रश्न विचारू लागले . ..जसे नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी आत जाऊन बाहेर आलेल्या उमेदवाराला बाकीचे उमेदवार.. काय काय ? विचारले ते माहित करून घेतात तसेच होते ..खरे तर मानसोपचार तज्ञ जे जे विचारतात त्यांची खरी उत्तरे द्यायची मानसिक तयारी असेल तर ..आधी सराव करून जाण्याची गरजच नाही ..प्रत्येकाची विचार करण्याची ..वागण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ..त्यानुसार त्यात काही वावगे आढळले तरच मानसोपचार तज्ञ गोळ्या देणार असतात ...बाहेर रांगेत बसलेल्या लोकांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून मला हसू येत होते .

( बाकी पुढील भागात )

Saturday, April 12, 2014

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !( बेवड्याची डायरी - भाग २५ वा )
ईश्वरी शक्तीबद्दल सांगताना सरांनी एखाद्या विशिष्ट धर्माच्या ..विशिष्ट पंथाच्या ईश्वराचा उल्लेख न करता प्रत्यक्ष सृष्टीला ..निसर्गाला ..निसर्ग नियमांना ईश्वर समजणे ..हेच ईश्वराच्या सर्व व्यापकतेला धरून आहे हे स्पष्ट करत आज ..हा सर्व व्यापक ..सर्वसमावेशक ईश्वर प्रत्येकाच्या जीवनात कशा रीतीने कार्यरत आहे हे सांगितले ..प्रत्येक जीवाचा जन्म निसर्गनियमांना अनुसरूनच होत असतो .. मानवाच्या बाबतीत जन्मानंतर त्या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी घेणारे त्याचे आई -वडील .. त्याचे या जगात प्रवेश केल्यानंतरचे प्रथम ईश्वर मानले पाहिजेत .. नंतर त्याची भावंडे ..जी त्याला प्रेम देतात ..खेळण्यात सवंगडी म्हणून त्याच्या सोबत असतात ..जी त्याच्या दुखल्या दुखल्या खुपल्याला त्याला मदत करतात ..आधार देतात ..मग त्याच्या आयुष्यात येणारे त्याचे गुरुजन.. जे त्याला स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे ज्ञान देतात ..मोठा झाल्यावर त्याची पत्नी ..जी आई प्रमाणेच त्याची काळजी घेते ..त्याला प्रेम देते ..त्याचे जीवन आनंदी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते ....शेवटी माणूस म्हातारा झाला की त्याला आधार देणारी त्याची मुले ही देखील ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होतात ..सर्वात शेवटी हा संपूर्ण समाज येतो ईश्वराच्या व्याख्येत ..आपले मित्र ..शुभचिंतक ..स्नेही ..जे जे लोक आपण व्यसनमुक्त व्हावे म्हणून इच्छा ठेवतात ते सगळे या व्याख्येत येतील ..परस्परांना आनंदाने जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी समाजातील प्रत्येक घटक मदत करत करत असतो ..अश्या पद्धतीने जर आपण ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ..ईश्वराला समजून घ्यायला कुठे दूर जाण्याची गरज नाही हे स्पष्ट करत सर म्हणाले की .आपल्या व्यसन करण्याला यातील बहुतेक लोकांनी विरोध केला तरीही आपण व्यसन करत राहिलो याचे प्रमुख कारण की या लोकांना आपण ईश्वर मानले नाही ..हे लोक आपल्या भल्याचे सांगतात हे समजून न घेता ..केवळ मला विरोध करतात म्हणून त्यांना शत्रूच्या यादीत टाकले होते आपण ..सर नीट उलगडून सांगत गेले तसे मला थोडेफार समजत गेले .. जर आपण निसर्गनियम ..आपले नातलग ..स्नेही ..शुभचिंतक ..कौटुंबिक नियम ..सामाजिक नियम ..व्यवस्थित समजून घेतले तर ईश्वर समजण्यास सोपा जाईल ..ईश्वर प्रत्येक जीवात आहे ..प्रत्येक प्राण्यात आहे ..त्यामुळे अदृश्य अशा ईश्वराची पूजा करून ...त्याला प्रसन्न करून घेवून ..नवस बोलून ..आपल्या आयुष्यात काहीतरी चत्मकार होईल अशी वाट पाहत बसण्यापेक्षा ..आपण जर आपले जीवन आहे तसे स्वीकारून ..ते अधिक समृद्ध ..आनंदी ..करण्यासाठी या ईश्वराची सकारात्मक मदत घेत गेलो तर नक्कीच व्यसनमुक्त राहता येईल ...
सर्वात शेवटी त्यांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसला अभिप्रेत असलेल्या उच्चशक्तीची किवा प्रार्थनेत उल्लेखलेल्या ' गाँड ' या शब्दाची व्याख्या सांगितली ..G-म्हणजे good , O -म्हणजे orderly .आणि D - म्हणजे director ...हे सांगत ..याचा संपूर्ण शब्द होतो ..' गुड ऑर्डरली डायरेक्टर ' ...आपले जीवन चांगले यशस्वीपणे ..समर्थपणे ...धैर्याने ..जगण्यासाठी दिशादर्शन किवा दिग्दर्शन करणारी कोणतीही व्यक्ती ..तत्व ..नियम ..विचारधारा ..या सर्वांचा या ' गाँड ' मध्ये समावेश होतो असे सांगितले ..एकदा आपण आपले स्वता:चे जीवन ..केवळ स्वतच्या इच्छाशक्तीच्या बळावर ..बुद्धीच्या बळावर ..आर्थिकतेच्या बळावर यशस्वीपणे जगू शकत नाहीय हे मान्य केले की मगच आपल्याला या ईश्वरी शक्तीची मदत घेण्याची मानसिक तयारी करता येते ..या ईश्वरी तत्वाला समजून घेवून त्याच्या अनुषंगाने जीवन जगण्यास प्रेरणा मिळू शकते ..सरांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यावर कोणाला काही प्रश्न आहेत का असे विचारले ..आम्ही सगळे अंतर्मुख झालो होतो ..काय विचारावे याचा विचार करत होतो ..एकाने विचारले " सर ..मग निसर्गानेच अनेक प्रकारच्या मादक वनस्पती निर्माण केल्या आहेत .ज्या पासून गांजा ..भांग ..अफू ..कोकेन असे मादक पदार्थ निर्माण होतात ..तसेच ज्यापासून दारू तयार होते ते पदार्थ पण निसर्गानेच निर्माण केले आहेत ..त्यांना पण ईश्वर समजायचे का ? " ..त्याच्या प्रश्नाने सर्व हसू लागले ..अतिशय चाणाक्षपणे त्याने हा प्रश्न विचारला होता ..सरांनी लगेच उत्तर दिले " तू नावे घेतलेल्या सर्व वनस्पती निसर्गाने निर्माण केल्या आहेत हे एकदम बरोबर आहे ..मात्र निसर्गाचा यात मानवाला मदत व्हावी हाच हेतू होता ..या सर्व वनस्पती आयुर्वेदात किवा अँलोपथीमध्ये विशिष्ट प्रकारच्या आजारात औषधी म्हणून वापरल्या जातात... विशिष्ट मानवी आजार बरे करण्यास हातभर लावतात ..या वनस्पितींचा वापर आपण एखाद्या आजारासाठी अथवा आजार बरा होण्यासाठी न करता ..नशेसाठी ..कल्पनेच्या जगात जाण्यासाठी ..कृत्रिम आनंद मिळवण्यासाठी करत गेलो तर नक्कीच या आरोग्याला हानिकारक ठरतात ..दारूचेही तसेच आहे ..काही प्रकारच्या औषधांमध्ये अल्कोहोल अगदी सौम्य प्रमाणात वापरले जाते ..मात्र दारुड्याने आजार नसताना देखील याचा वापर सुरु केला ..हे स्वैर इछेचे लक्षण आहे ..आता तर आपण या औषधांचा इतका गैरवापर केलंय की ती औषधे वारंवार घेणे हाच आजार जडला आहे आपल्याला ..त्यामुळे यापुढे एकदाही अश्या मादक औषधांचे सेवन न करणे हेच पथ्य आपल्याला पाळायला हवे " सरांच्या उत्तराने त्याचे समाधान झाले ..
समूह उपचार संपल्यावर मी वार्डच्या बाजूच्या केबिनमध्ये असलेल्या वाचनालयात गेलो ..सरांनी उल्लेख केलेल्या अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची पुस्तके एकदा वाचावी असे मनात होते..लायब्ररीत चार पाच कपाटे होती..ज्यावर ..अध्यात्म ..आरोग्य ...आत्मचरित्र ..कादंबरी ..धार्मिक.. अशी लेबले लावलेली दिसली .. बरीच पुस्तके होती तर इथे ..मला वाचनाची आवड असल्याने बराच वेळ पुस्तके पाहत वेळ घालवला ..चला लायब्ररीमुळे माझा फावला वेळ चांगला जाणार होता ..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ' माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधन विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ' असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
( बाकी पुढील भागात )

डोक्याला खुराक ..विचारांना चालना !


डोक्याला खुराक ..विचारांना चालना ! ( बेवड्याची डायरी - भाग २४ वा )

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता ..मला मिळालेल्या २०० पानी वहीवर ...दोन दिवसांपूर्वीच मी नाव टाकून ..एका प्रश्नाचे उत्तर त्यात लिहिले होते ..ते पुन्हा एकदा वाचले ..अक्षर खूप वाईट आलेले होते माझे ..आज लिहायला सुरवात करण्यापूर्वी मनात प्रश्न आला की डायरी लिहिणे येथे सक्तीचे का असावे ? ...लगेच मी माँनीटरला याबाबत विचारलेच ..तो हसून म्हणाला ..जवळ जवळ येथे दाखल होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतोच ..कारण बहुधा सर्व व्यसनी लोकांना लिहायचा कंटाळा असतो ..तसेच स्वतःबद्दल काही खाजगी लिहायचे म्हंटले की माणसाच्या अजूनच जीवावर येते ..डायरी लिहिणे किवा दैनंदिनी लिहिणे हे खरे तर एक मानसिक उपचारच असतो ..बोलताना माणूस काहीही बोलून जाऊ शकतो ..नंतर ते नाकारूही शकतो ..पण लेखनाचे तसे नाही ..लिहिताना विचार करून लिहावे लागते ..आपल्या मनातील गोष्टी सुसंगतपणे कागदावर उतरवणे ही एक मानसिक शिस्त आहे ..तुम्ही त्यामुळे सुसंगत विचार करू शकता ..बोललेले लक्षात राहीलच याची खात्री नसते ..परंतु लिहिलेले सगळे तुम्हाला आठवण करून देण्यास पुरावा असतो ..शिवाय तुम्ही सर्व येथे काय शिकले ते बाहेर गेल्यावरही तुम्हाला वाचता येईल डायरी लिहिल्यामुळे ..जेव्हा जेव्हा व्यसनाची आठवण येईल ..खूप निराश ..अस्वस्थ वाटेल..तेव्हा तेव्हा इथे लिहिलेली डायरी उघडून वाचलीत तर येथे शिकलेले सगळे तुम्हाला व्यसनमुक्ती टिकवण्यास तसेच नव्या जोमाने जीवन जगण्यास मदत करू शकेल .. मी आजूबाजूला पहिले तर बहुतेक सगळे जण डायरी लिहायला बसलेले होते ..गम्मत वाटली ती त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ..अगदी कष्टप्रद चेहऱ्याने ..नाईलाजाने हे सगळे लिहायला बसले होते हे उघड दिसत होते ..शेरकर काका उगाचच इतरांच्या वहीत डोकावत फिरत होते ..त्यांनी वहीत डोकावताच ते ज्याच्या वहीत डोकावले ती व्यक्ती ताबडतोब वही मिटून टाकत असे ..ते पाहून माँनीटरने शेरकर काकांना टोमणा मारला " काका ..आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून .. हे बंद करा आता ..तुम्ही पण लिहायला बसा " असे म्हणत त्यानाही लिहायला बसवले ..

मी लिहायला दिलेला प्रश्न पुन्हा पहिला .. ' आपण निसर्ग नियमांचे पालन करण्यात कोठे चूक केलीय असे आपणास वाटते ? '.. डोक्याला ताण देवून विचार करायला हवा होता ..सरांनी जे निसर्गनियम सांगितले होते ..त्याबाबतच लिहावे लागणार होते ..मला आठवले ..निसर्गनियमानुसार ..अन्न ..वस्त्र ..निवारा या मानवाच्या मूळ किवा प्राथमिक गरजा असतात ..त्यात मी दारू जोडली होती ही चूकच होती माझी ..दारू ही मानवी शरीरची गरज नसतानाही मी तिला गरज बनवले होते ..सुरवातीला आनंद ..मौज ..अशी कारणे देत व नंतर दुखः ..तणाव ..राग ..निराशा ..या वेगवेगळ्या कारणांनी मी दारूच्या आहारी जावून तिला जीवनावश्यक गरज बनवले ..पुढे पुढे तर ' अन्न ' ही गरज दारूमुळे संम्पुष्टात येवू लागली होती दारूमुळे ..मी पटापट लिहू लागलो ..निसर्गनियमानुसार दुखः -आनंद ..मिलन - विरह .हे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या कालखंडात येत असते ..ते न स्वीकारता मी मला फक्त आनंदच मिळाला पाहिजे या अट्टाहासाने जगत राहिलो ..मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे मला जमलेच नाही .. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीने घडली पाहिजे या विचाराने मी सतत निराश ..वैफल्यग्रस्त होत गेलो ..जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले तेव्हा तेव्हा दारू पिवून स्वतचे खोटे समाधान करून घेतले ..माझे दारू सेवन करणे ही एक प्रकारची बंडखोरीच होती माझी ..निसर्गात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळेल हे लक्षात घेता मी बेबंद पणे ..बेदरकर पणे दारू पीत राहिलो ..माझे काहीच नुकसान होणार नाही या भ्रमात ..आणि हळू हळू ..शारीरिक ..मानसिक ..आर्थिक ..कौटुंबिक व सामाजिक पातळी वर माझे नुकसान होत गेले तेव्हा आपण करत असलेल्या क्रियेची ही प्रतिक्रिया आहे हे न समजता ..सर्वाना दोष देत गेलो ..भांडत गेलो इतरांशी ..शेवटी शेवटी तर जगात सर्वात जास्त दुखः माझ्याच वाट्याला आलेय ..मी कमनशिबी आहे ..माझ्यावर अन्याय होतोय या भावनेत गुरफटलो ..सतत नशिबाला दोष देत गेलो आणि दारू पीत राहिलो ..माझ्या जीवनातील अडचणी ..समस्या ..तणाव ...हे आव्हान म्हणून स्वीकारून त्यावर मला मात करता आली असती ..मात्र तसे न करता मी दारूचा आधार घेतला ..

एकदा लिहायला सुरवात केली तसे तसे मला पटापट सुचत गेले ..शेवटी लिहिले की निसर्गनियमानुसार जगणे मला मान्य नव्हते ..आयुष्यातील प्रत्येक घटना माझ्या मनासारखी घडली पाहिजे असे मला वाटे ..म्हणूनच मला वारंवार निराश व्हावे लागले.. समर्थ रामदासांनी म्हंटले आहेच ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ..विचारे मना तूच शोधून पाहे ' त्या नुसार जगात प्रत्येकच्या वाट्याला कोणते तरी दुखः आहेच ..तसेच कोणते तरी सुखही आहे ..मी मला मिळणारे सुख लक्षात न घेते दुखा:चा बागुलबुवा बनवून ..दारूचे कृत्रिम सुख मिळवत गेलो ..परिणामी अधिक अधिक दुखी: झालो ..दारू पिणे किवा व्यसन करणे हा जर दुखा:वर उपाय असता ..तर मग सर्वानीच दारू प्यायला हवी होती ..कारण सर्वांच्याच वाट्याला समस्या आणि दुखे: आहेत..सुमारे अर्धा तास कसा उलटून गेला लिहिण्यात ते समजलेच नाही .. अगदी शेवटी लिहिले कि या पुढे जीवनातील समस्या ..संकटे ..अडचणी यांचे आव्हान स्वीकारायला मला शिकले पाहिजे ..तसेच माझ्या प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया मला निसर्गाकडून मिळणार आहे हे लक्षात ठेवून या पुढे प्रत्येक कृती करताना ती सकारात्मक असली पाहिजे याचे भान ठेवणे मला आवश्यक आहे ..म्हणजेच आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे या विश्वासाने कोणतेही कर्म करताना नीट विचार करूनच वागावे लागेल मला ..एकदाचे लिहून झाले तसे एकदम सुटल्या सारखे वाटले ..माझ्या बाजूलाच शेरकर काका बसले होते लिहित ..मी गमतीने त्याच्या वहीत डोकावलो ..त्यांनी पटकन वही बंद केली .

( बाकी पुढील भागात )

Monday, April 7, 2014

ईश्वरी संकल्पना ....उच्चशक्ती !


ईश्वरी संकल्पना ....उच्चशक्ती !(बेवड्याची डायरी - भाग २३ वा )

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे चमत्कार घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला...पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे ..तसेच प्रत्येक धर्माने त्या स्वामीला अथवा ईश्वराला प्रसन्न करण्याचे ..त्याची पूजा अर्चा करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत ..तो एकच आहे ..त्याला मानवानी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहून धर्मात ..पंथात वाटला आहे ...असेही म्हंटले जाते..गोंधळ हा असतो की ज्याला कोणी प्रत्यक्ष पहिला नाहीय ..तरीही ' तो ' आहे ..त्याचे अस्तित्व आहे हे मानले जाते ..अशा या परमेश्वराला जाणून घेणे म्हणजे एक कसरतच आहे ...या ईश्वराची साकार सगुण आणि निराकार निर्गुण अशी दोन रूपे हिंदुत्वात मांडली गेली आहेत ..आपण खूप खोलात न जाता किवा या कल्पनेचा कीस न काढता सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने हे समजून घेतले पाहिजे ..त्यासाठी जर शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर केला तर धार्मिक वाद न उदभवता किवा ईश्वर आहे किवा नाही हा वाद न घालता आपल्याला कोणीतरी उच्च्शक्ती या सृष्टीत कार्यरत आहे ..नियमबद्ध सुसूत्र पद्धतीने त्याचे कार्य चालते ..तसेच आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणारे त्या शक्तीचे नियम आपण समजून घेवू शकू ..या शक्तीला आपण निसर्ग असे म्हणूयात ..निसर्ग म्हंटले की देव ..अल्लाह ..गाँड ...असे सगळेच यात येतात .. या निसर्गाचे नियम आपण समजावून घेतले... स्विकारले नक्कीच निसर्गाच्या मदतीने आपल्याला आपले जीवन व्यसनमुक्तीकडे ..शांती ..समाधान ..प्रसन्नतेकडे सहजतेने नेता येईल ..यालाच उच्चशक्तीची मदत घेणे म्हणता येईल ..असे सांगत सरांनी निसर्गनियमांचे पालन ..त्यांची अपरिहार्यता ..याबद्दल ..सांगण्यास सुरवात केली .

१ ) सृष्टीची निर्मिती झाल्यावर सर्व जीव सृष्टी निर्माण होण्यास होण्यास पृथ्वी ..अग्नी ..जल... वायू ..आकाश ही पंचमहाभूते कारणीभूत आहेत हे शास्त्राला मान्य आहे ..चल..अचल , सजीव -निर्जीव , अशा सर्व घटकांच्या निर्मितीला ही पंच महाभूते जवाबदार आहेत ..आपले शरीर देखील याच घटकांनी बनलेले आहे ..या पंच तत्वांचे प्रमाण शरीरात विशिष्ट असे आहे ..जेव्हा जेव्हा ते प्रमाण कमी जास्त होते तेव्हा ..आजार निर्माण होतात ..

२) जन्म - मृत्यू , भरती- ओहोटी , दिवस- रात्र , अपघात ..नैसर्गिक आपत्ती ..हे निसर्ग नियम आहेत ..तसेच सुख -दुखः , मिलन - विरह , बालपण ..तारुण्य ..प्रौढावस्था ..जरा ..व्याधी ..मृत्यू या अवस्था देखील या निसर्गनियमांवर आधारित आहेत ...मानव जेव्हा जेव्हा या नियमांना नाकारतो ..हे नियम समजून घेत नाही ..पालन करत नाही ..या नियमांना आव्हान देतो ..तेव्हा तेव्हा त्याला संकटांचा सामना करावा लागतो .

३) इतर प्राणी आणि मानव यातील प्रमुख फरक हा आहे की निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा कुशाग्र अशा बुद्धीचे वरदान दिले आहे तसेच त्या बुद्धीचा वापर करून जीवन अधिक सुखकर ..आरामदायी करण्यासाठी ..चातुर्य ..आकलन क्षमता ..योग्य असे उपयुक्त अवयव दिले आहेत .परंतु मानवाने त्याच्या निसर्गदत्त अशा काम ..क्रोध ..लोभ ..मद ..मोह ..मत्सर या विकारांमुळे स्वतच्या अहंकाराला खतपाणी घालून सारी सुखे मिळावी या अट्टाहासाने बुद्धीचा गैरवापर करून स्वतःसाठी आणि सर्व सृष्टीसाठी अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत .

४) या सृष्टीत ' आपोआप ' असे काहीच घडत नाही तर प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो ..म्हणजेच न्यूटनच्या क्रिया - प्रतिक्रिया या सिद्धांतानुसार हे कार्य चालते ...आपल्या प्रत्येक कृतीची काहीतरी प्रतिक्रिया निसर्गात निर्माण होत असते ..जर योग्य कृती असेल तर योग्य अशी प्रतिक्रिया मिळते ..विपरीत कृती करणाऱ्यांना विपरीत प्रतिक्रिया मिळते या प्रतिक्रिया भावनिक अथवा भौतिक असू शकतात .. ..राग.. द्वेष...प्रेम ..स्नेह ..जिव्हाळा ..या प्रकारच्या सकारात्मक किवा नकारात्मक भावना देखील प्रतिक्रिया निर्माण करतात ... ' कर्म आणि त्याचे फळ ' याच प्रकारचा सिद्धांत आहे हा ..फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की काही क्रीयांना ताबडतोब प्रतिक्रिया मिळते ..तर काही किर्यांचे फळ निर्माण होण्यास वेळ लागतो ..मात्र प्रतिक्रया अथवा फळ मिळणार हे नक्की ...आपण व्यसन करायला सुरवात केल्यावर ताबडतोब त्या विपरीत कृतीचे फळ आपल्याला मिळाले नाही ..तर कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होत गेले ..ग्लोबल वाँर्मिंग हे देखील मानवाने निसर्गनियम समजून न घेता स्वैर वर्तन केल्याचेच कालांतराने मिळणारे फळ आहे ..किवा एखादे फळ झाड आपण लावले कि जसे ताबडतोब त्याला फळे येत नाहीत ..त्याप्रमाणे चांगल्या कर्माचे फळ मिळण्यास देखील अवधी द्यावा लागतो .

५) या निसर्ग नियमांना कोणीही अपवाद नाहीय ..जेव्हा जेव्हा निसर्गनियम मोडले जातील ..नाकारले जातील ..पायदळी तुडवले जातील ..तेव्हा तेव्हा मानवाला दुखां:चा सामना करावाच लागेल ..म्हणून या निसर्ग नियमांना स्वीकारून ..योग्य प्रकारे समजून घेवून आपण स्वत:चे जीवन अधिक सुखी करू शकतो .

हे नियम सांगत सरांनी आता आपल्या व्यसनाधीनतेशी किवा व्यसनमुक्तीशी या नियमांचा कसा संबंध येतो ते उद्या सांगतो असे म्हणून समूह उपचार थांबवला ..आम्हाला सर्वाना डायरीत लिहायला एक प्रश्न दिला ' आपण निसर्गनियमांचे पालन करण्यात कोठे कोठे चूक केली असे असे आपल्याला वाटते ? '..सगळे जरा अवघडच वाटले मला ..पण थोडा थोडा उजेड पडत होता .

( बाकी पुढील भागात )

मदत मागणे ..मदत घेणे !


मदत मागणे ..मदत घेणे ! ( बेवड्याची डायरी - भाग २२ वा )

आज सकाळी मला अगदी प्रसन्नपणे जाग आली ..बहुतेक शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा ..उठल्याबरोबर अगदी फ्रेश वाटत होते ..शांत झोप झाल्याचेच हे लक्षण ..दारूच्या नशेत झोपल्यावर सकाळी उठतांना खूप जीवावर येई ..अंग जड पडलेले ..चुरचुरणारे डोळे ..डोके सुन्न ..अशी अवस्था असे ..शिवाय उठल्या बरोबर आज दारूचा बंदोबस्त कसा होईल ..पैसे कोठून आणायचे ..काल रात्री नशेत अलकाशी केलेलं भांडण ..हे सर्व आठवायचे आणि अंथरुणातून उठूच नये असे वाटायचे ..पुन्हा आता उठून कामावर जायचे ..दिवसभर ऑफिसमध्ये मान मोडून काम ...सहकाऱ्यांच्या कुत्सित मुद्रा ..वगैरे सगळे सगळे नकोसे होई ..पटापट तोंड धुवून मी अंघोळ उरकली ..सकाळी सकाळी मी एकदम अंघोळ वगैरे करून पी .टी. ला तयार झाल्यावर शेरकर काकांनी विचारलेच .." विजयभाऊ काय विचार आहे आज ? ..घरी जाणार की काय ? "..त्यांना हसून म्हंटले ' आता काही दिवस हेच घर समजायचे ..इथे सगळे शिकून मगच बाहेर जायचे असे ठरवलेय "..माझ्या उत्तराला त्यांनी हसून टाळी दिली ..वर टोमणा मारला ..म्हणजे कायमचे राहणार की काय इथे ? मी देखील त्यांना टोला दिला " त्यात काय विशेष ? तुम्ही आहातच की सोबतीला " हा टोला त्यांना लागला असावा ..नुसतेच गालातल्या गालात हसत चूप बसले ...

पी.टी आटोपून चहा घेताना ..बाजूला बसलेल्या एकाने त्याच्या लॉकर मधून त्याच्या पत्नीने काल आणलेला चिवडा आणला ..मलाही चिवडा घ्या असा आग्रह करू लागला ..मला आश्चर्य वाटले .. काल याचे पालक भेटायला आल्यावर याने खूप तमाशा केला असे ऐकले होते ..हा म्हणे पत्नी भेटायला आल्यावर सुमारे १० मिनिटे नुसताच तिच्या शेजारी बसून होता ..ती बिचारी बडबड करत होती ..हा घुम्यासारखा बसलेला ..मग म्हणाला ..झाले ना तुझे समाधान ?.. पंधरा दिवस राहीलोय मी इथे .... सगळे शिकलो ..यापुढे दारू पिणार नाही असे वचन देतो तुला ..आता घरी घेवून चल मला..नाहीतर मी कायमचा इथे रहातो ..तू सांभाळ मुले ..माझी नोकरी ..ती हबकलीच बिचारी ...तिला भेटण्या पूर्वी सरांनी कल्पना दिली असावी की ते घरी घेवून चल म्हणून हट्ट करतील ..मात्र अगदी या पातळीवर येऊन धमक्या देतील असे वाटले नसावे तीला..ती रडू लागली ..ते पाहून एका कार्यकर्त्याने याला विचारले देखील काय झाले म्हणून ..तर हा म्हणाला की " ती मला घरी चला म्हणतेय ..आणि मी म्हंटले की अजून काही दिवस रहातो म्हणून तिला वाईट वाटले "..याने कार्यकर्त्याला पाहून एकदम पलटी मारली होती ..शेवटी सर्वाना समजलेच कि हा हट्ट करतोय घरी जाण्याचा ..याला सरांनी समजावले ..मग शांत झाला ..मात्र पत्नीने घरून याच्यासाठी आणलेल्या खाण्याच्या वस्तू घेणे याने नाकारले होते ..सरांनी मग ते पदार्थ ऑफिस मध्ये ठेवून घेतले ..पत्नीची समजूत घालून तिला पाठवले ..नंतर एक तासाने हा ऑफिस मध्ये गेला ..आणि ' सर अहो तिची गम्मत करत होतो मी ' ..असे स्पष्टीकरण देवून ..ते खाण्याचे सामान परत घेवून आला होता ...मी त्याला नम्रपणे नकार देवून ..तेथून उठलो .

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे ..अल्कोहोलिक्स अँँनाँनिमसच्या पहिल्या पायरी मध्ये जसे आपण व्यसनी झाल्याची मनोमन काबुली देणे आणि व्यसनामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतोय हे समजून घेण्यास सांगितले आहे ..तसेच पुढे दुसऱ्या पायरीत म्हंटले आहे " आम्ही या विश्वासाप्रत पोचलो की आमच्याहून उच्च असलेली शक्तीच आम्हाला पुन्हा गमावलेले शहाणपण मिळवून देण्यास मदत करेल " याचा अर्थ स्पष्ट आहे की आपणच जगातील सर्वात शक्तिशाली ..बुद्धिमान ..वगैरे नसून आपली समस्या सोडवण्यासाठी दुसरा कोणीतरी आपल्याला मदत करू शकतो यावर विश्वास ठेवणे होय ..अगदी जन्म झाल्यापासून कोणा ना कोणाच्या मदतीनेच आपण मोठे होत गेले आहोत ..हे सत्य आपण नाकारता कामा नये ..तसेच व्यसना पासून मुक्ती मिळावी यासाठी निसंकोच मदत मागितली पाहिजे ..जसे इतर शारीरिक आजारात आपण डॉक्टर ..औषधे यांची मदत घेतोच ..मग हा तर शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा आजार आहे ..अल्कोहोलिक्स अँनानिमसची किवा व्यसनमुक्ती केंद्राची ..समुपदेशकाची ..कुटुंबियांची व्यसनमुक्तीसाठी मदत घेण्यास कमीपणा वाटून घेवू नये ..

( बाकी पुढील भागात )

Friday, April 4, 2014

पालकांबद्दल कृतज्ञता !


पालकांबद्दल कृतज्ञता ! ( बेवड्याची डायरी -भाग २१ वा )

रविवारी सायंकाळी पालकांना भेटण्याची वेळ असते हे मला माँनीटर कडून समजले ..त्याने मला हे देखील सांगितले की अजून तुम्हाला येथे येवून दहा दिवस पूर्ण झाले नाहीत ..म्हणून तुमच्या घरून कोणी येणार नाहीत ...ज्यांना येथे दाखल होऊन किमान दहा दिवस होऊन गेले आहेत अश्या लोकांनाच पालकांना भेटू देतो आम्ही ..कारण सुरवातीचे दहा दिवस येथल्या दिनक्रमाशी जुळवूनघेण्यात जातात ..जर त्या दहा दिवसात पालकांशी संपर्क झाला तर उपचार घेणारा हमखास पालकांकडे मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करतो ..एक तर त्याच्या मनात व्यसनाची ओढ तीव्र असते ..शिवाय प्रथमच तो कुटुंबीयांपासून दूर राहत असतो ..त्यामुळे पालक दिसताच तो त्यांना घरी घेवून चला म्हणून मागे लागतो .. माझ्या घरून आज कोणी भेटायला येणार नाही हे समजल्यावर मी जरा खट्टू झालो ..खरे तर मी देखील मनात योजले होते की अलका भेटायला आली की आता मला घरी घेवून चल असे म्हणायचे ..इथे जरी चांगले शिकवले जात होते ..व्यसना शिवाय जेवण ..झोप येणे सुरळीत होत होते ..जेवणही चांगले होते ..मनोरंजन होते ..तरीही ..येथून बाहेर पडावे असे विचार मनात येत होते ..भेट नाही पण किमान अलकाला एखादा फोन तरी करावा सरांना सांगून असे मी ठरवले ..आज फक्त सकाळी एक समूह उपचार होणार होता ..बाकी थेरपीजना सुटी होती हे सकाळीच समजले होते ..

समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' कृतज्ञता ' हा विषय चर्चेला घेतला ..कृतज्ञता म्हणजे इतरांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल जाणीव ठेवणे ..त्या मदतीबद्दल ऋणी राहणे ..किवा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ...मदतीचा हात दिला आहे ..आपले जीवन अधिक सुखकर होण्यासाठी शिकवण दिलीय ..आपल्याला सुख मिळावे म्हणून प्रयत्न केले आहेत अश्या सर्व लोकांच्या श्रमांची ..कष्टांची जाण ठेवून ..अशा व्यक्तींना मान देणे ..त्यांच्या भावनांचा सन्मान करणे होय ..सरांनी आधी कृतज्ञतेचा अर्थ उलगडून सांगितला ..माणूस जन्माला आल्यावर त्याला जन्म देणारे ..त्याचे नीट पालन पोषण करणारे आईवडील ...त्याला वेळो वेळी प्रेम देणारी भावंडे ..शाळेत ..कॉलेजात त्याला वेगवेगळे विषय शिकवणारे त्याचे शिक्षक.. त्याला उदरनिर्वाहासाठी नोकरी देणारी व्यवस्था ..लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात येवून त्याचे जीवन अधिक सुखकर व्हावे या साठी झटणारी पत्नी ..त्याला पितृत्वाचा आनंद देणारी मुले ..इतकेच नव्हे तर माणसाने निसर्गाबद्दल ..समाजाबद्दल देखील कृतज्ञ राहिले पाहिजे हे सांगताना सरांनी सुंदर उदाहरण दिले ..ते म्हणाले आज अंगात मी जो शर्ट घातला आहे ..तो तयार होऊन माझ्या पर्यंत पोचविण्यासाठी देखील अनेक लोकांचा हातभार आहे ..आधी शेतकऱ्याने शेतात कापूस पिकवला ..पुढे तो कापूस मिल मध्ये जाऊन त्याचे कापड तयार झाले ..मग माझ्या मापाचा शर्ट शिवून तो दुकानात विक्रीला ठेवला गेला ..मी काही पैसे मोजून तो शर्ट खरेदी केला..मी केवळ काही पैसे मोजून तो खरेदी केला म्हणून शर्ट तयार होण्यासाठी कष्ट घेतलेल्या लोकांची मी किंमत करू नये ही ' कृतघ्नता ' ठरेल. 
मी जिवंत राहावे म्हणून शरीरात घेतला जाणारा प्राणवायू ..मला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी ..पोषणासाठी मी खात असलेले अन्न हे सगळे मी एकटा माझ्या बळावर निर्माण करू शकत नाही .. निसर्ग ..आसपासची माणसे ..एकंदरीत सर्व समाजच एकमेकांसाठी मदत करणारा ठरतो ..म्हणून सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे ..मात्र माणूस अहंकारामुळे अनेकदा मी ' सेल्फमेड ' आहे असे म्हणतो हे किती हास्यास्पद आहे ..मानवी शरीर आणि मन यांना सुख देणारी साऱ्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता बाळगली तरच अहंकार नाहीसा होतो ....परस्परावलंबनाची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात ...ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले.

पुढे त्यांनी विशेष सूचना दिली ..आज ज्या लोकांचे पालक त्यांना भेटायला येतील ..त्यांनी पालकांकडे कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे ..आपण व्यसने करून पालकांना खूप त्रास दिलाय ..पैसे उडवले आहेत ..सर्व कुटुंबियांना आपल्या व्यसनापायी वेठीस धरले होते ..तरीही त्यांनी आपण सुधारावे म्हणून आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून नव्याने जीवन जगण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलीय ..त्यामुळे भेटायला आलेल्या पालकांशी नम्रतेने बोला ..त्यांच्या भावना समजून घ्या ..त्यांना यापुढे व्यसन करणार नाही म्हणून आश्वस्त करा ..जर तुम्ही घरी जाण्याचा हट्ट केलात..,,घरी घेवून चला म्हणून त्यांना ' इमोशनल ब्लँकमेलिंग ' केले....धमक्या दिल्या ..घाबरवले किवा त्यांच्यावर राग व्यक्त केला .. तर नक्कीच त्यांना दुखः होईल ..इतके दिवस व्यसने करून आपण त्यांना दुखः दिलेच आहे ..आता सुधारणेच्या काळात त्यांना आपण सुधारत आहोत असा धीर मिळाला पाहिजे ..ज्यांचे पालक भेटीला येणार नाहीत त्यांनी नाराज न होता पालकांना काहीतरी अडचण असेल असा विचार केला पाहिजे ..असे सांगून सरांनी आम्हाला पालकांच्या भेटीसाठी शुभेच्छा दिल्या !

( बाकी पुढील भागात )

रविवारची सफाई ..टिवल्याबावल्या !


रविवारची सफाई ..टिवल्याबावल्या !( बेवड्याची डायरी -भाग २० वा )

आज रविवार म्हणून सकाळी कोणाला लवकर उठवले गेले नव्हते ..एक तास उशिरा सगळे उठले ..रविवारी पी.टी...आणि इतर थेरेपीजना सुटी असते हे कालच समजले होते मला ..काल रात्री आमच्यासाठी ' डँडी ' या सिनेमाची सीडी लावण्यात आली होती ..एक मध्यमवयीन दारुड्याची कथा छान दाखवली गेली होती ..अनुपम खेर ने दारुड्या व्यक्तीची घालमेल ..दारूची ओढ ..कुटुंबियांचेप्रेम ..या कात्रीत सापडलेली व्यक्तिरेखा छान वठवली होती .. सिनेमा पाहताना अनेकदा मला माझ्या मुलीची आठवण झाली ..वडिलांना सुधारणेसाठी प्रेरणा देणारी ..वडिलांवर खूप प्रेम असलेली तरुण मुलगी पूजा भट्ट ने तंतोतंत साकारली होती ..माझी मुलगी आता सहावीत गेली होती ..तिला नक्कीच दारू वाईट आहे हे समजू लागले असावे ..कारण एरवी माझ्याशी खूप मस्ती करणारी ..बडबड करणारी ..शाळेतल्या गमतीजमती खास मला सांगणारी ..सारखी माझ्या आसपास असणारी स्नेहा आताशा मी पिऊन घरी आलो की माझ्या पासून दूर दूर राही ..चूप चूप असे ..तिच्या चेहऱ्यावरची नाराजी तिला लपवता येत नसे ..हल्ली तिचे आभ्यासातही लक्ष नसते असे अलका म्हणाली होती मला ..एकदा तर अलका म्हणाली ' पोरगी वयात येतेय आता ..तुमच्या अशा वागण्याने ती घरात थांबू इच्छित नसते ..क्लास ..शाळा ..झाली की पूर्वी घरी थांबे ..आता काही ना काही कारण काढून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहण्याचा प्रयत्न असतो तिचा ..पहा ..बर ..पोर भरकटेल उगाच ..घरात जर योग्य प्रेम ..माया ..मिळाली नाही तर मुले ते प्रेम बाहेर शोधतात ' अलकाला मी उडवून लावले होते ..असे काही नसते ..माझ्या दारूचा आणि तिच्या घरी कमी थांबण्याचा उगाच संबंध जोडू नकोस म्हणून चिडलो होतो अलकावर ..सिनेमा पाहताना मला स्नेहाची खूप आठवण झाली ..वाटले आता या पुढे दारूत जाणारा वेळ मुलांमध्ये घालवला पाहिजे ..सिनेमातील एक गाणे मनात ठसले होते ' आईना मुझसे मेरी पहेलीसी सुरत माँगे ' ..मलाही अनेकदा मी स्वतः हरवल्या सारखा होई ..दारू जीवनात आल्यापासून हळू हळू माझे व्यक्तिमत्व बदलत गेले होते यात शंकाच नव्हती ..तसा मी अगदी कुटुंबवत्सल वगैरे वर्गात मोडणारा नव्हतो ..तरीही पत्नी मुलांचे प्रेम ..घरातील भावनिक सुरक्षितता ..वगैरे गोष्टीना प्राधान्य देत असे पूर्वी ..मात्र आताशा सगळेच बदलले होते ..उलट घरात आलो की कटकटींचा सामना करावा लागतो असे वाटे ..मुले पत्नी हे दारूच्या आड येणारे शत्रू वाटू लागले होते ...हे सगळे व्याप पाठीशी नसते तर किती बरे झाले असते असेही वाटे ..

सकाळी प्रार्थना होऊन चहा झाला ..माँनीटरने वार्डची साफसफाई करण्यासाठी तीन गट तयार केले ..एका गटाला .. वार्ड मधील सर्व सामान वार्ड धुण्याच्या वेळी बाजूला उचलून ठेवणे व नंतर वार्ड सफाई झाली की पुन्हा सामान जागेवर ठेवणे ..दुसऱ्या गटाला वार्ड धुण्यासाठी पाणी पुरवणे ..आणि तिसर्या गटाला खराटे घेवून वार्ड साफ करणे अशी कामे दिली गेली .या कामात सुमारे १५ जण लागले ..बाकीचे आम्ही सारे वार्डच्या एका कोपर्यात बसून सफाईची धावपळ पाहत होतो ..चहा घेवून सगळे ताजेतवाने झाल्याने थट्टा मस्करी सुरु होती ...शेरकर काका तर एकदम खुश होते ..थेरेपीजना सुटी असली कि त्यांना फार उत्साह येई ..कारण त्यांचे फिरकी घेण्याचे काम त्यांना करता येई ..अशा वेळी ते एखाद्या वैतागलेल्या व्यक्ती जवळ जाऊन ..तुम्ही घरी कधी जाणार ? नक्की घरचे नेणार का तुम्हाला घरी ? बहुतेक बायको तुम्हाला घटस्फोट देणार असे ऐकलेय ..वगैरे प्रश्न विचारून हैराण करत ..एखाद्याला ते ..कालच तुझ्या घरातील लोक ऑफिस मध्ये येवून तुझे सहा महिन्यांचे पैसे भरून गेलेत असे मला ऑफिसमधून समजले आहे ..आता सहा महिने इथून सुटका नाही असे सांगून त्याचे ब्लडप्रेशर वाढवत.... तर एखाद्याला तुझे डोळे पिवळे दिसतात ..आजकाल तुझे जेवणही कमी झालेय ..काही समस्या आहे का ? बहुतेक कावीळ झाली असेल तुला असे म्हणून त्याला चिंतेत टाकत असत ..सगळी गम्मत चालली होती ..शेरकर काकांनी हैराण केलेले सगळे मग सारखे माँनीटर कडे जावून त्याच्या कडे स्पष्टीकरण मागत असत ..माँनीटर काकांवर चिडला की काका मिस्कील हसून त्याला डोळा मारत ..जरी शेरकर काका अशी मस्करी वगैरे करणारे होते ..तरीही त्यांचे एक वैशिष्ट्य देखील मी पहिले होते ..ते नेहमी इतरांना मदत करत असत ..त्यामुळे त्यांचा कितीही राग आला तरी त्यांच्याशी भांडत नसे कोणी ...साफसफाईचे काम सुरु असताना काकांनी टूम काढली की जे नियमित अंघोळ करत नाहीत त्यांना आज आंघोळ करायला लावायची ..झाले लगेच कोण कोण रोज अंघोळ करत नाहीत याचे संशोधन सुरु केले सर्वांनी ..अतिउत्साही सदस्यांनी चारपाच लोक निवडून काढले जे अंघोळीचा कंटाळा करत असत ..तसेच ..दात घासणे ..दाढी करणे ..स्वतचे कपडे वेळच्या वेळी धुणे वगैरे व्यक्तिगत स्वच्छतेबाबत देखील निष्काळजी होते ..आळशी होते ..त्या चारपाच जणांना मग जबरदस्ती ढकलून अंघोळीला पाठवण्यात येवू लागले ..तीन जण गेले मात्र दोन हट्टी लोक आम्ही नंतर अंघोळ करतो ..आता नाही करणार ..असा वाद घालू लागले ..अगदी हमरातुमरी वर आले होते ते ..

त्यांना अंघोळीला पाठवणे कठीण आहे हे जाणून शेरकर काकांनी गुपचूप जावून दोन बादल्या पाणी भरून आणले ..मग त्यांना काही कारणाने मोकळ्या जागेत बोलावले गेले ..मागून पटकन एकाने पाण्याची बादली त्यांच्या अंगावर टाकली ..ते क्षणभर गोंधळून गेले ..एकदम हक्केबक्के झाले ..मग ओशाळल्या चेहऱ्याने...नाईलाजाने त्यांना बाथरूम मध्ये जावेच लागले ..खराटे घावून वार्डसफाई करणाऱ्या लोकांची देखील काम करताना एकमेकांची मस्करी करणे..अंगावर पाणी उडवणे असे सुरु होते ..वार्डची फारशी धुण्यासाठी त्यावर निरमा पावडर टाकलेली होती ..सगळीकडे निसरडे झालेले ..दोन जण त्यात पाय घसरून पडले ..अर्थात ते सावध असल्याने फारसे लागले नाही ..मात्र सगळे कपडे ओले झालेले ..मग त्यांनीही तेथेच अंगावर अजून दोन बदल्या ओतून घेतल्या ..इतरांच्याही अंगावर पाणी फेकले ..सगळेच ओल्या कपड्यांनी मस्ती करू लागले ..मला या सगळ्याची गम्मत वाटत होती ..दारू पिण्याच्या काळात दुर्मुखलेले ..जीवनाला कंटाळलेले ..सतत चिडचिड करणारे आम्ही दारुडे इथे.. दारू बंद असताना ..जीवनाचा खरा आनंद घेत होतो ..जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालला होता ..सर्व भानगडी पाहून ..खूप दिवसांनंतर मी मनमोकळा हसलो ..अगदी पोट आणि गाल दुखायला लागले हसून हसून ! 

( बाकी पुढील भागात )