हर एक रूह प्यासी ! ( बेवड्याची डायरी - भाग ५२ वा )
मैत्री मध्ये उपचारांना दाखल होईपर्यंत व्यसनाधीनतेचे इतके भयंकर प्रमाण आहे अथवा हा आजार इतका गंभीर आहे याची मला कल्पनाच नव्हती ..इथे दाखल झाल्यानंतर जेव्हा वार्डात फावल्या वेळात मी उपचार घेणाऱ्या इतर मित्रांशी जेव्हा त्याच्या समस्यांबद्दल चर्चा करत असे ..त्यांच्या दारू पिण्याचे ..वारंवार उपचार घेण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला .तेव्हा जाणवले की उपचार घेणाऱ्या बहुतेकांची काही तरी व्यथा आहे ..ही व्यथा इतरांच्या दृष्टीने नसली तरी त्यांच्या दृष्टीने मात्र खूप गंभीर आहे ..आयुष्यात काहीतरी न मिळू शकल्याची टोचणी ..कधीतरी झालेल्या उपेक्षेचा बोचणारा काटा ...जे मिळाले आहे त्यात काहीतरी कमी असल्याची भावना ..जे निसर्गाने हिरावून घेतले आहे त्याबद्दल निसर्गावरचा अथवा नियतीचा रोष ..,,तर काही ठिकाणी सर्व काही असूनही काहीतरी वेगळे हवे असल्याची लालसा ..सर्व व्यवस्थित मिळूनही अंतर्मनातून असणारे असमाधान ..कारण काहीही असो सर्वांनी त्यावरचा शोधलेला उपाय मात्र अधिक जास्त नुकसानदायी होता हे खरे ..परवा एका अजित नावाच्या व्यक्तीशी बोललो ..उच्चशिक्षित असलेला अजित हा दक्षिण भारतीय..लग्न होऊन एक मुलगी झालेली ..छान राजाराणीचा संसार ..मित्रांसोबत कधीकाळी फक्त पार्टीत दारू पिणे ..एरवी सगळे छान .. अचानक पत्नी एका गंभीर आजारात मरण पावली ..हा आघात अजित सहन करू शकला नाही ..त्या नंतर रोज पिणे सुरु झाले ...निसर्गाने किवां देवाने माझ्यावर अन्याय केलाय ही भावना मनात रुजली ..त्यावर उपाय म्हणून बेशुद्ध होईपर्यंत दारू पिणे सुरु झाले ..लहानग्या मुली कडे दुर्लक्ष होऊ लागले ..आधार म्हणून आईवडील याच्या सोबत राहू लागले ..तरी काही फरक नाही ..शेवटी मुलीला आजोळी ठेवण्यात आले ..याने नोकरी सोडली ...घरची परस्थिती सुदैवाने चांगली असल्याने ..खाण्यापिण्याची आबाळ नव्हती ..मात्र याच्या सततच्या पिण्यामुळे म्हातारे आईवडील चिंतीत ..याला दुसरे लग्न करण्याचा सर्वांनी आग्रह केला मात्र हा तयार नाही ..मृत पत्नीच्या स्मृती विसरायला तयार नाही ..सारखे माझ्यावर अन्याय झालाय अशी तक्रार आणि दारू पिणे ..येथे आता सातव्या वेळी उपचारांना आला होता ...उपचारांच्या दरम्यान हा सतत दुर्मुखलेला असे ..त्याच्याशी बोलताना जाणवे की तो कुणावर तरी सूड म्हणून दारू पितोय ..अर्थात हा सूड स्वतःवरच उगवत होता खरेतर ..जन्म -मृत्यू कोणालाही चुकला नाही ..हे साधे सोपे सत्य स्वीकारायला तो तयार नाही ..शिवाय जी पत्नी गेलीय तिच्या दुखा:त दारू पिवून ..तो जे आईवडील ..मुलगी ..भावंडे वगैरे नातलग जिवंत होते त्यांप्रचंड ना दुखः देत होता हे त्याला समजत नव्हते ..जो पर्यंत त्याला हे समजणार नाही तोवर तो दारू पीत राहील ..अहंकारामुळे मानसोपचार तज्ञांची मदत घेण्यासही तयार नाही ..
दुसरा एक जण तीन मुली आहेत व मुलगा नाही ..घराण्याला वंशज नाही या व्यथेचे कारण करून व्यसनी झालेला ..मुलींच्या लग्नाची चिंता ..आर्थिक बाबी कशा व्यवस्थित पार पडतील ही चिंता ..आपण मेल्यावर आपल्या चितेला अग्नी देण्यास मुलगा नाही ही खंत ..याच्याही बाबतीत याच्या मते निसर्गाने याच्यावर अन्याय केलेला होता ..मुलगा होणे किवा मुलगी होणे हे आपल्या हाती नाही मात्र निसर्गाने जे दान पदरात टाकले आहे त्याचे व्यवस्थित पालन पोषण करावे चांगले संस्कार द्यावेत ..चांगले शिक्षण द्यावे ..पैश्यांची बचत करून योग्यवेळी लग्न करून द्यावे ही सरळ गोष्ट त्याला उमजत नव्हती ..शिवाय आपल्या मृत्युनंतर चितेला अग्नी कोणीही दिला तरी आपल्याला मोक्ष हा आपल्या कर्माने मिळणार आहे ..मुलाने अथवा मुलीने किवा कोणीही अग्नी दिला तरी काही फरक पडत नाही ..आपण मेल्यावर वंश संपला काय राहिला काय काही फरक नाही... हे याच्या गळी उतरणे कठीण होते ..एकाला जन्मतः अपंग मुलगा होता म्हणून म्हणे तो दारू पिऊन ते दुखः विसरण्याच्या प्रयत्नात असे ..एक जण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून नाराज ..कोणी परिस्थिती मुळे मनासारखे शिक्षण घेता आले नाही म्हणून दुखी:..एक जण लहानपणी आई लवकर वारली आईचे प्रेम अनुभवता आले नाही म्हणून व्यथित ..एकाला लग्न होऊन दहावर्षे झाली तरी मुल बाळ नाही ही व्यथा दारूत बुडवण्याच्या प्रयत्नात ..आवडत्या मुली सोबत लग्न झाले नाही म्हणून एकजण रागात दारू पीत असे ..त्याच्या मते कुटुंबीयांनी माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत ..मात्र त्या नादात तो नंतर ज्या मुलीशी लग्न झाले तिला दारू पिवून किती दुख; देतोय हे समजून घ्यायला तयार नाही ..एकाला संपत्तीच्या वाटणीत योग्य वाट मिळाला नाही अशी तक्रार म्हणून तो दारू पीत होता ..एक जण असाही भेटला की ऑफिस मध्ये साहेब मलाच जास्त रागावतात म्हणून टेन्शन येते ते घालवायला दारू पितो ..
मी वरील गोष्टी माॅनीटर जवळ बोललो आणि त्याला विचारले यावर काय उपाय आहे ? ..माॅनिटर हसून म्हणाला ..स्विकार हा सगळ्यात सोपा उपाय आहे यावर ..मात्र मानव अनेकदा अहंकारामुळे आपल्याला निसर्गाने हे दिले आहे अथवा आपल्या बाबतीत जी दुखःद घटना घडली आहे ती स्वीकारू शकत नाही ..निसर्गाशी ..देवाशी ..परिस्थितीशी ..समाजाशी ...आणि काही वेळा स्वतःशी देखील भांडण करत रहातो माणूस ..मुख्य म्हणजे आयुष्यात कधीतरी दारूची अथवा मादक पदार्थांची चव घेतली असल्याने हे सगळे आपली व्यथा स्वीकार करण्याऐवजी ती व्यथा दारू पिवून विसरण्याचा प्रयत्न करतात ..दारू उतरली की भयाण वास्तव समोर येवून पुन्हा दारू पितात ..आपल्या पिण्यामुळे अनेकांना आपण दुखः देतोय हे गावीही नसते व्यसनीच्या ..आपल्या व्यथा विसरण्यासाठी दारू पिणाऱ्या व्यसानीला हे कळतच नाही की आपले दारू पिणे हेच इतरांच्या व्यथेचे कारण बनतेय ..अर्थात इथे सतत उपचारांमध्ये आम्ही हेच वारंवार सांगत असतो ..ज्यांना हे लवकर समजते ते व्यसनमुक्त राहण्यास सुरवात करतात ..ज्यांना अहंकारामुळे हे समजण्यास वेळ लागतो त्यांना वारंवार उपचार देणे भाग असते ..कारण तेवढ्या उपचारांच्या काळात का होईना त्यांची दारू बंद राहते व कुटुंबीय समाधानाचा श्वास घेवू शकतात ..माॅनीटर सांगत असलेली गोष्ट मलाही लागू होती ..मी स्वतचा अहंकार बाजूला ठेवून इथे जे जे शिकवतील ते सगळे आत्मसात करायचे असा निश्चय केला .
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment