Saturday, May 31, 2014

बदनामीची भीती !

बदनामीची भीती ! ( बेवड्याची डायरी - भाग ५१ वा )


पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा वेळी त्याला आपल्या चुकांचा ..व्यसनांचा तसेच व्यसनासाठी केलेल्या भानगडींचा कबुली जवाब देणे अवघड वाटते ..' तो मी नव्हेच ' असा त्याचा अविर्भाव असतो ..खरे तर कुठून ना कुठून तरी आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या व्यसनी होण्याबद्दल माहिती कळलेली असते ..घरातील मोलकरीण ..सोसायटीचा वाॅचमन ...ऑफिसमधील सहकारी ..सोबत पिणारे मित्र ..अश्या लोकांकडून त्याच्या व्यसनी असण्याबद्दल व्यवस्थित माहिती पोचलेली असते सगळीकडे ..फक्त ' आपल्याला काय करायचेय ' या विचाराने लोक त्याच्या तोंडावर तशी चर्चा करत नाहीत ..किवा एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर व्यसनी त्याला अनेक समर्थने देवून उडवून लावतो ..अनेकदा कुटुंबीय देखील बदनामीच्या भीतीने तो व्यसनात अडकल्याची बाहेर कुठे वाच्यता करत नाहीत ..उलट कोणी तसा उल्लेख केला तर व्यसनीच्या चुकांवर पांघरून घालतात..असा हा आजार आहे ..त्यामुळे पाचव्या पायरीत सांगितलेले ' कन्फेशन ' करणे व्यसनी व्यक्तीला खूप जीवावर येते ' मुझको बरबादी का कोई गम नही..गम है बरबादी का क्यू चर्चा हुवा ' अश्या प्रवृत्तीने तो आपल्या चुका लपवून ठेवतो ..इतरांनी त्याच्याबद्दल चर्चा करू नये असे त्याला मनापासून वाटते ..कितीही झाकले तरी कोंबडे बांग देतेच हे विसरता कामा नये ..आपल्या चुकांवर पांघरूण घालून कुटुंबीय खरे तर आपल्या व्यसनीपणाला खतपाणी घालत असतात .
सर व्यसनी व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मनस्थिती बद्दल बारकाईने माहिती देत होते ..मला ते लागू पडते आहे हे जाणवले ..मी नेहमी बाहेरच्या लोकांमध्ये अगदी असेच वर्तन करत असे ..स्वतचा चांगुलपणा लोकांना जाणवावा असे वागत असे ..मी साधा भोळा..प्रामाणिक प्रवृत्तीचा ..जवाबदार ..सरळमार्गी व्यक्ती आहे असेच इतरांना भासवत असे ..खरेतर अनेकांना मी रोज दारू पितो ..दारूमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय ..माझ्या कुटुंबात भांडणे होत आहेत ..आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललो आहे ..कामावर दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलेय .वगैरे माहिती मिळाली असणारच ..कारण मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की चार माणसे एकत्र जमली की ते इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतातच ..तेथे हजर नसलेल्या व्यक्तीच्या दुर्गुणांची चर्चा करतात ..आपल्याला समजलेली गुप्त बातमी कोणाला सांगू नकोस असे म्हणत सगळीकडे वितरीत करतात .. फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याला कोणी काही बोलत नाहीत कारण त्यांना तो आपलं अपमान करेल अशी भीती असते किवा ' ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल ' या उक्तीनुसार गप्प राहतात ..अलका भांडणात आमचा आवाज वाढला की शेजारचे लोक ऐकतील या भीतीने चूप बसत असे ..सुरवातीला तर तिने माहेरी देखील माझ्या पिण्याबद्दल वाच्यता केली नव्हती ..सगळे काही छान आहे असेच भासवले होते ..माझ्या आईबाबांनी देखील कधी इतर नातलगांकडे माझ्या पिण्याचा विषय काढला नव्हता ...इतरांना समजले तर बदनामी होईल या भीतीने त्यांनी माझ्या चुकांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न केला होता ..पाचव्या पायरीत स्पष्टपणे म्हंटले होते की आपल्या चुका मोकळेपणी कबूल केल्या पाहिजेत तरच पुढे जाता येते ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये केले जाणारे शेअरिंग हा पाचव्या पायरीचाच एक भाग आहे ...प्रत्येकाने निर्भयपणे शेअरिंग करणे गरजेचे असते ..
सरांचे बोलणे सुरु असताना एकाने हात वर करून विचारले ' सर हे जे ईश्वर ..स्वतः ..व आदरणीय व्यक्तीजवळ चुकांची तंतोतंत कबुली दिली असे म्हंटले आहे.. ते तीन भाग का केले आहेत ..? " सरांनी त्याचे उत्तर दिले ..म्हणाले खरेतर जेव्हा आपण ईश्वरी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सर्वव्यापी ईश्वर ' यत्र ..तत्र ..सर्वत्र ' आहे असे म्हंटले होते ..म्हणजे प्रत्येक जीवात ते सर्वशक्तिमान चैतन्य वसलेले आहे ..तेव्हा चुकांची कबुली देताना नेमकी कोणाजवळ द्यावी हा प्रश्न पडतो ..किवा कोणाजवळही दिली तरी चालते का ? असा संभ्रम निर्माण होतो .. यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून हे तीन भाग आहेत ..पहिल्या भागातला ईश्वर म्हणजे आपले जवळचे कुटुंबीय ज्यात पत्नी ..आईवडील .भावंडे येतात ..आपण घरी अनेकप्रकारचे बेताल वर्तन केले आहे ..आपल्या वागण्याने कुटुंबियांना खूप त्रास झाला आहे ..आर्थिक ..मानसिक ..कौटुंबिक ..शारीरिक ..सामाजिक..आणि अध्यात्मिक या साऱ्या पातळ्यांवर जसे आपले नुकसान झालेय तसेच त्यांना देखील या सगळ्या पातळ्यांवर आपल्यामुळे त्रास झालेला आहे .. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध केला ..प्रतिकार केला तेव्हा तेव्हा आपण आक्रस्ताळे पणाने ..आक्रमकपणे ..त्यांना चूप बसवले आहे ..किवा त्यांनी आपल्याबद्दल चर्चा सुरु करतच तेथून काढता पाय घेतला आहे..त्यांना आपल्यामुळे त्रास होतोय हे कधीच त्यांच्या समोर मान्य केलेले नाहीय ..तर त्यांच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय असा कांगावा केला होता आपण ..पाचव्या पायरीचे आचरण करताना आपण जवळच्या नतलगांपुढे आपण त्यांना दिलेल्या त्रासाची कबुली देणे अपेक्षित आहे ..त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो ..तसेच आपण मनापासून सुधारू इच्छितो हे त्यांना समजते ..त्यांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळण्यास सुरवात होते ..आपल्या वागण्याबद्दल आपल्याला खरोखर पश्चाताप होतोय याची खात्री वाटते ..आता दुसऱ्या भागात " स्वतः जवळ कबुली दिली " असा उल्लेख आहे ..म्हणजे केवळ नातलगांकडे कबुली देणे पुरेसे नाहीय तर ..आपल्याला स्वतःला ते आतून ..अंतर्मनातून पटले पाहिजे ..अगदी मनाच्या खोल गाभार्यातून आपण चुकलो आहोत हे वाटले पाहिजे ..केवळ पाचव्या पायरीत सांगितले आहे म्हणून नव्हे ..किवा आपण व्यसनमुक्ती केंद्रात आलोत म्हणून नव्हे ..अथवा आता आपल्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरला नाही म्हणून ..इतरांनी लवकर आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून ..आपल्याला माफ करावे म्हणून ..पश्चाताप झालाय असे दाखवावे म्हणून नव्हे तर .मनापासून आपण चुकलो आहोत याची खोल जाणीव व्हावी अशी अपेक्षा आहे ..
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment