Friday, April 4, 2014

मानसोपचारतज्ञ ..औषधांचा नकार


मानसोपचारतज्ञ ..औषधांचा नकार ( भाग १९ वा  )

माँनीटरने आपले बोलणे संपवले तसे सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..त्याने प्रामाणिक पणे स्वतच्या चुका सांगत ..सुधारणेकडे जाण्यासाठी काय काय गरजेचे आहे ते सांगितले होते ..त्याचे बोलणे ऐकून मलाही वाटले मी देखील ' भाग्यवान ' आहे ..कारण निसर्गाने मला कोणतेही व्यंग न देता जन्माला घातले ..माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे पालक मला मिळाले ..माझे शिक्षण ..माझा सांभाळ त्यांनी योग्य पद्धतीनेच केला होता ..आपल्या कर्तव्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नव्हती ..पत्नीनेही नेहमी मला समजूनच घेण्याचा प्रयत्न केला होता ..जेव्हा माझे पिण्याचे प्रमाण वाढले ..आर्थिक समस्या येवू लागल्या .माझ्या शारीरिकतेवर ..इतर वर्तनावर परिणाम होऊ लागला ..तेव्हाच तिने मला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता ..मला इथे दाखल करून तिने एकप्रकारे माझ्यावर उपकारच केले होते ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात आपल्याला अडकवले गेले आहे ..इथे माझ्या मनाविरुद्ध मला ठेवले गेले आहे ही भावना व्यर्थ होती ..त्यापेक्षा सावरण्यासाठी मला मदत केली जातेय ..म्हणून मी ' भाग्यवान ' आहे असे मला वाटू लागले .

मिटिंग संपल्यावर सर्वाना एका जागी बसवून औषध वाटप सुरु झाले ..मी माझा नंबर येण्याची वाट पाहत होतो ..माँनीटर आणि त्याचे सहकारी दोन डबे उघडून बसले होते ..त्यात एकेकाच्या नावाची प्लास्टिकची पाकिटे ठेवलेली होती ..त्यातून एकेकाचे नाव पुकारून गोळ्या देण्याचे काम सुरु होते ..प्रत्येकाचा हातावर पाकिटातील गोळ्या दिल्यावर तो गोळ्या खातोय की नाही यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाई ..एकाने गोळ्या तोंडात टाकल्या आणि वर तेथे ठेवलेल्या बाटलीतले पाणी प्यायले ..तो जायला निघाला तसे त्याला माँनीटरने अडवले ..त्याचे हात तपासले ..तेव्हा लक्षात आले की त्याने शिताफीने एक गोळी हाताच्या बोटांमध्ये लपवून ठेवली होती ..त्याला पुन्हा गोळी खायला सांगितले गेले ..कुरबुर करत त्याने ती गोळी घेतली..असे गोळ्या लपवणारे दोन तीन जण निघाले..सर्वांचे गोळ्या घेवून होई पर्यंत कोणीही जागेवरून उठायचे नाही अशी कडक सूचना दिली होती माँनीटरने..एक दोन जण तरीही गोळी तोंडात टाकल्यावर बाथरूम कडे जायला निघाले ..त्यानाही अडवले गेले ..त्यांचे तोंड तपासले गेले ..त्यांनी गोळ्या न गिळता तशाच तोंडात धरून ठेवल्या होत्या ..बाथरूम मध्ये जाऊन गोळ्या थुंकून टाकण्याचा त्यांचा डाव फसला ... हे लोक स्वत:च्या बरे होण्यासाठी आवश्यक असणारी औषधे घ्यायला कुरकुर का करतात ते मला समजेना ..या बाबत नंतर माँनीटरला मी विचारलेच ..गोळ्या वाटप करताना इतके लक्ष का ठेवावे लागते ? .

त्याने सांगितलेले कारण ऐकून मला नवल वाटले ..तो म्हणाला या इथे उपचारांना दाखल असलेले सगळेच लोक गंभीरपणे उपचार घेतातच असे अजिबात नाही ..काहीना अजूनही आपण व्यसनी आहोत हे मान्य नाहीय ..काहीना असे उपचार घेवून दारू सुटते यावर विश्वास नाहीय .. काही असेही आहेत की ज्यांना मुळातच स्वतचे भले समजत नाही ..तर काही जण मानसोपचार तज्ञ ..औषधे या बाबत अनेक गैरसमज बाळगून आहेत ..
खरेतर जसे प्रत्येक व्यक्तीला काही शारीरिक दुखणी उद्भवतात तसेच काही मानसिक दुखणी देखील असतात ..ज्यात सातत्याने निराशा वाटणे ..वैफल्यग्रस्त वाटणे ..जगात आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटून सतत खंत करत राहणे ..कधी खूप उत्साही वाटणे..तर कधी एकदम शक्तिपात झाल्यासारखे वाटणे ..एका अनामिक भीतीने ग्रस्त असणे ..सतत चिंता करत राहणे ..भावनिक असंतुलना मुळे सतत चिडचिड करणे ..तणावग्रस्त राहणे अशी काही भावनिक आजाराची लक्षणे असतात ..तसेच व्यसन केल्यामुळे देखील व्यसनांचे दुष्परिणाम म्हणून काही मानसिक विकार उद्भवतात ..ज्याबाबत योग्य उपचार करणे आवश्यक असते ..काहीवेळा समस्या नीट उलगडून सांगून ..समुपदेशन करून तात्पुरते बरे वाटते अशा व्यक्तीला .. कायमचे बरे होण्यासाठी काही औषधे मदत करतात ..मात्र समाजात अजूनही मानसोपचार तज्ञ म्हणजे ' वेड्यांचा डॉक्टर ' वाटतो ..जे लोक डोक्यावर ठार परिणाम होऊन दैनंदिन कामे करू शकत नाहीत ..जे रस्त्यावर निरुद्देश भटकत असतात ..स्वतःशीच बोलतात ..हातवारे करून हवेशी भांडतात ..ज्यांना कपड्याचे भान नसते ..ते वेडे ' असा समज बाळगून काही जण " मी कुठे तसा करतो " म्हणून आपल्याला काही मानसिक समस्या असल्याचे साफ नाकारतात ..मानसोपचार तज्ञांची मदत घेत नाहीत ..नकळत स्वतचा मानसिक विकार जपतात ..वाढवतात ..अशा लोकांवर त्यांनी गोळ्या घ्यावे म्हणून लक्ष ठेवावे लागते ...ठार वेडे होऊन भटकणे ही मानसिक विकाराची अंतिम किवा टोकाचे नुकसान झाल्याची अवस्था असू शकते ..जर त्या आधीच सावधगिरी बाळगली तर चांगलेच असते ते या लोकांना समजत नाही ..तसेच मानसोपचार तज्ञांच्या औषधांमुळे काही ' साईड इफेक्ट्स ' होतील अशी भीती असते यांना ..उदा ..लैंगिक उत्तेजना न येणे ..सतत आळस वाटणे ..खूप झोप येणे वगैरे ..परंतु हे सर्व गैरसमजच आहेत ...मानसोपचार तज्ञ काही अपाय होणार नाहीत हे पाहूनच गोळ्यांचा डोस ठरवत असतात ..मात्र मुळातच संशयी स्वभावाची ..हट्टी ..जिद्दी ..स्वतःचेच खरे समजणारी माणसे मानसोपचार तज्ञांना सहकार्य करू शकत नाहीत ..म्हणून आम्हाला असे लक्ष ठेवावे लागते . 

( बाकी पुढील भागात )

Monday, March 31, 2014

" भाग्यवान दारुडा "

" भाग्यवान दारुडा " ( बेवड्याची डायरी - भाग १८ वा )

हॉल मध्ये सर्वाना एकत्रित बसवले गेले होते ..आता अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची मिटिंग होणार आहे हे समजले ..मी कुतूहलाने अगदी पुढच्या रांगेत जाऊन बसलो ..माँनीटर ने प्रार्थना घेतली ..बोलायला सुरवात केली ..नमस्कार मित्रानो माझे नाव संदीप .."मी एक भाग्यवान दारुडा आहे ..केवळ ईश्वराची असीम कृपा ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दर्शवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..आणि आपणा सर्वांचे मला लाभलेले प्रेम ..केवळ याच बळावर मी आज दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर आहे ..तसेच सुखी ..समाधानी ..संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय " संदीप ने असे म्हणताच ..सर्वांनी ' हाय संदीप ' ..असे म्हणता त्याला अभिवादन केले . पुढे तो म्हणाला " मी स्वतःला भाग्यवान दारुडा का म्हणतोय याचे सर्वाना आश्चर्य वाटत असेल .. सुरवातीची काही वर्षे सोडल्यास ..नंतर अनेक वर्षे मी दारूच्या गुलामीत जगत होतो ..दारूमुळे माझे शरीर .मन ..कुटुंब ..आर्थिक बाजू ..सामाजिक स्थान ..माझे आत्मिक स्वास्थ्य ढासळत जात होते.. हे समजत असूनही मी नाईलाजाने पुन्हा पुन्हा दारू पीत गेलो ..जीवन जगणे म्हणजे माझ्या साठी जणू सक्तमजुरीची शिक्षा झाले होते ..दारू शिवाय जीवन जगण्याची कल्पनाही करवत नव्हती इतकी प्रचंड गुलामी निर्माण झाली होती ..मनोमन मी यातून सुटका व्हावी अशी इच्छा करत होतो ..मात्र मला सुटकेचा मार्ग सापडत नव्हता ..कोणाच्या तरी ओळखीने माझ्या कुटुंबियांना या व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता मिळाला ..हो ..नाही ..करता करता शेवटी येथे दाखल झालो ..इथेच मला अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची माहिती मिळाली ..हे देखील समजले मी अतिशय घातक अशा आजारात अडकलो आहे ..त्यातून सुटका होण्यासाठी बारा पायऱ्यांचा मार्ग मिळाला ..मित्रानो मी भाग्यवान अशासाठी आहे की आज जगात लाखो लोक दारूच्या विळख्यात अडकले असूनही त्यांना सुटकेचा मार्ग मिळत नाहीय ..ते आपल्या नशिबाला ..परिस्थितीला ..कुटुंबियांना ..किवा आणखी कुणाला तरी दोष देत पुन्हा पुन्हा दारू पीत आहेत ..रोज कणाकणाने उध्वस्त होत आहेत ..तरीही त्यांना मला मिळाला तसा मार्ग अजून मिळाला नाहीय ...मला हा मार्ग मिळाला आणि माझा पुनर्जन्म झाला ..म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतोय "
तो हिंदीत स्वतची कथा न संकोचता सांगत होता ..आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन त्याचे बोलणे ऐकत होतो ..तो जणू आमचेच मनोगत सांगत आहे असे वाटत होते ..पुढे तो म्हणाला ' सर्वसाधारण मुलांप्रमाणेच मी मोठा होत गेलो ..माझ्यावर प्रेम करणारे आईवडील ..भाऊ बहिण ..सर्व इतरांसारखेच ..मी अआभ्यासात हुशार होतो ..पदवी प्राप्त केल्यानंतर ..पुढेही मी शिकलो ..चांगली नोकरी मिळाली ..त्याच आनंदात मित्रांच्या आग्रहाखातर माझ्या हातात दारूचा ग्लास आला ..सुरवातीचे काही दिवस दारू म्हणजे मला मिळालेली एक जादू आहे असे मला वाटले ..दारूचा घोट पोटात जाताच ..माझ्या चित्तवृत्ती बहरून जात असत ..माझ्या विनोदबुद्धीला धार चढत असे ..माझी रसिकता जागृत होई ..सगळ्या समस्या ..ताण तणाव चुटकीससरशी निघून गेल्याची ..एक प्रचंड हलकेपणाची भावना निर्माण होई ..सुंदर समृद्ध भविष्य मला खुणावत असे ..परंतु मित्रानो हळू हळू दारू पिण्याची ओढ माझ्या मनात घट्ट होत होती ..माझ्या मनावर त्या नशेच्या अवस्थेचा पगडा ..मगरमिठी अधिक दृढ होत होती हे मला समजले नाही ..पुढे पिण्याचे प्रमाण वाढत गेले ..पगारातील सगळा पैसा दारूत खर्च होऊ लागला ..मनाचे असमाधान ..अवस्थता वाढत गेली ..त्याच बरोबर नैराश्य ..वैफल्याचा मी धनी होत गेलो ..माझे दारू पिणे आता एक आनंदोत्सव न राहता सर्वांच्या काळजीचा विषय बनत चालला होता ..कुटुंबियांच्या आग्रहाखातर काही दिवस दारू बंद केली ..मात्र पुन्हा सुरु झाली ..असे वारंवार घडत गेले ..सर्वांचा विश्वास गमावला ..नोकरीत दांड्या मारण्याचे प्रमाण वाढल्यावर ..जेव्हा साहेबांनी मला नोटीस दिली तेव्हा मी रागाने बेदरकारपणे नोकरी सोडली ..दुसरी मिळवली ..अश्या किमान दहा नोकऱ्या करून झाल्या ..सगळा पैसा दारूत गेला ..वय वाढत गेले तसे नुकसानही वाढत गेले ..शेवटी भावाच्या एका परिचिताने भावाला या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती सांगितली ..भावाने मला त्याबद्दल विचारले ..मी साफ नकार दिला ..दारू मी स्वतच्या बळावर सोडू शकेन ..अशी माझी खात्री होती ..परंतु ते जमू शकले नाही ..शेवटी मला इथल्या लोकांनी प्यायलेल्या अवस्थेत जबरदस्ती उचलून येथे आणले .,,मला सुरवातीचे काही दिवस प्रचंड अपमानास्पद वाटत होते ..नंतर नंतर इथल्या थेरेपीज ..योगाभ्यास ..प्राणायाम या सर्व गोष्टींमुळे माझ्या बुद्धीवर असलेला दारूचा पगडा कमी होण्यास मदत झाली ..अल्कोहोलिक्स अँनानिमसचे साहित्य वाचल्यावर मी दारूच्या गुलामीत जगत होतो हे जाणवले ..मग सगळे काम सोपे होत गेले ..मी येथे रमलो ..
मित्रानो दारू सोडली म्हणजे माझ्या जीवनातील समस्या संपल्या असे नाही ..परंतु आता माझ्या जीवनातील समस्यांवर दारू हे औषध नाहीय हे मला पक्के समजले आहे ..माझे जीवन कितीही समस्यापूर्ण असले तरीही ..दारू ही त्यावरची तात्पुरती मलमपट्टी असते ..त्याऐवजी आत्मभान बाळगून ..नैतिकतेचा पाठपुरावा करून ..जीवनावर श्रद्धा ठेवून ..नक्कीच समस्यांचा सामना करता येतो हे मला येथे शिकायला मिळाले ..त्यामुळेच आज मी हातीपायी धडधाकट उभा आहे तुमच्या समोर ..रोज दारूच्या नशेत वाहने चालवून अपघातात मरणारे ..दारूमुळे घरदार सोडून भटकणारे ..एकाकी रहाणारे ..दारूमुळे लिव्हर फुटून ..कावीळ होऊन ..मरणारे अनेक लोक आहेत ..मात्र मला हा मार्ग मिळाला म्हणूनच मी वाचलो ..नव्याने जीवनाला समोरा गेलो ..माझ्या मनात नम्रता ..कृतज्ञता ..सहिष्णुता ..ही बीजे रोवली गेली आहेत ..आता रोजच्या रोज माझ्या समर्पणाचे खतपाणी घालून ती बीजे प्रचंड वृक्ष कसा होतील यासाठी प्रामाणिकपणे मला श्रम करावे लागतील ..याची मी नियमित खबरदारी घेत असतो .....
( बाकी पुढील भागात )

Saturday, March 29, 2014

त्रिदेव ..त्रिमूर्ती ..!


त्रिदेव ..त्रिमूर्ती ..! ( बेवड्याची डायरी - भाग १७ वा )

विमनस्क असा बसून राहिलो प्राणायाम संपायची वाट पहात...माझे लक्ष वेधून घेणारे एक दृश्य दिसले ... वार्डात भिंतीला टेकून तीन जण अगदी शांतपणे बसलेले होते ..हे तीन जण येथे आल्यापासून माझ्या कुतूहलाचा विषय बनेलेल होते ..त्यातील एक जण खूप जाडा ..वजन किमान १०० किलो असावे ..बुटका ..रंगाने काळा तसेच त्याचा एक डोळा तिरळा होता ..वय सुमारे २२ वर्षे असावे ..त्याचे नाव योगेश असे होते ..हा योगेश प्रथम दर्शनीच मंदबुद्धी वाटत होता तसेच त्याच्या रंगरूपामुळे जरा तो भीतीदायकच वाटे ..अतिशय हळू हळू वार्डात फिरत रहाणे ..मध्येच कुठेतरी भिंतीला टेकून उभे राहणे असे याचे नेहमीचे चाललेले असे ....प्रत्येक वेळी ..चहा ..नाश्ता ..जेवणाच्या वेळी मात्र योगेशच्या हालचाली वेगवान होत असत ..तो त्या वेळी सर्वात आधी नंबर लावून उभा राहत असे ..दुसरा एक जण लौकिक नावाचा ..हा देखील साधारण २५ वर्षांचा तरुण मुलगा ..उंच ..लुकडा ..वार्डात हा सुद्धा अतिशय वेगाने संपूर्ण वार्डमध्ये दिवसभर चकरा मारत असे ..त्याचे चालण्याचा वेग योगेशच्या दहापट होता ..कोणाशीच काहीही न बोलता वेगवान चकरा मारण्याचे काम तो इमान इतबारे करे..तिसरा प्रकाश ..हा प्रकाश बहुधा अंगात शर्ट किवां बनियन असे काहीच घालत नसे ..कमरेवर एक बर्म्युडा आणि वर उघडा असा याचा नेहमीचा वेष ..अंगाने तसा बारीकच ..हा दिवसभर वार्डात दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांकडे लक्ष देवून असे ..त्याला आवडलेला एखादा टी शर्ट .. विजार ..अधूनमधून अंगावर घालत असे ..ते कपडे आपलेच असावेत असा याचा अजिबात आग्रह नसे ..कोणाचेही कपडे तो तात्पुरते घालून ..आरश्यात पाहून परत मनात येईल तेव्हा ते कपडे काढून पुन्हा फक्त बर्म्युडा वर राही ..हे तिघेही कोणत्याही थेरेपीज करताना कधी दिसले नाहीत ..मी पाहिलेले दृश्य असे होते की..एका कोपर्यात भिंतीला टेकून योगेश आणि लौकिक बसलेले होते ..त्यांनी त्यांचे पाय पुढे पसरलेले होते ..त्यांच्या समोर बसून प्रकाश अतिशय प्रेमाने काही वेळ योगेशचे आणि काही वेळ लौकिकचे पाय दाबून देत होता .. मूकपणे हे पाय दाबून देण्या ..घेण्याचे काम चाललेले होते ..मला या प्रकारची गम्मत वाटली ..मी प्राणायाम संपल्यावर माँनीटरला हे तिचे कोणते व्यसन करतात ..असे विचारले तर म्हणाला.. हे दुर्दैवी लोक आहेत ..

योगेश जा जन्मतः मंदबुद्धी आहे ..लहानपणी वडिलांच्या ते लक्षात आले नाही ..मोठा होत गेला तसे हळू हळू ध्यानात आले ..त्याला मानसोपचार तज्ञांचे उपचार देण्याचा प्रयत्न झाला ..शाळेत पाठवून झाले ..जेमतेम आठवी पर्यंत शाळेत गेला ..याचे वैशिष्ट्य असे की याला तेलकट ..तुपकट पदार्थ ..मिठाई ..सामोसे..बटाटेवडे वैगरे खाण्याची प्रचंड आवड आहे ..घरी तो त्या साठी भांडून पैसे घेतो ..हॉटेल मध्ये जावून खावून येतो ..त्यामुळे वजन वाढले आहे याचे ..मोठा होत गेला तसा याचा त्रास वाढला ..हॉटेलात खायला पैसे दिले नाहीत तर .आरडा ओरडा ..शिवीगाळ करतो ..शेवटी वडिलांनी वैतातून याला काही दिवस मनोरुगालयात ठेवले ..मात्र फारसा बदल झाला नाही ..हा घरी फक्त चांगले चुंगले पदार्थ खाण्यासाठी मस्ती करतो ..म्हणून मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने याला इथे ठेवले गेले आहे ....दुसरा लौकिक हा १२ वी पर्यंत शिकलेला आहे ..बारावी पर्यंत सगळे सुरळीत होते ..अभ्यासात अतिशय हुशार होता ..परंतु बारावीत असताना याच्या हाती मोबाईल आणि संगणक आला ..हा जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर चँटिंग तसेच नेटकँफेत जावून सर्फिंग यात वेळ घालवू लागला ..पुढे एक दिवशी काय झाले नक्की समजले नाही ..मात्र याचे डोके फिरले ..कॉलेजला जाणे बंद झाले ..घरात नुसता बसून राहू लागला ..कोणी आभ्यास ..कॉलेजचा विषय काढला की आक्रमक होई ..मानसोपचार तज्ञांचे उपचार यालाही सुरु आहेत ..मात्र अनेक दिवस दिवस झाले तरी याच्या वागण्यात फारसा बदल झालेला नाही ..कदाचित प्रेमभंग झाला असावा ..किवां जास्त वेळ नेट सर्फिंग तसेच चँटिंग करून याच्या मनावर ताण येवून हे असे झाले असावे ..मात्र ह माणसातून उठला ...तिसरा प्रकाश हा देखील नववी पर्यंत सर्व साधारण मुलांसारखा होता ..बहुधा सायकलवरून पडल्याचे निमित्त झाले ..तेव्हा पासून हा असा विचित्र वागतो ..पँट व्यतिरिक्त अंगावरचे इतर कपडे काढून टाकतो ..केव्हाही घरातून असा उघडा बाहेर निघून जातो ..मनात येईल तेव्हा इतरांचे कपडे घालतो ..पुन्हा काढून ठेवतो ..कधी कधी घरातील सर्व कपडे एका सूटकेस मध्ये भरून गावाला जातो असे सांगून एकदोन दिवस गायब रहातो,..परत येताना सूटकेस कुठेतरी हरवून येतो ..

या तिघांबाबत मला मिळालेली माहिती सुन्न करणारी होती ..या तिघांना मनोरुग्णालयात ठेवले पाहिजे ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात यांना का ठेवले ? असा विचार माझ्या मनात आला ..माँनीटरला तसे विचारले ..तो म्हणाला हे तिघेही मध्यमवर्गीय आहेत ..आई वडिलांचे अतिशय प्रेम असते अशा मुलांवर ..यांचे आईवडील मनोरुग्णालयात जावून पाहणी करून आले ..मात्र तिथले वातावरण पाहून त्यांना तिथे ठेवावे असे वाटले नाही आईवडिलांना ..घरी हे तिघेही मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या गोळ्या घेत नाहीत ..कशाला विरोध केला तर आरडा ओरडा करतात .. त्यांनी नियमित औषधे घ्यावीत या साठी त्यांना कुठेतरी शिस्तबद्ध वातावरणात ठेवण्याची गरज आहे ..बाहेर हे कुठेतरी निघून जातील ..रस्त्यावर भटकत राहतील .. रस्त्यावर फिरणाऱ्या ..ओळख हरवलेल्या .दाढी वाढलेल्या ..फाटके कळकट कपडे घातलेल्या वेड्यांसारखी यांची अवस्था होईल ..मुंबई ..पुणे या भागात अशा लोकांना ठेवून घेणारी महागडी नर्सिंग होम आहेत ..मात्र तेथील खर्च यांच्या कुटुंबियांना परवडणारा नाही ..यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सरांनी अतिशय अल्प खर्चात यांना येथे ठेवून घेतले आहे ..यांचा इथे फारसा त्रास नाही ..फक्त काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लगते ..हे तिघेही इथे आक्रमक होत नाहीत कारण नियमित यांना औषधे दिली जातात ..तसेच सरांचा यांना हाताळण्याचा अभ्यास असल्याने हे आमचे आणि सरांचे ऐकतात ..गमतीने आम्ही यांना त्रिदेव म्हणतो .

हे तिघेही वार्डातील इतर लोकांशी फारसे बोलत नाहीत ..मात्र एकमेकांची खूप काळजी घेतात ..कोणी यांच्या पैकी एकाला रागावले तर इतर दोघांना खूप राग येतो ..कदाचित यांना आपण तिघे व्यसनी नाही आहोत तर मनोरुग्ण आहोत हे जाणवले आहे..एकमेकांना धरून राहतात तिघे ..महिन्या पंधरा दिवसातून यांचे पालक यांना भेटायला येतात ..मात्र तिघेही पालकांशी फारसे बोलत नाहीत ..पालकांनी आणलेले ख्ण्याचे पदार्थ संपले की हे उठून येतात ..बिचारे पालक हे नक्की कधीतरी सुधारतील या आशेवर आहेत ...!

( बाकी पुढील भागात )

नातलगांच्या भेटीची ओढ !


नातलगांच्या भेटीची ओढ !( बेवड्याची डायरी - भाग १६ वा )

मला विचारलेल्या कौटुंबिक प्रश्नांनी मी मनातून हललो होतो ..मी केलेल्या अनेक चुकांची नव्याने जाणीव होत होती ..स्मृतीच्या पडद्या आड गेलेल्या घटना एका नव्या स्वरुपात माझ्यासमोर उघड होत होत्या ..दारू पिण्याच्या काळातले माझे वर्तन अलकाने कसे सहन केले असेल ते जाणवून हृदयात खळबळ उडाली होती ..उरलेल्या प्रश्नांची कशीबशी उत्तरे देवून मी केबिन मधून विषण्णपणे बाहेर पडलो ..अलकाची आणि मुलांची तीव्रतेने आठवण येत होती ..त्यांना भेटायची ओढ जागृत झाली ..मी माँनीटर कडे जावून ..मला सरांना भेटायचे आहे असा आग्रह करू लागलो ..तो म्हणाला तुमचे नेमके काम काय आहे ते सांगा ..काही त्रास होत असेल तर मी औषध देतो .. विशेष काम असल्याखेरीज सरांना भेटता येणार नाही ..मी हट्टालाच पेटलो ..शेवटी त्याने मला बाहेर जाण्यास परवानगी दिली ..बाहेर ऑफिसमध्ये दोन तीन कार्यकर्ते आणि सर बसलेले होते ..माझा चेहरा पाहून कदाचित त्यांना माझी अवस्थता जाणवली असावी ..' काय हो ..विजयभाऊ कंटाळलात की काय इथल्या वातावरणाला ' एका कार्यकर्त्याने विचारले ..त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी सरांच्या समोरच्या खुर्ची वर बसलो .." बोला ..कसे वाटतेय इथे " सरांनी प्रसन्नतेने विचारले .." मला घरी फोन करायचा आहे " असे म्हणताच सर म्हणाले " आम्हाला वाटलेच होते ..अहो पण इथे दाखल झाल्यावर सुमारे पंधरा दिवस नातलगांशी संपर्क करता येत नाही " सरांनी सरळ नियमावर बोट ठेवत मला सांगितले .." सर मी इथे राहायला तयार आहे ..फक्त मला एक फोन करून अलका आणि मुले कशी आहेत याची चौकशी करायची आहे ....गेल्या तीन दिवसांपासून घरी काय चाललेय याची मला काहीच माहिती मिळालेली नाहीय ..मुलांची शाळा वगैरे माहिती हवीय मला ..मी घरी जाण्याचा हट्ट करत नाहीय " मी माझा मुद्दा पुढे रेटत होतो ..सर हसून विनोदाने म्हणाले ' विजयभाऊ कुटुंबियांची सर्वात मोठी काळजी इथे दाखल आहे म्हंटल्यावर सगळे काही तिकडे सुरळीतच असणार ..आपण घरी असलो की जास्त समस्या असतात " कसेनुसे हसत मी म्हणालो " सर पण ..जर मी कुटुंबियांना घरी घेवून चला असा हट्ट करणार नसेन ..इथे मी पूर्ण उपचार घेतो असे चांगले सांगणार असेन ..तर माझ्या मानसिक समाधानासाठी मला घरी फोन लावून द्यायला काय हरकत आहे " मी एकदम अचूक मुद्दा मांडला .

" हे बघा विजयभाऊ व्यसनमुक्ती केंद्रातील नियम हे उगाच आमच्या मनात आले म्हणून बनवलेले नसतात तर त्या प्रत्येक नियमामागे मानसिक उपचार दडलेले असतात ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात ..जर कुटुंबीयांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर चिडतात ...धमक्या देतात ..म्हणून असा संपर्क फक्त पहिले पंधरा दिवस उलटून गेल्यावर रविवारीच करता येतो ..आम्ही येथे कुटुंबियांच्या भेटीसाठी रविवार ठरवलेला आहे ..तेव्हा पंधरा दिवस झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी नक्की तुमचे कुटुंबीय तुम्हाला भेटायला येतील ..असा मध्ये संपर्क करता येणार नाही .." सरांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला " पण सर मी घरी जाण्याचा हट्ट अजिबात करणार नाही हे तुम्हाला आधीच सांगितले आहे .. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे ..मी एकही वावगं शब्द बोलणार नाही अलकाशी "..मी माझा घरी फोन करायचा हट्ट चालूच ठेवला . 
" विजयभाऊ मला खात्री आहे कि तुम्ही हट्ट करणार नाही ..तुम्ही शब्द दिलाय तसे वागाल तरीही तुम्हाला मी घरी फोन करू देणारा नाहीय ..याचे कारण असे की एकदा कुटुंबियांशी बोलणे झाले की तुमचे मन इथून बाहेर.. घरी जाईल ..इथे फक्त शरीर राहील ..उरलेले सगळे दिवस तुम्ही घरचाच विचार करत बसाल इथे ..एक व्यसनी व्यक्ती हा मुळातच खूप चंचल असतो ..शिवाय खूप भावनाप्रधान देखील ..कुटुंबीयांशी संपर्क झाला की आपले आताचे विचार बदलू शकतात हे दुसरे कारण ..शिवाय तुम्हाला इथे कुटुंबियांच्या तुमच्यावरील प्रेमाची..त्यांच्या त्यागाची ..त्यांनी भोगलेल्या त्रासाची जाणीव व्हावी असाच आमचा हेतू आहे ..त्यांचा विरह सहन करत गेले तरच ती जाणीव सखोल होण्यास मदत मिळेल ..आता संपर्क झाला आणि तुम्ही पत्नीला 'सॉरी ' म्हंटले म्हणजे काम पूर्ण होत नाही ..व्यसनामुळे आपल्याला प्रिय व्यक्तींचा दुरावा सहन करावा लागतोय हे तुम्ही नीट समजून घेतले तर ....या पुढे तुम्ही कुटुंबियांच्या भावना समजून घेवू शकाल .." 

" व्यसनाधीनता या धूर्त आजाराचा भाग असा आहे की व्यसन बंद केल्यावर काही दिवस व्यसनी व्यक्ती अतिशय अवस्थ असतो ..त्याला बाहेरच्या अनेक गोष्टींची आठवण होत राहते ..पूर्वी लांबवलेली कामे ..नोकरीवरील समस्या ..कुटुंबातील समस्या ..विम्याचा न भरलेला हप्ता ..गाडीचा हप्ता .बँकेचे देणे ..वगैरे गोष्टी त्याला अवस्थ करतात ..व कसेही करून तो लवकरात लवकर इथून बाहेर पडावे या मनस्थितीत जातो ..साहजिकच उपचार घेण्यातील त्याचे लक्ष उडते ..म्हणून हा नियम आम्ही केला आहे ..अहो तुम्हीच नाही तर कुटुंबियाना देखील आम्हाला हे सगळे समजावून सांगून संपर्क करण्यास मनाई करावी लागते..काही कुटुंबीय घरातील व्यसनी व्यक्ती इथे दाखल केल्यावर ..दिवसरात्र आम्हाला फोन करत राहतात ..त्याची आठवण येते सांगतात ..त्यच्याशी एकदा बोलता येईल का ? त्याला दुरून पाहता येईल का ? वगैरे प्रश्न विचारून भंडावून सोडतात ..काही जण तर अगदी ' तो जेवतो का ? झोपतो का ? किती जेवतो ? काही म्हणतो का ? आमची आठवण काढतो का ?असे प्रश्न विचारतात ..त्यानाही आम्ही हेच सांगत असतो ..की काही काळजी करू नका ..इथे सर्व व्यवस्थित आहे ..त्याच्याशी संपर्क पंधरा दिवसानंतर येणाऱ्या रविवारीच करता येईल ..एक प्रकारे नातलगांसाठी देखील हा एक मानसिक उपचार असतो ..एरवी त्यांचे सगळे लक्ष व्यसनी व्यक्ती भोवती केंद्रित झालेले असते ..आता तो दूर आणि व्यसन करणार नाही असा सुरक्षित ठिकाणी आहे म्हंटल्यावर त्यांनी देखील त्याची काळजी करणे बंद करावे अशी आमची इच्छा असते " सरांनी इतके सविस्तर उलगडून सांगितल्यावर मी माझा हट्ट सोडणे योग्य समजले ..संमती दर्शक मन हलवून सरांचा निरोप घेतला ..वार्डात येवून बसलो ..म्हणजे आता बाहेरचे घरातील सर्व विचार सोडून इथल्या उपचार पद्धतीवर लक्ष केंद्रित करायचे होते तर ..चला काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ..नाहीतरी घरी असतानाही माझे वर्तन घरात असून नसल्यासारखेच होते ..मला कोणाचीच पर्वा नव्हती !

( बाकी पुढील भागात )

Thursday, March 27, 2014

चांभारचौकशा ? ? ? ? ? ?


प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना ... शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता ..मला कंटाळा आला ते सगळे करण्याचा ..खरे तर मला तीन दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते ..तरीही मी हे सगळे करणार असे ठरवून यात सहभागी होत होतो ..शेवटी कंटाळून उठलो ..माझ्या पलंगावर जावून बसलो ..सगळे शरीर ओढल्या सारखे वाटत होते ..जरा झोप काढावी असे वाटू लागले ...माझ्या सारखेच नवीन आलेले किवा आजारी असलेले चारपाच जण होते जे प्राणायाम करत नव्हते ..आम्ही सगळे प्राणायाम करणाऱ्या लोकांकडे पाहत होतो ..सुमारे ८० जण त्या हॉल मध्ये बसलेले असावेत ...जे मांडी घालून बसू शकत होते त्यांनी मांडी घातलेली ..काही अधिक उत्साही ..वज्रासनात बसलेले होते ..एका बाजूला कोपऱ्यात आठ दहा खुर्च्यांवर कंबर दुखी ..अपघातात पायाला इजा होऊन पाय थोडा अधू असलेले ..दारूमुळे लिव्हर वर परिणाम होऊन लिव्हरची समस्या वाढल्याने ..प्राणयाम न करता येणारे ..हार्टची समस्या असलेले लोक बसलेले होते ..हे सारे खुर्चीवर बसलेले लोक प्राणयाम घेणारे सर सांगत असलेले व्यायाम जेमतेम जमेल तसे करत होते ..एकंदरीत त्यांच्या हालचालींवरून ते हे सगळे नाईलाजाने करत असावेत असे जाणवत होते ..कारण सरांची नजर दुसरीकडे जाताच ते पुन्हा शुंभासारखे बसून रहात..सरांचे लक्ष गेले की गडबडीने काहीतरी हालचाल केल्यासारखे दाखवत ..बसलेल्या लोकांपैकी देखील काही जण ओढून ताणून प्राणायाम करणारे वाटले ...सर्वांचे निरीक्षण करताना एक लक्षात आले यात काही जण अंगचोर ..आळशी ..चालढकल करण्याच्या प्रवृत्तीचे वाटले ..मला असा पलंगावर रिकामा बसलेला पाहून एक कार्यकर्ता माझ्याजवळ आला ..म्हणाला मला जरा तुमची काही माहिती आहे ..चला माझ्यासोबत ..त्याच्या सोबत बाजूच्या केबिनमध्ये गेलो .

त्याने माझा येथे दाखल होते वेळचा फॉर्म काढला..मग माझी शैक्षणिक माहिती ..कौटुंबिक माहिती ..विचारली ..मी पटापट उत्तरे देत होतो ..तो ती माहिती फॉर्मच्या रकान्यात भारत होता ..माझ्या व्यसन सुरु होण्याला किती वर्षे झाली ? व्यसनामुळे खोटे बोलणे ..घरचे पैसे मारणे ..बाहेर उधाऱ्या ..कर्जे वगैरे आहेत काय ? पोलीस केसेस झाल्या आहेत का ? दारू पिवून कधी अपघात झाला आहे का ? दारू वरून पती -पत्नीत भांडणे होतात का ? असे प्रश्न आल्यावर मी जरा सावध झालो ..वाटले आता हा जरा जास्त खाजगी माहिती विचारतोय ..मी सगळ्यांना नकारार्थी उत्तरे देत गेलो ..क्षणभर तो थांबला ..माझ्याकडे पाहून मिस्कील हसला .." काय हो सगळ्या प्रश्नांना विचार न करता पटापट उत्तरे देत आहात ..जरा नीट आठवून उत्तरे द्या " मी जरा वरमलो .." त्यात आठवण्यासारखे काय आहे ?..मी जे आहे ते सांगतोय " असे म्हणून सारवासारव केली ..मग तो म्हणाला " ही माहिती समुपदेशकाच्या अभ्यासासाठी असते ...तुमचे दारूमुळे कोणकोणत्या पातळीवर नुकसान होतेय हे समुपदेशकाला समजते ..तुम्हाला चांगले समुपदेशन करण्यासाठी त्याला या माहितीचा उपयोग होतो .. म्हणून खरी आणि योग्य उत्तरे दिलीत तर तुमचाच फायदा आहे " मी समजल्या सारखी मान हलवली ..मग लक्षात आले की काही प्रश्नांची उत्तरे मी धादांत खोटी दिली होती ...ऑफिस मध्ये काही मित्रांकडून मला अनेक वेळा उसने पैसे घ्यावे लागले होते ..काहींचे परत करणे बाकी होते ..एकदा अलकाला न सांगता तिच्या पर्स मधील पैसे मी काढले होते ..दोन वेळा दारू पिवून बाईक चालवताना माझा कंट्रोल सुटून एकदा दुभाजकाला तर एकदा एका रस्त्यावरून चालणाऱ्या मुलाला माझा धक्का लागला होता ..मी पटकन तेथून पोबारा केला होता ..म्हणून वाचलो होतो ..पत्नीशी अगदी जोरदार भांडणे ..मारहाण असे प्रकार घडले नव्हते तरी बरेच वेळा माझ्या पिण्यावरून अलका मला बोलली की मला खूप राग येई ..रागाच्या भरात मी नको ती बडबड करी ..तिचाही राग अनावर होई ..मुले बिचारी भांबावून आमच्या दोषांकडे पाहत असत ..या भांडणाचा शेवट ..तिची माहेरी निघून जाण्याची धमकी ..आणि जा निघून ..माझे तुझ्यावाचून अडले नाही अजिबात या माझ्या बेफिकीर घोषणेत होई ..मग तीनचार दिवस तिचा अबोला असे ..हे सगळे आठवल्यावर मी त्याला काही उत्तरे दुरुस्त करून घ्यायला लावली ...माझ्या हातावर हात ठेवून तो आश्वासक हसला .

पुढे पत्नीशी शारीरिक संबंध सुरळीत आहेत का ? शारीरिक संबंध ठेवण्यात काही अडचण येते का ? असे प्रश्न आल्यावर मी पुन्हा अंतर्मुख झालो ..या प्रश्नांची उत्तरे देवू नयेत असे वाटले ..लग्न झाल्यावर अगदी सुरवातीच्या काळात आमचे सहजीवन म्हणजे आनंदसोहळा होता ..अधून मधून दारू पीत होतोच ..तरीही फारशी अडचण येत नसे ..फक्त माझ्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने मळमळल्या सारखे वाटते ..अजिबात तुमच्या जवळ येवू नये असे वाटते असे अलकाने बोलून दाखवले होते ..मी मात्र त्याच्या कडे दुर्लक्ष करत असे ..माझे पिण्याचे प्रमाण वाढल्यावर अलका माझ्या जवळ येण्यास अजिबात उत्सुक नसे ..एकतर दिवसभर घरातील कामे ..मुलांचे सगळे करताना तिची खूप दमछाक होई ..शिवाय मी पिवून आलो की तिच्या चेहऱ्यावर सतत फक्त मलाच जाणवणारी एक अढी असे ..मग कसला प्रणय न कसले काय ? ..पुढे पुढे मी याबाबतीत बेफिकीर होत गेलो ..तिच्या कपाळावरील अढीकडे दुर्लक्ष करायला शिकलो ..मला हवे ते हक्काने वसूल करत गेलो ..तिचा प्रतिसाद माझ्या दृष्टीने नगण्य होता ..किवा कधी जाणवलेच तर मी त्याची पर्वा केली नाही ..अनेकदा महिनोंमहिने आमची जवळीक होत नसे ..हे सगळे आठवले तसा मी अंतर्यामी हादरलो ..गेल्या अनेक दिवसात पत्नी पत्नी म्हणून आमचे नाते लोकांसाठी आणि मुलांसाठी होते ..बाकी सगळा आनंदी आनंद ..अनेकदा इच्छा असूनही योग्य प्रकारे शारीरक संबंध प्रस्थापित करू शकलो नव्हतो ..याला कारण दारू असे अलका म्हणे ..मात्र मी इतर करणे पुढे काढून तिची समजून घालत असे ..तर वाटले काही वेळा तर अलकाच्या इच्छेविरुद्ध केवळ दारूच्या उत्तेजनेत आणि आक्रमक अविर्भावात मी बलात्कार तर केला नव्हता !

( बाकी पुढील भागात )

Saturday, November 23, 2013

व्यायाम

किती वेळ झाला असावा कळेना ..कोणीतरी मला दुरून हाक मारत असल्यासारखा आवाज आला ..मी पटकन डोळे उघडून पहिले ..माझ्या बाजूला शेरकर काका उभे राहून मला हाक मारत होते ...उठून बसलो ..काय झाली का झोप ? त्यांनी मिस्कीलपणे विचारले ..मी खजील झालो ..सर शवासनाच्या सूचना देत असताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही ..' होते असे ..अहो बाहेर खूप दिवस आपण दारू पिवूनच झोप काढली होती ..ती काही खरी झोप नव्हती .फक्त गुंगी असायची ..इथे दारू नसताना शरीर आपोआप राहिलेली झोप अशी मधूनच पूर्ण करून घेते . ..चला चहा घ्यायला लाईनीत ' असे म्हणत काकांनी माझ्या हातात एक ग्लास दिला ..चहा घेत गप्पा मारत बसलो ..दोन दिवसातच जरा हुशारी आल्या सारखे वाटत होते...सगळे जण चहा पीत गप्पा मारत होते ..दोन जण आमच्या बाजूलाच बसून बिस्किटाचा पुडा फोडून चहा बरोबर बिस्किटे खात होते .. माँनीटर तेथे जाऊन उभा राहिला आणि त्यातील एकाला रागावू लागला ..' सुनील काय रे उपोषण करणार होतास ना तू ? आता का खातो आहेस बिस्किटे ? संपली का ताकद तुझी ? ' ..सुनील नावाचा तो सधारण विशीचा मुलगा एकदम वरमला ..त्यांनीच मला बोलावले असे सांगू लागला ..मला कळेना इतक्या सध्या गोष्टीवरून माँनीटर सुनीलला का रागावला ..मला सुनीलची दया आली .. माँनीटर माझ्याकडे वळून म्हणाला ..अरे हो ..तुम्हाला सांगायचे राहिले ..या सुनीलला तुमच्याकडील काही खाण्याच्या वस्तू मागितल्या तर देवू नका अजिबात ' मग पुढे म्हणाला ' परवा याच्या घरची मंडळी भेटायला आली होती तेव्हा ..हा घरी घेवून चला म्हणून त्यांच्या कडे हट्ट करत होता ..त्यांनी ऐकले नाही ..म्हणून रागावून याने त्यांनी आणलेल्या खायच्या वस्तू फेकल्या ..त्यांना धमकी दिली की मला आज घरी नेले नाही तर मी आजपासून अन्न पाणी ग्रहण करणार नाही अशी ..बिचाऱ्याची आई काळजीने रडतच घरी गेली ..कसले उपोषण न कसले काय ..इथे मिळणारे जेवण जेवत नाहीय ..मात्र कालपासून सगळ्यांकडे बिस्किटे ..फळे वगैरे त्यांच्या घरून आलेल्या वस्तू फस्त करत बसलाय नाटकी आहे खूप ....मागच्या वेळी असाच धमक्या देवून उपचार पूर्ण न करताच घरी गेला ..लगेच दुसर-याच दिवशी दारू प्यायला कारण काय तर म्हणे ..मित्राने आग्रह केला ..' ..मलाही सुरवातीला इथे आणले म्हणून अलकाचा राग आला होता ..मात्र नंतर जे होतेय ते माझ्याच भल्यासाठी हे मला समजले तेव्हा माझा राग निवळला होता ..सुनीलला अजूनही इतकी साधी गोष्ट समजल नाही याचे मला नवल वाटले .सुनीलकडे मी पहिले तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि निघून गेला ..' निर्लज्ज आहे भलता ' असे म्हणत माँनीटर देखील निघून गेला .
घडयाळाकडे पहिले साडेपाच वाजत आले होते ..खिडकीशी जावून उभा राहिलो ..बाहेर आकाशात ढगांनी गर्दी केली होती ..बहुतेक पाउस पडणार अशी चिन्हे वाटली ...ढगाळलेले वातावरण पाहून मनात आले अशा वेळी मस्त हातात ग्लास घेवून खिडकी बाहेर निसर्ग बघत दोन पेग घ्यायला मस्त वाटेल ..मी गमतीने बाजूला उभ्या असलेल्या शेरकर काकांना तसे म्हंटले ..त्यांनीही हसून टाळी दिली मला ..गम्मत अशी की आम्ही दोघेही व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासठी दाखल होतो ..मात्र दारूचे विचार मनात होतेच ..मी भानावर येवून खिडकी जवळून दूर झालो ..चार जण हॉल मध्ये कँरम खेळत होते तेथे जाऊन बसलो ..छान रंगला होता खेळ ..एक बोर्ड झाल्यावर एकाने उठून मला खेळायला जागा दिली ..मी पण उत्साहाने बसलो ..पूर्वी कॉलेजमध्ये असताना मी छान खेळत असे ...गेल्या दहा बारा वर्षात अजिबात हात लावला नव्हता कँरमला ..बोर्ड घरातच कुठेतरी कोपर्यात धूळ खात पडला होता ..पहिला बोर्ड मला अवघड गेला ..अजिबात एकही सोंगटी घातली नाही मी ..जरा जोरात मारले जाई किवा एकदम हळू ..माझा पार्टनर मात्र समजूतदार वाटला ..मी एकही सोंगटी घेतली नाही तरी मला काही बोलला नाही ..उलट ' बहोत दिन के बाद खेलनेसे ऐसाही होता है ..म्हणत मला प्रोत्साहन देत गेला ...तीनचार बोर्ड खेळून बेल वाजल्यावर सगळे उठलो ..पुन्हा सतरंजी घातली गेली ..सगळे मांडी घालून बसले ..आता प्राणायाम आहे ..बाजूलाच येवून बसलेल्या शेरकर काकांनी माहिती पुरवली ..
प्रार्थना घेतली गेली ..मग शरीर संचालन नावाचा प्रकार सुरु झाला ..दोन्ही पाय पुढे पसरून पावले मांडीपासून चारपाच वेळा घोट्यातून डावीकडे आणि नंतर उजवी कडे फिरवायला सांगितले गेले ...दोन्ही हात मागे टेकून मी बाकीचे लोक कसे करतात ते पाहत ते करत गेलो ..मग दोन्ही पाय एकत्र जोडून पावले पुन्हा तशीच घोट्यातून चारपाच वेळा डावीकडे ..उजवीकडे फिरवून झाले ..छान वाटत होते ..पायाच्या सगळ्या शिरा ..सांधे मोकळे झाल्यासारखे वाटत होते ..मग हात समोर ताठ धरून दोन्ही हाताच्या मुठी तशाच डावीकडे ..उजवीकडे फिरवल्या ..मग हात कोपरातून वाकवून खांद्याजवळ आणण्याचा व्यायाम झाला ..शेवटी मान एका डाव्या खांद्याजवळ ..एकदा उजव्या खांद्याजवळ असे चार पाच वेळा झाले ..मग खाली मान वाकवून ती पुढून मागे फिरवून पुन्हा पुढे आणायला सांगितले ..सर्व सूचना दिल्या जात होत्या तसे करत गेलो ..
( बाकी पुढील भागात )

Sunday, May 26, 2013

योगा ...हमसे नही होगा !

दुपारचे जेवण आटोपून सगळे जरा विश्रांती घेत होते ..आता मला चांगली भूक लागू लागली होती .. पहिले दोन दिवस पोटात दारू नसल्याने काही खाण्याची इछाच नसे .. मळमळत होते ..मात्र आता बहुतेक शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा .. बहुतेक जण विश्रांतीच्या मूड मध्ये होते .. काही तरुण मुले कोपऱ्यात भिंतीशी बसून थट्टा मस्करी करीत होते ..शेरकर काका तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने त्यांच्यात सामील झाले होते ..दोन जण बुद्धिबळाचा पट उघडून डोके लावत बसलेले ..तर चार जण कँरम भोवती .. एकंदरीत चांगले खेळीमेळीचे वातावरण झालेले .. माझा जेमतेम डोळा लागत होता तोच पुन्हा एकदा ती कर्कश्श बेल वाजली .. माझ्यासारखे नवखे धडपडून उठून बसले ..आता योगाभ्यास होणार होता असे कळले ..माझा व योगाभ्यास यांचा छत्तीस चा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो .. इथे मात्र सर्वाना योगाभ्यास करणे सक्तीचे होते .. नाईलाजाने मी जरा मागेच बसलो .. योगाभ्यास घ्यायला आलेले सर ..अंगाने किडकिडीत होते ..चेहऱ्यावर मात्र प्रसन्नता होती .. त्यांनी सर्वाना अभिवादन केले .. तिकडे माँनीटर योगाभ्यास बुडविण्यासाठी नेमक्या वेळी लघवी..संडास वगैरे निमित्ताने बाथरूम मध्ये जावून बसलेल्या चुकार लोकांना शोधून बाहेर काढून ..हॉल मध्ये आणून बसवीत होता .. एकंदरीत आठदहा लोक योगाभ्यास चुकविण्याच्या मागे होते ...सरांना ते माहित असावे ..सरांनी त्यांना सर्वाना पुढच्या रांगेत बसविले .. मग ' योगेन चित्तस्य ..' अशी प्रार्थना म्हंटली ..' मित्रांनो आज आपण आधी योगाभ्यासाबद्दल नीट माहिती घेवूयात ..म्हणजे सर्वाना व्यसनमुक्ती केंद्रात योगाभ्यास का घेतला जातो याचे कारण कळेल ..तसेच मन लावून योगाभ्यास करण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल .. ' सरांनी पुढे एक प्रश्न विचारला ' योग ' म्हणजे काय ? ' आम्ही सर्व मख्खपणे त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिलो .


' चला ..कोणीच उत्तर देत नाहीय असे दिसतेय .. ' योग ' म्हणजे दोन गोष्टींचे एकत्र येणे असे म्हणता येईल .. संस्कृत मधील ' युज ' या शब्दापासून योग हा शब्द आलाय ..इथे शरीर आणि मन यांचे एकत्र येणे या अर्थाने ' योग ' हा शब्द वापरला जातो ..एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शरीर आणि मनाची एकाग्रता ..संतुलन ..अतिशय महत्वाचे असते .. व्यसनमुक्ती केंद्रात यावे लागणाऱ्या व्यक्तीचे मन अतिशय चंचल असते हे गृहीत आहे .. अनेक वेळा मनाने या पुढे दारू प्यायची नाही ..असे ठरवूनही ..शारीरिक ओढीमुळे आपण दारू प्यायलो आहोत ..आणि काहीवेळा शारीरिक त्रास होत असताना ..दारू पिणे शरीरीला झेपणार नाही हे ठावूक असताना देखील मन दारूकडे ओढ घेते म्हणूनही आपण दारू प्यायलो ..थोडक्यात सांगायचे तर आपण ठरविलेल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी शरीर मनाचे एकत्र येणे आवश्यक होते ..मात्र ते आपल्याला जमले नाही .येथे योगाभ्यास करून सगळ्यात आधी आपण शरीर मन एकाग्र करण्याचे शिकणार आहोत ..यासाठीच योगाभ्यास बहुधा डोळे मिटून केला जातो ..म्हणजे डोळे मिटून शरीराच्या विशिष्ट हालचाली करणे ..विशिष्ट आसने करणे ....ज्यामुळे आपले स्न्यायु ..सांधे ..पचन संस्था ..मेंदूची ग्रहणशक्ती ..मज्जा संस्थेची कार्ये यांना बळकटी मिळेल ... व्यसनाधीनतेमुळे अनेक वर्षे आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे .. योगाभ्यास करून आपण शरीर आणि मन निरोगी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .. योगाभ्यास हा फक्त ज्यांना साधू संन्यासी व्हायचेय ..मोठे योगी बनायचेय त्यांनीच करायचा असतो हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे ..अष्टांग योग ..ध्यान साधना ..समाधी वगैरे अवस्था अगदी पुढील पायऱ्या आहेत .. इथे तसे काही नसणार आहे तर फक्त आपले शरीर आणि मन बळकट करण्यासाठी हलकी आसने आपण करणार आहोत ..अगदी प्रत्येकाला सहज शक्य होतील अशी आसने इथे घेतली जातील तेव्हा कंटाळा न करता एकाग्रतेने योगाभ्यास करणे आपल्या व्यसनमुक्ती साठी खूप फायदेशीर ठरेल 


सर सांगत असलेली माहिती मला नवीन होती ..माझे गैरसमज दूर व्हायला त्यामुळे मदत झाली .. पुढे सर म्हणाले इथे घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक आसनांचे फिशिष्ट फायदे आहेत ते मी वेळोवेळी सर्वाना सांगीनच .. सध्या इतकेच सांगतो की ' योगा मेक्स यु ..हेल्दी ..हँप्पी ..अँड क्रियेटीव्हली इफिशियंट ' सरांनी याचा मराठीत पुन्हा अर्थ सांगितले ..योगामुळे तुम्ही निरोगी ..आनंदी ..आणि सृजनात्मक शक्ती प्राप्त करू शकाल .. सरांचे बोलणे माझा उत्साह वाढवणारे होते .. चला काही फायदे होवोत की न होवोत .. आपण करून पाहायला काय हरकत आहे ...मग सरांनी सर्वाना डोळे मिटून उताणे झोपायला सांगितले .. हात शरीराच्या बाजूला ठेवा .. मान सरळ किवा सोयीस्कर वाटेल तशी एका बाजूला कलती ठेवा .. डोळे हलकेच मिटलेले .. सगळे शरीर सैल सोडा ..शरीरात कोठेही कसलाही ताण जाणवणार नाही अश्या अवस्थेत पडून रहा .. आपण आता शरीर मनाला उत्तम विश्रांती देणारे आसन करणार आहोत .जे दिसायला अगदी सोपे आहे मात्र योग्यप्रकारे करण्यास अवघड आहे ..ज्याला सर्व आसनांचा ' राजा ' संबोधले जाते असे ' शवासन ' करणार आहोत ..सर सांगत होते त्यापद्धतीने मी उताणा झोपलो ..डोळे मिटले .. सरांचा आवाज दुरून ..खोल जागेतून आल्यासारखा वाटत होता .. !


( बाकी पुढील भागात )