Friday, April 4, 2014

मानसोपचारतज्ञ ..औषधांचा नकार


मानसोपचारतज्ञ ..औषधांचा नकार ( भाग १९ वा  )

माँनीटरने आपले बोलणे संपवले तसे सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..त्याने प्रामाणिक पणे स्वतच्या चुका सांगत ..सुधारणेकडे जाण्यासाठी काय काय गरजेचे आहे ते सांगितले होते ..त्याचे बोलणे ऐकून मलाही वाटले मी देखील ' भाग्यवान ' आहे ..कारण निसर्गाने मला कोणतेही व्यंग न देता जन्माला घातले ..माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे पालक मला मिळाले ..माझे शिक्षण ..माझा सांभाळ त्यांनी योग्य पद्धतीनेच केला होता ..आपल्या कर्तव्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नव्हती ..पत्नीनेही नेहमी मला समजूनच घेण्याचा प्रयत्न केला होता ..जेव्हा माझे पिण्याचे प्रमाण वाढले ..आर्थिक समस्या येवू लागल्या .माझ्या शारीरिकतेवर ..इतर वर्तनावर परिणाम होऊ लागला ..तेव्हाच तिने मला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता ..मला इथे दाखल करून तिने एकप्रकारे माझ्यावर उपकारच केले होते ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात आपल्याला अडकवले गेले आहे ..इथे माझ्या मनाविरुद्ध मला ठेवले गेले आहे ही भावना व्यर्थ होती ..त्यापेक्षा सावरण्यासाठी मला मदत केली जातेय ..म्हणून मी ' भाग्यवान ' आहे असे मला वाटू लागले .

मिटिंग संपल्यावर सर्वाना एका जागी बसवून औषध वाटप सुरु झाले ..मी माझा नंबर येण्याची वाट पाहत होतो ..माँनीटर आणि त्याचे सहकारी दोन डबे उघडून बसले होते ..त्यात एकेकाच्या नावाची प्लास्टिकची पाकिटे ठेवलेली होती ..त्यातून एकेकाचे नाव पुकारून गोळ्या देण्याचे काम सुरु होते ..प्रत्येकाचा हातावर पाकिटातील गोळ्या दिल्यावर तो गोळ्या खातोय की नाही यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाई ..एकाने गोळ्या तोंडात टाकल्या आणि वर तेथे ठेवलेल्या बाटलीतले पाणी प्यायले ..तो जायला निघाला तसे त्याला माँनीटरने अडवले ..त्याचे हात तपासले ..तेव्हा लक्षात आले की त्याने शिताफीने एक गोळी हाताच्या बोटांमध्ये लपवून ठेवली होती ..त्याला पुन्हा गोळी खायला सांगितले गेले ..कुरबुर करत त्याने ती गोळी घेतली..असे गोळ्या लपवणारे दोन तीन जण निघाले..सर्वांचे गोळ्या घेवून होई पर्यंत कोणीही जागेवरून उठायचे नाही अशी कडक सूचना दिली होती माँनीटरने..एक दोन जण तरीही गोळी तोंडात टाकल्यावर बाथरूम कडे जायला निघाले ..त्यानाही अडवले गेले ..त्यांचे तोंड तपासले गेले ..त्यांनी गोळ्या न गिळता तशाच तोंडात धरून ठेवल्या होत्या ..बाथरूम मध्ये जाऊन गोळ्या थुंकून टाकण्याचा त्यांचा डाव फसला ... हे लोक स्वत:च्या बरे होण्यासाठी आवश्यक असणारी औषधे घ्यायला कुरकुर का करतात ते मला समजेना ..या बाबत नंतर माँनीटरला मी विचारलेच ..गोळ्या वाटप करताना इतके लक्ष का ठेवावे लागते ? .

त्याने सांगितलेले कारण ऐकून मला नवल वाटले ..तो म्हणाला या इथे उपचारांना दाखल असलेले सगळेच लोक गंभीरपणे उपचार घेतातच असे अजिबात नाही ..काहीना अजूनही आपण व्यसनी आहोत हे मान्य नाहीय ..काहीना असे उपचार घेवून दारू सुटते यावर विश्वास नाहीय .. काही असेही आहेत की ज्यांना मुळातच स्वतचे भले समजत नाही ..तर काही जण मानसोपचार तज्ञ ..औषधे या बाबत अनेक गैरसमज बाळगून आहेत ..
खरेतर जसे प्रत्येक व्यक्तीला काही शारीरिक दुखणी उद्भवतात तसेच काही मानसिक दुखणी देखील असतात ..ज्यात सातत्याने निराशा वाटणे ..वैफल्यग्रस्त वाटणे ..जगात आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटून सतत खंत करत राहणे ..कधी खूप उत्साही वाटणे..तर कधी एकदम शक्तिपात झाल्यासारखे वाटणे ..एका अनामिक भीतीने ग्रस्त असणे ..सतत चिंता करत राहणे ..भावनिक असंतुलना मुळे सतत चिडचिड करणे ..तणावग्रस्त राहणे अशी काही भावनिक आजाराची लक्षणे असतात ..तसेच व्यसन केल्यामुळे देखील व्यसनांचे दुष्परिणाम म्हणून काही मानसिक विकार उद्भवतात ..ज्याबाबत योग्य उपचार करणे आवश्यक असते ..काहीवेळा समस्या नीट उलगडून सांगून ..समुपदेशन करून तात्पुरते बरे वाटते अशा व्यक्तीला .. कायमचे बरे होण्यासाठी काही औषधे मदत करतात ..मात्र समाजात अजूनही मानसोपचार तज्ञ म्हणजे ' वेड्यांचा डॉक्टर ' वाटतो ..जे लोक डोक्यावर ठार परिणाम होऊन दैनंदिन कामे करू शकत नाहीत ..जे रस्त्यावर निरुद्देश भटकत असतात ..स्वतःशीच बोलतात ..हातवारे करून हवेशी भांडतात ..ज्यांना कपड्याचे भान नसते ..ते वेडे ' असा समज बाळगून काही जण " मी कुठे तसा करतो " म्हणून आपल्याला काही मानसिक समस्या असल्याचे साफ नाकारतात ..मानसोपचार तज्ञांची मदत घेत नाहीत ..नकळत स्वतचा मानसिक विकार जपतात ..वाढवतात ..अशा लोकांवर त्यांनी गोळ्या घ्यावे म्हणून लक्ष ठेवावे लागते ...ठार वेडे होऊन भटकणे ही मानसिक विकाराची अंतिम किवा टोकाचे नुकसान झाल्याची अवस्था असू शकते ..जर त्या आधीच सावधगिरी बाळगली तर चांगलेच असते ते या लोकांना समजत नाही ..तसेच मानसोपचार तज्ञांच्या औषधांमुळे काही ' साईड इफेक्ट्स ' होतील अशी भीती असते यांना ..उदा ..लैंगिक उत्तेजना न येणे ..सतत आळस वाटणे ..खूप झोप येणे वगैरे ..परंतु हे सर्व गैरसमजच आहेत ...मानसोपचार तज्ञ काही अपाय होणार नाहीत हे पाहूनच गोळ्यांचा डोस ठरवत असतात ..मात्र मुळातच संशयी स्वभावाची ..हट्टी ..जिद्दी ..स्वतःचेच खरे समजणारी माणसे मानसोपचार तज्ञांना सहकार्य करू शकत नाहीत ..म्हणून आम्हाला असे लक्ष ठेवावे लागते . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment