Friday, May 2, 2014

रोजचा दिनक्रम !


रोजचा दिनक्रम !( बेवड्याची डायरी - भाग ३६ वा ) 

सरांनी ' फक्त आजचा दिवस ' मधील पुढील सूचना फळ्यावर लिहिल्या होत्या ..

७ ) आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरी मी तसे दर्शवणार नाही .

८ ) फक्त आजचा दिवस मानसिक व्यायाम म्हणून मी स्वतःला न आवडणाऱ्या दोन तरी गोष्टी करेन .

९ ) फक्त आज मी स्वतःसाठी एक दिनक्रम आखेन ..तंतोतंत पाळला गेला नाही तरीही मी दिनक्रम आखेन .

व्यसनी व्यक्ती त्याच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे सतत स्वतःच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करत असतो ..त्याला त्याच्या वर्तनाने आसपासच्या इतर लोकांना काय त्रास होतोय याची परवा नसते ..प्रत्येक क्षणी आपण कोठे आहोत ? काय बोलतो आहोत ? काय करतो आहोत ? याचे आपण भान ठेवणे गरजेचे आहे ..अनेकदा आपण आई -वडील , भावंडे , पत्नी -मुले , यांच्याशी इतके दादागिरीचे ..आक्रमक ..त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करतो ..त्यांचे आपल्यावरील प्रेम ..त्यांचा अधिकार समजून न घेता अनेकदा आपण तोंडाचा पट्टा सोडतो ..त्यांना घायाळ करतो ...वेगवेगळे आरोप करून त्यांना चूप बसवतो ..या वर्तनाने त्याच्या भावना दुखावल्या जातात ..त्यांचे आपल्यावर कितीही प्रेम असले तरी आपण केलेल्या अपमानाने त्यांना त्रास होतोच ..या उलट आपण स्वतच्या भावना मात्र खूप जपतो ..कोणी आपल्याशी काही वावगे बोलल्यास लगेच विचार न करता तिखट प्रतिक्रिया देतो ..समोरच्या व्यक्तीच्या वयाचा ..मानाचा..सामाजिक स्थानाचा ..कसलाही मागचा पुढचा विचार न करता दुरुत्तरे करतो .. ..आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे लगेच जाहीर करून ..बहुधा त्याचे कारण पुढे करून व्यसन करतो ..हे कितपत योग्य आहे ? इतरांची मने जपणे व स्वतःची सहनशीलता वाढवण्यासाठी ही ' आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरीही तसे वर्तन करणार नाही ' ही सूचना केली गेलीय .

पुढच्या सुचने बाबत सांगताना सर म्हणाले ..व्यसनी व्यक्ती हा स्वताच्या आवडी -निवडी बाबत खूप दक्ष असतो ..अनेक गोष्टी करायला त्याला आवडत नाही ..त्या गोष्टी कितीही उपयोगाच्या असल्या तरी तो त्या गोष्टी करण्याचा कंटाळा करतो ..किवां त्या करणे पुढे ढकलत जातो ..उदा . सकाळी लवकर उठणे , नियमित नियमित योगाभ्यास करणे , घरातील जवाबदारीची कामे करणे ज्यात ..सामान आणणे ..घरचा गॅस सिलेंडर संपल्यास तो घेवून येणे ...वीजबिले भरणे ..कुटुंबीयांसोबत फिरायला जाणे ..पत्नीसोबत खरेदीला जाणे..घरातील वृद्ध माणसाना मदत करणे ..पत्नीला घरकामात मदत करणे ..स्नेही नातलग यांना अधूनमधून भेटी देणे ...लग्न समारंभ ..तसेच नातलगांच्या कार्यक्रमात सहभागी होणे ..पत्नीच्या नातलगांशी सलोखा ठेवणे ..अशा अनेक गोष्टी करणे आपण व्यसनांच्या काळात करणे टाळले आहे ..आता व्यसनमुक्तीचे जीवन जगात असताना या टाळलेल्या अथवा नावडत्या गोष्टी करणे गरजेचे आहे ..त्यामुळे आपली व्यसनमुक्ती बळकट होते ..तसेच कुटुंबीय व समाजाचा गमावलेला विश्वास परत मिळवता येतो .

शिस्तबद्ध व उपयुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने रोज स्वतःसाठी एक दिनक्रम आखणे गरजेचे असते ..आपल्या जवाबदा-या ..कर्तव्ये ..या खेरीज फावला वेळ कसा उपयुक्ततेने व्यतीत करता येईल असा हा दिनक्रम असावा ज्यात आपले शारीरिक आरोग्य ..मनोरंजन ..आपले छंद जोपासण्यासाठी देखील वेळ दिला गेला पाहिजे ..पूर्वी आपण समोर येईल तसे आयुष्य जगत गेलो ..वाट्टेल तसे वागलो ..नेमका चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिकण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही ..आता व्यसनमुक्त जीवन जगत असताना आळशीपणा ..कंटाळा ..बोर होणे ..वगैरे गोष्टी टाळून एका विशिष्ट दिनक्रमानुसार जीवन व्यतीत केले तर ..आपले झालेले बहुतेक नुकसान लवकर भरून काढता येवू शकते ...वेळ सत्कारणी लावता येतो ..आपण आखलेला दिनक्रम कधी कधी तंतोतंत पालन करणे आपल्याला काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नाही ..मात्र त्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडून न देता आपण नियमित दिनक्रम आखून तो पाळण्याचा प्रयत्न सोडता कामा नये ..

वरील स्पष्टीकरण झाल्यावर सरांनी आम्हाला प्रश्न दिला .. तुम्ही इथे राहत असताना ...येथील थेरेपीज च्या वेळा सोडून इतर वेळी काय काय करायचे ? याचा एक दिनक्रम ठरवून तो डायरीत लिहा . 

( बाकी पुढील भागात ).

झडती..कडक तपासणी !


झडती..कडक तपासणी !( बेवड्याची डायरी - भाग ३५ वा )


सकाळी प्रार्थनेच्या वेळीच माॅनीटरने जाहीर केले की आता प्रार्थना झाल्यावर सर्वांनी आपापल्या लॉकर मधून ताबडतोब चहाचे ग्लास काढून घेवून ..आपल्या लॉकरची किल्ली इथे कार्यकर्त्याकडे जमा करायची आहे ..आज सर्वांच्या लॉकरची तपासणी करणार आहोत आम्ही ..हे ऐकून सगळ्याचा आश्चर्य वाटले ..काहीजण कुरबुर करू लागले ..हे काय नवीन लफडे ? आम्ही काय चोर आहोत का ? वगैरे चर्चा सुरु झाली ..एकंदरीत सर्वाची या प्रकाराबद्दल नाराजी दिसली ..कोणीतरी म्हणाले की वार्डात कोणीतरी ब्राऊन शुगर लपवून आणली आहे अशी ' खबर ' आहे म्हणून ही झडती घेण्याचे काम सुरु आहे ..मात्र सगळ्यांनी चहाचे ग्लास काढून घेवून किल्ली दिली कार्यकर्त्याच्या ताब्यात ..चहा घेवून झाल्यावर मग माॅनीटर आणि त्याचे साथीदार एकेका लॉकर जवळ जावून ..ज्याचा लॉकर आहे त्याला सोबत घेवून त्याच्या समक्ष त्याच्या लॉकरची तपासणी करू लागले ..कुतूहलाने आम्ही सगळे गर्दी करून कोणाच्या लॉकरमधून काय निघते हे पाहत होतो ..सुमारे तासभर हा प्रकार चालला ..जेमतेम आठ दहा लॉकर असे निघाले ज्यात कपडे ..तेलाची छोटीशी बाटली ..लोणच्याची बाटली ..इतर सटरफटर वस्तू नीट व्यवस्थित ठेवलेल्या होत्या ..बाकी बहुतेक लॉकर मध्ये या सर्व वस्तू कोंबल्यासारख्या भरलेल्या आढळल्या ..शेरकर काकांचा लॉकर उघडताना मजा आली ..ते लॉकरची किल्ली देण्यास कुरकुर करत होते ..त्यांच्या लॉकर मधून इतर सामानासोबातच खोबरेल तेलाच्या रिकाम्या झालेल्या आठदहा प्लास्टिकच्या बाटल्या ..दहा पंधरा चमचे .. आंघोळीचे अर्धवट वापरलेले चारपाच साबण ..दोन तीन हातरुमाल ..भांडी ड्युटीसाठी किचन मध्ये गेले असताना कोणाच्याही नकळत तेथून उचलून आणलेले आठदहा कांदे ..मिरच्या ..असा इतर अनधिकृत ऐवज सापडला ..एकाच्या लॉकर मध्ये मासिके आणि वर्तमान पत्रातून फाडून घेतलेले सिने अभिनेत्रींचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले ..हे कशाला इथे ? असे विचारल्यावर तो खजील झाला ..दुसऱ्या एकाच्या लॉकरमध्ये त्याच्या सामानाखेरीज ..इतरांच्या चारपाच अंडरवेअर..दोन तीन बनियन ..अर्धवट लिहिलेल्या डायऱ्या.. डझनभर पेन ..असा माल सापडला ..त्या वस्तू बाहेर पडताच आमच्यातील चारपाच जण ..अरे ही तर माझी अंडर्वेअर आहे ..हा बनियन माझा आहे असे ओरडू लागले .. झडती घेणार्यांना नेमका कशाचा शोध आहे ते आम्हाला समजत नव्हते ..एकाच्या लॉकर मध्ये किचन मधील चाकू सापडला ..कार्यकर्ते बारकाईने प्रत्येक लॉकरचा कोपरान कोपरा धुंडाळत होते ... एकाच्या लॉकर मध्ये शंभर रुपयांच्या दोन नोटा अगदी काळजीपूर्वक बारीक घडी करून लॉकर मध्ये घातलेल्या कागदाच्या खाली लपवून ठेवलेल्या आढळल्या ...झडतीचे सगळे काम पार पडल्यावर कार्यकर्त्यांनी अनिधिकृत असलेल्या वस्तू ताब्यात घेवून ..किल्ल्या दिल्या आम्हाला .

कार्यकर्ते बाहेर आफिसात निघून गेल्यावर ..आम्ही सगळे घोळक्याने चर्चा करत होतो ..समूह उपचारांची बेल वाजल्यावर सगळे बसले ..सरांनी समूह उपचारांना आत आल्याबरोबर ..लॉकर्सच्या झडती बद्दल दिलगिरी व्यक्त केली ...म्हणाले ..मित्रांनो ही अशी झडती घेतली म्हणून आपल्यातील अनेकांना राग येणे स्वाभाविक आहे ..मात्र वार्डात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे आवश्यक असते ..तसेच या निमित्ताने आपलं लॉकर नीट व्यवस्थित लावला गेला हा फायदा आहेच ..अशी झडती घेण्यामागे प्रमुख कारण हे होते की ..किचन मधून एक चाकू गायब झालेला आहे हे आमच्या लक्षात आले होते ..तसेच वार्डातील बऱ्याच लोकांच्या अंडरवेअर ..बनियन ..व काही इतर वस्तू गहाळ झाल्याच्या आमच्याकडे तक्रारी होत्या .. भांडी ड्युटीच्या निमित्ताने प्रत्येक जाण किचन मध्ये जात असतो ..तेथून कांदे मिरच्या लोक वार्डात उचलून आणत आहेत हे आढळले होते..सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता रविवारी पालक भेटायला आल्यावर एकाने पालकांकडून ..येथे मला बिस्किटे .चिवडा वगैरे विकत घ्यायला लागतात असे सांगून दोनशे रुपये मागून घेतल्याचे आम्हाला समजले होते ...येथे राहत असताना तुम्हा सर्वांच्या खिश्यात अजिबात पैसे नसावेत असा आमचा कटाक्ष असतो ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर आपल्याला इथे दारू ..अथवा इतर कोणतेही मादक पदार्थ सेवन करायला मिळत नाहीत ..मात्र या व्यसनांची मानसिक ओढ खूप तीव्र असल्याने .. अनेकदा असे मादक पदार्थ बाहेरून कोणाकडून तरी मागवता येतील का असा विचार काहींच्या डोक्यात सुरु असतो ..अनेकांनी बाहेर हॉस्पिटल मध्ये दाखल असताना वार्डबॉयला पैश्याचे आमिष देवून ...अथवा हॉस्पिटल मध्ये भेटायला येणाऱ्या मित्रांकडून व्यसने मिळवलेली आहेत ..काही लोकांच्या मनात येथून पळून जाण्याचे विचार सुरु असतात ..त्यांना येथील शिस्तबद्ध जीवन जगणे आवडत नाही ..इथे बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतात ..त्यातून सुटका करून घ्यावी असा बंडखोरीचा विचार करून ते टोळी बनवून ..कार्यकर्त्यांना दमदाटी करून पळून जाण्याच्या विचारात असतात ..अर्थात हा मोठा अविचार असतो ..कारण तुम्ही येथून पळून जाण्यात जरी यशस्वी झालात तरी ..तुम्ही शेवटी आपल्या घरीच जाणार ..आम्ही पुन्हा तुम्हाला घरून पकडून आणू शकतो हे विसरता कामा नये ..

व्यसनाधीनते मुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार उदभावू शकतात किवा काहीना व्यसनी होण्याच्या आधीपासून काही मानसिक विकार असू शकतात ..त्यात एक ' क्लँप्टोमॅनिया ' नावाचा आजार आहे ..ज्यात व्यक्ती इतरांचा डोळा चुकवून ...त्यांच्या वस्तू चोरून आपल्याकडे ठेवतात असे लक्षण आढळते ..खरे तर अनेकदा त्या वस्तू चोरणाऱ्या व्यक्तीच्या उपयोगाच्या नसतात ..किवा त्या उपयोगात आणल्यादेखील जात नाहीत ..तरीही विशिष्ट प्रकारच्या अशा वस्तू दिसल्यावर त्या व्यक्तीला आपलं ' हाताळपणा ' थांबविता येणे अशक्य होते ..यात वेगवेगळ्या प्रकरचे चमचे ..पेन्स ..हात रुमाल ..छोटे कपडे अश्या प्रकारच्या किरकोळ वस्तू असतात..आपण पहिले की एकाच्या लॉकर मधून आपल्याला एकाच्या लॉकर मध्ये झडती घेताना इतरांच्या अंडरवेअर ..बनियन्स ..डायऱ्या वगैरे आढळल्या ..अश्या वस्तू गहाळ करण्यामागे नक्कीच वाईट हेतू नसला तरी ..हे ' हाताळपण ' योग्य नसते ..त्यावर उपचार घेतले पाहिजेत ..कारण अशा छोट्या छोट्या मानसिक व्याधी देखील आपल्याला पुन्हा व्यसन करण्यास प्रवृत्त करू शकतात ..सर देत असलेली माहिती ऐकून झडती घेतल्याबद्दलचा सर्वांचा राग निवळत होता ..मग ही अशी झडती घेणे आवश्यक आहे हे आम्हाला पटले ..सरांनी ज्यांच्या ज्यांच्या लॉकर मध्ये अशा अनधिकृत वस्तू मिळाल्या त्यांना आम्ही काही शिक्षा करणार नाही आहोत ..मात्र त्यांनी या पुढे असे प्रकार करता कामा नयेत अशी ताकीद दिली ..एकाने प्रश्न विचारला ..सर पण एकाच्या लॉकरमध्ये नट्यांचे अर्धवट कपड्यातील फोटो सापडले आहेत ..त्याचे कारण काय ? हा कोणता आजार ? ..सर्व खिदळू लागले या प्रश्नावर ..ज्याच्या लॉकर मध्ये ते फोटो सापडले तो खाली मान घालून बसला होता ..सरांनी सांगितले ..ही जरा नाजूक बाब आहे ..लैंगिक संबंधांची ओढ ही पत्येक व्यक्तीच्या मनात असतेच ..मात्र सर्वाना ती इच्छा पूर्ण करता येणे शक्य नसते ... इथे तर नाहीच नाही ..ज्यांना लैंगिक तृप्तीचे अधिकृत मार्ग नाहीत असे लोक लैंगिक तृप्ती करता हस्तमैथुन करतात हे शास्त्रीय सत्य आहे ..मग लैंगिक उत्तेजनेसाठी हे असे फोटो ..अश्लील साहित्य ..पोर्नोग्राफिक फिल्मस वगैरेंचा उपयोग होतो ..अर्थात इथे इतर काही उपलब्ध होऊ शकत नाही ..म्हणून मासिकातले ..वर्तमान पत्रातले नट्यांचे फोटो कामी येतात ...सगळे पुन्हा हसू लागले .. सर पुढे म्हणाले इथे पुढे आपण लैंगिक समस्यांवर बोलणारच आहोत ..मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे लक्षात घेतले पाहिजे !

( बाकी पुढील भागात )

Saturday, April 26, 2014

परिस्थितीशी जुळवून घेणे !


परिस्थितीशी जुळवून घेणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ३४ वा )

मिलिंदच्या ' फक्त आजचा दिवस ' च्या केलेल्या विडंबनाचे कौतुक करत सर म्हणाले ..एक वैशिष्ट्य सांगितले जाते व्यसनी व्यक्तीचे ते हे की व्यसनी व्यक्तीची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र असते ..परंतु त्याला ही बुद्धिमत्ता योग्य पद्धतीने स्वतःच्या भल्यासाठी तसेच प्रगतीसाठी ..व्यसनमुक्तीसाठी ..वापरता येत नाही ..तर उलट तो ही अतिरिक्त बुद्धी नेमकी स्वता:च्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ..स्वता:च्या चुका लपवण्यासाठी वापरत असतो.. त्यामुळेच व्यसनमुक्त रहाणे त्याला अवघड जाते ..सरांनी मग पुढची सूचना चर्चेला घेतली ..' फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षानुसार बदलण्याऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थिती नुसार बदलण्याचा प्रयत्न करेन ' ...प्रत्येक व्यसनी हा नेहमी स्वताच्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करता यावे या मनोवृत्तीचे समर्थन करणारा असतो ..तो त्या साठी खूप आग्रही देखील रहातो ..मात्र या जगात कोणाच्याही मनासारखे सतत घडत नसते ...आसपासची माणसे ..परिस्थिती ..अनेकदा आपल्यासाठी अनुकूल नसतात ..त्यावेळी व्यसनी व्यक्ती पटकन निराश होतो ..वैफल्यग्रस्त होतो ..अथवा खूप संतापून संघर्ष करणे सोडून देतो ...व त्याच्यावर अन्याय होतोय असे समर्थन देवून पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो ..खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे ..अन्यथा सतत भांडणे ..कटकटी ..भावनिक असंतुलन ..या गोष्टींचा सामना करावा लागून आपण केलेला व्यसनमुक्तीचा निश्चय वारंवार डळमळीत होऊन व्यसन सुरु होते .

पुढची सूचना होती ...' फक्त आज माझ्या चंचल मनाला मी आवर घालेन ..स्वतःला उपयुक्त एखादी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन ' ही सूचना खरेतर प्रत्येक व्यक्तीला लागू पडते कारण चंचलता हा मनाचा स्थायीभाव आहे ..मन सारखे एका विचारतून दुसऱ्या विचाराकडे जात असते ..बहिणाबाई चौधरी यांनी ' मन वढाय वढाय ' या कवितेत मनाच्या चंचलतेचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे ..मन नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भोगांच्या विचारात लिप्त असते ..अशा ओढाळ मनाला जर लगाम घालता आला नाही तर माणसाची ' एक ना धड ..भराभर चिंध्या ' अशी अवस्था होणारच ..जिवनात यशस्वी व्हावे ..अधिकाधिक प्रगती करावी ..स्वताच्या आणि इतरांच्या सुखासाठी सतत प्रयत्न करावेत ..सर्वाना आनंद होईल असे वर्तन असावे ..असे सर्वांनाच वाटत असते ..मात्र सर्वाना ते करता येत नाही याचे कारण मनाची चंचलता हे आहे ..आपण जरी व्यसनमुक्तीचे ..चांगल्या जीवनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून येथे उपचार घेत असलो तरीही अनेकदा ..मनाच्या चंचलतेमुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होऊ शकतो ..मग कंटाळा येणे ..निराशा येणे ..कुटुंबियांची ..मित्रांची ..खूप आठवण होऊन येथून लवकरात लवकर बाहेर पडणे ..वगैरे प्रकारच्या विचारांनी मन अवस्थ होते ..तसे होऊ नये म्हणून मनाच्या चंचलतेला आवर घालणे अपरिहार्य आहे ..आपले व्यसनमुक्तीचे ..प्रगतीचे ..ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला मनाला कठोरपणे लगाम घालता आला पाहिजे ..चंचल मनाला ताळ्यावर आणण्यासाठी अथवा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण सर्व येथे योगाभ्यास व प्राणायाम करतोच आहोत ..मात्र हे आभ्यास प्रामाणिक पणे केले तरच ..शिवाय येथून बाहेर पडल्यावर देखील हे सुरु ठेवले तरच आपल्या मन ताब्यात ठेवणे शक्य होईल ...प्राणायाम करताना ' अनुलोम विलोम . अथवा ' दीर्घ श्वसन ' या प्रकारावर भर दिला तर नक्कीच हे साध्य होईल ...सर्वांनी घरी देखील हे केले पाहिजे ..काळ कोणासाठी कधीच थांबत नाही ..आपण आधीच आयुष्याची अनेक अनमोल वर्षे व्यसनाधीनतेत वाया घालवली आहेत ..तेव्हा आता वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे ..प्रत्येक क्षण मोलाचा आहे हे लक्षात घेवून ..आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी ..आरोग्यासाठी ..ज्ञान संवर्धनासाठी ..आपण वेळ दिला पाहिजे ..स्वतःला उपयुक्त अशा गोष्टी शिकण्याचा ...अभ्यासण्याचा प्रयत्न असला पाहिजे आपला ..उगाचच टिवल्याबावल्या ..टाईमपास ..फालतू बडबड ..नसते विचार करत बसण्यापेक्षा ..वेळेचा सदुपयोग केला पाहिजे .

सर हे सर्व बोलत असतांना एकाने प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला ..सरांनी त्याला अनुमती दिली ..तो उठून उभा राहत म्हणाला ' सर ..मला घरची खूप आठवण येतेय ..मला घरी कधी सोडणार ? ' त्याच्या या प्रश्नाने सर्व हसू लागले ..हा फालतू प्रश्न आहे असे म्हणत त्याच्या आसपासचे लोक त्याला खाली बसवू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..मग म्हणाले ..बघा हा मनाच्या चंचलतेचा उत्तम नमुना ..आपण आता इथे काय शिकतो आहोत याकडे याचे लक्षच नव्हते ..हा सतत इथून बाहेर कसे आणि केव्हा पडता येईल याच विचारात होता इतका वेळ ..असेच असते मनाचे ..ते आपले शरीर जेथे आहे तेथे न राहता शरीराच्या बाहेर पडून सर्व ठिकाणी जावू पहाते ..प्रत्येकाने ' आत्ता ..इथे ' हा विचार केला तर हे टाळता येते ..आपण आत्ता ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीचे उपचार घेत आहोत हे ध्यान्यात ठेवले पाहिजे ..आपले उपचार पूर्ण होताच इथून बाहेर जाता येईल हे नक्की ..त्यासाठी आपले कुटुंबीय आणि समुपदेशक निर्णय घेत असतात ..तेव्हा त्याबाबत आपण विचार करणे व्यर्थ आहे ..त्याएवजी आपण इथे का आहोत ? का यावे लागले ? याचा विचार केला तर इथले वास्तव्य नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरेल ..बाहेर असताना देखील आपण असेच चंचल होतो ..घरी असताना ..मित्रांचा विचार ..व्यसनाचा विचार ..ऑफिसचा विचार ..तर ऑफिसला गेल्यावर ..घरचा ..नातलगांचा विचार ..भविष्य काळातील समस्यांचा विचार ..किवा भूतकाळातील विचार ..हे सगळे सोडून ' आत्ता ..इथे ' हा विचार समोर ठेवला तरच चंचलता आटोक्यात ठेवता येईल .

( बाकी पुढील भागात )

Friday, April 25, 2014

बुद्धीचा गैरवापर !


बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी - भाग ३३ वा )

आज पहाटे गम्मत झाली ..नेहमीप्रमाणे बेल वाजली तसे आम्ही सर्व उठून बसलो ..वार्डच्या भिंतीवरील घडाळ्यात सहा वाजलेले होते ..पटापट उठून सगळे ..गाद्या..चादरी आवरून ठेवायला लागले ..रोज पहाटे बेल वाजवून उठवण्याचे काम ..माँनीटरने वार्ड मधील एका उत्साही मुलाला दिलेले होते ..हा सुमारे पंचविशीचा मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून येथे उपचार घेत होता ..खूप बडबड्या आणि उत्साही ..सकाळी उठण्याचा जे लोक कंटाळा करत ..किवा उठून पुन्हा काहीतरी आजारीपणाचे कारण सांगून झोपून राहत .. पी .टी. , योगाभ्यास , प्राणायाम अशा थेरेपीज करणे टाळत असत ..त्यांची नावे वहीत लिहून माँनीटर कडे देण्याचे काम या अशोककडे दिलेले होते ..एकप्रकारे तो माँनीटरचा मदतनीस म्हणून काम करत असे ..स्वभावाने तसा चांगलाच होता ..मात्र त्याचे हे कंटाळा करणाऱ्या लोकांची नावे माँनीटरला देणे अनेकांना पसंत नव्हते ..म्हणून काही नाठाळ लोक त्याला ' खबरी ' किवा ' चमचा ' म्हणत असत ..सगळे आवरून पी .टी. करायला उभे राहिले ..तितक्यात माँनीटर बाहेरच्या ऑफिसात जावून आला ..ऑफिसमधून वार्डात आल्या आल्या तो ' काय मूर्खपणा चाललाय हा ' असे ओरडला .. पी .टी . करणे थांबवायला लावले ..आम्हाला समजेना काय भानगड झालीय ते ..मग माँनीटर अशोकला म्हणाला ' अरे तू सर्वाना पहाटे सहा ऐवजी चारलाच उठवले आहेस ..मी आता बाहेरच्या घड्याळात पहिले तर तेथे साडेचार झालेत ' आम्ही पटकन वार्डातील घडल्यात पहिले तेथे साडेसहा वाजलेले ..सर्व चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..आपल्याला मूर्ख बनवले गेले आहे हे अशोकच्या लक्षात येवून तो खजील झाला ..मग माँनीटर ने सर्वाना विचारले ' खरे खरे सांगा ..हा प्रकार कोणी केलाय ' सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..कोणीतरी रात्री सगळे झोपले असताना स्टूलवर चढून वार्डातील घड्याळा काटे फिरवून ते दोन तास पुढे करून ठेवलेले होते ..कोणीच काहीच सांगायला तयार होईना ...कोणीतरी अशोक वहीत आपले नाव लिहून माँनीटरला देतो याचा राग काढण्यासाठी हे केले असावे हे उघड होते ..सगळे पार वैतागले होते ..कारण दोन तास आधी उठून ..सगळे आवरून आम्ही पी .टी.ला उभे राहून सगळेच मूर्ख बनलो होतो ..आता पुन्हा दोन तासांसाठी झोप येणे शक्य नव्हते . 

मग माँनीटर ने आता दोन तास वेळ कसा घालवायचा म्हणून टी. व्ही . लावला ..त्यावरचे कार्यक्रम पाहत बसलो सर्व ..मी टी.व्ही पाहताना माझ्या शेजारी बसलेल्या शेरकर काकांना विचारलेच ..' काका तुम्ही इतके हुशार ..शोध लावा की या भानगडीचा ..कोणी घड्याळ पुढे केले असेल ? ' काकांनी मला चार पाच संशयित नावे सांगितली ..बहुतेक सगळे जण ब्राऊन शुगाचे व्यसनी होते ..परवा या चौघांनी सकाळी वेळेवर उठण्याचा कंटाळा केला होता ..यांची नावे अशोकने माँनीटरला सांगितली होती ..त्यांना समज देण्यात आली होती ..बहुतेक त्याचा बदला यांनी घेतला असावा ' असा काकांचा संशय होता ..नंतर समूह उपचाराच्या वेळी हा प्रकार समजल्यावर सरांनी .. हा प्रकार गम्मत म्हणून छान आहे ..मात्र ही गम्मत सर्वांसाठी कशी त्रासदायक आहे हे सांगत ..ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल ..असे उद्गार काढले ..तसेच मी कोणालाही रागावणार नाही याची खात्री बाळगून.. ज्याने हे केले असेल त्याने स्वतःहून पुढे यावे असे आवाहन केले ..कोणी रागावणार नाही याची खात्री झाल्यावर मग एका मिलिंद नावाच्या मुलाने हळूच हात वर करून ..हा प्रकार त्याने केला असल्याचे कबूल केले ..हे का केलेस असे त्याला विचारले असता ..त्याने सांगितले की अशोकने ...मिलिंदच्या डायरीत लिहिलेला एक कागद फाडून घेतला होता .. व तो कागद सरांना दाखवीन अशी त्याला धमकी दिली होती ..त्याच्या बदल्यात अशोकने त्याच्याकडून स्वतःचे कपडे धुवून घेतले होते ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..कोणता कागद ? काय लिहिलेय त्यावर ? .सरांनी मग अशोकला तो कागद आणण्यास सांगितले ..अशोकने खिश्यातून काढून कागद सरांच्या हाती दिला ..सरांनी तो घडी केलेला तो कागद उघडून त्यावर नजर टाकली आणि हसू लागले ..त्यावर काहीतरी भयंकर लिहिलेले असावे असे वाटले होते आम्हाला ..पण सर हसत होते ..सरांनी मिलिंदकडे हसत पहिले ..' मस्तच सुचलेय तुला हे ..तुझ्या कुशाग्र बुद्धीचे हे प्रतिक आहे ..फक्त दिशा थोडी चुकली आहे ' असे म्हणत त्याची तारीफ केली ..मग सरांनी तो कागद सर्वाना वाचून दाखवला . ..परवा पासून जे ' फक्त आजचा दिवस शिकवले जात होते त्याचे विडंबन मिलिंदने कागदावर लिहिले होते ..

१ ) फक्त आजचा दिवस ..आयुष्यभराचे सर्व चिंता ..प्रश्न ..समस्या मी आजच सोडविल्या गेल्या पाहिजेत याचा विचार करून स्वताचे डोके खराब करून घेईन ..आणि टेन्शन आलेय असे कारण देवून दारू पीईन .

२ ) फक्त आज मी कोणाचेही ऐकणार नाही ..जास्तीत जास्त गबाळे दिसण्याचा ..सर्वांवर टीका करण्याचा ..दुरुत्तरे करण्याचा ..उर्मटपणे वागण्याचा आणि स्वतः सोडून सर्वांनी सुधारावे असा प्रयत्न करेन .

३ ) फक्त आजचा दिवस कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने मी कोणाचे तरी वाटोळे करीन ..भांडणे लावीन ..चुगल्या करीन ..त्यामुळे माझा वेळ छान जाईल ..

४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या मनासारखी असावी यासाठी मी वाट्टेल ते करेन ..भांडेन ..परिस्थितीला दोष देईन ..नातलगांवर आरोप करेन ..सर्वाना अशांत करेन ..जेणे करून कोणी मला दारू पिण्याबद्दल दोष देणार नाहीत .

५ ) फक्त आजचा दिवस मी अतिशय चंचलपणे वागेन ..एकही गोष्ट धड करणार नाही ..नसत्या उचापती करेन ..

६ ) फक्त आजचा दिवस स्वतःला उपयुक्त असे एखादी गोष्ट शिकण्याऐवजी ..कंटाळा करत ..बोअर झालो असे म्हणत कटकट करीन ...दारू पिवून झोपून राहीन ..

सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो ...त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते ..ते अशोकला सापडले ..अशोकने ते सरांना दाखवेन अशी धमकी देवून स्वतःचे कपडे धुवून घेण्याचे काम करून घेतले होते मिलिंद कडून ..सरांनी मग अशोकला समज दिली ..तू हा तुझ्या अधिकारांचा गैरवापर करून .. सरांना नाव सांगेन ही भीती घालून स्वताची कामे करून घेणे यापुढे बंद केले पाहिजेस असे बजावले ..मिलिंदला सर म्हणाले..अरे तू एकप्रकारे स्वताचे परिक्षणच मांडलेले आहे यात ..पूर्वी असेच वर्तन असायचे आपले ..तेच तू अतिशय हुशारीने लिहिले आहेस ..आता असे वर्तन आपल्याला करायचे नाहीय.. हेच तर शिकण्यासाठी आपण येथे आलोत ..

( बाकी पुढील भागात )

मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे !


मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ३२ वा )

सरांनी फळ्यावर लिहिलेली दुसरी सूचना होती ' फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा ..आणि स्वतः खेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन ' ..त्याबाबत सांगताना सर म्हणाले ..एका व्यसनी व्यक्तीला इतरांचे आपल्या बाबत काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची अजिबात सवय नसते .. त्याला कोणी त्याच्या वर्तनाबद्दल काही सूचना दिल्यास तो लगेच समर्थने देतो ..कोणाला तरी दोष देतो ..किवा आपले वर्तन हे परिस्थितीनुसार कसा नाईलाज होता हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो ..त्याचे हे बचावात्मक धोरण किवा आक्रमक धोरण सोडून देवून त्याने इतरांचे म्हणणे नेमके काय आणि का ? आहे हे समजून घेण्यासाठी ...इतरांचे शांतपणे ऐकून घेण्याची गरज असते ..त्यातून बरेच शिकायला मिळू शकते हा झाला फक्त ऐकण्याचा भाग ..दुसरा भाग असतो वर्तनाचा ..व्यसनी व्यक्ती हेकेखोर ..हट्टी ..जिद्दी ..असतो ..आपल्या या स्वभावात बदल करण्यासाठी इतरांनी आपल्या वर्तनाबाबत दिलेल्या सूचनांचा वापर करून स्वतःच्या वृत्तीत व कृतीत बदल करण्यास यातून सुचवलेले आहे ..यातून आपल्याला बरेच शिकायला मिळू शकते याबाबत एक छान घोषवाक्य आहे ' Learn to Listen and Liisten to Learn ' म्हणजे ' ऐकायला शिका आणि शिकण्यासाठी ऐका ' ..हे जर आपण पाळण्याचा प्रयत्न केला आपली अवांतर अथवा निरर्थक बडबड कमी होऊन ' मितभाषी ' होण्यास मदत मिळते व अनेक गोष्टी शिकता येतात . ..फक्त आज मी नीटनेटके दिसण्याचा प्रयत्न करेन या वाक्यातून ...आपले व्यक्तिमत्व नेहमी प्रसन्न व ताजेतवाने ठेवण्यास सांगितले गेले आहे ..व्यसनी व्यक्ती व्यसनांच्या काळात आळशी प्रवृत्तीकडे झुकलेला असतो ...तसेच व्यक्तिगत निराशेमुळे अनेकदा तो आपल्या दिसण्याबाबत आपल्या पेहरावाबाबत निष्काळजी रहातो ..व्यसन बंद केल्यावरही काही लोक अशाच आळशी प्रवृत्तीचे राहतात ..वेळच्या वेळी अंघोळ ..दाढी ..कपडे स्वच्छ ठेवणे ...व्यवस्थित केस विंचरणे ..अशा बाबतीत तो निरुत्साही आढळतो ..यात बदल होणे आवश्यक आहे ..कारण आता व्यसन बंद ठेवून आपण एका नवीन आयुष्याला सामोरे जाणार आहोत तेथे यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तिमत्व उठावदार असणे गरजेचे ठरते ..आजचा दिवस किंचितही टीका न करता ..स्वतःखेरीज अन्य कुणालाही सुधारण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ व्यसनी व्यक्तीच्या दोषारोपण करण्याच्या ..छिद्रान्वेशी वृत्तीच्या ..वागणुकीत बदल सुचवला आहे ..आपल्या अश्या टीका करण्यामुळे किवा सतत इतरांच्या चुका शोधण्याच्या प्रवृत्ती मुळे तो आसपासच्या लोकांमध्ये अप्रिय होऊ शकतो ...आपल्या आसपास सगळे मूर्ख आहेत अशी त्याची समजूत होऊन तो स्वतःला अतिशाहणं समजू लागतो .. अनेकदा त्याची टीका खरी देखील असली तरी ती इतरांना नाराज करणारी असते ..आधीच व्यसनाच्या काळात व्यसनी व्यक्तीने अनेकांची मने विनाकारण दुखावली असतात ..आता आसपासच्या सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांवर टीका करणे किवा त्यांच्या चुका शोधणे बंद केले पाहिजे ..त्याऐवजी जास्तीत जास्त वेळ आपण स्वताच्या सुधारणेबाबत दिला पाहिजे ..व्यसनाधीनतेच्या काळात आपल्यात निर्माण झालेले स्वभावदोष ..विचारांचे ..भावनांचे व वर्तनाचे बिघडलेपण लवकर निघून जावे यासाठी जास्तीत जास्त वेळ स्वताच्या सुधारणेकरता व्यतीत करून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे ..इतरांना सुधारण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवता कामा नये ..हे समजावून सांगताना सर आमच्या नेमक्या त्रुटीवरच बोलत आहेत असे वाटत होते मला ..ते सांगत असलेल्या गोष्टी मला तंतोतंत लागू पडत होत्या ..

फक्त आजच्या दिवस कुणालाही समजणार नाही अश्या पद्धतीने मी कोणाचे तरी भले करेन .या वाक्यात व्यसनी व्यक्तीची आत्मकेंद्रित व आत्मप्रौढी मिरवण्याची वृत्ती ओळखून त्यात बदल करण्यासाठी प्रेरित केले जाते ..अनेक वर्षे आपण फक्त स्वतःच्या सुखाचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला आहे ..या स्वार्थी वृत्तीमुळे आपण अनेकांना दुखावले आहे ..यापुढे जर आपण आपल्या आसपासच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करण्याचे ठरवले तर नक्कीच आपण केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची संधी मिळत रहाते ..आत्मगौरव करण्यात किवा शेखी मिरवण्यात ..आत्मप्रौढी मिरवण्यात आपण कधीच मागे राहत नाही ..आपण केलेल्या चुका झाकण्यासाठी इतरांसाठी आपण काय काय केलेय किवा आपण किती दयाळू ..कृपाळू ..परोपकारी आहोत हे सतत सांगण्यात त्याला धन्यता वाटते ..' नेकी कर दर्या में डाल ' या उक्तीनुसार जर कोणाला आपण कशाही पद्धतीने मदत केली तर त्यात अगदी डंका वाजवून ..स्वताचे मोठेपण सिद्ध करणे म्हणजे आपल्या चांगल्या कर्मावरील आपली श्रद्धा डळमळीत असल्याचे लक्षण आहे ..निसर्ग आपल्या सर्व प्रकारच्या चांगल्या -वाईट कृत्यांची योग्य ती दखल घेत असतो ..व त्या कर्मानुसार आपले भविष्य घडत जाते यावर आपली श्रद्धा हवी ..म्हणजे कोणालाही नकळत कोणाचे तरी भले करता येणे शक्य आहे ..हे सांगत सरांनी पुढे आणखीन तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षा नुसार बदलण्या ऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थितीनुसार बदलण्याचा पयत्न करेन .

५ ) फक्त आज मी माझ्या चंचल मनाला आवर घालेन . 

६ ) स्वतःला उपयुक्त अशी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन .

' फक्त आजचा दिवस ' चे तत्वज्ञान खूपच मौलिक आहे असे मला वाटले .. बेबंद ..बंडखोर .बेलगाम..स्वैर अशा वर्तनाच्या व्यसनी व्यक्तीला मर्यादांच्या चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न नक्कीच व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचा होता ..उद्या सर काय सांगतात याची उत्सुकता लागून राहिली होती मला . 

( बाकी पुढील भागात )

फक्त आजचा दिवस !


फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी - भाग ३१ वा )

आजच्या समूह उपचारात सरांनी आधी चर्चा झालेल्या अल्कोहोलिक्स अॅनाँनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्यांचा एकत्रित आढावा घेत आम्हाला सर्वाना ' फक्त आजचा दिवस ' हे तत्व समजावून सांगितले ..पहिल्या तीन पायऱ्या या हतबलता , मान्यता , अस्ताव्यास्तता दर्शवून देतात ..तर दुसऱ्या पायरीने विश्वास ..श्रद्धा मिळवता येते , तिस-या पायरीत नवीन जीवनाचा मजबूत पाया तयार करण्यासाठी स्वेछेचा त्याग व आपल्याला समजलेल्या ईश्वराच्या कलाने जीवन व्यतीत करण्याबद्दल मागर्दर्शन दिलेले आहे हे सांगत ..सरांनी सर्व प्रथम.. इथे दाखल झाल्यावर आपण व्यसनांच्या आहारी गेलेलो आहोत हे स्वतःशी कबूल करणे आवश्यक आहे व त्यासाठी व्यसनामुळे आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे तपासण्यास आपल्याला प्रेरित केले गेलेय असे सांगितले ..आपली बुद्धी , आर्थिक व मानसिक शक्ती , तसेच शैक्षणिक आणि इतर क्षमता स्वतःच्या बळावर व्यसन कायमचे बंद ठेवण्यास कशा असमर्थ ठरल्या हे प्रत्येकाने नक्कीच तपासले पाहिजे ..तरच आपल्याला व्यसनमुक्ती साठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे आहे हे समजेल .. ही पहिली पायरी ..नंतर ही मदत घेण्यासाठी ईश्वरी शक्ती ओळखणे ज्यात विशिष्ट धर्माचा ..जातीचा ..पंथाचा देव तर येतोच पण त्या खेरीज निसर्ग ..आपले नातलग ..स्नेही ..हितचिंतक ...एखादी अध्यात्मिक विचारधारा ...एखादे तत्व इतकेच नव्हे तर अल्कोहोलिक्स अँनाॅनिमसचे तत्वज्ञान .. सगळे आपल्यासाठी कसे उच्चशक्ती किवां ईश्वर आहे हे समजून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे आले ..जे जे आपल्याला व्यसनापासून परावृत्त करण्यास मदत करते ते सगळे या ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होऊ शकते ..हे समजून घेवून त्यावरील विश्वास बळकट करणे ही झाली दुसरी पायरी ..आणि यापुढे व्यसनमुक्त रहात नवीन जीवनाची बांधणी ...जडण घडण ..किवा नव्या आणि सर्वांसाठी उपयुक्त अशा पद्धतीने जीवन व्यक्तीत करण्यासाठी आपल्याला समजलेल्या ईश्वरी तत्वानुसार जीवन व्यातित करण्याची मानसिक तयारी हे तिसऱ्या पायरीचे सार आहे असे सर म्हणाले ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ' फक्त आजचा दिवस ' हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले केवळ व्यसनी व्यक्तीसाठीच नाही तर ..अस्वस्थ ..अशांत ..असमाधानी ..असुंतूलीत..अयशस्वी अशा सर्व लोकांसाठी.. हे ' फक्त आजचा दिवस ' लागू पडते .ज्यात फक्त आजचा दिवस काहीही झाले ..कितीही संकटे आली ..कितीही निराशा... वैफल्य आले ..कितीही आनंदाचा यशाचा क्षण आला तरीही मी व्यसन करणार नाही हा निश्चय आहेच ..या खेरीज माझ्या सुखी ..समाधानी ..संतुलित आणि यशस्वी जीवनासाठी काय काय करणे भाग आहे हे स्पष्ट केले ...एक एक दिवसाच्या हिशेबाने आयुष्य अधिक सोपे ..सहज ..सुंदर कसे घडते हेच यात दिले आहे .

' फक्त आजचा दिवस '

१) फक्त आजचा दिवस आयुष्यभराचे सर्व प्रश्न ..चिंता ..समस्या एकदम सोडवण्याऐवजी ..फक्त आलेला आजचा दिवस मी व्यवस्थित पणे जगण्याचा प्रयत्न करेन .

२ ) फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा आणि स्वतःखेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन .

३ ) फक्त आजचा दिवस मी कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीने कुणाचे तरी भले करेन ..

ही तीन वाक्ये सरांनी फळ्यावर लिहिली आणि एकेका वाक्याचे विश्लेषण करण्यास सुरवात केली ..प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रश्न ..समस्या..चिंता असतात..आणि त्या समस्या सोडविल्या जाव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते ..या चिंता आणि समस्याच आपल्या अस्वस्थतेस कारणीभूत असतात .. या समस्या चुटकीसरशी सुटाव्यात ..यांचे उत्तर आपल्याला ताबडतोब मिळावे ..किवा या चिंता कधी कमी होतील या बाबतचा सर्वांगीण विचार करण्यात आपण बराच वेळ वाया घालवत असतो ..खरे तर प्रत्येकाला आपण नक्की किती दिवस जगणार आहोत हे देखील माहित नसते ..भविष्याच्या पोटात नेमके काय दडलेले आहे हे कोणीच सांगू शकत नाही ..अशा वेळी संपूर्ण जिवनभराच्या चिंता .समस्या यांचा आपण विचार करत बसतो ..त्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो ..सतत चिंताग्रस्त असतो ..काळजी करत बसतो ..प्रश्न सुटावेत म्हणून बैचैन रहातो.. हे अविवेकी आहे ..क्षणभंगुर किवा अशाश्वत जीवनाची अनिश्चितता ध्यानात घेतली तर हे व्यर्थ असते ..त्या ऐवजी जर ' फक्त आजचा दिवस ' या प्रश्न चिंता सोडवण्यासाठी मी व्यवस्थित पद्धतीने व्यतीत केला तर नक्कीच मी समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू शकेन ..आता व्यवस्थित म्हणजे काय हा प्रश्न उरतो ..तर व्यवस्थित म्हणजे ...सर्वात आधी आज मी या अनमोल शरीराची योग्य स्वच्छता ठेवेन ..शरीर बळकटी करता आवश्यक व्यायाम करेन ज्यात योगाभ्यास , प्राणायाम येते ...नंतर माझ्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली नोकरी अथवा काम नीट जवाबदारीने करेन ..माझ्या सभोवालच्या लोकांशी चांगले संबंध ठेवेन ..माझ्या कुटुंबियांच्या भावनांची योग्य काळजी घेईन ..भविष्याची तरदूत म्हणून योग्य ती काटकसर ..बचत करेन ..माझी मनस्थिती आनंदी राहण्यासाठी मनोरंजन ..कला ..माझे छंद यांच्यासाठी योग्य वेळ देईन ..एकंदरीत जवाबदारीने वागेन हे सगळे व्यवस्थितपणाच्या व्याख्येत येते .

( बाकी पुढील भागात )

झाडू ड्युटी !


झाडू ड्युटी ! ( बेवड्याची डायरी -भाग ३० वा )

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ..अगदी लहानपणा पासूनच्या घटना आठवत होतो ..अनेक घटनांमध्ये मला जाणवले की माझ्या आवडी निवडी ..माझ्या इच्छा ..वगैरेंबाबत मी खूप जागरूक असे ..एकदा लहानपणी मेथीची भाजी खाणार नाही म्हणून मी हटून बसलो होतो ..तर एकदा विशिष्ट रंगाचाच शर्ट विकत घ्यायचा म्हणून कपड्यांच्या दुकानात रडून गोंधळ घातला होता ..आईचा नेहमी मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात म्हणून आग्रह असे ..पालेभाज्या ..तसेच कारली ..दुधी ..मुळा ..भोपळा ..वगैरे भाज्या अजिबात आवडत नसत ...एकदा घरी जेवणात मेथीची भाजी केलेली होती ..मी ती भाजी खाणार नाही म्हणून हटून बसलो ..मला वेगळी बटाट्याची भाजी करून दे म्हणून आईकडे हट्ट धरला ..आईने खूप समजावले ..सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत ..आवडीनिवडी पेक्षा त्या भाज्यांमध्ये पोषक तत्वे कोणती आहेत ते पाहून भाजी खाल्ली पाहिजेत वगैरे समजावले ..मात्र मी तिचे अजिबात ऐकायला तयार नव्हतो ..शेवटी मी जेवत नाहीय ते पाहून तिने रात्री ११ वाजता मला वेगळी बटाट्याची भाजी करून दिली तेव्हा माझे समाधान झाले होते ..पुढे मी एन.सी .सी च्या कँम्प मध्ये गेलो असताना ..माझ्या या भाज्यांच्या आवडीनिवडी मुले मला जवळ जवळ उपाशी राहावे लागले होते ...कारण तेथे सर्व भाज्या माझ्या नावडीच्या होत्या ..मी फक्त वरण पोळी खाल्ली होती तीन दिवस ..तेव्हा जाणवले होते की सर्व भाज्या खायची सवय आपल लावून घ्यायला हवी होती ..माझ्या मित्राकडे एक लाल रंगाचा शर्ट होता तो त्याला खूप .. शोभून दिसे ..मलाही वाटे असला शर्ट आपल्याला हवा ..जेव्हा दिवाळीत कपडे खरेदी साठी आम्ही सर्व कपड्यांच्या दुकानात गेलो तेव्हा मी मला तो विशिष्ट लाल रंगाचा शर्ट हवा अशी मागणी केली ..नेमका माझ्या मापाचा शर्ट तेथे उपलब्ध नव्हता ..थोडा आखूड होता ..तरीही मी तो आखूड लाल शर्टच घेणार असा हट्ट धरला ..मला सर्वांनी खूप समजावले ..मात्र मी रडारड सुरु केली ..शेवटी तो आखूड मापाचा शर्ट घेवून आलो ..जेमतेम दिवाळीत तो दोन दिवस वापरला ..धुतल्यानंतर तो अजूनच आखूड झाला नंतर तो शर्ट मी पुन्हा घातला नाही ...शाळेत विशिष्ट प्रकारचे दप्तर हवे ..वह्या विशिष्ट कंपनीच्याच हव्यात ..वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी मी हटून बसत असे ..माझे सर्व मित्र दहावीनंतर कॉमर्सला गेले म्हणून मी पण घरचे सायन्स घे असा आग्रह करत असताना कॉमर्सलाच गेलो ..नंतर अनेकदा आपण सायन्स घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटत राहिले ..अनेक घटना मला आठवत गेल्या ज्यात माझ्या इच्छा तसेच माझ्या आवडीनिवडी नुसार मी घरच्यांना वेठीला धरले होते ..त्यांच्या मानसिकतेचा विचार न करता ..ते आपले हितच बघत आहेत याचा विचार न करता केवळ स्वतच्या इछेचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला होता ..नोकरी लागल्यावर जेव्हा पहिल्या पगारात मित्रांनी पार्टी दिली तेव्हा ..मित्रांनी बियर घेण्याचा आग्रह केला ..आमच्या घरी कोणीही कधीच दारू किवा बियर वगैरे घेत नसे ..उलट माणसाला कोणतेही व्यसन नसावे हाच आग्रह असे वडिलांचा ..तेव्हा देखील मी वडिलांची शिकवण बाजूला ठेवून बियर घेतली ..घरी आल्यावर जेव्हा वास आला तेव्हा वडील रागावले ..मी वडिलांना माझ्या पिण्याचे समर्थन दिले ..आजकाल सर्वच पितात ..एखादे दिवशी घेतली तर इतके बोलायचे काही कारण नाही ..असा वाद घातला ..पुढे माझे पिणे वाढतच गेले ..तेव्हा देखील मी समर्थने देत गेलो ..वाद घालत गेलो ..कदाचित त्यामुळेच आज मला व्यसनमुक्ती केंद्रात यावे लगले होते ..पहिल्यांदाच मी स्वताच्या इच्छा बाजूला ठेवून घरच्यांच्या इच्छेला मान दिला असता तर मला व्यसन लागले नसते ..उत्तर लिहून झाल्यावर मी मोठा सुस्कारा सोडला ..

उत्तर लिहून डायरी माॅनीटर कडे द्यायला गेलो ..डायरी घेत मला म्हणाला ..विजयभाऊ आज उद्या तुमची झाडू ड्युटी लागली आहे ..तुम्हाला आता येथे एक आठवडा उलटून गेलाय ..तुमची तब्येतही चांगली आहे ..तेव्हा उद्या सर्व हॉल मध्ये ..सकाळी चहानंतर ..दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर झाडू मारण्याचे काम तुम्हाला करायचे आहे ..येथे उपचार घेणाऱ्या सर्वांनाच झाडू मारणे ..वार्ड सफाई ..जेवण बनवण्याची मोठी भांडी घसणे वगैरे प्रकारची कामे करावी लागत असत ..फक्त जे आजारी आहेत ..वृद्ध आहेत किवा इतर काही समस्या आहेत अश्यानच यातून सूट मिळे..तत्वतः हे मला मान्य होते ..मात्र प्रत्यक्ष माझी झाडू ड्युटी लागली आहे हे ऐकून मला कसेसेच झाले ..घरी कधीच मी असल्या कामांना हात लावला नव्हता ..झाडू मारणे ..भांडी घासणे ..स्वैपाक करणे ..कपडे धुणे ..घराची साफसफाई करणे वगैरे कामे स्त्रियांनी करायची असतात ही एक चुकीची मानसिकता बनून गेली होती ..अलका माहेरी गेली की या मानसिकते मुळे मला खूप त्रास होई ..चारचार दिवस मी घरात झाडू मारत नसे ..ती येई तेव्हा घराचा अक्षरश: उकिरडा झालेला असे ..सगळीकडे कचरा ..अस्ताव्यस्त पडलेले माझे कपडे ..फ्रीज मध्ये उघडे ठेवलेले पदार्थ ...चहा केलेली खरकटी भांडी ..नासलेल्या दुधाचे बाजूला ठेवलेले भांडे ..वगैरे पसारा पाहून ती खूप कटकट करत असे ..तिला सगळा पसारा आवरायला चारपाच तास लागत ..यावर मी तिला म्हणे तुला आपल्या घराची इतकी काळजी आहे तर मग माहेरी जावू नकोस .. मात्र ती माहेरी गेल्यावर मी सर्व साफसफाई नीट करत जावी असे मला वाटले नव्हते ..

माझा पडलेला चेहरा पाहून माँनीटर म्हणाला ..विजयभाऊ ही ड्युटी तुमच्याकडून काम करून घ्यावे म्हणून लावलेली नाहीय तर या जागेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी म्हणून ..तसेच आपला अहंकार कमी व्हावा म्हणून लावली जाते ..तसेच आपले घर स्वच्छ ठेवण्यात आपल्या कुटुंबातील स्त्रियांचा कसा वाटा असतो हे समजून त्यांची किंमत कळावी हा हेतू आहे ..कोणतेही काम हे हलक्या अथवा दुय्यम दर्जाचे नसते ..उलट अशी कामे केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो ..वेगवेगळ्या प्रकारची कामे केल्याने शरीराला व्यायाम मिळतो ..आपले मन स्वस्थ आणि शांत राहण्यास ही कामे मदत करतात ..त्याचं बोलण्याला मी मान डोलावून दुजोरा दिला .