Friday, April 25, 2014

मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे !


मर्यादांची चौकट- क्षमता वाढवणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ३२ वा )

सरांनी फळ्यावर लिहिलेली दुसरी सूचना होती ' फक्त आज मी इतरांचे ऐकेन..जास्तीत जास्त नीटनेटके दिसण्याचा ..किंचितही टीका न करण्याचा ..आणि स्वतः खेरीज अन्य कुणालाही न सुधारण्याचा मी प्रयत्न करेन ' ..त्याबाबत सांगताना सर म्हणाले ..एका व्यसनी व्यक्तीला इतरांचे आपल्या बाबत काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची अजिबात सवय नसते .. त्याला कोणी त्याच्या वर्तनाबद्दल काही सूचना दिल्यास तो लगेच समर्थने देतो ..कोणाला तरी दोष देतो ..किवा आपले वर्तन हे परिस्थितीनुसार कसा नाईलाज होता हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो ..त्याचे हे बचावात्मक धोरण किवा आक्रमक धोरण सोडून देवून त्याने इतरांचे म्हणणे नेमके काय आणि का ? आहे हे समजून घेण्यासाठी ...इतरांचे शांतपणे ऐकून घेण्याची गरज असते ..त्यातून बरेच शिकायला मिळू शकते हा झाला फक्त ऐकण्याचा भाग ..दुसरा भाग असतो वर्तनाचा ..व्यसनी व्यक्ती हेकेखोर ..हट्टी ..जिद्दी ..असतो ..आपल्या या स्वभावात बदल करण्यासाठी इतरांनी आपल्या वर्तनाबाबत दिलेल्या सूचनांचा वापर करून स्वतःच्या वृत्तीत व कृतीत बदल करण्यास यातून सुचवलेले आहे ..यातून आपल्याला बरेच शिकायला मिळू शकते याबाबत एक छान घोषवाक्य आहे ' Learn to Listen and Liisten to Learn ' म्हणजे ' ऐकायला शिका आणि शिकण्यासाठी ऐका ' ..हे जर आपण पाळण्याचा प्रयत्न केला आपली अवांतर अथवा निरर्थक बडबड कमी होऊन ' मितभाषी ' होण्यास मदत मिळते व अनेक गोष्टी शिकता येतात . ..फक्त आज मी नीटनेटके दिसण्याचा प्रयत्न करेन या वाक्यातून ...आपले व्यक्तिमत्व नेहमी प्रसन्न व ताजेतवाने ठेवण्यास सांगितले गेले आहे ..व्यसनी व्यक्ती व्यसनांच्या काळात आळशी प्रवृत्तीकडे झुकलेला असतो ...तसेच व्यक्तिगत निराशेमुळे अनेकदा तो आपल्या दिसण्याबाबत आपल्या पेहरावाबाबत निष्काळजी रहातो ..व्यसन बंद केल्यावरही काही लोक अशाच आळशी प्रवृत्तीचे राहतात ..वेळच्या वेळी अंघोळ ..दाढी ..कपडे स्वच्छ ठेवणे ...व्यवस्थित केस विंचरणे ..अशा बाबतीत तो निरुत्साही आढळतो ..यात बदल होणे आवश्यक आहे ..कारण आता व्यसन बंद ठेवून आपण एका नवीन आयुष्याला सामोरे जाणार आहोत तेथे यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तिमत्व उठावदार असणे गरजेचे ठरते ..आजचा दिवस किंचितही टीका न करता ..स्वतःखेरीज अन्य कुणालाही सुधारण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ व्यसनी व्यक्तीच्या दोषारोपण करण्याच्या ..छिद्रान्वेशी वृत्तीच्या ..वागणुकीत बदल सुचवला आहे ..आपल्या अश्या टीका करण्यामुळे किवा सतत इतरांच्या चुका शोधण्याच्या प्रवृत्ती मुळे तो आसपासच्या लोकांमध्ये अप्रिय होऊ शकतो ...आपल्या आसपास सगळे मूर्ख आहेत अशी त्याची समजूत होऊन तो स्वतःला अतिशाहणं समजू लागतो .. अनेकदा त्याची टीका खरी देखील असली तरी ती इतरांना नाराज करणारी असते ..आधीच व्यसनाच्या काळात व्यसनी व्यक्तीने अनेकांची मने विनाकारण दुखावली असतात ..आता आसपासच्या सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इतरांवर टीका करणे किवा त्यांच्या चुका शोधणे बंद केले पाहिजे ..त्याऐवजी जास्तीत जास्त वेळ आपण स्वताच्या सुधारणेबाबत दिला पाहिजे ..व्यसनाधीनतेच्या काळात आपल्यात निर्माण झालेले स्वभावदोष ..विचारांचे ..भावनांचे व वर्तनाचे बिघडलेपण लवकर निघून जावे यासाठी जास्तीत जास्त वेळ स्वताच्या सुधारणेकरता व्यतीत करून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे ..इतरांना सुधारण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवता कामा नये ..हे समजावून सांगताना सर आमच्या नेमक्या त्रुटीवरच बोलत आहेत असे वाटत होते मला ..ते सांगत असलेल्या गोष्टी मला तंतोतंत लागू पडत होत्या ..

फक्त आजच्या दिवस कुणालाही समजणार नाही अश्या पद्धतीने मी कोणाचे तरी भले करेन .या वाक्यात व्यसनी व्यक्तीची आत्मकेंद्रित व आत्मप्रौढी मिरवण्याची वृत्ती ओळखून त्यात बदल करण्यासाठी प्रेरित केले जाते ..अनेक वर्षे आपण फक्त स्वतःच्या सुखाचा ..स्वताच्या आनंदाचा विचार केला आहे ..या स्वार्थी वृत्तीमुळे आपण अनेकांना दुखावले आहे ..यापुढे जर आपण आपल्या आसपासच्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करण्याचे ठरवले तर नक्कीच आपण केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची संधी मिळत रहाते ..आत्मगौरव करण्यात किवा शेखी मिरवण्यात ..आत्मप्रौढी मिरवण्यात आपण कधीच मागे राहत नाही ..आपण केलेल्या चुका झाकण्यासाठी इतरांसाठी आपण काय काय केलेय किवा आपण किती दयाळू ..कृपाळू ..परोपकारी आहोत हे सतत सांगण्यात त्याला धन्यता वाटते ..' नेकी कर दर्या में डाल ' या उक्तीनुसार जर कोणाला आपण कशाही पद्धतीने मदत केली तर त्यात अगदी डंका वाजवून ..स्वताचे मोठेपण सिद्ध करणे म्हणजे आपल्या चांगल्या कर्मावरील आपली श्रद्धा डळमळीत असल्याचे लक्षण आहे ..निसर्ग आपल्या सर्व प्रकारच्या चांगल्या -वाईट कृत्यांची योग्य ती दखल घेत असतो ..व त्या कर्मानुसार आपले भविष्य घडत जाते यावर आपली श्रद्धा हवी ..म्हणजे कोणालाही नकळत कोणाचे तरी भले करता येणे शक्य आहे ..हे सांगत सरांनी पुढे आणखीन तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या इच्छा आकांक्षा नुसार बदलण्या ऐवजी मी स्वतःला आहे त्या परिस्थितीनुसार बदलण्याचा पयत्न करेन .

५ ) फक्त आज मी माझ्या चंचल मनाला आवर घालेन . 

६ ) स्वतःला उपयुक्त अशी गोष्ट शिकण्याचा अथवा आभ्यासण्याचा मी प्रयत्न करेन .

' फक्त आजचा दिवस ' चे तत्वज्ञान खूपच मौलिक आहे असे मला वाटले .. बेबंद ..बंडखोर .बेलगाम..स्वैर अशा वर्तनाच्या व्यसनी व्यक्तीला मर्यादांच्या चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न नक्कीच व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचा होता ..उद्या सर काय सांगतात याची उत्सुकता लागून राहिली होती मला . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment