बुद्धीचा गैरवापर ! ( बेवड्याची डायरी - भाग ३३ वा )
आज पहाटे गम्मत झाली ..नेहमीप्रमाणे बेल वाजली तसे आम्ही सर्व उठून बसलो ..वार्डच्या भिंतीवरील घडाळ्यात सहा वाजलेले होते ..पटापट उठून सगळे ..गाद्या..चादरी आवरून ठेवायला लागले ..रोज पहाटे बेल वाजवून उठवण्याचे काम ..माँनीटरने वार्ड मधील एका उत्साही मुलाला दिलेले होते ..हा सुमारे पंचविशीचा मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून येथे उपचार घेत होता ..खूप बडबड्या आणि उत्साही ..सकाळी उठण्याचा जे लोक कंटाळा करत ..किवा उठून पुन्हा काहीतरी आजारीपणाचे कारण सांगून झोपून राहत .. पी .टी. , योगाभ्यास , प्राणायाम अशा थेरेपीज करणे टाळत असत ..त्यांची नावे वहीत लिहून माँनीटर कडे देण्याचे काम या अशोककडे दिलेले होते ..एकप्रकारे तो माँनीटरचा मदतनीस म्हणून काम करत असे ..स्वभावाने तसा चांगलाच होता ..मात्र त्याचे हे कंटाळा करणाऱ्या लोकांची नावे माँनीटरला देणे अनेकांना पसंत नव्हते ..म्हणून काही नाठाळ लोक त्याला ' खबरी ' किवा ' चमचा ' म्हणत असत ..सगळे आवरून पी .टी. करायला उभे राहिले ..तितक्यात माँनीटर बाहेरच्या ऑफिसात जावून आला ..ऑफिसमधून वार्डात आल्या आल्या तो ' काय मूर्खपणा चाललाय हा ' असे ओरडला .. पी .टी . करणे थांबवायला लावले ..आम्हाला समजेना काय भानगड झालीय ते ..मग माँनीटर अशोकला म्हणाला ' अरे तू सर्वाना पहाटे सहा ऐवजी चारलाच उठवले आहेस ..मी आता बाहेरच्या घड्याळात पहिले तर तेथे साडेचार झालेत ' आम्ही पटकन वार्डातील घडल्यात पहिले तेथे साडेसहा वाजलेले ..सर्व चकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..आपल्याला मूर्ख बनवले गेले आहे हे अशोकच्या लक्षात येवून तो खजील झाला ..मग माँनीटर ने सर्वाना विचारले ' खरे खरे सांगा ..हा प्रकार कोणी केलाय ' सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते ..कोणीतरी रात्री सगळे झोपले असताना स्टूलवर चढून वार्डातील घड्याळा काटे फिरवून ते दोन तास पुढे करून ठेवलेले होते ..कोणीच काहीच सांगायला तयार होईना ...कोणीतरी अशोक वहीत आपले नाव लिहून माँनीटरला देतो याचा राग काढण्यासाठी हे केले असावे हे उघड होते ..सगळे पार वैतागले होते ..कारण दोन तास आधी उठून ..सगळे आवरून आम्ही पी .टी.ला उभे राहून सगळेच मूर्ख बनलो होतो ..आता पुन्हा दोन तासांसाठी झोप येणे शक्य नव्हते .
मग माँनीटर ने आता दोन तास वेळ कसा घालवायचा म्हणून टी. व्ही . लावला ..त्यावरचे कार्यक्रम पाहत बसलो सर्व ..मी टी.व्ही पाहताना माझ्या शेजारी बसलेल्या शेरकर काकांना विचारलेच ..' काका तुम्ही इतके हुशार ..शोध लावा की या भानगडीचा ..कोणी घड्याळ पुढे केले असेल ? ' काकांनी मला चार पाच संशयित नावे सांगितली ..बहुतेक सगळे जण ब्राऊन शुगाचे व्यसनी होते ..परवा या चौघांनी सकाळी वेळेवर उठण्याचा कंटाळा केला होता ..यांची नावे अशोकने माँनीटरला सांगितली होती ..त्यांना समज देण्यात आली होती ..बहुतेक त्याचा बदला यांनी घेतला असावा ' असा काकांचा संशय होता ..नंतर समूह उपचाराच्या वेळी हा प्रकार समजल्यावर सरांनी .. हा प्रकार गम्मत म्हणून छान आहे ..मात्र ही गम्मत सर्वांसाठी कशी त्रासदायक आहे हे सांगत ..ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल ..असे उद्गार काढले ..तसेच मी कोणालाही रागावणार नाही याची खात्री बाळगून.. ज्याने हे केले असेल त्याने स्वतःहून पुढे यावे असे आवाहन केले ..कोणी रागावणार नाही याची खात्री झाल्यावर मग एका मिलिंद नावाच्या मुलाने हळूच हात वर करून ..हा प्रकार त्याने केला असल्याचे कबूल केले ..हे का केलेस असे त्याला विचारले असता ..त्याने सांगितले की अशोकने ...मिलिंदच्या डायरीत लिहिलेला एक कागद फाडून घेतला होता .. व तो कागद सरांना दाखवीन अशी त्याला धमकी दिली होती ..त्याच्या बदल्यात अशोकने त्याच्याकडून स्वतःचे कपडे धुवून घेतले होते ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..कोणता कागद ? काय लिहिलेय त्यावर ? .सरांनी मग अशोकला तो कागद आणण्यास सांगितले ..अशोकने खिश्यातून काढून कागद सरांच्या हाती दिला ..सरांनी तो घडी केलेला तो कागद उघडून त्यावर नजर टाकली आणि हसू लागले ..त्यावर काहीतरी भयंकर लिहिलेले असावे असे वाटले होते आम्हाला ..पण सर हसत होते ..सरांनी मिलिंदकडे हसत पहिले ..' मस्तच सुचलेय तुला हे ..तुझ्या कुशाग्र बुद्धीचे हे प्रतिक आहे ..फक्त दिशा थोडी चुकली आहे ' असे म्हणत त्याची तारीफ केली ..मग सरांनी तो कागद सर्वाना वाचून दाखवला . ..परवा पासून जे ' फक्त आजचा दिवस शिकवले जात होते त्याचे विडंबन मिलिंदने कागदावर लिहिले होते ..
१ ) फक्त आजचा दिवस ..आयुष्यभराचे सर्व चिंता ..प्रश्न ..समस्या मी आजच सोडविल्या गेल्या पाहिजेत याचा विचार करून स्वताचे डोके खराब करून घेईन ..आणि टेन्शन आलेय असे कारण देवून दारू पीईन .
२ ) फक्त आज मी कोणाचेही ऐकणार नाही ..जास्तीत जास्त गबाळे दिसण्याचा ..सर्वांवर टीका करण्याचा ..दुरुत्तरे करण्याचा ..उर्मटपणे वागण्याचा आणि स्वतः सोडून सर्वांनी सुधारावे असा प्रयत्न करेन .
३ ) फक्त आजचा दिवस कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने मी कोणाचे तरी वाटोळे करीन ..भांडणे लावीन ..चुगल्या करीन ..त्यामुळे माझा वेळ छान जाईल ..
४ ) फक्त आज सर्व परिस्थिती माझ्या मनासारखी असावी यासाठी मी वाट्टेल ते करेन ..भांडेन ..परिस्थितीला दोष देईन ..नातलगांवर आरोप करेन ..सर्वाना अशांत करेन ..जेणे करून कोणी मला दारू पिण्याबद्दल दोष देणार नाहीत .
५ ) फक्त आजचा दिवस मी अतिशय चंचलपणे वागेन ..एकही गोष्ट धड करणार नाही ..नसत्या उचापती करेन ..
६ ) फक्त आजचा दिवस स्वतःला उपयुक्त असे एखादी गोष्ट शिकण्याऐवजी ..कंटाळा करत ..बोअर झालो असे म्हणत कटकट करीन ...दारू पिवून झोपून राहीन ..
सर हे वाचत असताना आम्ही सर्व मनापासून हसून मिलिंदच्या बुद्धीला दाद देत होतो ...त्याने एक दारुडा नेमका कसा वागतो याचेच वर्णन केलेले होते ..जे आम्हाला सर्वाना तंतोतंत लागू पडत होते ..फक्त त्याने हे विडंबन केले असल्याने ..हे सरांना कळले तर ते रागावतील म्हणून वहीत लिहून लपवून ठेवलेले होते ..ते अशोकला सापडले ..अशोकने ते सरांना दाखवेन अशी धमकी देवून स्वतःचे कपडे धुवून घेण्याचे काम करून घेतले होते मिलिंद कडून ..सरांनी मग अशोकला समज दिली ..तू हा तुझ्या अधिकारांचा गैरवापर करून .. सरांना नाव सांगेन ही भीती घालून स्वताची कामे करून घेणे यापुढे बंद केले पाहिजेस असे बजावले ..मिलिंदला सर म्हणाले..अरे तू एकप्रकारे स्वताचे परिक्षणच मांडलेले आहे यात ..पूर्वी असेच वर्तन असायचे आपले ..तेच तू अतिशय हुशारीने लिहिले आहेस ..आता असे वर्तन आपल्याला करायचे नाहीय.. हेच तर शिकण्यासाठी आपण येथे आलोत ..
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment