Friday, May 3, 2013

दिवस पहिला


मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते ..गेले काही दिवस माझे पिणे वाढलेय म्हणून अलका सारखी कटकट करत होती ..तिने कुठून तरी या व्यसनमुक्ती केंद्राची माहिती आणली आणि माझ्यामागे लकडा लावला होता की एकदा तरी आपण चौकशी ला जाऊ येथे म्हणून पण मी अनेक वेळा उडवून लावले होते तिला ..मी काही दारू पिऊन कधी भांडण करत नव्हतो .. कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..सगळे काही सुरळीत चालले होते तरीही अलका सारखी मागे लागली म्हणून तिला असेच एकदा म्हंटले होते की ' जाऊ केव्हातरी ' आणि तिने आज सुटी पाहून अचानक मला इथे आणले होते ..मी तिला प्रतिकार करू शकत होतो ..नाही केला .कारण मला थोडेफार कुतूहल होतेच व्यसनमुक्ती केंद्राबद्दल . 

उठून पलंगावर बसलो तसे एकदोन जण माझ्याजवळ आले आणि माझे निरीक्षण करू लागले ऐक जण जरा वयस्कर होता ..केस पांढरे मात्र त्याच्या चेहऱ्यावर मिस्कील भाव होते ..जणू काही तो मला ' काय ? कशी मजा आली " असे म्हणत असावा ... दुसरा खुपच तरुण होता साधारण पंचविशीचा असावा ..माझ्या जवळ येऊन म्हणाला ' विजय भाऊ , बरे झाले तुम्ही उठलात .चला चहा घ्या थोडा म्हणजे तरतरी येईल .. त्याच्या हातात ऐक स्टीलचा ग्लास होता ...माझे डोके जड झाले होते ..शिवाय मघा ऑफिस मधून मला सरळ आत पलंगावर आणून झोपवले होते ..माझे जेवण देखील राहिले होते ..पोटात नुसती आग पडली होती ..मी त्याला पाणी मागितले ..त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ..ऐक ..दोन तीन ..मी घटाघटा तीन ग्लास पाणी रिचवले ..तेव्हा कुठे जरा हुशारी आली ..खूप दारू पिऊन रात्रीचा जेव्हा मी घरी येऊन न जेवता झोपत असे तेव्हा देखील मला एकदम मध्यरात्री जाग येई व पोटात पडलेली आग शांत करण्यासाठी असे दोन तीन ग्लास पाणी प्यायले की बरे वाटे ..त्याने मला चहा दिला गरम गरम वाफाळलेला चहा घ्यावासा वाटत होता पण ..पण तो ग्लास हातात घेतला तेव्हा हात थरथरू लागला ..माझ्या थरथरत्या हात कडे पाहून तो म्हतारा परत गालात हसतोय असे वाटले ..त्याचे असे हे ..जवळ उभे राहणे आणि मुख्य म्हणजे माझे सतत निरीक्षण करणे मला आवडले नाही ..मी त्याच्याकडे त्रासिक मुद्रेने पहिले ..तसा तो निघून गेला . हळू हळू चहाचा ऐक ऐक घोट घेत होतो ..पण आता आपण व्यसनमुक्ती केंद्रात अडकलो आहे ही भावना मात्र मन पोखरत होती ..माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीचा हा ऐक अपमानच समजत होतो मी ..दारू काय जगात सगळेच पितात ..आणि जर एखादा प्रामाणिक पणे कष्ट करून नीट संसार करत जर स्वतच्या आनंदासाठी दारू प्यायला तर त्यात चूक ते काय ? ..अलकाला उगाच माझी चिंता वाटे ..मी काही लहान मुलगा नव्हतो की... मला स्वतचे भले बुरे समजत नव्हते अश्यातला ही भाग नव्हता ..उलट हल्ली तिच्याच कटकटीमुळे माझे पिणे वाढले होते ...ही बाई सारखी घरात माझ्या मागे काहीतरी भुणभुण लावत असे ..हे करा ..ते करा ..हे का नाही केले ? ते का नाही केले ? वगैरे ..ऑफिस मधील साहेबाची वेगळीच तऱ्हा ..त्याला कोणतेही काम कधी पसंत पडले असे होत नसे . प्रत्येक काही ना काही चुका काढून हाताखालच्या लोकांवर कसे डाफरावे याचे जणू त्याचे खास ट्रेनिंग झालेले होते ..ऑफिस चा ताण ..घरच्या कटकटी या सगळ्या गोष्टीतून विरुंगुळा म्हणून मी पीत असे !

चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते ..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव ..परत आलो आणि पलंगावर बसलो ..समोरच्या भिंतीवर मोठे घड्याळ होते त्यात साडेपाच वाजले होते ..बापरे म्हणजे मी जवळ जवळ पाच तास झोपलो होतो तर .. ! तो तरुण मुलगा आज्ञाधारक भाव चेहऱ्यावर घेऊन उभाच होता माझ्या समोर त्याला विचारले की येथील प्रमुख कोण आहेत ? मला त्यांना भेटायचे आहे .यावर तो नुसताच हसला ..मग म्हणाला ..सर् दुपारी लंचसाठी घरी जातात आता येतीलच संध्याकाळी ..तुमचे काय काम आहे ? .याला कशाला सांगू मी माझे काम ? ..ते मी सरांनाच सांगीन म्हणत चूप बसलो . जरा वेळाने कोणीतरी म्हणाले की सर् आलेत बहुतेक ..मी लगेच सावध झालो आणि उठून बाहेरच्या दाराकडे जाऊ लागलो तर मला एकाने अडवले म्हणाला ..कुठे जाताय ..तिकडे ऑफिस मध्ये जाता येणार नाही तुम्हाला ..माझी सटकलीच .साला मी काय चोर बीर आहे की काय ? ..मला सरांना भेटायचे आहे असे म्हणत त्याला बाजूला करून मी पुन्हा दाराकडे निघालो ..बाहेर ऑफिस ला जाण्याचे दार बंद होते मात्र त्या दाराला मध्यभागी ऐक चौकट होती व त्यातून बाहेरच्या लोकांशी बोलता येईल से वाटले मी जवळ जाऊन सर् ..अहो सर् ..जरा मला तुमच्याशी बोलायचे आहे असे ओरडलो .तसे वार्ड मधले एकदोन जण धावत आले आणि ते मला पुन्हा पलंगाकडे नेऊ लागले ..माझा आवाज एकून बाहेरून दार उघडले गेले आणि बाहेरच्या माणसाने मला धरलेल्या लोकांना सांगितले ..सोडा त्याला ..सर् त्याला बोलवत आहेत ..मी पटकन बाहेर आलो ..सकाळचाच तो माणूस बसला होता खुर्चीवर ..प्रसन्नपणे हसत म्हणाला ' बोला विजयभाऊ ? कसे वाटतेय आता ? .. मला अलकाला जरा फोन करायचा आहे मी त्याला म्हणालो तसे हसला ' अहो त्या जाऊन जेमतेम पाच तास झालेत आणि लगेच तुम्हाला त्यांची इतकी आठवण यायला लागली की काय ? ..त्या उद्या येणार आहेत तुम्हाला भेटायला " ..नाही पण मला जरा तिला महत्वाचा निरोप द्यायचा आहे ..मी माझी मागणी पुढे रेटली .म्हणाला ..ऐक काम करा तुम्ही तुमचा निरोप माझ्याजवळ द्या , मी त्यांना पोचवतो ..त्याने मला निरुत्तर केले ..मग म्हणाला तुम्ही फक्त ऐक दिवस धीर धरा उद्या नक्की तुमची भेट घालून देतो पत्नीशी . मी ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली व मागे वळलो.!

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment