Friday, May 3, 2013

निर्बलतेची कबुली ..मान्यता !


सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ' रोजचे प्रतिबिंब ' असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..आपण रोज या पुस्तकातील ऐक विचार वाचून त्यावर चिंतन करत असतो ..या चिंतनामुळे आपल्याला व्यसनापासून दूर राहण्याची मानसिक शक्ती मिळते असा हजारो व्यसनींचा अनुभव आहे . आजचा विचार हा व्यसनाधीन झाल्याची स्वतःला कबुली देण्यासंबंधी आहे .. आपण इथे उपचारांसाठी दाखल झाले आहेत खरे असले तरी ..बहुतेकजण आईवडिलांच्या ..पत्नीच्या ..किवा मुलांच्या आग्रहाखातर इथे दाखल झाले आहेत व त्यांना अजूनही मनात वाटत असेल की मी काही फारशी दारू पीत नव्हतो किवा फारसे व्यसन करत नव्हतो .. पण नातेवाईकांना उगाचच चिंता ..काळजी वगैरे वाटली आणि त्यांनी आग्रह केला तो मोडता आला नाही म्हणून उपचार घेण्यास तयार झालो . काही जणांना पत्नीने माहेरी निघून जाण्याची धमकी दिली असेल ..काही जणांना नोकरीवर गैरहजर राहण्याबद्दल नोटीस मिळाली असेल म्हणून जरा तब्येत बरी करण्यासाठी ता येथे आले असतील .. तर काही जण असेही असतील की व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय उपचार चालतात हे पाहण्यासाठी येथे दाखल झाले असतील ..मात्र मनातून प्रत्येकाला मी दारुडा नाही असेच वाटत असते कारण दारुडा म्हंटले म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे फाटके कपडे ..दाढी वाढलेली .. नोकरी गेलेली .. घरात सतत भांडणे .. लोकांकडे पैसे मागणे .. दारू पिऊन रस्त्यावर झिंगत चाललेला .. रस्त्याच्या कडेला नशेत पडून असलेला ..अश्या व्यक्तीशी तुलना करता आपल्या पैकी बहुतेक जणांना कधीच या अवस्थेला तोंड द्यावे लागले नसल्याने स्वाभाविक पणे आपण दारुडे आहोत हे मनापासून आपण कबुल करण्यास नकार देत असतो .

सरांचे म्हणणे अगदी पटले मला ..माझ्या मनात देखील दारुडा म्हणजे अशीच ऐक भणंग .. कर्जबाजारी ..झोपडपट्टीत राहणारा ..पत्नी .मुलांना मारझोड करणारा ही प्रतिमा होती ..आणि त्या तुलनेत मी जरी दारू पीत असलो तरी माझ्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती .. मी नेहमी अलकाला हेच सांगत होतो की मी दारू पितो म्हणजे एकदम आभाळ कोसळल्यासारखे घाबरण्याची काही गरज नाहीय ..मी काही दारुडा नाहीय अजिबात , मी स्वतः नोकरी करतो ..घरचा खर्च भागवतो .. कधीही तुला मारझोड केली नाहीय ..तू उगाच बाऊ करते आहेस माझ्या पिण्याचा ....आणि अलकाचे त्यावर असे म्हणणे होते की अहो पण तुम्ही रोजच दारू पीत आहात ..आता तुमचे प्रमाणही वाढत चालले आहे ..जेवण कमी झालेय ..सुटीच्या दिवशी तुम्ही दुपारी देखील पिता ही सगळी लक्षणे पाहून मला माझी आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटते ..रोज वर्तमानपत्रात दारूबद्दल काय काय बातम्या असतात ..कितीतरी अपघात होतात मग मला काळजी वाटणारच . अलकाचे म्हणणे तेव्हा मला पटत नसे पण आता सर् अगदी सविस्तर सांगत होते तेव्हा पटत होते .. सर् पुढे बोलू लागले ..मित्रानो जो पर्यंत आपण दारूच्या किवा जे काही मादक द्रव्य सेवन करत असू त्याच्या आहारी गेलो आहोत अशी कबुली देत नाही तो पर्यंत व्यसनमुक्त होण्याची ताकद मिळणे अवघड आहे . जो पर्यंत आपण व्यसनी झालो आहोत अशी आतून अंतर्मनातून कबुली देत नाही तो पर्यंत उपचारामधिल आपला सहभाग वाढणार नाही आणि मानसिक शक्ती देखील वाढणार नाही . आपण व्यसनी झालो आहोत की नाही हे तपासण्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारून आपण त्याची प्रामाणिक पणे उत्तरे दिली तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याची कबुली आपल्याला देता येईल . अल्कोहोलीक्स अँनॉनिमस ने या साठी वीस प्रश्नांची ऐक प्रश्नावली तयार केली असून त्या वरून मी तुम्हाला फक्त पाच प्रश्न विचारणार आहे व जर त्याची प्रामाणिक पणे तुम्ही होकारार्थी उत्तरे दिलीत तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याचे आपल्याला मान्य कारणे भाग आहे असे म्हणत सरांनी पाच प्रश्न फळ्यावर लिहिले

१) माझ्या व्यसनामुळे माझे कुटुंबीय चिंतीत आहेत काय ? ( कधी ..किती .कोणत्या दर्जाची पितो हे महत्वाचे नाहीय ) 

२) माझ्या व्यसनामुळे अनेकदा माझा वेळ आणि पैसा मी व्यर्थ वाया घालवत आहे असे मला कधी वाटले काय ? 

३) अनेकदा व्यसन बंद करण्याचा मी मनाशी निर्धार करूनही माझे व्यसन पुन्हा सुरु झाले आहे काय ? 

४) दुखः , निराशा , राग , अपमान , खुन्नस , वैफल्य , कंटाळा , वगैरे प्रकारच्या भावनांनी ग्रस्त झाल्यावर मला व्यसन करावेसे वाटते काय ? 

५) माझ्या व्यसनाबद्दल जेव्हा कुटुंबीय चिंता व्यक्त करतात व मला व्यसनमुक्तीचा सल्ला देतात तेव्हा मला त्यांचा राग येतो का ? 

फळ्यावर सरांनी हे प्रश्न लिहून सगळ्यांना ते प्रश्न वहीत उतरवून घेण्यास सांगितले आणि मग म्हणाले ..जर या पैकी तीन प्रश्नांची जरी होकारार्थी उत्तरे आली तर आपण स्वतःशी व्यसनी झाल्याची कबुली दिली पाहिजे . सर् फळ्यावर लिहीत असतानाच मी मनात या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक पणे देत होतो आणि तीनच काय पण पाचही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी येत होती . मला पटले की मी नक्कीच व्यसनी झालो होतो आणि मला उपचारांची गरज होती ..मनातल्या मनात मी अलकाचे आभार मानले कारण तिनेच मला इथे येण्याचा आग्रह केला होता . सर् पुढे सांगू लागले ' मित्रानो आपला अहंकार बहुधा अशी कबुली देण्याचा आड येत असतो ..आपली संपत्ती ..शारीरिक क्षमता ..आपले शिक्षण .. सामाजिक सन्मान ..अधिकाराचे पद .. वगैरे अहंकारामुळे आपण व्यसनी झाल्याचे मान्य करत नाही त्या मुळे आपल्याला जगात कोण पीत नाही ? .. थोडीशी घेतली तरी माझे काही नुकसान होणार नाही ..आणि नुकसान झाले तर .ते नुकसान भरून काढण्यास मी समर्थ आहे असे वाटत राहते व आपल्या पिण्याचे आपण समर्थन करत जातो . सगळ्यांनी तटस्थ पणे स्वतःकडे पाहण्याची गरज आहे म्हणजे आपली समर्थने गळून पडतात ' असे सांगत सरांनी समारोप केला . सगळे उठले तसे शेरकर काका माझ्या जवळ आले आणि मिस्कील पणे भुवया उडवत म्हणाले ' काय आहे का कबुल ? ' मी हसत त्यानी पुढे केलेल्या हातावर टाळी दिली .

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment