पालकांबद्दल कृतज्ञता ! ( बेवड्याची डायरी -भाग २१ वा )
रविवारी सायंकाळी पालकांना भेटण्याची वेळ असते हे मला माँनीटर कडून समजले ..त्याने मला हे देखील सांगितले की अजून तुम्हाला येथे येवून दहा दिवस पूर्ण झाले नाहीत ..म्हणून तुमच्या घरून कोणी येणार नाहीत ...ज्यांना येथे दाखल होऊन किमान दहा दिवस होऊन गेले आहेत अश्या लोकांनाच पालकांना भेटू देतो आम्ही ..कारण सुरवातीचे दहा दिवस येथल्या दिनक्रमाशी जुळवूनघेण्यात जातात ..जर त्या दहा दिवसात पालकांशी संपर्क झाला तर उपचार घेणारा हमखास पालकांकडे मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करतो ..एक तर त्याच्या मनात व्यसनाची ओढ तीव्र असते ..शिवाय प्रथमच तो कुटुंबीयांपासून दूर राहत असतो ..त्यामुळे पालक दिसताच तो त्यांना घरी घेवून चला म्हणून मागे लागतो .. माझ्या घरून आज कोणी भेटायला येणार नाही हे समजल्यावर मी जरा खट्टू झालो ..खरे तर मी देखील मनात योजले होते की अलका भेटायला आली की आता मला घरी घेवून चल असे म्हणायचे ..इथे जरी चांगले शिकवले जात होते ..व्यसना शिवाय जेवण ..झोप येणे सुरळीत होत होते ..जेवणही चांगले होते ..मनोरंजन होते ..तरीही ..येथून बाहेर पडावे असे विचार मनात येत होते ..भेट नाही पण किमान अलकाला एखादा फोन तरी करावा सरांना सांगून असे मी ठरवले ..आज फक्त सकाळी एक समूह उपचार होणार होता ..बाकी थेरपीजना सुटी होती हे सकाळीच समजले होते ..
समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' कृतज्ञता ' हा विषय चर्चेला घेतला ..कृतज्ञता म्हणजे इतरांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल जाणीव ठेवणे ..त्या मदतीबद्दल ऋणी राहणे ..किवा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ...मदतीचा हात दिला आहे ..आपले जीवन अधिक सुखकर होण्यासाठी शिकवण दिलीय ..आपल्याला सुख मिळावे म्हणून प्रयत्न केले आहेत अश्या सर्व लोकांच्या श्रमांची ..कष्टांची जाण ठेवून ..अशा व्यक्तींना मान देणे ..त्यांच्या भावनांचा सन्मान करणे होय ..सरांनी आधी कृतज्ञतेचा अर्थ उलगडून सांगितला ..माणूस जन्माला आल्यावर त्याला जन्म देणारे ..त्याचे नीट पालन पोषण करणारे आईवडील ...त्याला वेळो वेळी प्रेम देणारी भावंडे ..शाळेत ..कॉलेजात त्याला वेगवेगळे विषय शिकवणारे त्याचे शिक्षक.. त्याला उदरनिर्वाहासाठी नोकरी देणारी व्यवस्था ..लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात येवून त्याचे जीवन अधिक सुखकर व्हावे या साठी झटणारी पत्नी ..त्याला पितृत्वाचा आनंद देणारी मुले ..इतकेच नव्हे तर माणसाने निसर्गाबद्दल ..समाजाबद्दल देखील कृतज्ञ राहिले पाहिजे हे सांगताना सरांनी सुंदर उदाहरण दिले ..ते म्हणाले आज अंगात मी जो शर्ट घातला आहे ..तो तयार होऊन माझ्या पर्यंत पोचविण्यासाठी देखील अनेक लोकांचा हातभार आहे ..आधी शेतकऱ्याने शेतात कापूस पिकवला ..पुढे तो कापूस मिल मध्ये जाऊन त्याचे कापड तयार झाले ..मग माझ्या मापाचा शर्ट शिवून तो दुकानात विक्रीला ठेवला गेला ..मी काही पैसे मोजून तो शर्ट खरेदी केला..मी केवळ काही पैसे मोजून तो खरेदी केला म्हणून शर्ट तयार होण्यासाठी कष्ट घेतलेल्या लोकांची मी किंमत करू नये ही ' कृतघ्नता ' ठरेल.
मी जिवंत राहावे म्हणून शरीरात घेतला जाणारा प्राणवायू ..मला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी ..पोषणासाठी मी खात असलेले अन्न हे सगळे मी एकटा माझ्या बळावर निर्माण करू शकत नाही .. निसर्ग ..आसपासची माणसे ..एकंदरीत सर्व समाजच एकमेकांसाठी मदत करणारा ठरतो ..म्हणून सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे ..मात्र माणूस अहंकारामुळे अनेकदा मी ' सेल्फमेड ' आहे असे म्हणतो हे किती हास्यास्पद आहे ..मानवी शरीर आणि मन यांना सुख देणारी साऱ्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता बाळगली तरच अहंकार नाहीसा होतो ....परस्परावलंबनाची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात ...ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले.
पुढे त्यांनी विशेष सूचना दिली ..आज ज्या लोकांचे पालक त्यांना भेटायला येतील ..त्यांनी पालकांकडे कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे ..आपण व्यसने करून पालकांना खूप त्रास दिलाय ..पैसे उडवले आहेत ..सर्व कुटुंबियांना आपल्या व्यसनापायी वेठीस धरले होते ..तरीही त्यांनी आपण सुधारावे म्हणून आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून नव्याने जीवन जगण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलीय ..त्यामुळे भेटायला आलेल्या पालकांशी नम्रतेने बोला ..त्यांच्या भावना समजून घ्या ..त्यांना यापुढे व्यसन करणार नाही म्हणून आश्वस्त करा ..जर तुम्ही घरी जाण्याचा हट्ट केलात..,,घरी घेवून चला म्हणून त्यांना ' इमोशनल ब्लँकमेलिंग ' केले....धमक्या दिल्या ..घाबरवले किवा त्यांच्यावर राग व्यक्त केला .. तर नक्कीच त्यांना दुखः होईल ..इतके दिवस व्यसने करून आपण त्यांना दुखः दिलेच आहे ..आता सुधारणेच्या काळात त्यांना आपण सुधारत आहोत असा धीर मिळाला पाहिजे ..ज्यांचे पालक भेटीला येणार नाहीत त्यांनी नाराज न होता पालकांना काहीतरी अडचण असेल असा विचार केला पाहिजे ..असे सांगून सरांनी आम्हाला पालकांच्या भेटीसाठी शुभेच्छा दिल्या !
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment