Saturday, April 12, 2014

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !( बेवड्याची डायरी - भाग २५ वा )
ईश्वरी शक्तीबद्दल सांगताना सरांनी एखाद्या विशिष्ट धर्माच्या ..विशिष्ट पंथाच्या ईश्वराचा उल्लेख न करता प्रत्यक्ष सृष्टीला ..निसर्गाला ..निसर्ग नियमांना ईश्वर समजणे ..हेच ईश्वराच्या सर्व व्यापकतेला धरून आहे हे स्पष्ट करत आज ..हा सर्व व्यापक ..सर्वसमावेशक ईश्वर प्रत्येकाच्या जीवनात कशा रीतीने कार्यरत आहे हे सांगितले ..प्रत्येक जीवाचा जन्म निसर्गनियमांना अनुसरूनच होत असतो .. मानवाच्या बाबतीत जन्मानंतर त्या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी घेणारे त्याचे आई -वडील .. त्याचे या जगात प्रवेश केल्यानंतरचे प्रथम ईश्वर मानले पाहिजेत .. नंतर त्याची भावंडे ..जी त्याला प्रेम देतात ..खेळण्यात सवंगडी म्हणून त्याच्या सोबत असतात ..जी त्याच्या दुखल्या दुखल्या खुपल्याला त्याला मदत करतात ..आधार देतात ..मग त्याच्या आयुष्यात येणारे त्याचे गुरुजन.. जे त्याला स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे ज्ञान देतात ..मोठा झाल्यावर त्याची पत्नी ..जी आई प्रमाणेच त्याची काळजी घेते ..त्याला प्रेम देते ..त्याचे जीवन आनंदी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते ....शेवटी माणूस म्हातारा झाला की त्याला आधार देणारी त्याची मुले ही देखील ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होतात ..सर्वात शेवटी हा संपूर्ण समाज येतो ईश्वराच्या व्याख्येत ..आपले मित्र ..शुभचिंतक ..स्नेही ..जे जे लोक आपण व्यसनमुक्त व्हावे म्हणून इच्छा ठेवतात ते सगळे या व्याख्येत येतील ..परस्परांना आनंदाने जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी समाजातील प्रत्येक घटक मदत करत करत असतो ..अश्या पद्धतीने जर आपण ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ..ईश्वराला समजून घ्यायला कुठे दूर जाण्याची गरज नाही हे स्पष्ट करत सर म्हणाले की .आपल्या व्यसन करण्याला यातील बहुतेक लोकांनी विरोध केला तरीही आपण व्यसन करत राहिलो याचे प्रमुख कारण की या लोकांना आपण ईश्वर मानले नाही ..हे लोक आपल्या भल्याचे सांगतात हे समजून न घेता ..केवळ मला विरोध करतात म्हणून त्यांना शत्रूच्या यादीत टाकले होते आपण ..सर नीट उलगडून सांगत गेले तसे मला थोडेफार समजत गेले .. जर आपण निसर्गनियम ..आपले नातलग ..स्नेही ..शुभचिंतक ..कौटुंबिक नियम ..सामाजिक नियम ..व्यवस्थित समजून घेतले तर ईश्वर समजण्यास सोपा जाईल ..ईश्वर प्रत्येक जीवात आहे ..प्रत्येक प्राण्यात आहे ..त्यामुळे अदृश्य अशा ईश्वराची पूजा करून ...त्याला प्रसन्न करून घेवून ..नवस बोलून ..आपल्या आयुष्यात काहीतरी चत्मकार होईल अशी वाट पाहत बसण्यापेक्षा ..आपण जर आपले जीवन आहे तसे स्वीकारून ..ते अधिक समृद्ध ..आनंदी ..करण्यासाठी या ईश्वराची सकारात्मक मदत घेत गेलो तर नक्कीच व्यसनमुक्त राहता येईल ...
सर्वात शेवटी त्यांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसला अभिप्रेत असलेल्या उच्चशक्तीची किवा प्रार्थनेत उल्लेखलेल्या ' गाँड ' या शब्दाची व्याख्या सांगितली ..G-म्हणजे good , O -म्हणजे orderly .आणि D - म्हणजे director ...हे सांगत ..याचा संपूर्ण शब्द होतो ..' गुड ऑर्डरली डायरेक्टर ' ...आपले जीवन चांगले यशस्वीपणे ..समर्थपणे ...धैर्याने ..जगण्यासाठी दिशादर्शन किवा दिग्दर्शन करणारी कोणतीही व्यक्ती ..तत्व ..नियम ..विचारधारा ..या सर्वांचा या ' गाँड ' मध्ये समावेश होतो असे सांगितले ..एकदा आपण आपले स्वता:चे जीवन ..केवळ स्वतच्या इच्छाशक्तीच्या बळावर ..बुद्धीच्या बळावर ..आर्थिकतेच्या बळावर यशस्वीपणे जगू शकत नाहीय हे मान्य केले की मगच आपल्याला या ईश्वरी शक्तीची मदत घेण्याची मानसिक तयारी करता येते ..या ईश्वरी तत्वाला समजून घेवून त्याच्या अनुषंगाने जीवन जगण्यास प्रेरणा मिळू शकते ..सरांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यावर कोणाला काही प्रश्न आहेत का असे विचारले ..आम्ही सगळे अंतर्मुख झालो होतो ..काय विचारावे याचा विचार करत होतो ..एकाने विचारले " सर ..मग निसर्गानेच अनेक प्रकारच्या मादक वनस्पती निर्माण केल्या आहेत .ज्या पासून गांजा ..भांग ..अफू ..कोकेन असे मादक पदार्थ निर्माण होतात ..तसेच ज्यापासून दारू तयार होते ते पदार्थ पण निसर्गानेच निर्माण केले आहेत ..त्यांना पण ईश्वर समजायचे का ? " ..त्याच्या प्रश्नाने सर्व हसू लागले ..अतिशय चाणाक्षपणे त्याने हा प्रश्न विचारला होता ..सरांनी लगेच उत्तर दिले " तू नावे घेतलेल्या सर्व वनस्पती निसर्गाने निर्माण केल्या आहेत हे एकदम बरोबर आहे ..मात्र निसर्गाचा यात मानवाला मदत व्हावी हाच हेतू होता ..या सर्व वनस्पती आयुर्वेदात किवा अँलोपथीमध्ये विशिष्ट प्रकारच्या आजारात औषधी म्हणून वापरल्या जातात... विशिष्ट मानवी आजार बरे करण्यास हातभर लावतात ..या वनस्पितींचा वापर आपण एखाद्या आजारासाठी अथवा आजार बरा होण्यासाठी न करता ..नशेसाठी ..कल्पनेच्या जगात जाण्यासाठी ..कृत्रिम आनंद मिळवण्यासाठी करत गेलो तर नक्कीच या आरोग्याला हानिकारक ठरतात ..दारूचेही तसेच आहे ..काही प्रकारच्या औषधांमध्ये अल्कोहोल अगदी सौम्य प्रमाणात वापरले जाते ..मात्र दारुड्याने आजार नसताना देखील याचा वापर सुरु केला ..हे स्वैर इछेचे लक्षण आहे ..आता तर आपण या औषधांचा इतका गैरवापर केलंय की ती औषधे वारंवार घेणे हाच आजार जडला आहे आपल्याला ..त्यामुळे यापुढे एकदाही अश्या मादक औषधांचे सेवन न करणे हेच पथ्य आपल्याला पाळायला हवे " सरांच्या उत्तराने त्याचे समाधान झाले ..
समूह उपचार संपल्यावर मी वार्डच्या बाजूच्या केबिनमध्ये असलेल्या वाचनालयात गेलो ..सरांनी उल्लेख केलेल्या अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची पुस्तके एकदा वाचावी असे मनात होते..लायब्ररीत चार पाच कपाटे होती..ज्यावर ..अध्यात्म ..आरोग्य ...आत्मचरित्र ..कादंबरी ..धार्मिक.. अशी लेबले लावलेली दिसली .. बरीच पुस्तके होती तर इथे ..मला वाचनाची आवड असल्याने बराच वेळ पुस्तके पाहत वेळ घालवला ..चला लायब्ररीमुळे माझा फावला वेळ चांगला जाणार होता ..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ' माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधन विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ' असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment