Sunday, August 31, 2014

शस्त्र त्याग ???


शस्त्र त्याग ??? ( बेवड्याची डायरी - भाग - ५७ वा )

सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सहाव्या पायरीत ..आपल्या स्वभावात असलेल्या दोषांचा त्याग करण्यास सुचवले होते ..हे एक प्रकारे शस्त्रत्याग करण्यासारखेच होते ..राग ..इतरांना दोष देणे ..स्वत:च्या मनासारखे व्हावे म्हणून आरडाओरडा करणे ..खुन्नस ठेवणे . कुटुंबियांना घर सोडून जाण्याची ..आत्महत्येची धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल करणे ..मोठी मोठी स्वप्ने दाखवून त्यांना आपल्या मनासारखे वागायला भाग पाडणे ..किवां गरजेनुसार रडणे ..क्षमायाचना करणे ..पश्चाताप झालाय असे भासवणे ..ही शस्त्रे एक व्यसनी नेहमीच स्वतचे व्यसन करणे सुरळीत सुरु रहावे म्हणून वापरात असतो ..मात्र व्यसनमुक्तीच्या काळात देखील तो सगळे काही आपल्या मनासारखे सुरळीत घडावे म्हणून या शस्त्रांचा वापर करत जातो ..आपल्या स्वभावातील हे दोष वारंवार आपल्याला व्यसनाकडे घेवून जावू शकतात हे त्याच्या गावीही नसते ..केवळ काही दिवस व्यसन बंद असले की तो जग जिंकल्याच्या अविर्भावात वावरू लागतो .. आणि येथेच त्याची फसगत होते ..मग त्याला कोणी आपल्या पूर्वीच्या वागण्याचा उल्लेख केला की राग येतो ..कोणी आपल्या क्षमतेबाबत संशय व्यक्त केला की खुन्नस जागृत होते ..कोणी अविश्वास दर्शवला तर मनापासून वाईट वाटते ...आपण व्यसन आता बंद केलेय या अहंकारात तो जीवनाबद्दल मोठी मोठी स्वप्ने पाहतो ..व्यसन बंद आहे म्हणजे आता सगळे काही मनासारखे सुरळीत घडेल अशी आशा ठेवतो ..आणि तसे घडले नाही तर पुन्हा व्यसनाचा आधार घेतो ! 

सहाव्या पायरीच्या विवेचनात सरांनी हे सारे स्पष्ट केले होते ..माझ्याही बाबतीत नेहमी तसेच घडत आले होते ..खूप आर्थिक त्रास झाला ..किवा काही शारीरिक समस्या आली ..पत्नीने माहेरी जाण्याची धमकी दिली की काही काळ मी व्यसन बंद करत असे .. मनावर घेतल्यावर मी पाहिजे तेव्हा व्यसन सोडू शकतो हा अहंकार जागृत होऊन .. आता सारे काही ताबडतोब सुरळीत व्हावे अशी अपेक्षा मी ठेवत असे सगळ्या जगाकडून ..व्यसन बंद करून मोठे उपकार केल्याच्या भावनेत वावरत असे ..मी व्यसन बंद करू शकतो म्हणजे मी खूप निर्धारी आहे..कुटुंबियांच्या भल्यासाठी मी खूप मोठा त्याग केलाय अशी भावना मनात तयार होऊन ..आता सगळे माझ्या मनासारखे घडावे अशी मागणी करत असे ..मात्र मी व्यसन बंद केले तरी पूर्वी मी व्यसनामुळे दिलेले त्रास ..विश्वासघात ..मुजोऱ्या..माझे आणि कुटुंबियांचे केलेले अतोनात नुकसान इतर सर्वांनी विसरून जावे ही अपेक्षा ठेवत असे ..त्यांना मात्र हे सगळे ताबडतोब विसरणे केवळ अशक्य असते ..मी जणू त्या गावचाच नाही असा वावरत असताना कोणी मी पूर्वी दिलेल्या त्रासाची आठवण काढली की मला राग येई ..जुन्या गोष्टींचा उल्लेख करून हे लोक उगाच मला त्रास देत आहेत असे वाटे ..माझ्या भावनांची कोणालाही पर्वा नाही असे वाटे ..कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन केले की मला अपमान वाटे ..माझ्यावर अविश्वास व्यक्त केला की खुन्नस वाटे घरच्या लोकांची ..आणि मग माझी चिडचिड सुरु होई ..तसेच सगळे आपल्या मनासारखे सुरळीत कधी होईल या विचाराने मी अवस्थ राही ..अशी बैचेनीची ..रागाची ..अपमानाची भावना मला सतत अस्वस्थ ठेवत असे ..आणि एक दिवस माझी सहन शक्ती संपुष्टात येवून ' व्यसन बंद ठेवून काही फायदा नाही ' असे विचार मनात सुरु होता असत ..अरेरे मी किती गरीब बिच्चारा..सगळे जग किती स्वार्थी .. माझ्या त्यागाची कोणाला किंमत नाही ..वगैरे विचारांनी मी ' फक्त आज एकदाचा खूप मनस्ताप होतोय म्हणून थोडेसे व्यसन करायला काय हरकत आहे ' या विचारांनी एकदा म्हणून प्यायला जात असे ..या आजाराचा सगळ्यात घातक भाग असा की एकदा म्हणून घेतले की माझ्या शरीर मनाची व्यसनाबद्दल असलेली सुप्त भूक जागृत होऊन पुन्हा पुन्हा मी व्यसन करत राही ..परत जीवनाबद्दलचे सगळे नकारात्मक विचार मला घेरून रहात आणि पूर्वीचेच वर्तन सुरु होई .

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहून मी समाधानाने डायरी बंद केली ..माझ्या बाजूला बसलेल्या शेरकर काकांनी मला टोमणा मारलाच ..' काय स्कॉलर ? " असे म्हणत डोळे मिचकावले ..मी देखील हसून त्यांना टाळी दिली ..स्वताचे परखड आत्मपरीक्षण करताना खूप हलके वाटते हे मी काकांना समजावून सांगू शकत नव्हतो ..तितक्यात एक गांजाचा व्यसनी आमच्या जवळ आला ..हा गडी तसा खुशालचेंडू होता ..तो सगळ्या थेरपीज निव्वळ नाईलाजाने करत असे ..प्रत्येक वेळी माॅनीटर त्याला रागवत असे ..तरीही याच्यावर काही परिणाम होत नसे ..त्याला पाहून काकांनी हाताने चिलीम ओढण्याची अॅक्शन करत ' भोले ..भेज दे सोने चांदी के गोले ' असा पुकारा केला ..तो मनापासून हसला . बसलाच आमच्या जवळ येवून..केवळ गांजा पिण्याची अॅक्शन पाहूनच तो एकदम उत्तेजित झाल्यासारखा वाटला ..त्याचे डोळे चमकू लागले ..बापरे किती खोल आकर्षण दडले असते मनात हे मला जाणवले ..माझ्याही बाबतीत असेच होता असावे असे वाटले ..माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कोणी दारुडा मित्र भेटला ..अथवा दारूने मिळणाऱ्या आनंदाचा कोणी उल्लेख केला तर मी असाच उत्तेजित होऊन ' एकदा तरी घ्याला हवी ' हा किडा मनात रेंगाळू लागे ..कधीतरी कुठल्या तरी निमित्ताने मग हा डोक्यातला किडा शेवटी मला व्यसनाकडे घेवून जाई . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment