Friday, August 8, 2014

स्वभावदोष हाकलणे !

स्वभावदोष हाकलणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ५४ वा )

काल समूह उपचार संपल्यावर आम्ही सगळे डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पत्नीचा फोन नंबर देणाऱ्या पाटील भोवती गोळा झालो होतो ..सगळे त्याला तू मूर्ख आहेस असे म्हणत होते ..तो खजील होऊन बसला होता ..शेरकर काका अशी मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत ...ते पाटील ला म्हणाले ..तुला पुढची बातमी तर सरांनी सांगितलीच नाहीय ..मला ऑफिस मधून असे समजलेय की तो दारू पिवून तुझ्या घरी पण गेला होता ..आणि तुझ्या पत्नीकडे उधार पैसे मागत होता ..तुझ्या पत्नीने त्याला पैसे न देता घरातून हाकलले ..नंतर तिला खूप राग आला तुझा आणि तिने सरांना फोन करून तुला किमान सहा महिने तरी इथे ठेवावे अशी विनंती केली आहे ..हे ऐकून पाटील चक्क रडू लागला ..आता अजून सहा महिने वाढले उपचारांचे हा मोठाच धक्का होता ..मग तो शेरकर काकांच्या मागे लागला ..तुम्ही खरे सांगा ..अजून काय म्हणाली माही पत्नी सरांना ? कधी फोन केला होता तिने ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्याची केविलवाणी अवस्था पाहून सर्वांनी त्याची खूप मजा केली ..मग एकेक जण असे डिस्चार्ज होणार्या व्यक्तीला घरचा फोन नंबर व पत्ता दिल्याने पूर्वी घडलेले ऐकीव किस्से सांगू लागले .. एकाने असा घरचा पत्ता घेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी जावून खोटीनाटी करणे सांगून पैसे घेतले होते ..एकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खरोखर डिस्चार्ज केले होते ..नंतर ते दोघेही नियमित एकमेकांना भेटू लागले ..दोघांचेही दारू पिणे सुरु झाले त्यामुळे ..हे किस्से ऐकून मी मनाशी ठरवले की इथे उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कितीही चांगला मित्र असला तरी आपल्या घरचा पत्ता व फोन नंबर द्यायचा नाही ..इथे राहताना मित्र निवडताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे ..जे लोक अजूनही नकारात्मक विचार करतात ...गंभीरतेने उपचार घेत नाहीत ..थेरेपीज बुडवतात अशा नाठाळ लोकांपासून चार हात दूर राहिलेले बरे ..

आजच्या समूह उपचारात सरांनी फळ्यावर अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसची सहावी पायरी लिहिली.. ज्यात म्हंटले होते की '"परमेश्वराच्या मदतीने आम्ही आमचे सगळे स्वभावदोष काढून टाकण्यास पूर्णपणे तयार झालो " फळ्यावर पायरी लिहून होताच सरांनी मोठा सुस्कारा सोडला ..म्हणाले खूप कठीण काम आहे हे ..व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या या बारा पायऱ्या कोणी पूर्ण प्रामाणिकपणे आचरणात आणल्या तर तो नक्कीच ' संत ' बनेल ..अर्थात आपल्याला जरी संत बनायचे नसले तरी एक सर्वसामान्य आयुष्य समाधानाने आणि प्रसन्नतेने व्यतीत करायचे आहे ..त्यामुळे जास्तीत जास्त प्रामाणिकपणे या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करायला हवा ..असे म्हणतात की एक व्यसनी व्यक्तीकडे जन्मतः नैसर्गिक इच्छा आणि आकांक्षा इतर व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात असतात .. तो स्वताच्या इच्छापूर्ती साठी अधिक आग्रही असतो ..कदाचित त्यामुळेच तो जास्त जिद्दी ..हट्टी बनलेला असतो ..त्याला प्राप्त झालेल्या अतिरिक्त बुदिमत्तेचा वापर करून तो नेहमी स्वता:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो ...शिवाय संवेदनशील व हळवा असल्याने छोट्या छोट्या गोष्टीत तो पटकन रागावतो ..निराश होतो ..दुखी: होतो ..वैफल्यग्रस्त होतो या सर्व नकारात्मक भावनांचा परिणाम म्हणून तो सहजगत्या व्यसनांकडे आकर्षित होतो ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करता यावे या अट्टाहासामुळे तो सहजगत्या खोटे बोलतो ..ढोंगीपणा करतो ..दुहेरी व्यक्तिमत्व बनते त्याचे ..त्यातूनच अनेक प्रकारचे स्वभावदोष निर्माण होतात त्याच्या स्वभावात ..पुढे व्यसनाच्या काळात तो पूर्णतः निर्ढावतो ..अनेक स्वभावदोष त्याच्या वागण्यात इतरांना जाणवतात ..आता जरी आपण इथे उपचार घेताना व्यसनमुक्त असलो तरी जोवर या स्वभावदोषांची आपण दखल घेत नाही आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही तोवर आपले व्यसन वारंवार सुरु होण्याचा धोका कायम आहे ..वैचारिक आणि भावनिक संतुलन साध्य करणे आपल्याला आवश्यक ठरते ..सांगा बरे आपल्यात कोणते कोणते स्वभाव दोष आहेत असे आपल्याला वाटते ? सरांच्या या प्रश्नावर एकेकाने उत्तर देण्यास सुरवात केली ..खोटे बोलणे ..बाता मारणे ..दिवास्वप्ने पाहणे ..अतिआत्मविश्वास ..स्वतःला शहाणा समजणे ...दोषारोप करणे ..इतरांच्या भावनांची पर्वा नसणे ..आत्मकेंद्रित वृत्ती ..कृतघ्नता ..आळशीपणा ..कामचुकारपणा ..बेजवाबदारपणा ..असमंजसपणा ..उतावळेपणा .आर्थिक गैरव्यवहार करणे ..पैश्यांची अफरातफर करण्याची वृत्ती ...चैनीवृत्ती ..अय्याशी वृत्ती ..चालढकल करण्याची वृत्ती ..कमी कष्टात जास्त पैसे मिळावेत अशी इच्छा असणे ..झटपट सुख मिळावे अशी लालसा ..इतरांवर दादागिरी करणे ..माझेच म्हणणे खरे असे वाटणे . ..सतत असुरक्षित वाटणे ..वार्डातील सगळे पटापट ऐकेक स्वभावदोष सांगत होते ..सर ते फळ्यावर लिहित होते ..पाहता पाहता मोठीच यादी तयार झाली ..

त्या यादीकडे पाहत हसून सर म्हणाले " बापरे ! .तुम्ही सर्व खूपच प्रामाणिकपणे सांगितले आहेत आपले स्वभावदोष .आता हाच प्रामाणिकपणा हे स्वभावदोष निघून जाण्यासाठी वापरला पाहिजे ..यापैकी काही ना काही दोष प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीत देखील असतात ..मात्र त्यांचे हे दोष त्यांना व्यसनाकडे नेण्यास प्रवृत्त करत नाहीत कारण त्यांना व्यसन करू नये हे भान असते ..व्यसनामुळे आपले शारीरिक.. आर्थिक ..मानसिक.. कौटुंबिक ..सामाजिक पातळीवर नुकसान होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना असते ..किवा व्यसन करणे योग्य नाही हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून पक्क कोरला गेला असतो ..त्यामुळे त्यांचे स्वभावदोष जरी इतरांसाठी घातक..त्रासदायक असले तरी त्यामुळे ते व्यसन करतील असा धोका नसतो ..आपल्या बाबतीत मात्र ' आधीच मर्कट ..त्यात मद्य प्यायला ' असे घडलेय ..त्यामुळे आता हे मर्कटपण काढून टाकले तरच आपली व्यसनमुक्ती सहजपणे टिकते ..तसेच समाधानी आणि स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयुक्त असे आयुष्य घडवण्यास आपल्याला मदत मिळते ..पुढे सर म्हणाले या पायरीत म्हंटले आहे की परमेश्वराच्या मदतीने हे स्वभावदोष काढून टाकायचे आहेत ..म्हणजे आपल्याला स्वताच्या बळावर हे करता येणे कठीण आहे ..कारण सध्या आपले स्वभाव दोष हे आपले शस्त्रे किवा अस्त्रे बनली आहेत..आनंदाने जीवन व्यतीत करता यावे यासाठी आपण या शस्त्रांचा वापर ..गैरवापर करत आलो आहोत ..अशी शस्त्रे स्वतःहून त्यागण्यास आपले अंतर्मन सहजासहजी तयार होणार नाही...व्यसनमुक्तीचा आणि स्वभावदोष काढून टाकण्याचा काहीही संबंध नाही असे आपल्याला वाटेल ..जगत माझ्यापेक्षा जास्त स्वभावदोष असलेली अनेक माणसे आहेत ..त्यात काय विशेष ? ..प्रत्येक व्यक्तीत असतातच स्वभावदोष अशी समर्थने मनात तयार होऊ शकतात ..या समर्थानांच्या आड लपून आपण स्वभावदोष काढून टाकण्याच्या बाबतीत चालढकल करू शकतो ...हे स्वभावदोष काढून टाकताना खूप मानसिक त्रास होईल आपल्याला ..तरी आपली ही शस्त्रे त्यागणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment