Sunday, August 31, 2014

लैंगिक शिक्षण ???


लैंगिक शिक्षण ???  ( बेवड्याची डायरी - भाग ५८ वा ) 

नेहमीप्रमाणे प्रार्थना घेवून सरांनी आजच्या समूह उपचारांचा विषय म्हणून फळ्यावर ' लैंगिक शिक्षण ' असे लिहीताच ..आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो ..इथे सुमारे साठ टक्के लोक लग्न झालेले ..मुलेबाळे असलेले होते ..काही पन्नाशी उलटलेले ..तर उरलेले अविवाहित देखील सज्ञान या व्याख्येत मोडणारे होते ..लैंगिक शिक्षण हा विषय आम्हाला कशाला ? असा विचार माझ्या मनात आलाच ...व्यसनमुक्तीचा आणि लैंगिक शिक्षणाचा काय संबंध ? हा प्रश्न देखील पडला ..सरांनी सगळ्यांच्याकडे पाहून स्मित केले .." तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल ना ..लैंगिक शिक्षणाचा आणि व्यसनमुक्तीचा काय संबंध ? " सर्वांनी होकारार्थी मना डोलावल्या .." मित्रानो लैंगिक शिक्षण केवळ व्यसनमुक्तीशीच नव्हे तर आपल्या संपूर्ण जिवनाशी निगडीत आहे ..लैंगिकतेतूनच आपला सर्वांचा जन्म झालाय ..तरीही आपल्या पैकी फार थोड्या लोकांना लैंगिकते बदल शास्त्रीय माहिती असते .. थोडी फार माहिती आणि भरपूर गैरसमज आपल्या मनात असू शकतात ..लैंगिकता म्हणजे केवळ स्त्री - पुरुष संबंध ..अथवा शारीरिक सुख इतकाच त्रोटक अर्थ लैंगिकतेचा काढला जातो " ..मी पहिल्यांदाच हा विषय कोणीतरी इतक्या उघडपणे चर्चा करतोय हे पहात होतो ..खाजगीत चर्चिला जाणारा हा विषय आहे असेच माझे मत होते ..बहुतेक सगळ्यांच्या मनात हेच चालले असावे कारण बहुतेक लोक सरांकडे न पाहता खाली मान घालून सरांचे बोलणे ऐकत होते ..सर्वांनी आधी माना वर करा ..असे सरांनी सांगितले ..शेरकर काका तुम्ही पण ..सरांनी असे म्हणताच सर्वांनी वर फळ्याकडे पहिले ..शेरकर काका साठीच्या पुढे पोचलेले ..सरांनी त्यांचे नाव घेताच खसखस पिकली ..' आज आपण लैंगिकता म्हणजे नक्की काय ? लैंगिकतेच्या शास्त्रीय बाजू ..या बाबतची स्त्री - पुरुष यांची शारीरिक व मानसिक जडणघडण .. प्रेमसंबंध आणि शरीरसुख ..स्त्री -पुरुष इंद्रीयाबाबतची शास्त्रीय माहिती ..अपत्यप्राप्ती ..लैंगिकतेतून मिळणारे शारीरक आणि मानसिक सुख ..हस्तमैथुन ..दारू आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे लैंगिकतेवर होणारे दुष्परिणाम ..तसेच लैंगिकते बाबत असलेले प्रचंड गैरसमज या बाबत चर्चा करणार आहोत ..हा विषय सर्वांच्या जिवनाशी निगडीत असला तरी देखील आपण याची उघडपणे चर्चा करणे टाळतो किवा या विषयाकडे गंभीरतेने न पाहता ..काहीतरी अश्लील....अंधारातले ..चावट ..या दृष्टीकोनातून पाहतो ...या बाबतचे अनेक जोक्स करतो ..खिल्ली उडवतो ..स्त्री पुरुष इंद्रियाशी संबंधित शिव्या देतो ..खाजगीत हमखास चर्चा केला जाणारा हा विषय असूनही याबाबत आपल्याला नेमकी शास्त्रीय माहिती नसते .."

' लैंगिकते बाबत शास्त्रीय माहिती असलेली पुस्तके किती लोकांनी वाचलेली आहेत ? " सरांनी हा प्रश्न विचारताच ..जेमतेम एक दोघांनी बोट वर केले ..बाकी सगळे अवघडल्या सारखे बसलेले होते .." बर आता सांगा ..बाजारात मिळणारी पिवळ्या कव्हरची ..प्रणयाचे रसभरीत आणि अवास्तव वर्णन असणारी..अनैतिक संबंधावर आधारित .मस्तराम ..मुसाफिर .अशा टोपणनावानी लिहिणाऱ्या लेखकांची ..तसेच हैदोस ..बिनधास्त कथा ..मदभरी कहाँनिया ..डेबोनेर ..चॅस्टीटी ..फॅन्टसी .. वगैर नावे असलेली ..उघडीनागडे फोटो असलेली मासिके किती लोकांनी वाचली आहेत ? " सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले ..घाबरू नका मोकळेपणी हात वर करा ..असे सरांनी म्हणताच सुमारे पन्नास साठ हात वर झाले ..सगळेच हसले ..शेरकर काकांचा देखील हात वर झाला होता ..आता वातावरण जरा मोकळे होत होते ..सरांनी पुढचा प्रश्न विचारला ." किती लोकांनी नेट वर ..वेबसाईटवर ..अथवा आडबाजूला असणाऱ्या थेटरमध्ये ..मित्रांच्या रूमवर .. अश्लील समजले जाणारे चित्रपट ..क्लिप्स ..व्हिडीओ गुपचूप पहिले आहेत ? "..पुन्हा सगळे हात वर झाले ..' अरे वा ..सगळे हात वर झालेत ..म्हणजे या विषयात सर्वाना इंटरेस्ट आहे ..मात्र उघड कबुल करायला शास्त्रीय चर्चा करायला लाज वाटते ..कदाचित म्हणूनच देशात बलात्कार ..स्त्रियांशी संबंधित गुन्हे ..बालकांचे लैंगिक शोषण ..एड्स ..लैंगिकतेशी संबंधित इतर आजार ..गुप्तरोग ..यांचे वाढते प्रमाण आहे ..अधिक लैंगिक सुख मिळवण्यासाठी निरनिराळ्या मादक पदार्थांचा वापर ..उत्तेजना निर्माण होण्यासाठी.. उन्मादासाठी दारूचा वापर असे प्रकार होत आहेत .." 

सर बोलत असताना मागच्या बाजूला बसलेल्या दोघांमध्ये काहीतरी कुजबुज सुरु होती ..हळू हळू त्यांचे आवाज वाढले ..' काय चालले आहे रे तिकडे ? काय गप्पा मारताय .." असे सरांनी विचारताच दोघेही गप्पा बसले ..त्यातील एक म्हणाला .." सर याच्या खिश्यात एका उघड्या नटीचे बिकिनी घातलेले चित्र आहे ..याने मासिकातून फाडून घेतले आहे .." सगळे मोठ्याने हसू लागले ..ज्याच्या खिश्यात ते मासिकातून फाडलेले चित्र होते ..तो खूप खजील झाला ..मानेनेचे नको नको म्हणून लागला .." सर हा ते चित्र घेवून जातो संडासात " अशी एकाने पुस्ती जोडली ..त्या बरोबर पुन्हा सगळे हसू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..' अरे ...यात काही वावगे नाहीय ..असे प्रकार व्यसनमुक्ती केंद्रातच नव्हे तर सगळीकडे घडत असतात ..लैंगिक उत्तेजना मिळवण्यासाठी अशा फोटोंचा वापर होत असतो ..त्यात गुन्हा नाहीय काही " ..तो मुलगा संडासात असा उघडा फोटो घेवून जावून हस्तमैथुन करत असावा हे सगळ्यांचा ध्यानात आले ..तो मुलगा मान खाली घालूनच बसला होता ..सर पुढे म्हणाले ' हस्तमैथुन हे पाप आहे ..हस्तमैथुनाने तेज कमी होते ..इंद्रिय वाकडे होते ..शरीर खंगते ..रक्त कमी होते ..वीर्यनाश होतो ..वगैरे गोष्टी सर्वांनी कोणाकडून तरी ऐकल्या आहेत म्हणून हस्तमैथुन हे मोठे पाप आहे हेच सगळ्यांच्या मनात बसलेले आहे ..खरे तर हस्तमैथुन हे लैंगिक भावनेचा निचरा करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात सुरक्षित असे माध्यम आहे ..सुमारे ९० टक्के पुरुष या माध्यमाचा कधी ना कधी वापर करत असतात ..फक्त कोणी तसे उघड काबुल करत नाहीत ..तेव्हा त्या मुलाची खिल्ली उडवणे बंद करा " सरांनी असे म्हणताच सगळे अंतर्मुख झाले . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment