Monday, September 8, 2014

खरा पुरुषार्थ !

खरा पुरुषार्थ !  ( बेवड्याची डायरी - भाग ६२ वा ) 

आपण आता एकंदरीत नैसर्गिक दृष्टीने लैंगिकतेचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय ..लैंगिकता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे जाणून घेतानाच शरीर संबंध म्हणजे नेमके काय ..त्या मागील जवाबदारी ..लैंगिक तृप्ती म्हणजे काय ..त्याबाबतचे गैरसमज ..त्याबाबतची स्त्री -पुरुषांची मानसिकता इत्यादी गोष्टींबाबत देखील जाणून घेतले पाहिजे ..असे सांगत सरांनी फळ्यावर ..' कामतृप्ती ' हा शब्द लिहिला ..सगळ्यांच्या भुवया उंचावल्या ..मग सरांनी प्रश्न विचारला कोणी सांगू शकेल का याचा अर्थ ? आता या विषयाबाबत चांगलाच मोकळेपणा आलेला असल्याने चारपाच हात वर झाले ..' सर कामतृप्ती म्हणजे शरीर संबंधांचा शेवट असतो ..' एकाने सांगितले .." सर कामतृप्ती म्हणजे लैंगिक सुखाची चरम अवस्था " .." कामतृप्ती म्हणजे वीर्य स्खलनाची अवस्था " वेगवेगळी उत्तरे येत होती .." अगदी बरोबर तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात ..मात्र बहुतेक वेळा " कामतृप्ती " ही संज्ञा एकांगी अथवा एका बाजूने विचार करूनच लक्षात घेतली जाते ..शरीर संबंधातील लैंगिक उत्तेजनेचा आनंददायी शेवट ..वीर्य स्खलनाचा व अत्युच्च शारीरिक व मानसिक आनंद मिळवून देणारा क्षण म्हणजे ' कामतृप्ती ' असे म्हणता येईल ...येथे स्त्री - पुरुष या दोघांचा मानसिक व शारीरिक आनंदाचा विचार असला पाहिजे ...त्या साठी स्त्री पुरुषांची मने प्रसन्न असली पाहिजेत ..हवा तसा एकांत पाहिजे ..मुख्य म्हणजे आपल्या जोडीदाराच्या कामतृप्तीचा देखील विचार असला पाहिजे ..जर आपल्या जोडीदाराचे मन दुखी: असेल ..चिंताग्रस्त असेल ..निराश असेल ..तर आपल्या सोबत तो अत्युच्च आनंदाचा क्षण जोडीदार अनुभवू शकणार नाही ..व्यसनी व्यक्तीच्या बाबतीतच नव्हे तर सर्वसामान्य पुरुषांच्या बाबतीत देखील या बाबतचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने ..बहुधा जोडीदाराच्या आनंदाचा विचार पुरुष करत नाहीत ..शरीर संबंध म्हणजे स्त्री च्या दृष्टीने केवळ एक वैवाहिक जवाबदारी ..अथवा नावडीचे कर्म उरते

निसर्गतः स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक उत्तेजनेच्या आणि लैंगिक तृप्तीच्या बाबतीत काही फरक आहे ..या बाबत महेश मांजरेकर यांच्या ' प्राण जाये पर चाॅल ना जाये " या चित्रपटात दाखवलेले दोन प्रसंग अतिशय मार्मिक आहेत ..एका प्रसंगात ..बेकार ..नोकरी न करणारा ..रिकामटेकडा असा नवरा दाखवला आहे ..जो लग्न झाल्यावर काही काम धंदा न करता सासऱ्याच्या घरी राहत असतो .छोट्याशा चाळीत असलेल्या सासऱ्याच्या खोलीत सासू सासरा ..मेव्हणा .आणि हे दोघे नवरा बायको राहत असतात ..शरीर संबंधांसाठी हवा तसा एकांत मिळू शकत नाही ..मात्र कामपिपासू नवरा एके दिवशी रात्री आसपास सगळी मंडळी झोपलेली असताना निर्लज्ज होऊन पत्नीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो ..पत्नी लज्जेमुळे ..त्याला नकार देते ..यावर तो आरडा ओरडा करतो ..घर डोक्यावर घेतो ..पत्नीवर वाट्टेल ते आरोप करतो ..तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करतो ..शेवटी सासू सासरा जागे होतात ..ते या कामपिसाट जावयाची समजूत घालतात ..आम्ही दोघे बाहेर गॅलरीत जातो झोपायला असे म्हणून ..जावयाला एकांत उपलब्ध करून देतात ..त्यावेळी त्या पत्नीच्या चेहऱ्या वरचे ओशाळलेले ..व्यथित झालेले ..भाव अतिशय करूण आहेत.. दुसऱ्या एका प्रसंगात दारुडा पती ..दारूच्या नशेत पत्नीशी शरीर संबंध ठेवतोय ..त्याच वेळी ..ती त्याला तिच्या अडचणी ..संसारिक चिंता ..त्याच्या दारूमुळे घरात आलेली विपन्नता ..तिला बाहेर काम करताना येणाऱ्या अडचणी वगैरे बाबत सांगू इच्छित आहे ..मात्र याचे सगळे लक्ष स्वताच्या कामतृप्ती कडे आहे ..तो तिला चूप बस म्हणून रागावतो ..हे नंतर बोलू असे म्हणून आपला कार्यभाग सुरु ठेवतो ..आणि आपले काम साधल्यावर पत्नीच्या शेजारी नशेत गाढ झोपी जातो ..शेवटी कॅमेरा स्त्री च्या चेहऱ्यावर आहे ..तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना दाखवले आहेत ..अतिशय सुन्न करणारे हे दोन्ही प्रसंग आहेत ..अंतर्मुख व्हायला लावणारे ..मात्र खंत अशी की हे प्रसंग सुरू असताना थेटर मध्ये ..त्या पुरुषांच्या निर्लज्ज पणाला लोक दाद देवून शिट्ट्या वाजवत होते ..हसत होते विनोदी प्रसंग असल्यारखे ..त्या स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार बहुधा झाला नाही ..किवा शेवटी त्या पत्नीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू कोणाला बोचले नाहीत .

वरील प्रसंग सरांनी अशा पद्धतीने सांगितले की आम्हाला सगळ्यांना हळहळ वाटली ..काही क्षण सगळे स्तब्ध झालो ..खरेच कामतृप्ती एकांगी कल्पना नाहीय ..केवळ शारीरिक पातळीवर अनुभवण्याची प्रक्रिया नाही ...ते एक मंगल मिलन असते ..स्त्री चे समर्पण असते ..अत्युच्च आनंदाचा सोहळा असतो ..त्यामागे स्त्री च्या मानसिकतेचा विचार असलाच पाहिजे असे वाटू लागले ..केवळ शरीर संबंध ठेवण्यास पात्र असणे अथवा अपत्य प्राप्ती होणे हा पुरुषार्थ नव्हे ...संसाराच्या जवाबदारया स्वीकारणे ..आपल्या जोडीदाराला जास्तीत जास्त आनंदी ठेवणे ..कुटुंबाच्या प्रगतीचा ..विकासाचा विचार करणे.. आपल्या कर्तुत्वाने सगळ्या कुटुंबाला मान सन्मान मिळवून देणे ..या सगळ्या बाबी पुरुषार्थ या संज्ञेत मोडतात हे सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता ..एक व्यसनी व्यसन केलेल्या अवस्थेत ..किवा त्याच्या व्यसनामुळे पत्नी चिंतीत असताना ..घरात अनेक कौटुंबिक ..आर्थिक अडचणी असताना ..शिवाय तोंडाला दारूचा गलिच्छ आंबूस वास येत असताना जेव्हा पत्नीशी शरीर संबंध ठेवतो ..तेव्हा तो त्या स्त्री वर बलात्कारच करत असतो असे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment