Wednesday, May 14, 2014

उत्खनन ..मंथन !


उत्खनन ..मंथन ! ( बेवड्याची डायरी - भाग ४३ वा )


फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .

" फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे मला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..धर्माने शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..

सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व धर्मग्रंथांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते .

( बाकी पुढील भागात )

Friday, May 9, 2014

अहंकाराची लुडबुड !


अहंकाराची लुडबुड ! ( बेवड्याची डायरी - भाग ४२ वा )

अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..

अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण ! 

( बाकी पुढील भागात )

माझा अन्न सत्याग्रह !

माझा अन्न सत्याग्रह ! ( बेवड्याची डायरी - भाग ४१ वा )

काल रात्रभर नीट झोप लागलीच नाही ...पोटात जेवण नाही म्हणून असेल कदाचित ..शिवाय डोक्यात राग होताच मला काल घरी न सोडल्याचा ..सकाळी मी पीटी करता उठलोच नाही ..मुद्दाम तोंडावर चादर घेवून पडून राहिलो ..कार्यकर्ता उठवायला आला तेव्हा ..माझी तब्येत बरी नाही असे कारण सांगितले ..शेरकर काका मला दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करून गेले... मी त्यानाही दाद दिली नाही ..' ओ गांधी बाबा उठा की आता चहा तरी घ्या ' तिसऱ्यांदा शेरकर काका जवळ येवून मला उठवू लागले ..त्यांनी मला गांधी बाबा नावाने मारलेली हाक खटकलीच ..काल पासून मी अघोषित उपोषण सुरु केले होते म्हणून ते मला गांधीबाबा म्हणत आहेत हे जाणवले ..मी रागाने उठून बसलो व त्यांना म्हणालो ' काका तुमचे इतके वय झालेय ..मात्र शहाणपणा काडीचा नाहीय तुमच्यात ' यावर ते नेहमीप्रमाणे मिशीत हसले ..त्यांच्या हातात चहाचे तों ग्लास होते ..' जाऊ दे यार ..वयाचा आणी शहाणपणाचा काही संबंध नसतो ..चहा तर घे ..' माझ्या बाजूला बसकण मारत त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडला .. भूक लागली होती ..परंतु माझे अघोषित उपोषण मात्र सोडायचे नव्हते मला ..मी शेरकर काकांकडे न पाहता तोंड फिरवून बसलो ..' अरे जाऊ दे नको घेवून चहा ..पण बोल तरी जरा माझ्याशी ' काका चिवटपणे मला चिकटून राहिले ..' विजयभाऊ अहो ..असा राग चांगला नसतो आपल्या माणसांवर ..असे मनाविरुद्ध घडतच असते ..जेवणावर राग काढून काही साध्य होत नाही ..इथले कार्यकर्ते अजून एक दिवस वाट पाहतील तुम्ही जेवता की नाही याची ..मग सरळ डॉक्टरना बोलावून तुम्हाला सलाईन लावतील ..तुम्ही जास्त विरोध केलात तर बांधून ठेवून सलाईन लावतील ' हे ऐकून मी विचारात पडलो .. जरा अंतर्मुख झालो ..कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला माझ्या .

काल सरांनी सर्वाना नेहमीप्रमाणे सूचना दिली होती ..' आज पालकांच्या भेटीचा दिवस आहे ..ज्या लोकांना इथे येवून दहा दिवस पूर्ण होत झालेले आहेत ..तसेच वार्डातील ज्यांचे वर्तन नीट आहे अशा लोकांच्या पालकांना आम्ही भेटीस परवानगी दिली आहे ...मला माहित आहे की इथे व्यसनमुक्ती केंद्रात रहाणे म्हणजे बहुतेक लोकांना शिक्षा वाटत असेल ..कारण इथे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात ..पत्येक वेळी तुम्हाला अॅडजेस्टमेंट करावी लागतेय ..व्यसनी व्यक्तीच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावात बदल करण्यासाठी ते आवश्यकच असते...मात्र येथे मनासारखे वागता येत नाही म्हणून सर्वांनाच आपण लवकरात आपल्या घरी जावे असे वाटते ..इथे कोणालाही कायमचे राहायचे नाहीय ..उपचार पूर्ण झाल्यावर सर्वाना घरी जायचेच आहे .. व्यसनमुक्ती साठी आणि उज्वल भविष्यासाठी आपल्याला येथे आणले गेलेय ..यावे लागलेय ...किवां काही स्वतःहून आलेत म्हणा हवे तर ..पण पालक आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ..आपल्यात घडणारे बदल पाहण्यासाठी भेटायला येतात ..कोणीही आपल्या पालकांजवळ मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करू नका ..त्यातून हेच सिद्ध होईल कि अजूनही तुमच्यात सुधारणा झालेली नाही ..उलट हट्ट केला तर पालक नाराज होऊन तुमचे इथले वास्तव्य वाढवण्याचा विचार करतील हे ध्यानात ठेवा ..बाकी आपण सुज्ञ आहातच ' ....मी मनातून आज अलका भेटीला येईल म्हणून आनंदलो होतो ..तिच्याकडे घरी ने असा हट्ट करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता ..प्रत्यक्ष संध्याकाळी ती भेटीला आली तेव्हा तिचा प्रफुल्लीत चेहरा पाहून मला भरून आले होते ..मला पाहताक्षणी तिचे चमकलेले डोळे सांगून गेले कि ती अतिशय आतुरतेने माझ्या भेटीची वाट पाहत असावी .. जवळ बसताच तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली .. बोलताना ती इतकी निष्पाप दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम मी पाहतच राहिलो ' अहो लक्ष कुठेय तुमचे ..मी काय म्हणतेय ऐकताय ना ' असे म्हणत तिने मला भानावर आणले ..म्हणाली मुले पण मागे लागली होती आम्ही पण येतो बाबांना भेटायला म्हणून पण मीच नको म्हंटले ..पुढच्या वेळी नक्की आणीन मुलांना ..मग तिने माझी चौकशी सुरु केली ' कसे वाटतेय इथे ? जेवण कसे आहे ? सगळ्या उपचारात भाग घेता का ? वैगरे ..मी जमेल तशी उत्तरे देत होतो ..खरे तर तिच्याकडे मला घरी ने असा हट्ट करण्याचा माझा कुठलाच विचार नव्हता ..इथले सगळे नीट शिकूनच डिसचार्ज घ्यायचा हे मी ठरवले होते ..तरीही कसा कोण जाणे अलकाशी बोलता बोलता माझा विचार बदलत गेला ..पहिल्यांदाच मी पत्नी आणि मुलांपासून इतके दिवस दूर राहत होतो ..सुरवातीचे एक दोन दिवस वगळता मी इथे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यायला लागलो होतो .. इथे शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत हे देखील लक्षात आले होते ..पण अलकाशी बोलता बोलता वाटले ..दहा दिवस खूप झालेत आता ..यापुढे आपण दारू अजिबात पिणार नाही याची खात्री वाटू लागली होती मला..उगाच अजून जास्त दिवस राहून फारसे काही साध्य होणार नाहीय .. ..सहज एक चान्स घ्यावा म्हणून अलकाला म्हणालो ' आता मला पटलेय चांगलेच कि दारूमुळे आपले सर्वांचेच किती नुकसान केलेय ते ..यापुढे मी अजिबात प्यायची नाही असे ठरवलेय ..तू सरांना सांगितलेस तर ते मला डिसचार्ज सुद्धा देतील ' माझे हे बोलणे ऐकून अलका एकदम स्तब्ध झाली ...नुसतीच माझ्या तोंडाकडे पाहत राहिली ..कदाचित माझ्या मनाचा वेध घेत असावी ..म्हणाली ' अहो ..पूर्ण कोर्स केल्याशिवाय किवा सरांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला येथून नेता येणार नाहीय असे कालच सरांनी मला फोनवर सांगितलेय ..' ' म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीय तर अजून ? ..थोडे दुखावला जावून मी विचारले ..' इथे विश्वासाचा प्रश्नच नाहीय हो ..तुम्हाला डिसचार्ज देणे योग्य राहील कि नाही हे ठरवणारी मी एकटीच नाहीय ..सरांची परवानगी लागते त्यासाठी ..आपण आता बरे झालोत हे आजारी व्यक्तीने नाही तर त्याच्या उपचारकाने ठरवले पाहिजे ना ? ' 

" अग पण ..मी इथे स्वताच्या मर्जीने आलोय ..शिवाय आता मी सांगतोय ना की मला बरे वाटतेय .अजिबात दारूची आठवण येत नाहीय ..यापुढे मी अजिबात पिणार नाही ..तुझी शपथ " असे म्हणत मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ..यावर अलका गडबडली ..आपण तिची शपथ घेतली की ती भावनाविवश होते हे मला चांगलेच ठावूक होते ..मग म्हणाली ...बरे पाहू मी विचारते सरांना ..असे म्हणून पटकन उठून बाहेर ऑफिसात गेली ..मी वार्डातच बसून तिची वाट पाहू लागलो ..साधारण दहा मिनिटांनी परत आली ..' सरांनी नाही म्हंटले आहे ..' असे म्हणत खाली मान घालून बसली ..मी इथे आल्यापासून इतका चांगला सहभाग घेतोय सगळ्या उपचारात तरीही सरांनी माझ्या डिसचार्ज करिता नकार द्यावा याचे मला वैषम्य वाटले ..राग यायला सुरु झाला .. कुत्सितपणे म्हणालो ' तुला घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे तर ? ' अलका खाली पाहतच म्हणाली ' या पूर्वी इतके वेळा विश्वासघात केलंय तुम्ही की आता विश्वास ठेवणे कठीणच जातेय मला ..अनेक वेळा माझ्या शपथा झाल्यात ..मुलांच्याही शपथा घेवून झाल्यात ..मात्र तुमचे पिणे काही कायमचे बंद होत नव्हते ' तिच्या या बोलण्याने मी दुखावलो गेलो ..अपमानित झाल्यासारखे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात)

संगीतातून व्यसनमुक्ती !


संगीतातून व्यसनमुक्ती ! ( बेवड्याची डायरी -भाग ४० वा )

आज सायंकाळी ' म्युझिक थेरेपी ' आहे हे मला सकाळीच समजलेले ...शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे अनेक प्रकारची गाणी मी आवडीने ऐकत असे. .. दारू पितांना बार मध्ये बसल्यावर आम्हा मित्रांची खास गझल्स लावण्याची फर्माईश असे बारमालकाला ..मेहंदी हसन ..गुलामली ...पंकज उधास ..अशा गायकांच्या गझल्स ऐकून ' चियर्स ' करण्यात ..आम्ही वेळेचे भान विसरून जात असू ..मात्र मी कधी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शेरकर काकांनी तुला पण गाणे म्हणावे लागेल हे सांगून मला काळजीत टाकले होते ..काही उत्साही लोक सकाळपासूनच लायब्ररी मधून गाण्याची पुस्तके घेवून त्यातील गाणी पाठ करण्याचा मागे लागलेले..सायंकाळी ७ वाजता ...बाहेरच्या ऑफिस मधून तबला ..पेटी ..कोंगो ..अशी वाद्ये वार्डात आणून लावली गेली ..एका कार्यकर्त्याने माईक सिस्टीम लावली ..एकंदरीत वातावरण निर्मिती झाली होती ..सर वार्डात आल्यावर प्रार्थना घेवून त्यांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो मला माहित आहे आपण शनिवारच्या संगीत सभेची वाट आतुरतेने पाहता ..कारण संगीत अशी एक जादू आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो ..आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे संगीत असे म्हणता येईल ..आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करण्याची शक्ती संगीतात आहे ..नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्ती संगीत देवू शकते ..म्हणूनच आपण इथे आठवड्यातून एकदा संगीत उपचार घेतो ..इथे कोणी मोठा गायक अथवा कलाकार नाहीय आपल्यात .. तरीही सर्वांनी स्वताच्या आनंदासाठी या उपचारात भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्वाना विनंती आहे ..प्रास्ताविक झाल्यावर सरांनी एक हिंदी भक्ती गीत म्हंटले ..अनुप जलोटाने गायिलेले हे भक्तीगीत मी पूर्वी लहानपणी अनेकदा ऐकलेले होते ..सर गाणे म्हणतात हे पाहून मला नवल वाटले ..दुसरे सर हार्मोनियम वर बसले होते ..वा म्हणजे आज दोन्ही प्रमुख समुपदेशक या थेरेपीला हजर होते तर ..सरांचे गाणे झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..मग सरांनी आम्हाला एकेकाला आवाहन केले गाणी म्हणण्यासाठी ..जे उत्साही गायक वार्डात होते त्यापैकी एक जण उठून समोर गेला ..त्याने माईक हातात घेवून गाणे म्हणण्यास सुरवात केली ..' दोनो ने किया था प्यार मगर ..मुझे याद रहा ..तू भूल गई ' महुवा सिनेमातील हे दर्दभरे गाणे तो म्हणू लागला ..त्याचा आवाज यथातथाच होता ..मात्र तो अतिशय तल्लीन होऊन हे गाणे म्हणत होता ..तबल्यावर आमच्यातीलच एक जण बसला होता ..तो उत्तम तबलजी नव्हताच तरी तालाचे बरे भान होते त्याला ..मध्ये एक दोन ओळी विसरल्याने त्याने जेव्हा शब्दांऐवजी न ना ना न नाना ..नान न नाना सुरु केले तेव्हा सगळे हसू लागले ..दर्दभरे गीत सुरु असताना एकदम विनोदी वाटू लागले ..त्याचेही गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या आम्ही ...

एकाने मराठी लावणी म्हंटली ..त्याबरोबर शिट्ट्या वाजू लागल्या ..वातावरण चांगलेच रंगले ..शेरकर काका माझ्या मागे बसून मला बोटांनी ढोसत होते ..तू जा गाणे म्हणायला म्हणून ..वैतागून मी उठून दुसरीकडे गेलो ..मध्येच सर्वांनी ' वुई वांन्ट रमेश 'असा गलका सुरु केला ..एक रमेश नावाचा गांजाचा व्यसनी तयारच होता गाण्याचे पुस्तक घेवून ..हा खूप चांगला गायक असावा म्हणून सर्व त्याची मागणी करत आहेत असे मला वाटले.. रमेशने माईकचा ताबा घेतल्यावर खूप मोठा गायक असल्यासारखे जरा ' हॅलो माईक टेस्टिंग ...वन ..टू ' ...मग एकदम त्याने हिमेश रेशमाईया सारखा नाकात सूर लावला ..' झलक दिखलाजा ..एक बार आजा ...आजा ' सगळे हसू लागले ..रमेशला ताल सुराशी काही घेणे देणे नव्हते असे दिसले ..तो मस्त डोळे मिटून ...आजा ..आजा आळवीत होते ..त्याची तल्लीनता पाहून सर्वाना हसू येत होते ..सुदैवाने त्याचे डोळे बंद असल्याने त्याला समजत नव्हते की आपल्याला सगळे हसत आहेत ..एक गाणे संपल्यावर लगेच त्याने दुसरे गाणे सुरु केले ..' लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ' ..जेमतेम दोन ओळी म्हंटल्यावर मग पुन्हा दुसरे गाणे ' ओब्लाडा डा डा डा ..ओब्लाडू डू डू ' तो डोळे मिटून असे अंगविक्षेप करत होता ..की हसून हसून आमची मुरकुंडी वळली ..बरेच मनोरंजन झाल्यावर मग सर्वांनी एकदम टाळ्या वाजवायला सुरवात केली ..गाणे सुरु असताना सतत टाळ्या म्हणजे श्रोते तुम्हाला खाली बसायची सूचना करत आहेत हा अर्थ रमेशला माहित नसावा ..त्याचे ..डा डा डू डू सुरूच होते ..शेवटी सरांनी त्याला थांबवून आता नंतर म्हणा गाणे असे सांगितले तेव्हा त्याने माईक सोडला ..मला लक्षात आले रमेश चांगला गायक होता म्हणून नव्हे तर त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला गाण्याचा आग्रह होता होता ..बराच वेळ धमाल सुरु होती ... ' देखा ना हाये रे सोचा ना ..हाये रे ' या गाण्याला पब्लिक उठून नाचू लागले ...' खैके पान बनारसवाला ' पण झाले ..सुमारे दोन तास अतिशय मजेत गेले सर्वांचे..आम्ही सगळे आमच्या जीवनातील अडचणी ..संकटे ..दुखः ..विसरून जणू आनंदाच्या प्रदेशात शिरलो होतो ..सरांनी जेवणाची वेळ झाल्यावर सरांनी थांबण्याची सूचना केली आणि माईक हातात घेतला ..मित्रांनो सुमारे दोन तास आपण हा संगीताचा आनंदानुभव घेत होतो ..आता वास्तवात परतायची वेळ झालीय असे म्हणत ..समारोप करू लागले..

माणसाच्या जीवनात निराशा ..अडचणी ..संकटे असणारच ..तरीही जेव्हा जेव्हा आपण खूप अवस्थ असू ..कशातच मन लागत नसेल ..सगळ्या नकारात्मक भावना घेरतील तेव्हा संगीत नक्कीच तुम्हाला सगळ्या चिंता विसरायला लावते ..व्यसने करण्याच्या काळात देखील आपण संगीताचा आनंद घेतला आहे ..मात्र पोटात आणि डोक्यात दारू असताना आलेला आनंद हा कितीही झाले तरी कृत्रिमच ...भानावर राहूनच संगीताचा खरा आनंद लुटता येतो ..गीतकाराचा शब्द न शब्द बोलका होतो ..त्यात दडलेला गहन अर्थ मनात उतरतो ..सुरांची जादू हृदयात आनंदाचे कारंजे निर्माण करते ..तसेच वाद्यांचा ध्वनी आपल्या डोक्यात ताल निर्माण करून कोणतीही नशा न करता पाय थिरकायला लावतो ..मन भारून टाकतो हा अनुभव आता आपण सर्वांनी घेतलाय ..जगातले कोणतेही मादक द्रव्य देवू शकणार नाही अशी नशा संगीत आपल्याला देते ..इथून बाहेर पडल्यावर आपण हा आनंद विसरता कामा नये ..जेव्हा जेव्हा सगळे जग तुमच्यावर रागावले आहे असे वाटेल ..जगण्याचा कंटाळा येईल ..जीवन निरस वाटू लागेल ..एकटेपणाची भावना मनाला ग्रासेल ..व्यसन करण्याची अनावर ओढ मनात निर्माण होईल ..त्या त्या वेळी आपण जर संगीताचा वापर केला तर नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यास उर्जा मिळेल ..असे सांगत सरांनी उपचारांचा समारोप केला ..

( बाकी पुढील भागात )

बिडी -तंबाखूची लढाई !


बिडी -तंबाखूची लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ३९ वा ) 

सगळ्यांच्या सह्या घेवून झाल्यावर आम्ही सर थेरेपीच्या वेळी वार्डात येण्याची वाट पाहत बसलो ..साडेनऊला झाले वेगळेच ..माॅनीटर व कार्यकर्त्यांनी वार्डात मोठा स्क्रीन आणून लावला ..प्रोजेक्टर वगैरेचे व्यवस्था केली ..चौकशी केल्यावर समजले..कँन्सर बाबत जनजागृती करणाऱ्या एका संस्थेचे लोक येणार होते आमचे प्रबोधन करायला ..जरा वेळाने ते लोक आले ...भारतात सर्वाधिक लोक तंबाखूमुळे होणाऱ्या कँन्सर मुळे कसे मृत्युमुखी पडतात याची आकडेवारीसह माहिती सांगितली ..तंबाखू मध्ये असणाऱ्या विविध विषारी द्रव्यांबाबत माहिती दिली ..त्यांनी स्क्रीन वर आम्हाला भारतात तंबाखू व धुम्रपानामुळे झालेल्या कॅन्सर चे भयानक फोटो दाखवले ..सगळ्यात भयंकर असा तोंडाचा ..घश्याचा कर्करोग पाहून अंगावर काटाच आला सर्वांच्या ..गुटखा चघळण्यामुळे हा तोंडाचा कर्करोग हमखास होऊ शकतो असे सांगितले ..हे सर्व पाहत असताना सागळे पुरेसे गंभीर झाले होते ..शेवटी त्यांनी आम्हाला आम्ही येथे उपचारांना आल्याबद्दल आमचे अभिनंदन केले व आम्हाला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या ...ते लोक गेल्यावर शेरकर काका हळूच माझ्याजवळ आले ..म्हणाले ..दे तुझ्याकडची शिल्लक तंबाखू ..मी फेकून देतो ती बाथरूम मध्ये ..मी मनापासून हसलो यावर ..त्यांना म्हणालो मी फेकीन माझी पुडी ..तुमच्या हातात दिली तर तुम्हीच फस्त कराल ..त्यांनी नेहमीप्रमाणे मिशीत हसत टाळी दिली मला ..म्हणजे एकंदरीत परिणाम शून्य होता तर ..ते लोक जाताच सर वार्डात आले ..आम्ही सगळे घोळका करून त्याच्या भोवती जमलो ..शेवटी सर्वाना खाली बसवून सरांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो ..सकाळपासून उडालेला गोंधळ आलाय माझ्या कानावर..अशी पूर्वसूचना न देता बिडी तंबाखू वाटप बंद केल्याचे तुम्हाला रुचलेले नाहीय हे मी जाणून आहे ..परंतु नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागला आहे ..आपल्या सगळ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे हे तुम्ही देखील मान्य केले पाहिजे ..आताच आपण तंबाखूमुळे होणाऱ्या भीषण परिणामांबाबत माहिती घेतली आहे ..आपल्या पैकी कोणालाच असा भयंकर मृत्यू आलेला आवडणार नाही ..इथे दारू आणि इतर मादक द्रव्ये सोडतांना आपण जर तंबाखू देखील सोडली तर नक्कीच चांगले राहील ..ज्या लोकांना तंबाखू सोडताना ..पोट साफ न होणे..चीडचीड होणे ..अवस्थ वाटणे ..झोप न येणे .किवा इतर त्रास उद्भवतील त्यांना आम्ही औषध देवू हवे तर ..परंतु आता हा निर्णय अमलात आणायला सर्वांनी कृपया सहकार्य करावे ...असे म्हणून सरांनी आम्ही दिलेला अर्ज खिश्यात ठेवला ..कोणाला काही प्रश्न ? असे सरांनी विचारताच एकदम आठदहा हात वर झाले ..

" सर ..लेकीन मेरे घरमे मुझे तमांखू खाने के लिये मना नही है ..केवल मैने शराब छोडना चाहिये ऐसा बोला जाता है ..और मैने भी इसके आगे शराब नही पियुंगा ऐसी ठान ली है ..फिर मुझे तमांखू छोडने के लिये जबरदस्ती क्यों ? छत्तीसगढ मधल्या एकाने विचारले ..आम्ही नकळत माना हलवल्या ..त्याने सर्वांच्याच मनातला प्रश्न विचारला होता ..सर म्हणाले ..' हे बघा ..दारू आणि इतर मादक द्रव्यांचे परिणाम केवळ सेवन करणाऱ्या वर नव्हे तर त्याच्या कुटुंबियांवर देखील होत राहतात ..शारीरिक ..मानसिक ..कौटुंबिक ..आर्थिक ..सामाजिक ..आणि अध्यात्मिक अशा विविध पातळ्यांवर नुकसान होते ...दारू पिवून अपघात ..शिवीगाळ ..मारामारी ..किवा गुन्हेगारी .. ..वेड लागणे ..असे परिणाम होतात ..तंबाखूने तसे होत नाही ..तंबाखूमुळे कर्करोग ..दात खराब होणे ..कार्यक्षमता कमी होणे ..ब्राँकायटीस ..क्षयरोग ..क्वचित नपुंसकता ..असे आजार होऊ शकतात तरीही तंबाखूच्या नशेत शिवीगाळ ..तंबाखू सेवन करून मारामारी ..तंबाखूमुळे विविध मानसिक आजार उदभवणे..असे घडत नाही ..म्हणून आपले कुटुंबीय तंबाखू बाबत जास्त आग्रही नसतात ..' दगडा पेक्षा वीट मऊ ' या नात्याने ते आपल्याला तंबाखूचे सेवन करण्यास फारशी मनाई करत नाहीत ..याचा अर्थ असा नव्हे की तंबाखू चांगली आहे ..आपण जर व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालणार असू तर कोणत्याही प्रकारचे व्यसन अथवा मानसिक गुलामी आपण टाळली पाहिजे ..जर राहिलेले जिवन आरोग्यपूर्णतेने व्यतीत करायचे असेल तर आपण आता पासूनच प्रयत्न केले पाहिजेत ..' सरांचे बोलणे पूर्ण होताच .शेरकर काका म्हणाले ..सर पण आम्ही तंबाखू नंतर एकदोन वर्षात सोडणारच आहोत ..तसे मी ठरवले आहे ..सध्या फक्त दारू बंद करायची असे ठरवून आम्ही इथे उपचार घेतो आहोत ..शेरकर काकांच्या युक्तिवादाने सगळे हसू लागले ..

बराच काळ सर सर्वांना समजावत होते ..आम्हीही अनेक प्रकारचे युक्तिवाद मांडत होतो ..एकंदरीत तंबाखू सुरु केली पाहिजे ...आम्हाला सध्या फक्त दारू व इतर मादक पदार्थ सोडण्याची निकड आहे ..आम्ही नंतर तंबाखू देखील नक्की सोडू ..असाच सर्वांचा सूर होता ..शेवटी सरांनी काही अटी व शर्तींवरच तंबाखू बिडी सुरु करू असे जाहीर केले ..त्या अटी खालील प्रमाणे ठरल्या ..

१ ) थेरेपीजच्या वेळात कोणीही तंबाखू तोंडात ठेवता कामा नये ..कोणी असे करताना आढळ्यास ताबडतोब त्याची तंबाखू बंद करण्यात येईल .

२) बिडी ओढण्यासाठी किवा तंबाखू खाण्यासाठी बाथरूम जवळच्या जागेत सर्वांनी जावे ...वार्डात इतर ठिकाणी असे करू नये ..

३) बिडीचे विझलेले तुकडे ..तंबाखूच्या रिकाम्या पुड्या वगैरे नेमक्या कचरा टाकण्याच्या बादलीत टाकाव्यात ..तसेच तंबाखू खावून ..खिडकीतून बाहेर थुंकू नये .. बाथरूम मध्ये जावून थुंकावे 

४) आमचे पालक जेव्हा भेटीला येतील तेव्हा ..पत्येकाच्या पालकांना सर त्यांच्या पेशंटला तंबाखू अथवा बिडी द्यायची किवा नाही याची परवानगी घेतील ..ज्यांचे पालक तंबाखू बिडीस मनाई करतील त्यांची तंबाखू- बिडी बंद करण्यात येईल ...तसेच वरील नियम मोडणाऱ्या व्यक्तीची तंबाखू बिडी कायमची बंद करण्यात येईल .

आम्ही सर्वांनी या शर्ती मान्य केल्यावर ..मग नेहमीप्रमाणे तंबाखू-बिडी वाटप सुरु झाले... मी अंतर्मुख झालो होतो ..वाटले दारू बंद करून आपण एक वर्ष पूर्ण केल्यावर नक्कीच तंबाखू पण बंद केली पाहिजे ... 

( बाकी पुढील भागात )

Friday, May 2, 2014

बिडी ..तंबाखू ..!


बिडी ..तंबाखू ..! ( बेवड्याची डायरी - भाग ३८ वा )


आज सकाळी औषधे वाटून झाल्यावर सगळे ..बिडी तंबाखूचा रोजचा कोटा घेण्यासाठी रांगेत उभे असताना ..माॅनीटरने जाहीर केले की आजपासून बिडी -तंबाखू देणे बंद करण्यात येत आहे ..हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले ..एकदम आरडओरडा सुरु झाला ..मात्र माॅनीटरने कोणाचेही काहीही न ऐकता वाटप बंद करायला लावले ..सगळा गोंधळ उडाला ..आम्ही येथे दारू व इतर मादक पदार्थ सोडण्यासाठी आलेलो आहोत ..बिडी ..तंबाखू सोडण्यासाठी नाही असा सूर होता सगळ्यांचा ..मग वार्डात सगळे समूहात वाटले गेले आणि चर्चा सुरु झाली ..जेमतेम दोन तीन जण असे होते ..ज्यांचे म्हणणे होते की हे एकदम योग्य केले गेलेय ..व्यसनमुक्ती म्हंटले म्हणजे सगळीच व्यसने बंद केली पाहिजेत .. बहुतेक जण हा आमच्यावर अन्याय आहे असे म्हणू लागले ...आमच्या पालकांचे बिडी तंबाखू बद्दल काहीच म्हणणे नाहीय ..त्यांना दारू व इतर मादक पदार्थांचा त्रास होतोय ..त्यामुळे ते सोडण्यासाठी आम्ही इथे आहोत ..गोंधळाच्या वातावरणातच सुमारे तासभर गेला ..ज्यांच्याकडे काल वाटल्या गेलेल्या बिड्या किवा तंबाखू शिल्लक होती ते लोक एकदम श्रीमंत असल्याच्या अविर्भावात वावरू लागले ..ज्यांच्याकडील तंबाखू अथवा बिडी संपली होती ते लोक आपले कसे होईल या विवंचनेत ..मी बिडी ओढत नसे मात्र तंबाखूची सवय होती मला ..अगदी खूप नाही तरी सकाळी शौचाला जाताना चिमुटभर दाढेखाली धरली की बरे असे ..प्रत्येक वेळी जेवण झाल्यावर ..चहा झाल्यावर खूप तल्लफ येई तेव्हा चिमुटभर खात असे ..ही सवय मला अगदी कॉलेजला असल्यापासून लागलेली ..लग्नानंतर अलकाने काही दिवस तक्रार केली ..तोंडे वाकडी केली ..एकदोन वेळा माझी तंबाखूची पुडी लपवून ठेवली ..त्यावेळी मात्र मी चिडलो होतो तिच्यावर ..मी काही दिवसभर खात नाही तंबाखू ..थोडी चिमुटभर खातो ..त्याला तू अजिबात मना करू नकोस ..असा म्हणत वाद घातला खूप ..शेवटी तिने तक्रार करणे सोडून दिले होते ..पुढे दारूचे प्रमाण वाढल्यावर तिचे सगळे लक्ष दारू कशी बंद होईल माझी याकडे एकवटले होते ..तंबाखू नगण्य ठरली ..उलट हवे तर तंबाखू चालेल ..मात्र दारू अजिबात नको असा हट्ट होता तिचा ..अर्थात मी माझ्याच मनासारखे वागलो शेवटी ...

इथे उपचारांसाठी दाखल झाल्यावर देखील मला हीच चिंता होती की व्यसनमुक्ती केंद्र म्हंटल्यावर इथे तंबाखूचे वांधे होणार ..दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी मी सरांना त्याबद्दल विचारले होते..त्यावर ते हसून म्हणाले होते की बहुधा सर्वच व्यसनी व्यक्तींना दारू अथवा इतर मादक पदार्थांसोबत हे को-अॅडीक्शन असते तंबाखू ..सुपारी.. विडीचे ...हे आम्ही जाणून आहोत ..दारूच्या तुलनेत हे निकोटीनचे व्यसन तसे नगण्य वाटते आपल्याला ..इथे सगळी व्यसने एकदम बंद ठेवली तर खूप अवस्थता येते ..सगळ्याच व्यासनांशी एकाच वेळी झुंज देता येणे कठीण असते ..म्हणूनच आम्ही इथे अगदी माफक प्रमाणात इथे तंबाखू व विडी साठी परवानगी देत असतो ..रेशनिंग पद्धतीने येथे कोटा ठरवला आहे ..धुम्रपान करणाऱ्याला दिवसाला फक्त आठ विड्या मिळतील..सिगारेट अजिबात नाही ..कारण सिगारेट मध्ये काही ड्रग अँडीक्ट इथे मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या वगैरे भरून ओढण्याची शक्यता असते ..तसेच विडी मध्ये तंबाखूचे प्रमाण सिगरेटच्या तुलनेत खूप कमी असल्याने आणि कमी नुकसान व्हावे या हेतूने विडी दिली जाते ..तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना रोज फक्त एक पुडी तंबाखू मिळते ..जी सुमारे आठ दहा वेळा खाता येईल .. गुटखा ..खर्रा ..वगैरे प्रकार मात्र अजिबात मिळणार नाहीत ..हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला होता ..आता सगळेच बंद होणार म्हंटल्यावर मी देखील चिंतेत होतो ..मी कमी तंबाखू खात असल्याने माझ्या लॉकर मध्ये थोडी थोडी तंबाखू उरलेल्या एकदोन पुड्या ..तसेच भरलेली एक पुडी शिल्लक होती ..शेरकर काकांना ते माहित होते ..ते माझ्या मागे लागले ..एक चिमुटभर तरी तंबाखू दे म्हणून ..अगदी चार कण दे हवे तर ..यार सकाळी शौचाला साफ झालेली नाहीय ..एकदम गयावया करत ते माझ्या मागे फिरू लागले ..शेवटी मला त्यांची दया आली ..त्यांना मी तंबाखू देतोय हे कळले असते तर आणखी काही लोक माझ्या मागे लागले असते म्हणून मी त्यांना इशारा करून बाथरूमकडे जाण्यास खुणावले ..मग कोणाचे लक्ष नाही असे पाहून माझा लॉकर उघडून त्यातून पटकन ती भरलेली पुडी काढली आणि खिश्यात ठेवली ..एकाचे लक्ष गेलेच माझ्याकडे ..माझ्या संशयास्पद हालचाली पाहून त्याने काय ते ओळखले असावे ..तो पण माझ्या मागे मागे बाथरूम कडे आला ..शेवटी शेरकर काका आणि त्याला ही चिमुटभर तंबाखू द्यावी लागली मला ...

वार्डात जणू हलकल्लोळ मजला होता ..' अभी सर आने दो ..उनको बोलेंगे के हमको नही रहेना यहाँ.' .असा टोकाचा सूर काही काढू लागले ..बिडी ओढणारे महाभाग वार्डच्या काना-कोपऱ्यात फिरून कुठे एखादा बिडीचा तुकडा मिळतोय का ते तपासत होते ..त्यात अगदी उच्चशिक्षित लोक देखील सामील असलेले पाहून मला त्यांची गम्मत वाटली ..गुलामीची ही अवस्था मी प्रथमच अनुभवत होतो ..एकदोन दिवस माझ्याकडील शिल्लक तंबाखू मला पुरली असती ..मात्र नंतर आपले कसे होईल हीच विवंचना लागली मला देखील ..आता दोस्ती वगैरे बाजूला ठेवून फक्त स्वतःपूरते पाहायला हवे ..शेरकर काकांनी या पुढे कितींनी विनवणी केली तरी त्यांना तंबाखू द्यायची नाही हे मी ठरवले...नाष्टा झाल्यावर पुन्हा सगळे विडी तंबाखूच्या काळजीत समूहाने जमून चर्चा करत होते ..एकाने आयडिया काढली की आपण संस्थेच्या संचालकांच्या नावाने एक विनंती अर्ज लिहू ..त्यात सगळे नमूद करून ..विडी तंबाखू सुरु करण्याची विनंती करू ..अन्यथा आम्हाला येथून डिसचार्ज देण्यात यावा अशी मागणी करू ..लगेच कार्यवाही सुरु झाली ...जरा चांगले अक्षर असलेल्या एकाने अर्ज लिहायला सुरवात केली ..त्यापूर्वी त्याने अर्ज नीट लिहावा म्हणून त्याला एकाकडे असलेल्या चिमुटभर तंबाखूची लाच देण्यात आली ..ती दाढेखाली धरून मग त्याचा हात चालू लागला नीट ..अर्ज लिहून झाल्यावर त्यावर सगळ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या ..आम्ही वार्डातील ' त्रिदेव ' जे मानसिक रुग्ण होते व त्यांना कसलेही व्यसन नव्हते त्यांना देखील सह्या करण्यास सांगितले ..बिचार्यांनी निमूटपणे सह्या केल्या ..

( बाकी पुढील भागात )

सुंदरतेचा आस्वाद !


सुंदरतेचा आस्वाद ! ( बेवड्याची डायरी - भाग ३७ वा ) 

इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर झोप लागत नसे ..लागली तरी ती झोप नव्हती तर दारूच्या नशेत शरीर मन शिथिल होणे असे ..त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवे..मन देखील विषण्ण असे ..डोळ्यांची चुरचुर ..अंगदुखी ..पित्तप्रकोप अशी सगळी लक्षणे जाणवत ..अंथरुणातून उठूच नये असे वाटे ..अलकाने खूप तगादा लावल्यावर मी नाईलाजाने उठत असे ..आता ही लवकर उठण्याची सवय अशीच ठेवायची असे मी ठरवले होते मनाशी ..मी लवकर उठतो म्हणून माॅनिटरने मला बेल वाजल्यावर इतरांना उठवण्याची देखील जवाबदारी दिली होती ...हे दुसर्यांना उठवण्याचे काम गमतीशीर होते ..विशेषतः काही आळशी लोक उठायला खूप कंटाळा करत असत ..कितीही हाक मारला तरी नुसते ..हु..हम्म ..पाच मिनिट ..अशी सवलत मागत असत ..काही जण वैतागून ..मला म्हणत ...यार तू रातको सोता है या नही ? ..एकाने तर मला चक्क शाप दिला होता ..तू चैन से सोनेवालो कि निंद हराम करता है ..तूझे कभी चैन नही मिलेगा ..एकदोन महाभाग असे असत की अजिबात त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नसे ..शेवटी त्यांच्या तोंडवर थेंबभर पाणी शिंपडले की मग डोळे उघडत ते ..मला हे उठवण्याचे काम करतोय म्हणून काहींनी मला गमतीने ' मुर्गा ' म्हणजे ' कोंबडा ' म्हणण्यास सुरवात केली होती ..अर्थात मी हे काम उत्साहाने आणि हसतमुखाने न चिडता करत होतो ..सरांनी काल दिलेल्या प्रश्नानुसार मी येथे राहताना थेरेपीजच्या वेळा सोडून एक दिनक्रम लिहिला होता ..त्यात सकाळी पीटी झाल्यावर सूर्यनमस्कार ..दुपारी वाचन ..सायंकाळी मोकळ्या वेळात ..थोडा वेळ हास्यविनोदात सामील होणे ..थोडा वेळ कॅरम खेळणे ..टी.व्ही पाहणे ..आणि रात्री झोपण्यापूर्वी येथे जे जे शिकतो आहे त्याबाबत डायरीत नोंदी ठेवणे सगळे लिहिले होते .

आज समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' फक्त आजचा दिवस मधील शेवटची तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

१० ) फक्त आज मी स्वतःसाठी अर्धा तास देईन ..या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करेन .

११ ) जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही 

१२ ) मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल ..यावर मी विश्वास ठेवेन .

रोजच्या रोज स्वताच्या जिवनाबद्दलच्या चिंतना साठी दहावी सूचना आहे असे सांगत सर म्हणाले ..दिवसभरात केव्हाही मोकळा वेळ असेल तेव्हा आपण किमान अर्धा तास तरी चिंतन केले पाहजे ..म्हणजे आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे ..माझे दिवसभराचे वर्तन तपासणे ..मी कोणाशी कसा वागलो ..काय बोललो याचे परीक्षण करणे होय ..तसा प्रत्येक माणूस नकळत असे चिंतन करतच असतो ..मात्र बहुधा असे चिंतन करताना तो दिवसभरात स्वताच्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना आठवतो ..अपमान जनक प्रसंगांची उजळणी करतो ..इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वर्तनाचा विचार करून स्वताचे काय चुकले आहे हे न समजून घेता ...इतरांच्या चुका शोधून ..एकतर रागाची ..बदल्याची ..किवा निराशेची भावना मनात जोपासतो ..त्या ऐवजी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ..दिवसभरात घडलेल्या घटनांमधून मी काही सकारात्मक शिकतोय का ? मला भेटलेल्या व्यक्तींच्या वागणुकीतून मी काही धडा घेतोय का ?तसेच मी केलेल्या चुका उद्या कशा टाळता येतील ..आसपासच्या सर्वांशी आपुलकीचे संबंध कसे जोपासता येतील ..याचा विचार करणे म्हणजे सकारात्मक चिंतन होईल ..

' जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही ' हे वाक्य वाचल्यावर बहुतेक लोकांच्या मनात सुंदरता म्हणजे ' स्त्री ' चे सौंदर्य येवू शकते ..या सूचनेत सुंदरता या संकल्पनेत अनेक गोष्टी येतात ..तसेच या वाक्याचा असा ही अर्थ निघतो की ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरेन ' म्हणजेच ज्या ज्या गोष्टीना समाजाने ..धर्माने ..अथवा आपल्या संस्काराने वाईट म्हंटले आहे त्या सर्व गोष्टींपासून मी दूर राहीन .. समाज ज्याला चांगले म्हणतो ..सुंदर म्हणतो त्याचा आस्वाद घेईन ..यात विविध कलांचा आस्वाद ..निसर्गसौंदर्य ..भूतदया ..चांगल्या प्रकारच्या खाण्याच्या विविध गोष्टी ..संगीत ..वाचन ..समाजसेवा ..वगैरे गोष्टी येतात ..आपण व्यसन करत असताना नेमके ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे ' अश्या गोष्टी करत गेलो ..त्या ऐवजी आता चांगल्या आणि सुंदर गोष्टीत रस घेणे अपेक्षित आहे .

शेवटचे वाक्य होते ' मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवेन ' म्हणजे क्रिया -प्रतिक्रियेच्या सिद्धांतावर माझा विश्वास असला पाहिजे ..मी जर जगाला प्रेम ..आपुलकी ..माया ..द्या ..करुणा ...देत गेलो तर नक्कीच या गोष्टी मलाही मिळतील ..मात्र मी जर द्वेष ..तिरस्कार ..राग ..वंचना ..फसवणूक ..निर्भत्सना ..कटुता देत गेलो तर मलाही कधीतरी असेच मिळेल जगाकडून हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..आपल्या चांगल्या कर्मांनीच आपले भविष्य घडत जाते ..हे लक्षात ठेवून आपली भावना आणि कर्मे याप्रती जागरूक राहणे महत्वाचे आहे .

( बाकी पुढील भागात )