Friday, May 9, 2014

अहंकाराची लुडबुड !


अहंकाराची लुडबुड ! ( बेवड्याची डायरी - भाग ४२ वा )

अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..

अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण ! 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment