Friday, May 9, 2014

बिडी -तंबाखूची लढाई !


बिडी -तंबाखूची लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ३९ वा ) 

सगळ्यांच्या सह्या घेवून झाल्यावर आम्ही सर थेरेपीच्या वेळी वार्डात येण्याची वाट पाहत बसलो ..साडेनऊला झाले वेगळेच ..माॅनीटर व कार्यकर्त्यांनी वार्डात मोठा स्क्रीन आणून लावला ..प्रोजेक्टर वगैरेचे व्यवस्था केली ..चौकशी केल्यावर समजले..कँन्सर बाबत जनजागृती करणाऱ्या एका संस्थेचे लोक येणार होते आमचे प्रबोधन करायला ..जरा वेळाने ते लोक आले ...भारतात सर्वाधिक लोक तंबाखूमुळे होणाऱ्या कँन्सर मुळे कसे मृत्युमुखी पडतात याची आकडेवारीसह माहिती सांगितली ..तंबाखू मध्ये असणाऱ्या विविध विषारी द्रव्यांबाबत माहिती दिली ..त्यांनी स्क्रीन वर आम्हाला भारतात तंबाखू व धुम्रपानामुळे झालेल्या कॅन्सर चे भयानक फोटो दाखवले ..सगळ्यात भयंकर असा तोंडाचा ..घश्याचा कर्करोग पाहून अंगावर काटाच आला सर्वांच्या ..गुटखा चघळण्यामुळे हा तोंडाचा कर्करोग हमखास होऊ शकतो असे सांगितले ..हे सर्व पाहत असताना सागळे पुरेसे गंभीर झाले होते ..शेवटी त्यांनी आम्हाला आम्ही येथे उपचारांना आल्याबद्दल आमचे अभिनंदन केले व आम्हाला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या ...ते लोक गेल्यावर शेरकर काका हळूच माझ्याजवळ आले ..म्हणाले ..दे तुझ्याकडची शिल्लक तंबाखू ..मी फेकून देतो ती बाथरूम मध्ये ..मी मनापासून हसलो यावर ..त्यांना म्हणालो मी फेकीन माझी पुडी ..तुमच्या हातात दिली तर तुम्हीच फस्त कराल ..त्यांनी नेहमीप्रमाणे मिशीत हसत टाळी दिली मला ..म्हणजे एकंदरीत परिणाम शून्य होता तर ..ते लोक जाताच सर वार्डात आले ..आम्ही सगळे घोळका करून त्याच्या भोवती जमलो ..शेवटी सर्वाना खाली बसवून सरांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो ..सकाळपासून उडालेला गोंधळ आलाय माझ्या कानावर..अशी पूर्वसूचना न देता बिडी तंबाखू वाटप बंद केल्याचे तुम्हाला रुचलेले नाहीय हे मी जाणून आहे ..परंतु नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागला आहे ..आपल्या सगळ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे हे तुम्ही देखील मान्य केले पाहिजे ..आताच आपण तंबाखूमुळे होणाऱ्या भीषण परिणामांबाबत माहिती घेतली आहे ..आपल्या पैकी कोणालाच असा भयंकर मृत्यू आलेला आवडणार नाही ..इथे दारू आणि इतर मादक द्रव्ये सोडतांना आपण जर तंबाखू देखील सोडली तर नक्कीच चांगले राहील ..ज्या लोकांना तंबाखू सोडताना ..पोट साफ न होणे..चीडचीड होणे ..अवस्थ वाटणे ..झोप न येणे .किवा इतर त्रास उद्भवतील त्यांना आम्ही औषध देवू हवे तर ..परंतु आता हा निर्णय अमलात आणायला सर्वांनी कृपया सहकार्य करावे ...असे म्हणून सरांनी आम्ही दिलेला अर्ज खिश्यात ठेवला ..कोणाला काही प्रश्न ? असे सरांनी विचारताच एकदम आठदहा हात वर झाले ..

" सर ..लेकीन मेरे घरमे मुझे तमांखू खाने के लिये मना नही है ..केवल मैने शराब छोडना चाहिये ऐसा बोला जाता है ..और मैने भी इसके आगे शराब नही पियुंगा ऐसी ठान ली है ..फिर मुझे तमांखू छोडने के लिये जबरदस्ती क्यों ? छत्तीसगढ मधल्या एकाने विचारले ..आम्ही नकळत माना हलवल्या ..त्याने सर्वांच्याच मनातला प्रश्न विचारला होता ..सर म्हणाले ..' हे बघा ..दारू आणि इतर मादक द्रव्यांचे परिणाम केवळ सेवन करणाऱ्या वर नव्हे तर त्याच्या कुटुंबियांवर देखील होत राहतात ..शारीरिक ..मानसिक ..कौटुंबिक ..आर्थिक ..सामाजिक ..आणि अध्यात्मिक अशा विविध पातळ्यांवर नुकसान होते ...दारू पिवून अपघात ..शिवीगाळ ..मारामारी ..किवा गुन्हेगारी .. ..वेड लागणे ..असे परिणाम होतात ..तंबाखूने तसे होत नाही ..तंबाखूमुळे कर्करोग ..दात खराब होणे ..कार्यक्षमता कमी होणे ..ब्राँकायटीस ..क्षयरोग ..क्वचित नपुंसकता ..असे आजार होऊ शकतात तरीही तंबाखूच्या नशेत शिवीगाळ ..तंबाखू सेवन करून मारामारी ..तंबाखूमुळे विविध मानसिक आजार उदभवणे..असे घडत नाही ..म्हणून आपले कुटुंबीय तंबाखू बाबत जास्त आग्रही नसतात ..' दगडा पेक्षा वीट मऊ ' या नात्याने ते आपल्याला तंबाखूचे सेवन करण्यास फारशी मनाई करत नाहीत ..याचा अर्थ असा नव्हे की तंबाखू चांगली आहे ..आपण जर व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालणार असू तर कोणत्याही प्रकारचे व्यसन अथवा मानसिक गुलामी आपण टाळली पाहिजे ..जर राहिलेले जिवन आरोग्यपूर्णतेने व्यतीत करायचे असेल तर आपण आता पासूनच प्रयत्न केले पाहिजेत ..' सरांचे बोलणे पूर्ण होताच .शेरकर काका म्हणाले ..सर पण आम्ही तंबाखू नंतर एकदोन वर्षात सोडणारच आहोत ..तसे मी ठरवले आहे ..सध्या फक्त दारू बंद करायची असे ठरवून आम्ही इथे उपचार घेतो आहोत ..शेरकर काकांच्या युक्तिवादाने सगळे हसू लागले ..

बराच काळ सर सर्वांना समजावत होते ..आम्हीही अनेक प्रकारचे युक्तिवाद मांडत होतो ..एकंदरीत तंबाखू सुरु केली पाहिजे ...आम्हाला सध्या फक्त दारू व इतर मादक पदार्थ सोडण्याची निकड आहे ..आम्ही नंतर तंबाखू देखील नक्की सोडू ..असाच सर्वांचा सूर होता ..शेवटी सरांनी काही अटी व शर्तींवरच तंबाखू बिडी सुरु करू असे जाहीर केले ..त्या अटी खालील प्रमाणे ठरल्या ..

१ ) थेरेपीजच्या वेळात कोणीही तंबाखू तोंडात ठेवता कामा नये ..कोणी असे करताना आढळ्यास ताबडतोब त्याची तंबाखू बंद करण्यात येईल .

२) बिडी ओढण्यासाठी किवा तंबाखू खाण्यासाठी बाथरूम जवळच्या जागेत सर्वांनी जावे ...वार्डात इतर ठिकाणी असे करू नये ..

३) बिडीचे विझलेले तुकडे ..तंबाखूच्या रिकाम्या पुड्या वगैरे नेमक्या कचरा टाकण्याच्या बादलीत टाकाव्यात ..तसेच तंबाखू खावून ..खिडकीतून बाहेर थुंकू नये .. बाथरूम मध्ये जावून थुंकावे 

४) आमचे पालक जेव्हा भेटीला येतील तेव्हा ..पत्येकाच्या पालकांना सर त्यांच्या पेशंटला तंबाखू अथवा बिडी द्यायची किवा नाही याची परवानगी घेतील ..ज्यांचे पालक तंबाखू बिडीस मनाई करतील त्यांची तंबाखू- बिडी बंद करण्यात येईल ...तसेच वरील नियम मोडणाऱ्या व्यक्तीची तंबाखू बिडी कायमची बंद करण्यात येईल .

आम्ही सर्वांनी या शर्ती मान्य केल्यावर ..मग नेहमीप्रमाणे तंबाखू-बिडी वाटप सुरु झाले... मी अंतर्मुख झालो होतो ..वाटले दारू बंद करून आपण एक वर्ष पूर्ण केल्यावर नक्कीच तंबाखू पण बंद केली पाहिजे ... 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment