Wednesday, May 14, 2014

उत्खनन ..मंथन !


उत्खनन ..मंथन ! ( बेवड्याची डायरी - भाग ४३ वा )


फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .

" फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे मला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..धर्माने शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..

सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व धर्मग्रंथांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते .

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment