Friday, May 9, 2014

माझा अन्न सत्याग्रह !

माझा अन्न सत्याग्रह ! ( बेवड्याची डायरी - भाग ४१ वा )

काल रात्रभर नीट झोप लागलीच नाही ...पोटात जेवण नाही म्हणून असेल कदाचित ..शिवाय डोक्यात राग होताच मला काल घरी न सोडल्याचा ..सकाळी मी पीटी करता उठलोच नाही ..मुद्दाम तोंडावर चादर घेवून पडून राहिलो ..कार्यकर्ता उठवायला आला तेव्हा ..माझी तब्येत बरी नाही असे कारण सांगितले ..शेरकर काका मला दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करून गेले... मी त्यानाही दाद दिली नाही ..' ओ गांधी बाबा उठा की आता चहा तरी घ्या ' तिसऱ्यांदा शेरकर काका जवळ येवून मला उठवू लागले ..त्यांनी मला गांधी बाबा नावाने मारलेली हाक खटकलीच ..काल पासून मी अघोषित उपोषण सुरु केले होते म्हणून ते मला गांधीबाबा म्हणत आहेत हे जाणवले ..मी रागाने उठून बसलो व त्यांना म्हणालो ' काका तुमचे इतके वय झालेय ..मात्र शहाणपणा काडीचा नाहीय तुमच्यात ' यावर ते नेहमीप्रमाणे मिशीत हसले ..त्यांच्या हातात चहाचे तों ग्लास होते ..' जाऊ दे यार ..वयाचा आणी शहाणपणाचा काही संबंध नसतो ..चहा तर घे ..' माझ्या बाजूला बसकण मारत त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडला .. भूक लागली होती ..परंतु माझे अघोषित उपोषण मात्र सोडायचे नव्हते मला ..मी शेरकर काकांकडे न पाहता तोंड फिरवून बसलो ..' अरे जाऊ दे नको घेवून चहा ..पण बोल तरी जरा माझ्याशी ' काका चिवटपणे मला चिकटून राहिले ..' विजयभाऊ अहो ..असा राग चांगला नसतो आपल्या माणसांवर ..असे मनाविरुद्ध घडतच असते ..जेवणावर राग काढून काही साध्य होत नाही ..इथले कार्यकर्ते अजून एक दिवस वाट पाहतील तुम्ही जेवता की नाही याची ..मग सरळ डॉक्टरना बोलावून तुम्हाला सलाईन लावतील ..तुम्ही जास्त विरोध केलात तर बांधून ठेवून सलाईन लावतील ' हे ऐकून मी विचारात पडलो .. जरा अंतर्मुख झालो ..कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला माझ्या .

काल सरांनी सर्वाना नेहमीप्रमाणे सूचना दिली होती ..' आज पालकांच्या भेटीचा दिवस आहे ..ज्या लोकांना इथे येवून दहा दिवस पूर्ण होत झालेले आहेत ..तसेच वार्डातील ज्यांचे वर्तन नीट आहे अशा लोकांच्या पालकांना आम्ही भेटीस परवानगी दिली आहे ...मला माहित आहे की इथे व्यसनमुक्ती केंद्रात रहाणे म्हणजे बहुतेक लोकांना शिक्षा वाटत असेल ..कारण इथे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात ..पत्येक वेळी तुम्हाला अॅडजेस्टमेंट करावी लागतेय ..व्यसनी व्यक्तीच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावात बदल करण्यासाठी ते आवश्यकच असते...मात्र येथे मनासारखे वागता येत नाही म्हणून सर्वांनाच आपण लवकरात आपल्या घरी जावे असे वाटते ..इथे कोणालाही कायमचे राहायचे नाहीय ..उपचार पूर्ण झाल्यावर सर्वाना घरी जायचेच आहे .. व्यसनमुक्ती साठी आणि उज्वल भविष्यासाठी आपल्याला येथे आणले गेलेय ..यावे लागलेय ...किवां काही स्वतःहून आलेत म्हणा हवे तर ..पण पालक आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ..आपल्यात घडणारे बदल पाहण्यासाठी भेटायला येतात ..कोणीही आपल्या पालकांजवळ मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करू नका ..त्यातून हेच सिद्ध होईल कि अजूनही तुमच्यात सुधारणा झालेली नाही ..उलट हट्ट केला तर पालक नाराज होऊन तुमचे इथले वास्तव्य वाढवण्याचा विचार करतील हे ध्यानात ठेवा ..बाकी आपण सुज्ञ आहातच ' ....मी मनातून आज अलका भेटीला येईल म्हणून आनंदलो होतो ..तिच्याकडे घरी ने असा हट्ट करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता ..प्रत्यक्ष संध्याकाळी ती भेटीला आली तेव्हा तिचा प्रफुल्लीत चेहरा पाहून मला भरून आले होते ..मला पाहताक्षणी तिचे चमकलेले डोळे सांगून गेले कि ती अतिशय आतुरतेने माझ्या भेटीची वाट पाहत असावी .. जवळ बसताच तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली .. बोलताना ती इतकी निष्पाप दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम मी पाहतच राहिलो ' अहो लक्ष कुठेय तुमचे ..मी काय म्हणतेय ऐकताय ना ' असे म्हणत तिने मला भानावर आणले ..म्हणाली मुले पण मागे लागली होती आम्ही पण येतो बाबांना भेटायला म्हणून पण मीच नको म्हंटले ..पुढच्या वेळी नक्की आणीन मुलांना ..मग तिने माझी चौकशी सुरु केली ' कसे वाटतेय इथे ? जेवण कसे आहे ? सगळ्या उपचारात भाग घेता का ? वैगरे ..मी जमेल तशी उत्तरे देत होतो ..खरे तर तिच्याकडे मला घरी ने असा हट्ट करण्याचा माझा कुठलाच विचार नव्हता ..इथले सगळे नीट शिकूनच डिसचार्ज घ्यायचा हे मी ठरवले होते ..तरीही कसा कोण जाणे अलकाशी बोलता बोलता माझा विचार बदलत गेला ..पहिल्यांदाच मी पत्नी आणि मुलांपासून इतके दिवस दूर राहत होतो ..सुरवातीचे एक दोन दिवस वगळता मी इथे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यायला लागलो होतो .. इथे शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत हे देखील लक्षात आले होते ..पण अलकाशी बोलता बोलता वाटले ..दहा दिवस खूप झालेत आता ..यापुढे आपण दारू अजिबात पिणार नाही याची खात्री वाटू लागली होती मला..उगाच अजून जास्त दिवस राहून फारसे काही साध्य होणार नाहीय .. ..सहज एक चान्स घ्यावा म्हणून अलकाला म्हणालो ' आता मला पटलेय चांगलेच कि दारूमुळे आपले सर्वांचेच किती नुकसान केलेय ते ..यापुढे मी अजिबात प्यायची नाही असे ठरवलेय ..तू सरांना सांगितलेस तर ते मला डिसचार्ज सुद्धा देतील ' माझे हे बोलणे ऐकून अलका एकदम स्तब्ध झाली ...नुसतीच माझ्या तोंडाकडे पाहत राहिली ..कदाचित माझ्या मनाचा वेध घेत असावी ..म्हणाली ' अहो ..पूर्ण कोर्स केल्याशिवाय किवा सरांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला येथून नेता येणार नाहीय असे कालच सरांनी मला फोनवर सांगितलेय ..' ' म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीय तर अजून ? ..थोडे दुखावला जावून मी विचारले ..' इथे विश्वासाचा प्रश्नच नाहीय हो ..तुम्हाला डिसचार्ज देणे योग्य राहील कि नाही हे ठरवणारी मी एकटीच नाहीय ..सरांची परवानगी लागते त्यासाठी ..आपण आता बरे झालोत हे आजारी व्यक्तीने नाही तर त्याच्या उपचारकाने ठरवले पाहिजे ना ? ' 

" अग पण ..मी इथे स्वताच्या मर्जीने आलोय ..शिवाय आता मी सांगतोय ना की मला बरे वाटतेय .अजिबात दारूची आठवण येत नाहीय ..यापुढे मी अजिबात पिणार नाही ..तुझी शपथ " असे म्हणत मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ..यावर अलका गडबडली ..आपण तिची शपथ घेतली की ती भावनाविवश होते हे मला चांगलेच ठावूक होते ..मग म्हणाली ...बरे पाहू मी विचारते सरांना ..असे म्हणून पटकन उठून बाहेर ऑफिसात गेली ..मी वार्डातच बसून तिची वाट पाहू लागलो ..साधारण दहा मिनिटांनी परत आली ..' सरांनी नाही म्हंटले आहे ..' असे म्हणत खाली मान घालून बसली ..मी इथे आल्यापासून इतका चांगला सहभाग घेतोय सगळ्या उपचारात तरीही सरांनी माझ्या डिसचार्ज करिता नकार द्यावा याचे मला वैषम्य वाटले ..राग यायला सुरु झाला .. कुत्सितपणे म्हणालो ' तुला घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे तर ? ' अलका खाली पाहतच म्हणाली ' या पूर्वी इतके वेळा विश्वासघात केलंय तुम्ही की आता विश्वास ठेवणे कठीणच जातेय मला ..अनेक वेळा माझ्या शपथा झाल्यात ..मुलांच्याही शपथा घेवून झाल्यात ..मात्र तुमचे पिणे काही कायमचे बंद होत नव्हते ' तिच्या या बोलण्याने मी दुखावलो गेलो ..अपमानित झाल्यासारखे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात)

No comments:

Post a Comment