Friday, May 9, 2014

संगीतातून व्यसनमुक्ती !


संगीतातून व्यसनमुक्ती ! ( बेवड्याची डायरी -भाग ४० वा )

आज सायंकाळी ' म्युझिक थेरेपी ' आहे हे मला सकाळीच समजलेले ...शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे अनेक प्रकारची गाणी मी आवडीने ऐकत असे. .. दारू पितांना बार मध्ये बसल्यावर आम्हा मित्रांची खास गझल्स लावण्याची फर्माईश असे बारमालकाला ..मेहंदी हसन ..गुलामली ...पंकज उधास ..अशा गायकांच्या गझल्स ऐकून ' चियर्स ' करण्यात ..आम्ही वेळेचे भान विसरून जात असू ..मात्र मी कधी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शेरकर काकांनी तुला पण गाणे म्हणावे लागेल हे सांगून मला काळजीत टाकले होते ..काही उत्साही लोक सकाळपासूनच लायब्ररी मधून गाण्याची पुस्तके घेवून त्यातील गाणी पाठ करण्याचा मागे लागलेले..सायंकाळी ७ वाजता ...बाहेरच्या ऑफिस मधून तबला ..पेटी ..कोंगो ..अशी वाद्ये वार्डात आणून लावली गेली ..एका कार्यकर्त्याने माईक सिस्टीम लावली ..एकंदरीत वातावरण निर्मिती झाली होती ..सर वार्डात आल्यावर प्रार्थना घेवून त्यांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो मला माहित आहे आपण शनिवारच्या संगीत सभेची वाट आतुरतेने पाहता ..कारण संगीत अशी एक जादू आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो ..आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे संगीत असे म्हणता येईल ..आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करण्याची शक्ती संगीतात आहे ..नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्ती संगीत देवू शकते ..म्हणूनच आपण इथे आठवड्यातून एकदा संगीत उपचार घेतो ..इथे कोणी मोठा गायक अथवा कलाकार नाहीय आपल्यात .. तरीही सर्वांनी स्वताच्या आनंदासाठी या उपचारात भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्वाना विनंती आहे ..प्रास्ताविक झाल्यावर सरांनी एक हिंदी भक्ती गीत म्हंटले ..अनुप जलोटाने गायिलेले हे भक्तीगीत मी पूर्वी लहानपणी अनेकदा ऐकलेले होते ..सर गाणे म्हणतात हे पाहून मला नवल वाटले ..दुसरे सर हार्मोनियम वर बसले होते ..वा म्हणजे आज दोन्ही प्रमुख समुपदेशक या थेरेपीला हजर होते तर ..सरांचे गाणे झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..मग सरांनी आम्हाला एकेकाला आवाहन केले गाणी म्हणण्यासाठी ..जे उत्साही गायक वार्डात होते त्यापैकी एक जण उठून समोर गेला ..त्याने माईक हातात घेवून गाणे म्हणण्यास सुरवात केली ..' दोनो ने किया था प्यार मगर ..मुझे याद रहा ..तू भूल गई ' महुवा सिनेमातील हे दर्दभरे गाणे तो म्हणू लागला ..त्याचा आवाज यथातथाच होता ..मात्र तो अतिशय तल्लीन होऊन हे गाणे म्हणत होता ..तबल्यावर आमच्यातीलच एक जण बसला होता ..तो उत्तम तबलजी नव्हताच तरी तालाचे बरे भान होते त्याला ..मध्ये एक दोन ओळी विसरल्याने त्याने जेव्हा शब्दांऐवजी न ना ना न नाना ..नान न नाना सुरु केले तेव्हा सगळे हसू लागले ..दर्दभरे गीत सुरु असताना एकदम विनोदी वाटू लागले ..त्याचेही गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या आम्ही ...

एकाने मराठी लावणी म्हंटली ..त्याबरोबर शिट्ट्या वाजू लागल्या ..वातावरण चांगलेच रंगले ..शेरकर काका माझ्या मागे बसून मला बोटांनी ढोसत होते ..तू जा गाणे म्हणायला म्हणून ..वैतागून मी उठून दुसरीकडे गेलो ..मध्येच सर्वांनी ' वुई वांन्ट रमेश 'असा गलका सुरु केला ..एक रमेश नावाचा गांजाचा व्यसनी तयारच होता गाण्याचे पुस्तक घेवून ..हा खूप चांगला गायक असावा म्हणून सर्व त्याची मागणी करत आहेत असे मला वाटले.. रमेशने माईकचा ताबा घेतल्यावर खूप मोठा गायक असल्यासारखे जरा ' हॅलो माईक टेस्टिंग ...वन ..टू ' ...मग एकदम त्याने हिमेश रेशमाईया सारखा नाकात सूर लावला ..' झलक दिखलाजा ..एक बार आजा ...आजा ' सगळे हसू लागले ..रमेशला ताल सुराशी काही घेणे देणे नव्हते असे दिसले ..तो मस्त डोळे मिटून ...आजा ..आजा आळवीत होते ..त्याची तल्लीनता पाहून सर्वाना हसू येत होते ..सुदैवाने त्याचे डोळे बंद असल्याने त्याला समजत नव्हते की आपल्याला सगळे हसत आहेत ..एक गाणे संपल्यावर लगेच त्याने दुसरे गाणे सुरु केले ..' लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ' ..जेमतेम दोन ओळी म्हंटल्यावर मग पुन्हा दुसरे गाणे ' ओब्लाडा डा डा डा ..ओब्लाडू डू डू ' तो डोळे मिटून असे अंगविक्षेप करत होता ..की हसून हसून आमची मुरकुंडी वळली ..बरेच मनोरंजन झाल्यावर मग सर्वांनी एकदम टाळ्या वाजवायला सुरवात केली ..गाणे सुरु असताना सतत टाळ्या म्हणजे श्रोते तुम्हाला खाली बसायची सूचना करत आहेत हा अर्थ रमेशला माहित नसावा ..त्याचे ..डा डा डू डू सुरूच होते ..शेवटी सरांनी त्याला थांबवून आता नंतर म्हणा गाणे असे सांगितले तेव्हा त्याने माईक सोडला ..मला लक्षात आले रमेश चांगला गायक होता म्हणून नव्हे तर त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला गाण्याचा आग्रह होता होता ..बराच वेळ धमाल सुरु होती ... ' देखा ना हाये रे सोचा ना ..हाये रे ' या गाण्याला पब्लिक उठून नाचू लागले ...' खैके पान बनारसवाला ' पण झाले ..सुमारे दोन तास अतिशय मजेत गेले सर्वांचे..आम्ही सगळे आमच्या जीवनातील अडचणी ..संकटे ..दुखः ..विसरून जणू आनंदाच्या प्रदेशात शिरलो होतो ..सरांनी जेवणाची वेळ झाल्यावर सरांनी थांबण्याची सूचना केली आणि माईक हातात घेतला ..मित्रांनो सुमारे दोन तास आपण हा संगीताचा आनंदानुभव घेत होतो ..आता वास्तवात परतायची वेळ झालीय असे म्हणत ..समारोप करू लागले..

माणसाच्या जीवनात निराशा ..अडचणी ..संकटे असणारच ..तरीही जेव्हा जेव्हा आपण खूप अवस्थ असू ..कशातच मन लागत नसेल ..सगळ्या नकारात्मक भावना घेरतील तेव्हा संगीत नक्कीच तुम्हाला सगळ्या चिंता विसरायला लावते ..व्यसने करण्याच्या काळात देखील आपण संगीताचा आनंद घेतला आहे ..मात्र पोटात आणि डोक्यात दारू असताना आलेला आनंद हा कितीही झाले तरी कृत्रिमच ...भानावर राहूनच संगीताचा खरा आनंद लुटता येतो ..गीतकाराचा शब्द न शब्द बोलका होतो ..त्यात दडलेला गहन अर्थ मनात उतरतो ..सुरांची जादू हृदयात आनंदाचे कारंजे निर्माण करते ..तसेच वाद्यांचा ध्वनी आपल्या डोक्यात ताल निर्माण करून कोणतीही नशा न करता पाय थिरकायला लावतो ..मन भारून टाकतो हा अनुभव आता आपण सर्वांनी घेतलाय ..जगातले कोणतेही मादक द्रव्य देवू शकणार नाही अशी नशा संगीत आपल्याला देते ..इथून बाहेर पडल्यावर आपण हा आनंद विसरता कामा नये ..जेव्हा जेव्हा सगळे जग तुमच्यावर रागावले आहे असे वाटेल ..जगण्याचा कंटाळा येईल ..जीवन निरस वाटू लागेल ..एकटेपणाची भावना मनाला ग्रासेल ..व्यसन करण्याची अनावर ओढ मनात निर्माण होईल ..त्या त्या वेळी आपण जर संगीताचा वापर केला तर नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यास उर्जा मिळेल ..असे सांगत सरांनी उपचारांचा समारोप केला ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment