Friday, May 2, 2014

बिडी ..तंबाखू ..!


बिडी ..तंबाखू ..! ( बेवड्याची डायरी - भाग ३८ वा )


आज सकाळी औषधे वाटून झाल्यावर सगळे ..बिडी तंबाखूचा रोजचा कोटा घेण्यासाठी रांगेत उभे असताना ..माॅनीटरने जाहीर केले की आजपासून बिडी -तंबाखू देणे बंद करण्यात येत आहे ..हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले ..एकदम आरडओरडा सुरु झाला ..मात्र माॅनीटरने कोणाचेही काहीही न ऐकता वाटप बंद करायला लावले ..सगळा गोंधळ उडाला ..आम्ही येथे दारू व इतर मादक पदार्थ सोडण्यासाठी आलेलो आहोत ..बिडी ..तंबाखू सोडण्यासाठी नाही असा सूर होता सगळ्यांचा ..मग वार्डात सगळे समूहात वाटले गेले आणि चर्चा सुरु झाली ..जेमतेम दोन तीन जण असे होते ..ज्यांचे म्हणणे होते की हे एकदम योग्य केले गेलेय ..व्यसनमुक्ती म्हंटले म्हणजे सगळीच व्यसने बंद केली पाहिजेत .. बहुतेक जण हा आमच्यावर अन्याय आहे असे म्हणू लागले ...आमच्या पालकांचे बिडी तंबाखू बद्दल काहीच म्हणणे नाहीय ..त्यांना दारू व इतर मादक पदार्थांचा त्रास होतोय ..त्यामुळे ते सोडण्यासाठी आम्ही इथे आहोत ..गोंधळाच्या वातावरणातच सुमारे तासभर गेला ..ज्यांच्याकडे काल वाटल्या गेलेल्या बिड्या किवा तंबाखू शिल्लक होती ते लोक एकदम श्रीमंत असल्याच्या अविर्भावात वावरू लागले ..ज्यांच्याकडील तंबाखू अथवा बिडी संपली होती ते लोक आपले कसे होईल या विवंचनेत ..मी बिडी ओढत नसे मात्र तंबाखूची सवय होती मला ..अगदी खूप नाही तरी सकाळी शौचाला जाताना चिमुटभर दाढेखाली धरली की बरे असे ..प्रत्येक वेळी जेवण झाल्यावर ..चहा झाल्यावर खूप तल्लफ येई तेव्हा चिमुटभर खात असे ..ही सवय मला अगदी कॉलेजला असल्यापासून लागलेली ..लग्नानंतर अलकाने काही दिवस तक्रार केली ..तोंडे वाकडी केली ..एकदोन वेळा माझी तंबाखूची पुडी लपवून ठेवली ..त्यावेळी मात्र मी चिडलो होतो तिच्यावर ..मी काही दिवसभर खात नाही तंबाखू ..थोडी चिमुटभर खातो ..त्याला तू अजिबात मना करू नकोस ..असा म्हणत वाद घातला खूप ..शेवटी तिने तक्रार करणे सोडून दिले होते ..पुढे दारूचे प्रमाण वाढल्यावर तिचे सगळे लक्ष दारू कशी बंद होईल माझी याकडे एकवटले होते ..तंबाखू नगण्य ठरली ..उलट हवे तर तंबाखू चालेल ..मात्र दारू अजिबात नको असा हट्ट होता तिचा ..अर्थात मी माझ्याच मनासारखे वागलो शेवटी ...

इथे उपचारांसाठी दाखल झाल्यावर देखील मला हीच चिंता होती की व्यसनमुक्ती केंद्र म्हंटल्यावर इथे तंबाखूचे वांधे होणार ..दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी मी सरांना त्याबद्दल विचारले होते..त्यावर ते हसून म्हणाले होते की बहुधा सर्वच व्यसनी व्यक्तींना दारू अथवा इतर मादक पदार्थांसोबत हे को-अॅडीक्शन असते तंबाखू ..सुपारी.. विडीचे ...हे आम्ही जाणून आहोत ..दारूच्या तुलनेत हे निकोटीनचे व्यसन तसे नगण्य वाटते आपल्याला ..इथे सगळी व्यसने एकदम बंद ठेवली तर खूप अवस्थता येते ..सगळ्याच व्यासनांशी एकाच वेळी झुंज देता येणे कठीण असते ..म्हणूनच आम्ही इथे अगदी माफक प्रमाणात इथे तंबाखू व विडी साठी परवानगी देत असतो ..रेशनिंग पद्धतीने येथे कोटा ठरवला आहे ..धुम्रपान करणाऱ्याला दिवसाला फक्त आठ विड्या मिळतील..सिगारेट अजिबात नाही ..कारण सिगारेट मध्ये काही ड्रग अँडीक्ट इथे मिळणाऱ्या झोपेच्या गोळ्या वगैरे भरून ओढण्याची शक्यता असते ..तसेच विडी मध्ये तंबाखूचे प्रमाण सिगरेटच्या तुलनेत खूप कमी असल्याने आणि कमी नुकसान व्हावे या हेतूने विडी दिली जाते ..तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना रोज फक्त एक पुडी तंबाखू मिळते ..जी सुमारे आठ दहा वेळा खाता येईल .. गुटखा ..खर्रा ..वगैरे प्रकार मात्र अजिबात मिळणार नाहीत ..हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला होता ..आता सगळेच बंद होणार म्हंटल्यावर मी देखील चिंतेत होतो ..मी कमी तंबाखू खात असल्याने माझ्या लॉकर मध्ये थोडी थोडी तंबाखू उरलेल्या एकदोन पुड्या ..तसेच भरलेली एक पुडी शिल्लक होती ..शेरकर काकांना ते माहित होते ..ते माझ्या मागे लागले ..एक चिमुटभर तरी तंबाखू दे म्हणून ..अगदी चार कण दे हवे तर ..यार सकाळी शौचाला साफ झालेली नाहीय ..एकदम गयावया करत ते माझ्या मागे फिरू लागले ..शेवटी मला त्यांची दया आली ..त्यांना मी तंबाखू देतोय हे कळले असते तर आणखी काही लोक माझ्या मागे लागले असते म्हणून मी त्यांना इशारा करून बाथरूमकडे जाण्यास खुणावले ..मग कोणाचे लक्ष नाही असे पाहून माझा लॉकर उघडून त्यातून पटकन ती भरलेली पुडी काढली आणि खिश्यात ठेवली ..एकाचे लक्ष गेलेच माझ्याकडे ..माझ्या संशयास्पद हालचाली पाहून त्याने काय ते ओळखले असावे ..तो पण माझ्या मागे मागे बाथरूम कडे आला ..शेवटी शेरकर काका आणि त्याला ही चिमुटभर तंबाखू द्यावी लागली मला ...

वार्डात जणू हलकल्लोळ मजला होता ..' अभी सर आने दो ..उनको बोलेंगे के हमको नही रहेना यहाँ.' .असा टोकाचा सूर काही काढू लागले ..बिडी ओढणारे महाभाग वार्डच्या काना-कोपऱ्यात फिरून कुठे एखादा बिडीचा तुकडा मिळतोय का ते तपासत होते ..त्यात अगदी उच्चशिक्षित लोक देखील सामील असलेले पाहून मला त्यांची गम्मत वाटली ..गुलामीची ही अवस्था मी प्रथमच अनुभवत होतो ..एकदोन दिवस माझ्याकडील शिल्लक तंबाखू मला पुरली असती ..मात्र नंतर आपले कसे होईल हीच विवंचना लागली मला देखील ..आता दोस्ती वगैरे बाजूला ठेवून फक्त स्वतःपूरते पाहायला हवे ..शेरकर काकांनी या पुढे कितींनी विनवणी केली तरी त्यांना तंबाखू द्यायची नाही हे मी ठरवले...नाष्टा झाल्यावर पुन्हा सगळे विडी तंबाखूच्या काळजीत समूहाने जमून चर्चा करत होते ..एकाने आयडिया काढली की आपण संस्थेच्या संचालकांच्या नावाने एक विनंती अर्ज लिहू ..त्यात सगळे नमूद करून ..विडी तंबाखू सुरु करण्याची विनंती करू ..अन्यथा आम्हाला येथून डिसचार्ज देण्यात यावा अशी मागणी करू ..लगेच कार्यवाही सुरु झाली ...जरा चांगले अक्षर असलेल्या एकाने अर्ज लिहायला सुरवात केली ..त्यापूर्वी त्याने अर्ज नीट लिहावा म्हणून त्याला एकाकडे असलेल्या चिमुटभर तंबाखूची लाच देण्यात आली ..ती दाढेखाली धरून मग त्याचा हात चालू लागला नीट ..अर्ज लिहून झाल्यावर त्यावर सगळ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या ..आम्ही वार्डातील ' त्रिदेव ' जे मानसिक रुग्ण होते व त्यांना कसलेही व्यसन नव्हते त्यांना देखील सह्या करण्यास सांगितले ..बिचार्यांनी निमूटपणे सह्या केल्या ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment