Sunday, May 18, 2014

बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय !


बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय ! ( बेवड्याची डायरी - भाग ४७ वा )


काल रात्रभर जवळ जवळ जागाच होतो ...चौथ्या पायरीत सांगितल्या प्रमाणे ..स्वता:च्या चुकांचे समर्थन करणारा वकील बाजूला काढून आत्मपरीक्षण करताना माझी अवस्था खरोखर कठीण झाली होती ...आठवते तेव्हापासून स्वतच्या शोध घ्यायला सुरवात केल्यावर अनेक बारीक सारीक प्रसंग आठवू लागले ..जेथे मी माझी चूक मान्य करण्याऐवजी इतरांना दोष तिला होता ..कांगावा केला होता ...माझी चूक कबूल न करता इतरांशी भांडण करत गेलो होतो ...डायरीत प्रश्नाचे उत्तर काय लिहावे ते नेमके न समजल्याने मी माँनीटरला जेव्हा त्या बद्दल विचारले होते तेव्हा तो म्हणाला ..' आत्मपरीक्षण ' ही एका तासात होण्यासारखी प्रक्रिया नाहीय ..सध्या तुम्ही फक्त एक काम करा ..काम ..क्रोध ..लोभ ..मद..मोह आणि मत्सर या विकारांचा डायरीत एक एक भाग करा ..आणि आठवेल तेव्हा पासून या विकारांच्या बाबतीत तुमचे वर्तन कसे होते ते प्रत्येक विकाराच्या बाबतीत लिहून काढा ..तसेच त्या वर्तनामागील तुमचे नेमके विचार अथवा भावना यांचे परीक्षण करा ..त्या त्या वेळी ते विचार योग्य होते का ? त्या भावना नैतिक होत्या का ? हे तपासा ..अर्थात तुम्हाला हे सगळे करत असताना आत्मग्लानी येणे किवा अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणे ..हे परिणाम मिळतील तात्पुरते ..मात्र त्या मुळे खचून न जाता ..नेटाने प्रयत्न सुरु ठेवा ..पुढे ही अपराधीपणाची भावना काढून टाकण्यास देखील मदत मिळेलच नक्की ..

रात्री सगळे आठवत बसलो तसा अधिक अधिक खिन्नता येत गेली ..वाटले जर बारकाईने विचार केला तर आपण दिसतो तितके ..भासवतो तितके ..साधे सरळ नाही आहोत ..आपल्या मनात सतत एक स्वार्थ दडलेला असतो ..हा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपण वेळोवेळी खोटे बोलतो ..वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतो .. स्वार्थ कधी खाण्यापिण्याच्या वस्तूंचा ..कधी लैंगिक सुख मिळवण्याचा ..कधी आयता पैसा कसा मिळेल ..आपल्या मान सन्मान कसा प्राप्त होईल ..याबाबतचा असतोच ...शिवाय मत्सर देखील असतो आपल्या मनात अनेक लोकांबद्दल ..किवा सुप्त असूया असते ..त्यांचे रंगरूप ..वैभव ..संपत्ती त्यांचा मान सन्मान याबद्दल ..माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर अनेक दिवस मला उगाचच त्या कधीच न पाहिलेल्या श्रीराम नेने बद्दल असूया वाटत होती ...जेव्हा कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन करे तेव्हा मला त्याचा प्रचंड राग येवून अनेकदा ती व्यक्ती मरून जावी..उध्वस्त व्हावी ..असा मी विचार केला आहे ..माझ्या दृष्टीने नालायक असणाऱ्या अनेक लोकांना कसे संपवता येईल याचे मनसुबे रचले आहेत मनात ..अर्थात ते अमलात आणले नाहीत ही गोष्ट वेगळी .. कौटुंबिक ..सामाजिक ..अथवा देशांतर्गत कायदे पालन करण्याऐवजी ते कसे मोडता येतील याचा विचार अनेकदा मनात येतो ..लाल सिग्नल असताना मी अनेकदा आसपास कोणी पोलीस नाहीय हे पाहून सिग्नल तोडला आहे ..अशावेळी माझ्याकडे इतर वाहन चालक जेव्हा आश्चर्याने पहात तेव्हा मला खूप अभिमान वाटे ..माझे गाडी चालवण्याचे लायसन जवळ नसताना देखील मी अनेकदा गाडी चालवली आहे ..' दारू पिवून गाडी चालवणे हे तर नेहमीचेच असते .." पाहून घेवू काय होईल ते " या बेदरकर वृत्तीने ..एकदा मी जेमतेम १७ वर्षांचा असताना खोटे वय सांगून ' फक्त प्रौढांसाठी ' असलेल्या सिनेमाला मित्रांसोबत गेलो होतो ..त्या सिनेमात जंगलात ..गुहेत राहणाऱ्या आदिमानवा बद्दलचे चित्रण होते ..त्या सिनेमातील आदिमानवांना आजच्या सुधारलेल्या मानवा सारखी नैतिकतेची वगैरे बंधने अजिबात नव्हती ...ज्याच्याकडे जास्त शक्ती आहे युक्ती आहे तो सरळ सरळ इतरांवर अन्याय करून आपले सुख ओरबाडून मिळवीत होता ..विवाहबंधन पण नव्हते ..पसंत पडेल त्या वेगवेगळ्या स्त्रियांशी संग करण्यास मुभा होती ..लैंगिक संबंधातून निर्माण होणारी मुले ही आपोआप सगळ्या समूहात मोठी होत असत ..त्यांची जवाबदारी वडिलांवर नसे . नंतर आम्हा मित्रांना अनेक दिवस आपण त्या आदिमानवाच्या काळात जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते असे वाटत राहिले होते ..

रात्रभर सगळे असेच विचार मनात थैमान घालत होते ..मी आतून हादरलो होतो ..एरवी आपण मोठ्या समाजसेवेच्या ..न्यायाच्या ..प्रामाणिकपणाच्या ..कर्तव्यपालनाच्या ..गप्पा मारतो .मात्र स्वताच्या आत दडलेली नैतिकता तपासताना खरोखर आपण कोण आहोत ..कसे आहोत याची स्पष्ट जाणीव होते ...रात्रभर सारखी कुशी बदलत जागा होतो ..सकाळी मला पी .टी. करायचा देखील कंटाळा आला होता ..माॅनीटरला सकाळी माझी तब्येत बरी नाही असे सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले ..त्याने माझ्या कपाळाला हात लावून ताप आहे का ते पहिले ..मग म्हणाला ..ताप तर नाहीय तुम्हाला ..बहुतेक तुम्ही सिरीयसली आत्मपरीक्षण केल्याने असे कंटाळवाणे वाटत असेल ..रात्री झोप लागली नसेल ..असेच होते आत्मपरीक्षण करताना ..ते संत कबीराच्या दोह्या सारखे ' बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय '..खुद के अंदर झांक के देखा मुझसे बुरा ना कोय " ही भावना निर्माण होते ..कबीरा सारख्या संताला देखील असे वाटले तर आपली सर्वसामान्यांची काय कथा ..अर्थात तुम्ही प्रामाणिकपणे स्वताच्या आत शोधले म्हणून तुम्हाला तसे वाटतेय ..काही जण इतक्या प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत नाहीत त्यांना आपली चूक समजतच नाही ..अश्या लोकांना वारंवार उपचारांना यावे लागते ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment