Monday, May 26, 2014

बिंग फुटले

बिंग फुटले ( बेवड्याची डायरी - भाग ४९ वा )
रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही साधारण पंचाविशीचे ..मी बिछान्यावर आल्यानंतर देखील बराच वेळ ते तिकडेच होते ..त्यांची काहीतरी खलबते चालली होती असा संशय आला मला ..सकाळी मी चहा घेताना सहज शेरकर काकांजवळ त्याचा उल्लेख केला ..शेरकर काकांचे डोळे चमकलेले दिसले ..म्हणाले ...बहुतेक त्यांचे इथून पळून जाण्याचे प्लान चालले असतील ..हे तिघेही श्रीमंत घरचे आणि खूप लाडावलेले आहेत ..आपण हे माॅनीटरला सांगितले पाहिजे ..मला शेरकर काकांना आपण हे उगाच सांगितले असे झाले ..कारण प्रकरण आता माॅनिटर पर्यंत गेले असते ..मला उगाचच कशात अडकण्याची इच्छा नव्हती ..मी तसे शेरकर काकांना बोलून दाखवले ..' अहो तुम्ही कशाला घाबरता ..तुम्हाला काही होणार नाही ..उलट एक सावध नागरिक म्हणून तुमचे कर्तव्यच आहे वार्डात काही चुकीचे घडत असेल तर माॅनीटरला सांगणे ' ..शेरकर काका डोळे मिचकावत म्हणाले ..नाश्ता झाल्यानंतर माॅनीटरने मला ते तिघे कोण कोण होते हे विचारले ..मी नावे सांगितली ..मला ते नक्की काय बोलत होते ते माहित नाही ..त्यांना मी नाव सांगितले हे कळले तर ते उगाचच मला त्रास देतील असे माॅनीटरला म्हणालो ..त्याने तुमचे नाव कोणाला समजणार नाही अशी खात्री दिली मला ..तुम्ही घाबरू नका असा धीर देखील दिला ..
दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता ..पुढे काय होणार उत्सुकता देखील होतीच मनात ..तसे येथून पळून जाणे अजिबात सोपे नव्हते ..कारण बाहेर जाण्याचा एकच दरवाजा होता ..तो दरवाजा ऑफिसात उघडत असे ..ऑफिसमध्ये नेहमी एकदोन तगडे कार्यकर्ते बसलेले असत ..बाकी वार्डात सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..म्हणजे पळून जायचे तर आधी ऑफिसमध्ये जायला लागले असते .. जेव्हा केव्हा महिन्याभराचे किराणा समान येई किवा आठवड्याचा भाजीपाला आणला जाई तेव्हा काही लोकांना ते सामान टेम्पो मधून उचलून आणण्यासाठी म्हणून बाहेर नेले जाई ..मात्र त्यावेळी तेथे एकदोन कार्यकर्ते हजर असत..हे लोक कसे काय पळून जातील याचा विचार करून डोके शिणले माझे ..संद्याकाळी समूह उपचारांच्या वेळी सरांनी त्या तिघांना उभे केले ..म्हणाले .." घाबरू नका सगळे खरे खरे सांगा ..रात्री काय खलबते सुरु होती तुमची ..तुम्ही तिघे काय करत होतात बाथरूमच्या भागात ? ..तुम्हाला काहीही शिक्षा होणार नाही " यावर नागपूरचा असलेला गौरव म्हणाला " सर मेको हग्गी लगी थी..इसलिये मै वहा गया था " त्याच्या या बोलण्यावर सगळे हसले ..हा गौरव खूप लहान वयात बिघडल्याने तसा चेहऱ्याने खूप भोळाभाबडा वाटे ..तो नेमका काय म्हणत आहे ते सरांना बहुतेक समजले नाही ..' हग्गी लगी थी मधील ' हग्गी ' शब्द मलाही नवा होता ..सरांनी पुन्हा त्याला विचारले ...नीट सांग मराठीत काय झाले होते तुला ? तर म्हणाला मला ' हागरी ' लागली होती ..पुन्हा सगळे हसू लागले ..मग समजले की त्याला ' हगवण ' लागली होती असे तो सांगत होता ..पुढे काय झाले ते सांग मला ..तू ' हग्गी लागली म्हणून तिथे गेला होतास .तर आत संडासात न जाता बाहेर काय बोलत बसला होतास या दोघांसोबत ? काय रे तुम्हाला दोघांना पण ' हग्गी ' लागली होती का ? सरांनी थोडे दरडावून विचारले ..गौरव तसा लेचापेचा निघाला ..तो पोपटा सारखा बोलू लागला ..म्हणाला मी तेथे गेलो तेव्हा हे दोघे पळून कसे जायचे याचा प्लान करत होते .मलाही यांनी थांबवले ..म्हणाले जेव्हा केव्हा आता भाजी आणायला बाहेर नेले जाईल तेव्हा आपण तिघेही जाऊ ..आणि बाहेरच्या अंगणात गेलो की संधी साधून पळून जाऊ ..' सरांनी त्यांना खाली बसायला सांगितले अन म्हणाले ' हे बघा इथून पळून जाण्याचे विचार मनात येणे साहजिक आहे ..कारण आपल्याला इथे असणारी शिस्तबद्धता आवडत नाही ..सकाळी लवकर उठण्यापासून सुरु होणारा इथला दिनक्रम पार पाडणे जीवावर येते बहुतेकांच्या ..परंतु मित्रांनो हे सगळे आपल्याच भल्यासाठी आहे हे विसरता कामा नये ..पळून गेलात तरी तुम्ही शेवटी घरीच जाणार ..घरचे लोक आम्हाला कळवतील तसे ..पुन्हा आमची गाडी येईल तुम्हाला न्यायला ..पूर्वी अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत ..शिवाय तुमच्या सोबत बाहेर लक्ष द्यायला उभे असणारे कार्यकर्ते इतके लेचेपेचे समजू नका ..ते देखील पूर्वी तुमच्यासारखेच होते ..ते अतिशय सावध असतात ..ते लगेचच पाठलाग करून पकडतील तुम्हाला ..तुम्ही ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राच्या कैदेत नसून व्यसनाधीनतेच्या कैदेत आहात ..तेव्हा ' मैत्री ' मधून कसे बाहेर पडता येईल याचा विचार न करता व्यसनांच्या गुलामीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार कराल तर अधिक फायदा होईल ..
" व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने आपले काहीच चुकत नाहीय असे प्रत्येक व्यसनीला वाटणे स्वाभाविक आहे ..तो सहजासहजी उपचारांना तयार होत नाही म्हणून अनेकदा त्याला खोटे बोलून किवा जबरदस्तीने उपचारांना आणावे लागते ..पालकांचा तो नाईलाज असतो ..परंतु इथे दाखल झाल्यावर जर तुम्ही मनापासून उपचारात सहभाग घेतलात तर आपले काय चुकले ते नक्की ध्यानात येईल तुमच्या ..तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या पालकांनी तुम्हाला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला ते उगाच नाही ..त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे म्हणूनच काही पैसे खर्च करून ते तुम्हाला उपचारांना आणतात ..इथेही जर तुम्ही पूर्वीसारखाच नकारात्मक विचार केलात तर ..पुढे खूप नुकसानाला सामोरे जावे लागेल ..आम्ही सगळे या यातना भोगल्या आहेत ..तुम्हाला त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून आमची तळमळ असते ." .सर अगदी तळमळीने समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटले ..शेवटी त्या तिघांनी सरांची माफी मागितली ..आमचे चुकले अशी कबुली दिली ..प्रकरणावर एकदाचा पडदा पडला ..
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment