आत्मप्रौढी ..अहंकार ..आत्मक्लेश ..आत्मग्लानी वगैरे ! ( बेवड्याची डायरी - भाग ४६ वा )
सरांनी स्वतःमधील स्वभावदोष शोधून लिहिण्याबाद्दलच्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो तेव्हा ..सुरवातीला काय लिहावे तेच कळेना ..एक व्यसन करणे सोडले तर माझ्या स्वभावात फारसे काही दोष नव्हतेच ..उलट लहानपणापासून मी घरात आणि बाहेरही अतिशय गुणी मुलगा म्हणून वावरत होतो ..अभ्यासात ..खेळात ..बऱ्यापैकी प्राविण्य होते ...मित्र मंडळी व नातलगांमध्ये प्रसिद्ध होतो चांगलाच ...घरातही लाडका होतो सर्वांचा ..योग्य वेळी पदवीधर होऊन चांगली सरकारी नोकरी पण लागली होती मला ..स्वतःचा फ्लँट घेतल्यावर ..एक चांगले स्थळ म्हणून मला लग्नाच्या बाजारात मागणी होती ..मनासारखी पत्नी मिळेपर्यंत मी अनेक मुलीना नापसंत केले होते .. एकंदरीत सगळे छानच होते .. गडबड कुठून सुरु झाली असावी ते आठवेना ..आताशा गेल्या चारपाच वर्षात माझे दारू पिणे नियमित झाले होते ..तसेच कोटा देखील वाढला होता ..त्यामुळे अलकाची कटकट सुरु झाली की शब्दाने शब्द वाढून आमची भांडणे होत असत ..त्याला अलकाच जवाबदार होती असे माझे मत होते ..आपलं नवरा घरादारासाठी झटतो ..कष्ट करतो ..दिवसभर ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना ..तणावांना सामोरे जावे लागते त्याला ..तेव्हा रात्री थकून भागून घरी आल्यावर ..प्रेमाने विचारपूस करण्याऐवजी ..एकमेव विषय माझ्या दारू पिण्याचा ..हा विषय अजिबात काढायचा नाही असे अनेकदा बजावून सांगितले होते तिला ..तरीही ती माझ्या पिण्याचा विषय काढून भांडण ओढवून घेत असे ..मग मी चिडणे स्वाभाविक असे ..आणि रागाच्या भरात काही तोंडातून निघून गेले तर ..तिचा कांगावा ..रडणे .सुरु होई ..मुलेही घाबरून जात आमच्या भांडणाने ..मी तिला नेहमी सांगे ..तुला घरात काही कमी आहे का ? भौतिक सुखाच्या सगळ्या वस्तू आहेत ..त्यांचा छान उपभोग घेत आनंदाने राहायचे ..पण नाही ..एखाद्याचा स्वभावच कटकट्या असतो म्हणतात ना ..कोणताही विषय येवून जावून माझ्या दारूवर येई शेवटी ..अलीकडे तर..अलकाचे वागणे पाहून हिला एखद्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे कि काय असे मला वाटू लागले होते ..आझे आईवडील ..भावंडे यांचेही तसेच ..ते देखील जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा तेव्हा माझ्या तब्येतीबद्दल ..विशेषतः दारूबद्दल लेक्चर देत असत ..त्यांच्या अशा वागण्यामुळे मी त्यानाही हल्ली टाळत असे शक्यतो ..जगात बोलायला इतके विषय असताना यांना मात्र नेमके माझ्या दारूबर बोलायला का आवडते हा प्रश्नच होता मोठा ..मी दारू पिऊन कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..कधी कोणाकडे भिका मागितल्या नव्हत्या ..अथवा कधी दारूच्या नशेत रस्त्यावर ते झोपडपट्टीतले लोक करतात तसा तमाशा केला नव्हता ...तेव्हढे भान मला नेहमीच असे ..
लिहिता लिहिता मी एकदम थांबलो ..अरे ..आपल्या स्वताचे आत्मपरीक्षण करायचे होते ..इथे तर आपण अलकाचे परीक्षण लिहितोय ..शिवाय माझ्या वर्तनातील चुकीच्या बाजू न लिहिता ..माझ्याकडे चांगले काय काय आहे हे लिहित बसलो होतो ..ही तर आत्मप्रौढी झाली ..सरांनी सांगितले होतेच आपले दोष शोधणे अतिशय कठीण असते .." इतरांच्या डोळ्यातील कुसळ दिसते मात्र स्वताच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही " तसे..छे !..आपण समर्थनाचा वकील बाजूला न काढताच हे आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करून अलकाला दोष देत होतो ..आत्मपरीक्षण हे तटस्थपणे ..पारदर्शकतेने व्हायला हवे ..अगदी आठवते तेव्हापासून आपली नैतिकता शोधली पाहिजे ..मला काही सुचेनासे झाले ..नुसताच पेन हातात धरून बसलो ..मग आठवले ..लहानपणी एकदा मी रागाच्या भरात जेवणाचे ताट लाथाडले होते ..माझ्या आवडीची भाजी केली नव्हती म्हणून जेवण करणार नाही म्हणून हटून बसलो होतो ..बाबा रागावले मला त्यांनी अन्न हे पूर्णब्रम्ह असते त्याचा अपमान करू नये म्हंटले तेव्हा मी रागाने पानावरुन उठलो होतो ..उठताना चुकून झाले असे दर्शवत मुद्दाम पानाला लाथ मारली होती ..त्यावर बाबांनी एक झापड मारताच ..चुकून झाले तरी मला मारले म्हणून रडून खूप गोंधळ घातला होता ..कॉलेजला असताना ज्युनियर्सचे रँगिंग घेण्यात माझा पुढाकार असे ..एकदा एकाला आम्ही बळजबरी सिगरेट प्यायला पावली होती ..तो जेव्हा झुरका मारून ठसकत होता तेव्हा आम्ही खूप हसत होतो ..त्याची मजा घेत होतो ..तो मात्र डोळ्यात पाणी आणून विनवणी करत होता ..मित्रांमध्ये खर्चायला पैसे हवेत म्हणून मी अनेकदा बाबांच्या नकळत त्यांच्या पाकिटातले पैसे काढले होते ..चक्क चोरी केली होती ..लग्नानंतर देखील एकदोन वेळा अलकाच्या पर्स मधून मीच तिला घरखर्चासाठी दिलेले पैसे तिच्या नकळत काढले होते ..वर तिने विचारल्यावर हात वर केले होते ..तू वेंधळी आहेस ..हरवले असतील कुठेतरी म्हणून तिलाच दोष दिला होता ..अलीकडे माझ्या पगाराचा हिशोब तिला देणे बंद केले होते ..झालेली पगारवाढ तिच्यापासून लपवली होती ..अनेकदा आईची ..बाबांची ..अलकाची ..मुलांची खोटी शपथ घेतली होती उद्यापासून दारू नक्की सोडतो म्हणून ...अलकाला भांडणात अनेकदा तू घर सोडून जा आत्ताच्या आत्ता हे बजावले होते ..जणू ती माझी आश्रित असल्यासारखे वागवले होते तिला ..कामावरच्या पैश्यात अनेकदा थोडी गडबड करून चक्क पैसे खाल्ले होते ..म्हणजे खोटे हिशोब दाखवले होते ..हे सगळे नक्कीच नैतिकतेत बसणारे नव्हते ...
पुढे अनेक गोष्टी आठवू लागल्या मला ...एकदम भरून आल्यासारखे झाले ..बापरे .हे कधी शोधलेच नव्हते आपण ..अजून कितीतरी गोष्टी आहेत ..जेथे मी नैतिकतेची पर्वा न करता ..इतरांच्या भावना विचारात न घेता हवे तसे वर्तन केले होते ..वाट्टेल तशी दुरुत्तरे केली होती ..स्वताची चूक असूनही इतरांना दोष तिला होता ..माझे उच्च शिक्षण ...माझी नोकरी ..माझी कमाई ..माझा तडफदारपणा ..माझी हुशारी ..या बद्दल स्वतःवरच खुश राहून माझ्या वर्तनाचे समर्थन करत गेलो होतो ....मला खूप अपराधी वाटू लागले सगळे आठवल्यावर ..आपण खरोखरच खूप वाईट वागलो आहोत असे वाटले ..आईबाबांनी आपल्या जन्मानंतर किती स्वप्ने पहिली असतील आपल्यासाठी ..मात्र दारू प्यायल्यावर मी सरळ सरळ त्यांचा अपमान करत असे ..त्यांचे माझ्यावरील प्रेम ..माया याची पर्वा केली नाही ..,लग्नानंतर नवीन संसाराची स्वप्ने पाहिलेल्या अलकाला जेव्हा मी घरातून निघून जा ..असे मी म्हंटल्यावर किती क्लेश झाले असतील ? ..भावाने माझ्या दारू पिण्याबद्दल मला समजावले तेव्हा ..हा माझा पर्सनल मामला आहे ..त्यात तू दखल देवू नकोस असे सांगितल्यावर त्याला काय वाटले असेल ? एकदा सासरेबुवा घरी आले असताना मी अलकाशी भांडण करून तिचा अपमान केला असताना सासरेबुवा मध्ये बोलले तेव्हा त्यांना देखील ..नवराबायकोच्या भांडणात तुम्ही मध्ये बोलू नका ..तुमची मुलगी इतकी लाडकी असेल तर घेवून जा तिला असे बजावले होते ..मी एकदमच खिन्न झालो सगळे आठवून ..आता हे सगळे कसे लिहायचे ? असा प्रश्न पडला ..अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली ....शेवटी मी वही बंद केली ..उद्या लिहू असे म्हणत !
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment